Friday 7 May 2021

08/05/2021 red cross day

।। रक्तदान ।।


काही गोष्टी अशा आहेत
जे तयार करता येत नाही
अन्न, पाणी, हवा नि रक्त
कोठेही निर्माण होत नाही

अन्नदान केल्याने व्यक्तीचे
एका वेळेचे पोट भरेल
पण रक्तदान केल्यामुळे
आयुष्यभर जीवन मिळेल

मानवाला जगण्यासाठी
खूप अनमोल आहे रक्त
माणसाच्या शरीरातच 
तो तयार होत असतो फक्त

रक्ताचे नाते असते घट्ट
जुळवून घेतो कोणालाही
जाती जमाती धर्म पंथ
पाहत नाही मुळीच काही

आजारी किंवा अपघातात
रक्ताची खरी गरज भासते
हिंडून हिंडून रक्त भेटेना
रक्ताचे महत्व तेंव्हा कळते

रक्ताचे आहेत अनेक प्रकार
जरी दिसत असेल ते लाल
रक्तगटानुसार जुळते रक्त
मिळत नसेल तर हालबेहाल

रक्त दिल्याने कमी होत नाही
रक्तदानाचे महत्व तुम्ही जाणावे
उलट रक्ताचे शुद्धीकरणासाठी
नियमित रक्तदान करत राहावे

ओ पॉजिटिव्ह जगाचा रक्तदाता
रक्तदानाने इतरांना होतो फायदा
रक्तदान हेच आहे जीवनदान
बी पॉजिटिव्ह राहावे सदासर्वदा

- नासा येवतीकर, 9423625769


Wednesday 5 May 2021

06/05/2021 N P Bendre

एक आठवण ........!

🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

श्री एन. पी. बेंद्रे
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
हु. पानसरे हायस्कुल धर्माबाद

माझ्या वडिलांचे वर्गमित्र ही सरांसोबतची पहिली ओळख झाली. पानसरे शाळेत खूप विद्यार्थी आणि खूप शिक्षक सारे बघून माझ्या मनात धडकी भरली होती. मात्र बेंद्रे सरांनी मला दिलासा दिला आणि काही समस्या आली तर मला येऊन भेट, काळजी करू नको असे ते म्हणाले. त्यावेळी ते उपमुख्याध्यापक या पदावर होते. मी दहावीला गेलो आणि त्यांच्याकडे मुख्याध्यापक पद आले. योगायोगाने माझ्या दहावीचा परीक्षा क्रमांक पानसरेमध्येच आला. त्यामुळे अजून थोडं बरे वाटले. कॉप्या करण्याचा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा परीक्षा खूप कडक होत होत्या. फक्त मनाला दिलासा म्हणून पहिल्या पेपरला वडिलांनी परत बेंद्रे सरांची भेट घालून दिली. त्यावेळी ते जे बोलले ते आज ही आठवते, " सायन्ना, अरे नागोराव खूप हुशार विद्यार्थी आहे. त्याची काळजी करू नको, तो छान पेपर सोडावेल, तू जा आता " त्यांचे पहिल्या पेपरच्या दिवशी बोललेले वाक्य शेवटच्या पेपरपर्यंत ऊर्जा देत राहिली. सर्वच पेपर इंग्रजीसह ( सर्वात जास्त भीती इंग्रजी विषयाची होती ) छान पैकी सोडविण्यात आले. परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही तर विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झालो. म्हणून धर्माबाद नागरपालिकेकडून सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यावेळी मी उपस्थित नव्हतो म्हणून बेंद्रे सरांनी माझ्या वडिलांचा सत्कार केला. एका वर्गमित्रांनी एका वर्गमित्रांचा त्यावेळी सत्कार केला हे पाहून दोघे ही आनंदी झालो असे वडिलांनी मला नंतर सांगितले. अकरावी, बारावी आणि डी एड पूर्ण करायला चार ते पाच वर्षे संपली. 
माझ्या वडिलांनी ईच्छा होती की मी पानसरे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करावी. योगायोगाने बेंद्रे सर त्यावेळी देखील मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. माझा मित्र तिथे आहे, मी बोलून पाहतो तू काळजी करू नको असे म्हणून त्यांनी बेंद्रे सरांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी अर्ज करायला सांगितलं. माझ्या SBC प्रवर्गासाठी एकच जागा होती. त्याच जागेसाठी मी प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज केला. निवड मंडळासारखी आधी लेखी परीक्षा झाली. त्यात मी टॉप मध्ये उत्तीर्ण झालो. नंतर वर्गावर शिकवणे झाले आणि प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाली. मुलाखतीला गेलो, समोर सर्व मला शिकवलेले शिक्षक बसलेले होते. माझ्यातली गुणवत्ता त्यांना थोडीफार माहीत होतीच. म्हणून प्रत्येकांनी एक एक प्रश्न विचारले मी पण समाधानकारक उत्तर दिलो आणि बाहेर पडलो. माझी निवड होईल असे मला वाटत होते. वडिलांनी बेंद्रे सरांना भेटून जागेविषयी विचारणा केली. तेव्हा बेंद्रे सरांनी परत एकदा म्हणाले, " सायन्ना, नागोराव हुशार विद्यार्थी आहे, तो जिल्हा परिषद मध्ये लागतो, इथे पैसे द्यावे लागतात, तुझी तयारी असेल तर सांग, मी बोलतो." यावर वडिलांची तयारी होती पण माझा नकार होता कारण मीपुणे निवड मंडळाची परीक्षा दिली होती आणि माझी निवड होईल याची मला खात्री होती. सायंकाळी आम्ही घरी परत आलो. ती जागा दुसऱ्याला मिळाली हे ही तिथेच कळाले. मला तेव्हा काही वाटले नाही, मी जरा देखील नाराज झालो नाही. 
दुसऱ्याच दिवशी निवड मंडळाची यादी लागली त्यात माझी निवड झाल्याची माहिती नांदेडहुन माझ्या वडील बंधूने कळविले. त्यावेळी माझ्या घरी लँडलाईन फोन उपलब्ध होते. निवड झाली पण किनवट तालुक्यात पोस्टिंग मिळाली हे ऐकून माझं जीव धस्स केलं. किनवटचे नाव ऐकून मला भीती वाटू लागली. पानसरे शाळेत नोकरी स्वीकारली असती तर बरं झालं असतं असे तेव्हा वाटू लागले. वडिलांनी बेंद्रे सरांना संपर्क केले, पैसे भरायची तयारी आहे, जागा आहे का ? यावर त्यांनी उत्तर दिलं " नाही, कालच ती जागा भरण्यात आली." मला किनवटला पोस्टिंग मिळाल्याचे त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी मला घेऊन भेटायला सांगितलं. माझं त्यांनी समुपदेशन केले आणि मी किनवटला जाण्यास तयार झालो. 
त्यानंतर खूप दिवसाचा काळ उलटला. सर सेवानिवृत्त झाले. मी आदिवासी भागात पाच वर्षे सेवा करून धर्माबादला बदली करून आलो. एके दिवशी रस्त्यात त्यांची भेट झाली. मी नमस्कार केलो. त्यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि जाता जाता म्हणाले, " नागोराव तू छान लिहितोस, मागे तुझा एक लेख पुण्यनगरी मध्ये वाचलं होतं, छान वाटलं, असेच लिहीत राहा " म्हणून आशीर्वाद दिले. नंतर जेव्हा केव्हा भेट व्हायची तेव्हा ते माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखांवर भरभरून बोलायचे. सर्वांची चौकशी करायची. मी पाहिलेला एक प्रेमळ माणूस म्हणजे एन पी बेंद्रे सर होय. गेल्या वर्षी काकू गेल्या आणि एका वर्षात सरांनी देखील या जगाचा निरोप घेतला. 

श्रद्धांजली लिहितांना देखील डोळ्यात अश्रू दाटत आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो. 

- नासा येवतीकर, धर्माबाद

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...