Friday 12 January 2018

मकर संक्रांती निमित्त लेख

गोड गोड बोलण्याचा सण

नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. 
मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर  राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य या दिवशी  दक्षिणायनातुन उत्तरायनात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. याच दिवसापासून हिवाळा हळूहळू संपू लागतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. याच दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. 
इंग्रजी महिन्यानुसार मकरसंक्रांत हा दिवस १४  जानेवारी रोजीच येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एका दिवसानी पुढे सरकते. महाराष्ट्रात हा सण तीन दिवसात साजरी करण्याची पध्दत आहे. संक्रांतीच्या पूर्वी भोगी आणि संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांती म्हणजे कर सण साजरा केली जाते. संक्रांती सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातलग आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला तिळगुळ देतात आणि 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह, प्रेमात वाढ होण्याविषयी  शुभकामना दिली जाते. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. जीवनामध्ये नेहमीच आपणाला हा संदेश उपयोगात येऊ शकतो. जगात बंधुता निर्माण करायची असेल तर सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे. गोड बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही असे बोलणे होय. बहुतांश वेळा मोठ्या भांडणाचे मूळ जर शोधले तर ते बोलण्यावरुन घडल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे म्हटले जाते की, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. सतत आपले बोलणे चालू ठेवण्यापेक्षा फार कमी बोलल्यास त्याचा फायदा आपणास नक्की होतो. ' उचलली जीभ लावली टाळ्याला ' या म्हणीनुसार जर आपण बोलत असू, तर आपल्या बोलाण्याला काहीच किंमत उरणार नाही. त्यास्तव आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकही घर शोधून ही  सापडणार नाही, ज्यांच्या शेजारी शेजारी भांडण होत नाही. परंतु आपण आजच्या दिवसाचे तत्व वर्षभर अवलंबिले तर शेजाऱ्यांसोबत नक्कीच भांडणे होणार नाहीत. संकट काळात किंवा अडीअडचणीत आपणाला आधार कोण देतो ? तर तो असतो शेजार. घराला कुलूप लावून जायचे असेल तर आपण कुलुपाची  चावी कुठे ठेवणार ? दुपारच्या सुट्टीत घरी येणाऱ्या मुलांची व्यवस्था कोठे होते ? घरी वडील नसते वेळी घरात काही अपघात घडले तर कोणाला बोलवणार ? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबतात. म्हणून विशेष करून शेजाऱ्यांपाजाऱ्यांना नेहमीच गोड बोलणे फायद्याचे ठरते.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध येतो. जानेवारीच्या दिवसांमध्ये शेतातून उत्पन्न येण्यास प्रारंभ झालेले असते. शेतातून आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम करतात. हरभरे, उस, बोरे गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात तसेच सुवासिनीची ओटी ही भरतात. 
भारतातल्या विविध प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. जसे की उतर भारतातील हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये लोहरी या नावाने हा सण साजरा केला जातो. पूर्व भारतातीलआसाम राज्यात भोगाली बिहू असे म्हटले जाते. पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान मध्ये हा सणउत्तरायण म्हणजे पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो. आबालापासून वृध्दापर्यंत सर्वच जण खुप मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून धमाल करतात. भारताच्या दक्षिण भागातील तामिळनाडू राज्यात हा सणपोंगल या नावाने खुप प्रसिध्द आहे. भारतातल्या  इतरत्र भागात संक्रांती या नावानेच हा सण प्रसिध्द आहे. 
मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी यात्रा आयोजित केले जातात. प्रामुख्याने प्रत्येक बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी कुंभमेळा यात्रा, ज्याची बरेच जण प्रतिक्षा करतात. याशिवाय कोलकाता शहराजवळ जेथे गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. भारतातल्या विविध भागातील आणि प्रदेशातील लोक यादिवशी एकत्र येतात. भारतातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते. केरळ राज्याच्या शबीरमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. मकरसंक्रांत हा सण जरी एक असेल परंतु भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पध्दतीने सण साजरी करतात. त्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे एकमेकांना प्रेम देणे आणि घेणे. तेंव्हा चला तर मग पुढच्या मकरसंक्रांती पर्यंत काळजी घेऊ स्वतःची आणि हो शेजाऱ्यांची सुध्दा.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Thursday 11 January 2018

राजमाता जिजाऊ जयंती विशेष

आई असावी जिजाऊसारखी

कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते खरोखरच ज्यास आई नाही त्यालाच वरील ओळीचा अनुभव येईल. आईंची महती शब्दात व्यक्त करणे कठिण आहे. एक कवी आईला आपल्या कवितेत प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई असे संबोधतो. आपल्या जीवनाला वळण देणारी, आपले जीवन संस्कारक्षम करणारी म्हणजे आई. वडिलांचे संस्कार आपणास धाडसी करतात तर आईचे संस्कार आपणास मायाळू बनवतात. आईच्या वागणुकीवर मुलांचे वागणे अवलंबून असते. ज्या घरातील आई ही उद्योगी, सतत क्रियाशील, प्रेमळ, इतर लोकांना मदत करणारी असते त्यांची मुले सुद्धा त्याच वृत्तीची तयार होतात. या गोष्टीचा आपण कधीही विचार न करता लहान मुलांसमोर घरात वावरत असतो. लहान मुले टीप कागदाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात आणि त्याचे अनुकरण देखील करतात. प्रत्येक मुलांची कुटुंब ही पहिली शाळा आहे तर आई ही त्यांची पहिली शिक्षिका. वडील म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक समजू या. कुटुंबामधून मुलांना प्रत्येक गोष्टीचे संस्कार नकळत होत राहते. संस्कार जाणीवपूर्वक करता येत नाही मात्र तसे जाणीवपूर्वक वर्तन केल्यास मुलांवर नक्की फरक पडतो. कधी कधी आपण लहान मुलांसमोर नकळत खोटे बोलतो मग मुले ही खोटे बोलण्यास सुरुवात करतात. खोटे बोलू नका अशी आपली शिकवण असते आणि आपणच जर मुलांसमोर खोटे बोलत असू तर त्याचा खरोखर चांगला परिणाम बघायला मिळेल काय ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येते. कुटुंबातील शिक्षण हीच मुलांची खरी प्रगती दर्शवित असते. म्हणून तर शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात एखाद्या वेळी कुपुत्र म्हणजे वाइट मुलगा जन्मास येऊ शकतो मात्र कुमाता म्हणजे वाइट आई जन्मास येणे अशक्य आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांविषयी चांगले तेच पाहते.
जगात असे अनेक उदाहरण आहेत ज्या ठिकाणी आईच्या सहवासामुळे ते व्यक्ती महान झाले. ज्यात पहिले नाव येते अर्थात साने गुरुजी यांचे. यशोदा सारखी आई लाभली नसती तर कदाचित श्याम सारखा मुलगा पाहायला मिळाला नसता. तिच्या वागण्या बोलण्यातुन श्याम म्हणजे साने गुरुजी घडले. त्या नंतर दुसरे नाव आवर्जून घ्यावे वाटते ते म्हणजे विनोबा भावे. विनोबा लहान असताना त्यांची आई शेजारच्या लोकांना खूप मदत करीत असे. असाच एक प्रसंग विनोबाजी वर संस्कार करून गेला. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची. एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस. आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजा-याचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते. दुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी  नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले. विनोबाच्या मनात प्रेम, माया हे संस्कार त्यांच्या आईच्या वागणुकीतून रुजत गेले. सहज केलेले वर्तन बरेच काही शिकवून जाते. यांच्या आई सारखी आपली आई आहे काय ? मी श्यामची आई किंवा विनोबाच्या आई सारखी बनू शकते का ? याचा कधी आपण विचार करीत नाही. समाजात अजून एकनआई आहे ज्यांच्याकडे सर्वच जण आदर्श माता म्हणून पाहतो ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे यांच्याशी  दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीला रामायण आणि महाभारतातील शुर वीराच्या गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता इत्यादी गोष्टी सांगितल्या. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजीराजे घडले. जिजाबाईनी  नुसत्या याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर आपल्या शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस सुध्दा दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. राजमाता जिजाऊमुळे छत्रपती शिवाजी राजे घडले. म्हणून प्रत्येक जण म्हणतो की आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी. ज्याना कुणाला अशी आई मिळते त्यांचे जीवन खरोखरच धन्य होते. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Sunday 7 January 2018

सेमी इंग्रजीची समस्या

सेमी इंग्रजीची समस्या

राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.
इंग्रजी माध्यमासाठी सेमी इंग्रजी हा एक उत्तम पर्याय आहे असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. मात्र खरोखरच सेमी इंग्रजी आपल्या सर्वसाधारण आणि सरकारी शाळेतील मुलांसाठी फायदेशीर किंवा चांगले आहे काय ? यावर विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते. अन्यथा सेमी वर्गातील त्या विद्यार्थ्याचे एक वर्षाचे आयुष्य बरबाद झाले म्हणून समजा. त्या विद्यार्थ्याची अवस्था खुपच बिकट होते कारण त्याला मराठीचे अंक आणि त्याचे वाचन देखील कळत नाही. ही फार मोठी समस्या दिसत आहे. याही पेक्षा भयानक चित्र शाळेत दिसून येते. 
इंग्रजी माध्यमात जाणारी मुले मराठी शाळेत यावेत म्हणून सेमी इंग्रजी हा पर्याय काही वर्षापूर्वी राज्यात सुरु करण्यात आला. आजपर्यंत त्याचा आढावा घेण्यात आला नाही की सेमी इंग्रजी खरोखर प्रभावी आहे काय ? उच्च प्राथमिक शाळेत कदाचित सेमी योग्य आहे असे वाटते. मात्र प्राथमिक वर्गात या सेमीमुळे पूर्ण गोंधळ उडालेला आहे याची कोणालाही काही देणे घेणे नाही. त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत या सेमीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. प्रशासकीय आणि क्षेत्रीय अधिकारी मंडळीनी सरकारी शाळेत गेल्या दोन वर्षापासून कंपलसरी सेमी वर्ग सुरु करण्याची सूचना दिली. कोणतेही वर्ग सुरु करण्यासाठी संचालकाची परवानगी घ्यावी लागते. तर सध्या सरकारी शाळेत जे सेमी  इंग्रजी शाळा सुरु करण्यात आल्या त्यास संचालकाची परवानगी घेतली आहे काय ? अशी ही शंका राहून राहून पालकांच्या मनात येते. त्यामुळे प्रत्येक सरकारी शाळेत पहिल्या वर्गा पासून सेमीचा वर्ग सुरु करण्यात आला. सेमी म्हणजे फक्त गणित विषय तेवढा इंग्रजीत शिकवायचे आणि बाकी सर्व मराठीत. मुख्याध्यापकानी आपापल्या शाळेत सेमी सुरु केले पण आज एवढ्या अडचणीत सापडले आहेत की, काय करावे हे त्यांना सुचत नाही. पालकाना तर यातले काहीच माहित नाही. एका हुशार मुलाच्या पालकाने आमच्या एका सराजवळ तक्रार केली की, याला गणित काहीच येत नाही. सराना देखील आश्चर्य वाटले कारण त्याला गणितामध्ये सर्व येते. मग सर अंक दाखवून वाचन घेतले असता तो त्या अंकाचे वाचन इंग्रजीत योग्य करीत होता. पालकानी त्यावर म्हणाले हे बरोबर आहे सर पण मराठीत ओळखता येत नाही ना. पाच म्हणले तर त्याला कळत नाही, इंग्रजीत फाइव म्हणले की कळते. यावर शिक्षक म्हणाले हो बरोबर आहे तो सेमीच्या वर्गात आहे. त्याला इंग्रजी मधूनच शिकविण्यात आले. त्याला मराठीत कसे कळणार ? ही एक प्रमुख समस्या आज शिक्षक आणि पालकासमोर उभी आहे. वास्तविक पाहता इयत्ता पहिल्या वर्गापासून सेमीचा वर्ग सुरु करण्याची खरेच आवश्यकता होती काय ? तसे तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्णा मोरे यांनी सन 2000 या वर्षापासून इयता पहिली पासून इंग्रजी विषय अनिवार्य केले होते. त्या विषयाच्या माध्यमातून मुलांना इंग्रजीमधून अंक ओळख करता आली असती. त्यासाठी सेमी वर्ग सुरु केलाच पाहिजे असा प्रशासनाचा हट्ट कश्यासाठी ? हे न समझणारे कोडे आहे.
प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता - 
सेमी इंग्रजी वर्ग सुरु तर करण्यात आले मात्र त्या वर्गाला शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता सर्वत्र जाणवत होती. ही समस्या मात्र कोणी लक्षात घेत नाही. वर्गाला एक शिक्षक तर नाही उलट वर्गाची संख्या जास्त शिक्षकांची संख्या कमी यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतेच होते शिवाय सेमी इंग्रजी ही मराठी माध्यमातील शिक्षकांनीच शिकवावे म्हणजे किती शोकांतिका आहे. प्राथमिक शिक्षक सर्व काही करू शकतो ही भावना कुठे तरी कमी व्ह्ययला पाहिजे. इंग्रजी विषयाच्या माध्यमातून मुलांना इंग्रजीत अंक ओळख आणि वाचन करण्यास शिकविणे अवघड नाही. पण सेमी इंग्रजीचे भूत पालकांच्या मानगुटीवरुन उतरवणे आवश्यक. मातृभाषेतुन जेवढ्या लवकर आकलन होते तेवढ्या लवकर इतर कोणत्याच भाषेतुन होत नाही. बाकी इतर सर्व मुले मराठीत अंक वाचन करतात तेंव्हा सेमी वर्गातील विद्यार्थी बुचकळ्यात पडतात.
गणितासारखा विषय इयता पहिली पासून इंग्रजी मध्ये शिकविल्याने ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील आणि वंचित समाजातील मुले-मुली अशिक्षित राहण्याचा मोठा धोका निर्माण होऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक गळतीचे प्रमाण देखील वाढीस लागण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. प्राथमिक शिक्षणाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी न राहता तणावपूर्ण झाली आहे. प्रगत महाराष्ट्र मधील भावी पिढी शिक्षणापासून वंचित आणि अप्रगत राहू नये यासाठी प्राथमिक शाळा मध्ये सुरु असलेले सेमी इंग्रजी वर्ग तात्काळ प्रभावाने बंद व्हावे असे काही मराठी प्रेमी पालकाची मागणी अगदी रास्त वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
nagorao26@gmail.com

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...