Saturday 19 November 2016

सुंदरता महत्वाची की गुणवत्ता

*सुंदरता महत्वाची की गुणवत्ता*

शिक्षण आज गरिबासाठी नाही, असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. मुळात गरीब लोकांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण करायचे आहे ते ही खिशातील एक ही रूपया खर्च न करता. मग शासन ही शिक्षणावर तरतूद करायचे तेवढेच एवढे सोडून त्यासाठी वेगळा खर्च कशाला करेल. शिक्षक ही त्यासाठी वेगळा खर्च का करावा म्हणून शाळा जसे असेल तसे त्याचा स्वीकार करून आपले शिकवण्याचे काम करतात. शिक्षक आपल्या पगारातील पैसा आपल्या घराला लावतील शाळेला पैसा लावून त्यांना काय मिळतो ? याचा विचार ते करणारच. एक ना एक दिवस शिक्षकांची बदली होते मग शिक्षक कसा विचार करेल ? स्वतः च्या खिशाला चाट लावून शाळा सुधारणा करावी, शाळेला रंगरंगोटी करायची, शाळा स्वच्छ आणि सुंदर करावे आणि लगेच पुढील वर्षी बदलीचा आदेश येऊन धड़कतो मग आपले बस्तान उचलून दुसऱ्या गावी जावे. पुन्हा त्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करावे. या सर्व बाबीचा विचार करून सरकारी शाळा दिवसेंदिवस घाणीच्या विळख्यात सापडल्यासारखे वाटत आहे. त्यास फक्त सरकार हा एकच वाली आहे. गावात एखादा कार्यक्रम आहे तर घ्या शाळेच्या खोल्या आणि करा कार्यक्रम साजरा. शासनाचा कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आले की सर्वप्रथम दृष्टीस पड़ते ती म्हणजे शाळा. या व अश्या विविध कारणामुळे सरकारी शाळा नेहमी घाण होत राहतात आणि त्याची साफसफाई करण्याचे काम सेवक नसलेल्या शाळाप्रमुख म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक यांना करावे लागते. मैदानाच्या स्वच्छतेपासून तर शौचालयाच्या स्वच्छतेपर्यन्तची कामे एकट्या शिक्षक कम मुख्याध्यापकाना करावे लागते. शाळा कितीही स्वच्छ ठेवावे असे जरी म्हटले तरी स्वच्छ राहुच शकत नाही. सरकारी शाळेतील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर होतात. पगार होताना त्यांना कसलीच अडचण निर्माण होत नाही म्हणून यांची शाळा जरी घाण दिसत असेल तरी यांची स्वतः ची घरे मात्र अगदी पॉश असतात. त्यांना तसा राहण्याचा हक्क आहे मात्र जेव्हा पॉश घरातून घाणीच्या साम्राज्य मध्ये असलेल्या शाळेत त्यांचे जीव कसे रमत असेल हा एक मोठा प्रश्न आहे ? याची सोडवणूक कोण करावी शिक्षक, गावकरी की शासन यात ती शाळा मात्र आपले रूप बदलण्याच्या प्रतिक्षेत वाट पाहत उभी असते.
चित्राची एक बाजू अशी दिसत असेल तर चित्राची दूसरी बाजू सर्वाना आकर्षित करणारी आणि आखिव रेखीव असते.
त्याच राज्यात त्याच गावात दूसरे चित्र पाहिले की शाळेचा हवा वाटावे असे चित्र बघायला मिळते. आकर्षक ईमारत, रंगरंगोटी केलेल्या भिंती हे सर्व पाहून मन हरखून जाते. म्हणूनच प्रत्येक पालक या बाहेरून सुंदर दिसनाऱ्या शाळेकडे आकर्षित होतात. मात्र या शाळेची तुलना सरकारी शाळेसोबत करता येत नाही. त्याला कारणे भरपूर आहेत, जसे की, ही ईमारत म्हणजे स्वतः ची खाजगी मालमत्ता असते. त्यास मालक त्याच्या मनाला वाटेल तसे आकर्षक करू शकतो. आज शिक्षण हे एक व्यावसायिक रूप घेतले आहे आणि स्पर्धेत टिकून राहयचे असेल तर परिस्थिती पाहून काम करावेच लागते. नेमका हाच फरक सरकारी शाळेला लागू पडतो. सध्या लोक दुकान उघडल्यासारखे शाळा उघडत आहेत आणि दुकानदार जैसे गिरहाइक लोकांना आकर्षित करण्यासाठी रोशनाई करतो तसे रोशनाई करून पालकाना आकर्षित करत आहेत. मात्र यांना  शिकविणारे शिक्षक कोणत्या दर्जाचे आणि पातळीचे असतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की अध्यापन करण्याची पदवी किंवा पदविका नसणारे म्हणजे दहावी - बारावी पास-नापास मंडळी शिकविण्याचे काम करतात. यात त्या शाळा प्रमुखाची खूपच अक्कल हुशारी असते. ते म्हणजे ही मंडळी कमी पैशात उपलब्ध होतात त्यासाठी पात्र शिक्षक कशाला लागतात ? पहिलीच्या पोराला शिकवायला किती ज्ञान लागते ? असा विचार केल्या जातो म्हणून त्यांना कोणताही शिक्षक चालतो तो ही मजूरी प्रमाणे.  बेरोजगारने होरपळून निघलेले तरुण मिळालेल्या मानधन वर काम करण्यास तयार होतात. कारण त्यांना काम हवे असते. कामाच्या शोधात असलेल्या अनेक युवकांना ही मंडळी आयते वापरून घेतात. तंत्रशुद्ध पध्दतीने यांना शिकविता येईल काय ? याची खात्री नसते. शाळा प्रमुखाची मात्र या शाळेत उत्तरोत्तर प्रगती होते कारण मुले भरपूर पैसा देऊन शिक्षण घेतात त्याबदल्यात येथील शिक्षकांना तूटपुंजी पगार दिल्या जातो आणि त्यामुळे येथील शिक्षक जो झोपडीत होता तो आपल्या झोपडीतच राहतो. त्याची आर्थिक प्रगती काही होत नाही. कधी कधी तर घरची भाकर खाऊन त्यांची शाळा सांभाळण्याची वेळ सुध्दा येते हे सत्य नाकारुन चालणार नाही. शाळेला मिळत चाललेल्या यशात येथील शिक्षक मंडळीचा सिंहाचा वाटा असतो मात्र त्याचे फळ त्याला कधीच मिळत नाही हे ही खास आहे. येथील शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून काम करतो, शाळेला यशाच्या उच्च शिखरावर नेतो पण त्यांच्या पदरात काही पडत नाही, याची नेहमीच खंत त्यांच्या मनाला लागून राहते. ते बोलून दाखवू शकत नाही. कारण आजकाल शाळाप्रमुखाच्या विरोधात काही बोलले तर अंतर्गत त्रास दिला जातो किंवा लगेच बाहेरचा रस्ता दाखविले जाते. सरकारी व खाजगी शाळेचे चित्र जरी असे विसंगत दिसत असले तरी खाजगी शाळा बाहरसे सुंदर बदबू पूरा अंदर असण्याची शक्यता नकारता येत नाही आणि याउलट सर्वत्र घाण दिसनाऱ्या सरकारी शाळेतून सुध्दा चांगले विद्यार्थी घडू शकतात. जसे चिखलात कमळ उगवावे तसे एखादे कमळ येथे उगवते आणि त्याचा झगमगाट सर्वत्र पसरतो. म्हणून शाळेच्या बाह्य भागावरुन त्याचे गणित न मांडता खरोखर शाळेत किती चांगले शिकविले जाते आणि मुलांना किती चांगल्या प्रकारे संस्कार टाकल्या जातात ? या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 
   09423625769

Friday 18 November 2016

ए भाय जरा देख के चलो

*देशाचा विकासात रस्त्याची भूमिका*

नुकताच पावसाळा संपला आहे. यावर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे राज्यांतील मजबूत आणि दर्जेदार रस्त्याची पुरती वाट लागली. आज रास्त्यात खड्डे आहेत की खडड्यातुन रस्ता आहे हेच का
समजेनासे झाले आहे. राज्यात 6 हजार 357 किलोमीटरचे प्रमुख रस्ते आहेत जे की निश्चितच चांगल्या स्थितीत असेल, थोडी फार दुरुस्तीची गरज असेल. 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत तर 33 हजार 963 किलोमीटरचे राज्यमार्ग आहेत. या राज्यमार्गाची मात्र गेल्या दोन वर्षात बरीच दुरावस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील रस्ते आणि महाराष्ट्रातील रस्ते यांत जमीन आसमानचा फरक आहे. शेजारच्या राज्यात प्रवास करतांना आपण विमानात बसून प्रवास करीत असल्याचा भास होतो . रस्त्यांवर अजिबात एकही खड्डा दिसून येत नाही. याउलट आपल्या महाराष्ट्रात गाडी चालविताना वाहन चालकास विविध प्रकारच्या कसरती कराव्या लागतात. प्रवास करणारे व्यक्ती सुध्दा या खड्डातून प्रवास करतांना त्याच्या नाकी नऊ येते. खराब रस्त्यामुळे बरेच नुकसान होते, ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर चांगल्या रस्त्यांचे महत्व नक्कीच जाणवेल. 
देशाच्या विकासाची खरी सुरुवात ही खेड्यातून होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी खेड्याचे महत्व ओळखून होते त्यामूळे खेड्याकडे चला असा संदेश त्यांनी लोकांना दिला होता. जनतेनी मात्र बापूजीच्या या संदेशाचा दुसराच अर्थ काढला खेड्याकडे चला ऐवजी खेड्यातून चला असॆ म्हणत लोकांचा शहराकडे जाणारा लोंढा दिवसेंदिवस वाढतच आहे. खेड्यातून ही जनता शहराकडे का धाव घेत आहे ? या समस्येचा कोणी विचार करीत नाहीत की त्या समस्येवर काही उपाययोजना सुध्दा करीत नाहीत. प्रत्येक पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी मंडळी खेड्यातील भोळ्याभाबड्या जनतेला वेगवेगळी आश्वासन, वचने आणि आमिष देऊन मतदान प्रक्रियेपुरते मतदारांना राजा म्हटले जाते आणि एकदा निवडणूक प्रक्रिया संपली की विजयी झालेले लोकप्रतिनिधी पुढील पाच वर्ष आपल्या मतदारसंघाकडे ढुंकून सुध्दा पहात नाही. प्रत्येक गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीनी जाणिवपूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक आहे. विशेष करून प्रत्येक छोट्या गावात जाण्यासाठी चांगला पक्का रस्ता असणे अत्यंत महत्वाचे आहे. 
चांगल्या रस्त्यावरून प्रवास करतांना वाहन चालक आणि प्रवासी यांना खूप छान वाटते. दूरवरचा प्रवास सुध्दा सुखदायक वाटते. नियोजित स्थळी कधी पोहोचलो हे कळतच नाही. मात्र याउलट खराब रस्त्यावरून प्रवास करतांना खड्ड्यामुळे शरीराचा बुकणा होतो. थोड्याच प्रवासानंतर चालक थकून जातो. वाहने खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच सोबत जनतेला सुध्दा विविध शारीरिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खराब रस्त्यामुळे किंवा खड्डा चूकविताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. ज्यात लोकाना आपले अमूल्य जीव गमवावे लागले . म्हणूनच शक्यतो वाहन चालक आणि प्रवासी त्या खराब रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. जरी तो मार्ग 10 - 15 किलोमीटर दूर पडत असेल तरी दुसरा एखादा मार्ग निवडतात. वाहनाच्या ये - जा वर्दळ असल्यामुळे अनेक उद्योगधंद्याना प्रोत्साहन मिळते. लोकांच्या हाताला रोजगार मिळते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो. त्याच्या कुटुंबांमुळे गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा पर्यायाने राज्य आणि देशाचा विकास होतो, त्यांची प्रगती होते. गावाच्या विकासासाठी रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो. गाव ते शहर जोडणाऱ्या रस्त्यांवर सुरुवातीस लक्ष देऊन त्यांची दुरुस्ती करावी. दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता भासते. रस्त्याशिवाय गावाचा विकास आणि प्रगती अशक्य आहे. गावापासून तालुक्याला किंवा मोठ्या शहराला जोडणारी रस्ते हे अप्रत्यक्षरीत्या विकासासाठी हातभार लावतात. चांगल्या रस्त्यामुळे माणूस सहजरित्या त्यांना हवे असेल त्याठिकाणी तत्काळ पोहोचू शकतो. शेतकरी आपल्या शेतातील उत्पादन मोठ्या बाजारात सहजरित्या नेऊ शकतात. गावात कोणी आजारी किंवा अचानक बीमार पडल्यास रुग्णाना दवाखान्यात ने - आण करण्यासाठी रस्ता तो ही चांगला असणे गरजेचे आहे. शाळकरी मुलांसाठी जे स्कूल बस किंवा ऑटो चालविली जाते त्यांना सुध्दा या चांगल्या व खड्डेमुक्त रस्त्याचा फायदा होतो. एकूणच काय तर सर्वांनाच या खड्डेमुक्त चांगल्या रस्त्यांची आवश्यकता आहे. त्यशिवाय नागरिकांचे जीवन सुसह्य आणि आनंदी होणार नाही. 
आज राज्यांतील ग्रामीण भागातील गावाच्या रस्त्यांची स्थिती फारच बिकट आणि वाईट आहे. गावापासून तालुका किंवा जवळील शहराचा रस्ता जेमतेम दहा ते पंधरा किमी लांबीचा रस्ता असतो. मात्र एवढ्या कमी लांबीचा रस्ता सुध्दा नीट नसतो. अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे असतात, ज्याचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. त्यामूळे अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुध्दा वाढते. त्याचबरोबर वाहनाच्या आयुष्यासोबत वाहन चालविणाऱ्यां व्यक्तीचे आयुष्य सुध्दा कमी होते. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ताबडतोब दुरुस्त केल्या जाते मात्र जे लहान मार्ग आहेत त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. एकदा रस्ता बांधले की त्याकडे 15 - 20 वर्ष ढुंकून सुध्दा पाहिले जात नाही. खरे तर रस्ता पूर्ण झाल्यावर कमीत कमी चार पाच वर्ष त्या रस्त्यांची सुधारणा करण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीकडे द्यायला हवे. निदान तीन वर्ष तरी रोड टिकून रहावे. आजकाल असे रस्ते तयार होतात की त्याचे आयुष्य एक वर्ष ही नसते. टक्केवारी मिळविण्याच्या नादात राज्याचे काय हाल होत आहेत यावर विचार करण्यास कोणाला अजिबात वेळ नाही. गावाला जाणाऱ्या  रस्त्यांवर एक ही खड्डा नसेल तर येत्या तीन चार वर्षात महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात रस्त्याना अच्छे दिन मिळाल्यास जनतेला ही त्याचा फायदा होईल आणि देशाचा विकास देखील. परंतु हे होईल काय ? याबाबत लोकांच्या मनाता फार मोठी शंका आहे.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पैसा झाला खोटा

नोटावर बंदी ; बाजारात मंदी

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा हे लहानपणी गुणगुण करायचे गाणे आज सत्यात दिसून येत आहे. कारण यावर्षी पाऊस ही मोठा झाला आणि पैसा खोटा पण झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून इतिहास त्यांची आठवण करेल असे कार्य जरूर केले आहे. सध्या बाजारात पाचशे आणि हजाराच्या नकली नोटा भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचा वापर अतिरेकी, दहशतवादी मंडळी करीत असल्याचा तर्क लावण्यात येतो. त्याचसोबत काही श्रीमंत मंडळीकडे हा पैसा कपाटात बंद अवस्थेत असल्याची शक्यता सुद्धा धरण्यात आली, कदाचित ते सत्य ही असेल. रुपयाची घसरत चाललेली किंमत, वाढत चाललेला चलन फुगवटा आणि वाढीस लागलेले त्याचे गैरप्रकार त्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. या सर्व बाबी वर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधानानी उचललेले हे पाऊल कठोर आहे पण देशाला निश्चित अशी दिशा देणारी ठरेल की नाही हे येणारा काळ ठरवेल. आत्ताच त्याविषयी काही भविष्य वर्तवणे योग्य ठरणार नाही. 
ह्या निर्णयामुळे मात्र ज्यांच्या जवळ गडगंज संपत्ती आहे त्यांच्या कपाळावर आठ्या दिसत आहेत. पैसेवाल्यांची सर्व बाजूनी कोंडी झाल्यासारखे वाटत आहे. बाप दाखव नाही तर श्राध्द कर अशी स्थिती या लोकांची झाली. गोरगरीब लोकाजवळ पैसाच नाही तर कशाची काळजी लागली, पण पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे सर्वांची गोची मात्र झाली. रात्रीच्या वेळी घोषणा झाली त्यावेळी सर्व लोक निद्रिस्त अवस्थेत म्हणजे जागे नव्हते. ज्यांच्या जवळ शंभर, पन्नास, वीस आणि दहा च्या नोटा होत्या, त्यांचा व्यवहार सुरळीत चालत होते किंवा चालले. पण ज्यांच्याकडे फक्त पाचशे आणि हजाराच्या नोटा होत्या त्यांची विविध ठिकाणी पंचायत झाल्याचे दिसून येत आहे.
श्रीमंत लोकांना नोटा बदलायांची काळजी लागली तर सामान्य लोकांना व्यवहार करण्याची. सर्वसाधारणपणे लोकाकडे व्यवहारासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा होते. प्रत्येक जण सांभाळण्यासाठी सोपे म्हणून या नोटा ठेवत होते. त्याचा फटका मात्र सामान्य लोकांना बसला. नोटा बंद करताना लोकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी सरकारने घ्यायला हवी होती, ती घेतली नाही असे प्रथमदर्शनी वाटते. पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वापरत होत्या. त्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे ठप्प दिसत होते. कुठेही जा चिल्लर पैशाच्या समस्या जाणवत होते. बाजारात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होते. आज ना उद्या बाजार सुरळीत होईल असे म्हणता म्हणता दहा-पंधरा दिवसाच्या कालावधी संपला तरी ही बाजार सुरळीत झाला नाही. आज ही लोकांना पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याचे झळ पोहोचत आहे. नोटावार बंदी झाल्यापासून बाजारात मंदी आल्याचे व्यापारी वर्गातुन बोलले जात आहे, आणि ते सत्य आहे.
दोन हजार नोटाची समस्या -
पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून सरकारने दोन हजाराची नोट बाजारात आणली मात्र त्यामुळे लोंकाची अवस्था अजुन बिकट झाली. बाजारात अगोदरच शंभर आणि पन्नासच्या नोटा कमी त्यात ही दोन हजार ची नोट म्हणजे असून अडचन नसून खोलंबा अशी स्थिती झाली. गरज नसताना रूपयांची भरती करण्यासाठी काही वस्तू लोकांना विकत घ्यावे लागले. काही ठिकाणी लोकांना अरेरावीपणाचा ही अनुभव घ्यावा लागला. सरकारने ज्या ठिकाणी ह्या बंद नोटा चालतील असे सूचविले ती मंडळी देखील नोटा घेण्यास नकार देत असल्यामुळे संकटात अजुन भर पडली.  सर्वच जण आपल्या जवळ असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे पूर्ण गोंधळ उडाला, या बदल झालेल्या नोटामुळे एक बँक कर्मचाऱ्यासह संपूर्ण भारतात 23 लोकांचा बळी गेले आहेत, असे वृत्त वाचण्यात आले. ज्यामुळे त्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे यात शंकाच नाही.
आपल्या सरकारची ओळख दीर्घकाळ असावी म्हणून दोन हजाराची नोट चलनात आणली की काय असे ही वाटते. कारण या दोन हजाराच्या नोटावार स्वच्छ भारतचा संदेश लिहिण्यात आला आहे. वास्तविक पाहता चलनावर असे संदेश लिहिणे संयुक्तिक आहे का ? याचा ही कुठे तरी विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.
ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. नुकतेच एका वधुपिता असलेल्यां सेवानिवृत्त शिक्षकाचा नोटाच्या रांगेत उभे राहिल्याने मृत्यू झाला असल्याची बातमी खुप वेदना देऊन गेली.  तसेच ज्याचे कुणी जवळचे नातेवाईक किंवा घरातील मंडळी दवाखाण्यात आजारी आहेत त्यांचे हालबेहाल होत आहेत. अशाची समस्या सुटली तर लोकांना हायसे वाटत होते. जे कुणी सुट्टीचा काळ एन्जॉय करण्यासाठी परगावी गेले होते त्यांना ही फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. एवढ्या समस्याना तोंड दिल्यानंतर लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विषयी अनुकूल मत आहेत की प्रतिकूल हे येणारा काळ ठरवेल. मात्र गेल्या चाळीस वर्षात न केलेले काम हे सरकार करीत असल्याची भावना लोकामध्ये दिसत आहे. निदान शासनाने सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास जनतेला भविष्यात अजून चांगले दिवस नक्की बघायला मिळेल असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...