नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संत रविदास यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी
संत रविदास येथे क्लिक करावे.
संत रविदास हे भारतातील महान संत, समाजसुधारक व भक्तकवी होते.
संत रविदास यांचा जन्म साधारणपणे इ.स. १५ व्या शतकात उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे एका चर्मकार कुटुंबात झाला असे मानले जाते. बालपणापासूनच त्यांना संतसंगती व भक्तीची आवड होती. त्यांनी मेहनतीने जीवन जगत भक्तीमार्ग स्वीकारला.
संत रविदास यांनी ईश्वरभक्तीला जीवनाचा मुख्य आधार मानले. त्यांच्या मते, परमेश्वराची खरी उपासना प्रेम, सेवा व समतेत आहे; बाह्य विधी, जात-पात किंवा कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे. त्यांनी “बेगमपुरा” नावाच्या आदर्श समाजाची संकल्पना मांडली. जिथे दुःख, अन्याय, भीती व भेदभाव नसतो आणि सर्वांना समान सन्मान मिळतो.
संत रविदास हे उत्कृष्ट कवी होते. त्यांची एक ओळ "मन चंगा तो कठौती में गंगा" म्हणजे जर मन पवित्र असेल तर सर्व तीर्थे आपल्या जवळच आहेत. त्यांच्या अनेक पदांचा समावेश शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये आहे, ज्यामुळे त्यांचा प्रभाव शीख परंपरेतही दिसून येतो. त्यांच्या रचनांमध्ये भक्ती, वैराग्य, सामाजिक समता आणि आत्मशुद्धीचे विचार प्रभावीपणे मांडलेले आहेत. त्यांच्या भाषेत साधेपणा, भावनात्मकता आणि जनसामान्यांना समजेल असा आशय आढळतो. संत रविदास हे प्रसिद्ध भक्त कवयित्री मीराबाई यांचे गुरू होते, असे मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मीराबाईंच्या भक्तीला दृढता व दिशा मिळाली.
संत रविदास यांनी अस्पृश्यतेला विरोध करून सर्व मानव समान आहेत, हा संदेश दिला. त्यांनी श्रमाचे महत्त्व, आत्मसन्मान आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला.
संत रविदास यांचे निधन साधारणपणे इ.स. १५२८ मध्ये झाले असे मानले जाते.
संत रविदास हे केवळ संत नव्हते, तर समाजाला दिशा देणारे महान विचारवंत होते. त्यांनी प्रेम, समता व भक्तीचा संदेश देत मानवतेचे मूल्य अधोरेखित केले. त्यांच्या शिकवणी आजही समाजात सलोखा, सद्भावना व न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.
हिंदू पंचांगानुसार, संत रविदास यांची जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते, जी यावर्षी दिनांक 01 फेब्रुवारी रोजी रविवारी जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - संत रविदास यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, वाराणसी काशी येथे संत रविदास यांचा जन्म झाला.
दुसरा प्रश्न - बालपणापासून संत रविदास यांना कशाची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, बालपणापासून संत रविदास यांना संतसंगती व भक्तीची आवड होती.
तिसरा प्रश्न - संत रविदास यांनी कोणत्या नावाने आदर्श समाजाची संकल्पना मांडली ?
बरोबर उत्तर आहे, “बेगमपुरा” नावाच्या आदर्श समाजाची संकल्पना संत रविदास यांनी मांडली.
चौथा प्रश्न - संत रविदास यांच्या शिष्या कोण होत्या ?
बरोबर उत्तर आहे, संत मिराबाई ह्या संत रविदास यांच्या शिष्या होत्या.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - संत रविदास यांची कविता कोणत्या ग्रंथात समाविष्ट केले आहे ?
बरोबर उत्तर आहे - शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात संत रविदास यांच्या कविताचा समाविष्ट केले आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment