Monday 19 June 2023

ललाटरेषा ( Lalatresha )

            कथा - ललाटरेषा


( निवेदन :- या कथेतील पात्र आणि घटना सर्व काल्पनिक आहेत. यातील काही घटनेचा आपल्या जीवनाशी संबंध येत असेल तर तो निव्वळ योगायोग समजण्यात यावे. )

या कथेतील मुख्य पात्र, त्याचं नाव सुशांत, तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि चांगला पगार देखील मिळवितो. दुसरे पात्र म्हणजे त्याची पत्नी तिचे नाव सुमती असून ती चांगली गृहिणी, चांगल्या स्वभावाची पण जरा आळशी आहे. दोघांचा स्वभाव मात्र एकसारखा आहे तो म्हणजे माझे तेच खरे आहे. नशिबात जे काही घडणार आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी काही गोष्टी निमित्तमात्र असतात. म्हणूनच कोणाच्या नशिबात काय लिहिलं आहे ? कोणाची ललाटरेषा कशी आहे ? हे कोणी ओळखू शकतो किंवा सांगू शकतो का ? नाही ना ! प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे. यावर आधारित ही कथानक आहे, मला आशा आहे ही कथा आपणांस हे नक्की आवडेल. तेव्हा चला वाचू या .....!

पहिला भाग 

तालुक्यापासून बरेच दूर अंतरावर असलेल्या एका छोट्याश्या गरीब कुटुंबात सुशांतचा जन्म झाला. तसे ते कुटुंबात सर्वात शेवटचे पुत्र रत्न, त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. म्हणजे छोट्याशा घरात आई-वडील आणि पाच भावंडे असे एकूण सात जण राहत होते. काम करणारे हात एक आणि खाणारी तोंडे मात्र सहा यामुळे सुशांतच्या वडिलांची घर चालविताना ससेहोलपट व्हायची.
त्यांचे राहते घर म्हणजे काय ते घर होते काय ? ती एक झोपडीच होती. पावसाळ्यात तर पावसाचे पूर्ण पाणी त्या झोपडीत यायचे, हिवाळ्यात हवेतील गारवा झोपडीत शिरायचं आणि उन्हाळ्यात तर सारेच मंडळी झोपडीच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आपले बस्तान मांडलेले असायचे. पाऊस, थंडी, वारा आणि ऊन याची त्यांना सवय झाली होती. सहन केल्याशिवाय पर्याय देखील नव्हता. सुशांतचे आई-वडील दोघेही दिवसभर शेतात काम करायचे. त्यांच्याकडे स्वतःची फार कमी शेती होती, त्यामुळे ते दोघे इतरांच्या शेतात मजुरी करायचे. मिळालेल्या पैशात आपले घर चालवित असत. घरच्या गरिबीमुळे दोन भाऊ व दोन बहिणींनी गावातल्या शाळेत शिक्षण घेऊन थांबले आणि आई-वडिलांच्या कामात मदत करू लागले. कमावणारे हात वाढले म्हणून घरात थोडी फार लक्ष्मी येऊ लागली होती. काही वर्षानंतर त्यांनी झोपडीच्या जागी दोन खोल्याचे बांधकाम केले. थोडीफार शेती देखील खरेदी केले. गरिबीचे दिवस जाऊन जरा चांगले दिवस त्यांच्या जीवनात येऊ लागले होते. सुशांत त्यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण घेत होता. कमीतकमी सुशांत तरी शिकून मोठा व्हावा म्हणून घरातील सर्व मंडळी दिवसरात्र मेहनत करीत होती. जास्तीत जास्त पैसा कमावून आपली प्रगती करत होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग दुसरा

सुशांतची मोठी बहीण उपवर झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी वर संशोधन करण्याचे काम चालू झाले होते. एकदा तिचे लग्न जमले तर सुशांतच्या मोठ्या भावाचे देखील सोयरीक जुळवून दोघांचे लग्न एकाच मंडपात करावे असा विचार त्याचे आई-वडील करत होते. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन स्थळ बघितली पण कोणाचीही सोयरीक जुळत नव्हती, त्यामुळे जरा परेशान झाले होते. चिंताग्रस्त दिसत होते. शेतकरी बापाची ही पोरं, घर ही जेमतेम त्यामुळे कोणीही येऊन नाक मुरडून जायचं. सुशांतच्या मामाला दोन मुली होत्या त्यातील एका मुलींसाठी त्यांनी मागणी घातली होती पण ते विचार करून सांगतो असे कळवून चार-सहा महिन्यांचा काळ उलटला तरी त्यांचे उत्तर काही मिळत नव्हते. गावातीलच एका गृहस्थाने सुशांतच्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवलं. ते गावातच होतं. पण यांच्या घरापेक्षा गरीब होतं म्हणून ते स्थळ नाकारत होते. मात्र त्याला इलाज नव्हता म्हटल्याप्रमाणे शेवटी सुशांतच्या आई-वडिलांनी त्या स्थळाला होकार दिला. त्याच गृहस्थाच्या मध्यस्थीने मावळ्यांच्या घरी देखील भावाची सोयरीक जुळली.
दोघा बहीण-भावाचे लग्न एकाच मंडपात करून एक मुलगी सासरी गेली तर दुसरी सून म्हणून घरात आली. आपल्या भावाची मुलगी म्हणून सुशांतच्या आईने तिला आपली लेक समजत होती. मात्र दोन-चार महिन्यात तिने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. नवऱ्याला गोडी गुलाबी ने बोलून वेगळं राहण्याचं सोंग करू लागली. आपण दिवसरात्र मेहनत करायची आणि यांचं घर चालवायचं हे चालणार नाही. असे म्हणून ती घरात त्रागा करू लागली. शेवटी मुलगा आणि सून तरी आनंदात राहावं म्हणून त्या दोन खोलीपैकी एक खोली त्यांना देऊन एका खोलीत आता ते पाच जण राहू लागले. दोन वेगळे चूल मांडले गेले. एकीकडे खाण्याचे वांदे होऊ लागले तर एकीकडे गोड धोड, चंगळमंगळ खाल्ले जाऊ लागले. सुशांत त्यावेळी माध्यमिक शिक्षण घेत होता. सुट्टीच्या दिवशी तो देखील कामाला जाऊन कुटुंबाच्या खर्चाला हातभार देऊ लागला. घरातले पाच ही जण काम करू लागले आणि घरात लक्ष्मी यायला वेळ लागला नाही.
सुशांत माध्यमिक परीक्षेसाठी तयारी करू लागला होता. महत्वाचे वर्ष असल्याने तो कुठेही कामावर न जाता शाळा-अभ्यास करू लागला. दहावीच्या परीक्षेत तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण घेण्यासाठी घरातून विरोध होत होता मात्र धाकटी बहीण त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होती. अकरावी बारावी शिकून पुढे काय करावं ? हा प्रश्नच होता. ते नाही तर काय शिकावं ? घरातले सर्वजण तर अडाणी होते, त्यांना काही कळत नव्हते. कोणतं शिकावं ? काय करावं ? हे काही सुशांतला सुचत नव्हतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग तिसरा

दहावीच्या नंतर सुशांतला पुढं शिकायचं होतं मात्र त्यासाठी जो पैसा लागतो तो मात्र जवळ नव्हता. त्याच्या शाळेतील शिक्षकाने त्याला आयटीआय शिकण्यास सांगितले, त्याचे फायदे देखील सांगितले त्यानुसार तो आयटीआय शिकण्याच्या मनस्थितीत होता. त्याचवेळी त्याच्या घरात धाकट्या भावाच्या लग्नाची चर्चा देखील चालू होती. धाकटा भाऊ शेताची कामे सोडून जवळच्या शहरात किराणा दुकानात काम करत होता. त्यामुळे त्याची सोयरीक जुळविताना काही तेवढा त्रास जाणवला नाही. झट मंगणी पट ब्याह या उक्तीनुसार एका महिन्यात सोयरीक जुळली आणि लग्न देखील पार पडले. छोट्याशा घरात माणसाची गर्दी वाढली होती. धाकट्या भावाला आणि त्याच्या बायकोला त्या घरात राहणे जरा अवघडल्यासारखे होऊ लागले त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी त्याला त्याच शहरात एक खोली घेऊन राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी सुशांतला एक संधीची लकेर दिसून आली. मी पण दादा सोबत शहरात राहायला जातो आणि आयटीआय चे शिक्षण घेतो म्हणून तो हट्ट करू लागला. त्याच्या हट्टापायी आई-वडिलांने त्याला होकार दिला.
पावसाळा सुरू झाला, शेतीची कामे सुरू झाली आणि धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि सुशांत राहायला गेले. गावात इकडे आता तिघेच जण राहू लागले. आई-वडील शेतात काम करायला जाऊ लागले आणि धाकटी बहीण स्वयंपाक करू लागली. सुशांतला आयटीआय मध्ये सहज प्रवेश मिळाला. त्याचे कॉलेज घरापासून जरा दूर होते त्यामुळे तो एकदा सकाळी गेला की सायंकाळी घरी परत यायचा. सुरवातीचे काही दिवस त्याची चांगली सोय झाली मात्र हळूहळू त्याची त्या घरात गैरसोय होऊ लागली. धाकट्या भावाच्या बायकोला सुशांत अडचणीचा वाटू लागला. म्हणून त्याला ती मनासारखे जेवायला देत नव्हती आणि छोट्या मोठ्या गोष्टीवर त्याला खिसखीस करू लागली. धाकट्या भावाला दुसरे कारण सांगून सुशांतला बदनाम करू लागली. काही दिवसांतच सुशांत ते घर सोडून बाहेर पडला. त्यादिवशी खूप वाद झाला होता. म्हणून सुशांतने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तो गावी परत गेला. घरी गेल्यावर शहरात झालेली सर्व कहाणी सांगितली. त्याने एक जुनी सायकल विकत घेतली आणि घरून तो कॉलेजला जाऊ-येऊ लागला. शिकून भविष्यात आपण काहीतरी चांगली नोकरी करावी या हेतूने तो जिद्दीने शिकत होता. खूप कठीण आणि अवघड परिस्थितीत दोन वर्षात त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. या दोन वर्षात शहरात स्थायिक झालेल्या धाकट्या भावाने घराकडे एक रुपया देखील दिला नाही उलट गावकडूनच लागणारं रेशन घेऊन जात होता. त्यामुळे तर सुशांतला अजून राग यायचा पण नाईलाज होता. धाकट्या भावाच्या बायकोला आयतं कोलीत सापडलं होतं, घर सोडून शहरात राहण्याचा. त्याचा जास्तीत जास्त पैसा तुच्या राहण्या-सहाण्यावर खर्च होत होता. सुशांतला असे समजले होते की त्याला जुआ खेळण्याचा देखील नाद लागला होता. नोकरीमधून मिळालेले अर्ध्याहून जास्त पैश्याचा तो जुआ खेळत असे. कधी कधी जिंकत होता मात्र जास्तीत जास्त वेळा तर तो हारतच होता. काही दिवसांत त्याच्या घराचे दिवाळे निघाले आणि तो कर्जबाजारी झाला. माझं मला वाटणी करून द्या म्हणून त्याने अनेकवेळा सुशांतच्या वडिलांना भांडण केला होता. पण सुशांतचे वडील म्हणायचे,  जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही काही देणार नाही. अजून दोघांचे लग्न करणे बाकी आहे. तेव्हा तुमचे तुम्ही कसेही जगा. माझ्याकडे हात पसरू नका. आयटीआय केल्यामुळे एक-दोन महिन्यात त्याला मोठ्या शहरात नोकरी चालून आली. चार आकडी पगार होता आणि राहायला त्याच्याच कंपनीत सोय होती. लागलीच त्याने ती कंपनी जॉईन केली. त्यावेळी धाकट्या बहिणीला व आई-वडिलांना खूप आनंद झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग चौथा


सुशांत कंपनीच्या परिसरात राहू लागला. कंपनीकडून एक वेळचे नाष्टा, चहा, जेवण मिळत होते. सायंकाळी फक्त त्याला स्वतःला जेवण तयार करून घ्यावे लागायचे. काही दिवसात तो त्याठिकाणी चांगला रमला आणि काम देखील मन लावून करू लागला. इकडे गावात मोठ्या भावाच्या घरी पैश्याची चणचण भासू लागली. त्याला दोन लेकरं होती, त्याच्या शाळेचा आणि घराचा खर्च सोबत दवाखाना देखील लागला होता. मोठ्या भावाला बिडी पिण्याची खूपच सवय होती. एके दिवशी रात्री तो खूप खोकलत होता. खोकल्याची त्याला उमळ आली होती. शेजारच्या आई-वडिलांना त्याच्या खोकलण्याचा आवाज कानावर गेला. म्हणून त्याच रात्री ते त्याच्या घरात गेले. खोकलून खोकलून पार तो थकून गेला होता, त्याला धड बोलता ही येत नव्हते. त्याच्याशी जरा वेळ बोलून ते परत आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला घेऊन त्यांनी सरकारी दवाखान्यात गेले. तेथे सर्व बाबीची तपासणी केल्यावर कळाले की, त्याला टीबी झालंय. डॉक्टरांनी त्याची काळजी घेण्यास सांगितले आणि बिडी न पिण्याचे देखील सांगितले. बिडी सोडली तर काही काळ जगू शकतो आणि बिडी न सोडल्यास लवकरच तो आपल्या सर्वाना सोडून जाऊ शकतो. डॉक्टरांचे बोलणे ऐकून घेऊन आणि गोळ्या-औषध घेऊन ते घरी परत आले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर दिसत होती. कोणाला काही सुचत नव्हते. मुलाला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगावं असे त्याचे वय नव्हते तरी आई त्याला म्हणाली, बापू बिडी पिनं सोडून दे, चार दिस आमच्या सोबत लेकरा सोबत राहशील. सर्वजण आपापल्या कामाला निघून गेली. तो गावातील एका सवकाराकडे सालगडी म्हणून काम करायचा. त्या सावकाराला बिडी पिण्याची सवय होती. बिडीचा कट्टा आणून देण्याचे काम तो करत होता. एके दिवशी सहजच तो सावकार सोबत बिडीचा झुरका मारून बघितला. त्याला एकदम ठसका लागला, पण कसं तरी वेगळंच वाटलं. त्यानंतर तो रोज बिडीचे झुरके मारू लागला आणि त्याला बिडी पिण्याची सवय लागली. याच विचारात तो घरात एकटाच घराच्या छताकडे शून्य नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या संसाराचे विस्कटलेले चित्र उभे होते. माझ्या माघारी माझ्या लेकराचे काय होणार ? त्यांचे शिक्षण कसे पूर्ण होणार ? माझी बायको घर काशी चालवेल ? मी तर एक रुपया देखील बाजूला ठेवला नाही, माझे आई-बाबा त्यांना जवळ घेतील का ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. आजाराची आणि कुटुंबाची चिंता यामुळे दिवसेंदिवस तो अजून कमकुवत होत होता. त्याची पत्नी मिळेल ते काम करून कसेबसे आपले घर चालवित होते. अखेर तो काळा दिवस उगवला, त्यादिवशी तो रोजच्या प्रमाणे रात्रभर खोकलत राहिला. मध्यरात्र उलटली होती,  त्यावेळी त्याला जरा डोळा लागला. इतर मंडळी ही झोपी गेले. सकाळ झाली मात्र तो काही हालचाल करत नव्हता. रात्रीच्या गाढ झोपेत तो शांत झाला होता. त्याच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला. घरात दुःखांचे वातावरण होते. सुशांतला बातमी कळल्याबरोबर तो कंपनीत सुट्टी टाकून घरी परत आला. धाकट्या भावाला देखील ही बातमी कळाली पण तो कुठेतरी जुआ खेळण्यात व्यस्त होता. त्याला गावाकडे येण्यासाठी आणि मेलेल्या भावाचे शेवटचे मुख दर्शन घ्यावे असे देखील वाटले नाही. पूर्ण गाव त्याच्या अश्या वागण्याला आश्चर्य व्यक्त करत होते. निदान त्याची बायको तरी यायला हवी होती पण ती देखील अंत्यविधीसाठी आली नाही. आपल्या लेकराच्या अंत्यविधीला बापाला खांदा द्यावं लागतं आहे म्हणून बापाला खूप दुःख वाटू लागले. पण वेळच तशी आली होती. दोन लेकरं आणि बायको अनाथ झाली होती. सुनबाई ही सुशांतच्या आईच्या भावाची मुलगी होती म्हणून तिला खूप दया येऊ लागली. पण ती जरा जास्तच भांडकुदळ होती. आईच्या प्रेमाला तिने समजून घेतलं नाही उलट त्याचाच फायदा घेऊन ती वाटा देण्याविषयी वाद करू लागली. बापाला शेवटी नाईलाज होता. तिच्या माहेरच्या लोकांनी येऊन घरासमोर खूप नाटक केलं. हे सुशांतच्या वडिलांना पाहावलं नाही. त्यांनी काही दिवसांनी गावातील पंचासमक्ष मोठ्या भावाच्या हिश्यात जे काही येते ते देऊन टाकले आणि त्यांना कुठेही जाऊन जगण्यासाठी मोकळं केले. तिच्या माहेरची लोकं खूपच धूर्त होती. तिच्या नावावर सर्व काही करून घेऊन ते तिला आणि लेकरांना घेऊन आपल्या घरी आले. सुशांत हे सारं आपल्या डोळ्यासमोर घडतांना फक्त पाहत होता. तो लहान असल्याने त्याला काहीच बोलता येत नव्हते. काही दिवसानी सुशांत आपल्या कंपनीत काम करण्यासाठी निघून गेला.

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग पाचवा


मोठ्या मुलाचे असे अचानक निघून जाण्यामुळे सुशांतच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता, त्यात अजून एक धक्का म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत घडले. तिची गरिबी आणि त्यात नवऱ्याची वागणूक यामुळे ती नेहमीच त्रस्त राहायची. एक-दोन महिन्यातून एकदा तरी ती माहेरी यायची. नवऱ्यापासून होणाऱ्या त्रासाबद्दल आई-वडिलांना सांगायची. दिवसभर काम करून आलेला पैसा तो दारू पिण्यात टाकायचा. दारूच्या नशेत तिला काही बाही बोलून शिव्या शाप द्यायचा आणि काही वेळा मारझोड देखील करायचा. तिला एक मुलगा होता. ती देखील शेतात काम करायला जायची. तिच्या कामाचे पैसे देखील तोच घ्यायचा. घरात लागणारे रेशन कुठून आणू असा प्रश्न विचारला की, तो म्हणायचा, जा तुझ्या घरी आणि घेऊन ये तिकडून. नेहमीच्या या त्रासाला ती खूप कंटाळली होती. जेव्हा तो दारू पीत नाही त्यावेळी गोडी गुलाबीने बोलायचा. रात गई बात गई उक्तीनुसार रात्री काय बोललो आणि कोणते कृत्य केलोय याची त्याला काही आठवण राहायचं नाही. पण पश्चाताप वाटत राहायचं. हुई श्याम उनका खयाल आ गया म्हणजे जशी जशी सायंकाळ होऊ लागते तसे तसे त्याचे मन बेचैन होऊन जात असे. सूर्य मावळतीला गेलं की त्याचे पाय दारूच्या गुत्याकडे वळायचे. दारू ढोसून घरी आलं की, कधी जेवणावरून तर कधी दुसऱ्याच कारणावरून घरात वाद व्हायचे. त्या वादाचे कडाक्याचे भांडणात रूपांतर व्हायचं आणि मग तो आपल्या नवऱ्याचं मी पण दाखविण्यासाठी हातात असेल ती वस्तू फेकून मारायचा. बिचारा तो लहान मुलगा आपल्या वडिलांच्या या नाटकामुळे भिऊन लपून बसायचा. आपल्या वडिलांना साधे बोलण्याची देखील त्याच्यात हिम्मत नव्हती. तिच्या आई-वडिलांच्या देखील जावयाला चार लोकांत बसवून समजावून सांगितले होते पण त्याच्यात काही एक फरक पडला नव्हता.
त्या दिवशी देखील त्याने खूप दारू ढोसली आणि आपल्या घरी आला. रोजच्या प्रमाणे जेवणावरून जरासे वाद झाले आणि त्यानंतर वाद वाढला. तिला मारण्यासाठी तो उठून तिच्याकडे धाव घेतला तसा ती घराबाहेर पडली. तिच्या मागोमाग तो ही बाहेर पडला. दारू पिऊन तर्रर्र झाल्याने त्याचा तोल बिघडला आणि धाडकन खाली पडला. बाजूला असलेल्या एका दगडावर त्याचे डोके आपटले. डोक्याच्या मागच्या बाजूला जोरात आदळल्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध झाला. थोड्याच वेळात डोक्यातून रक्त वाहू लागलं हे पाहून ती जोरजोरात ओरडू व रडू लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं जमा झाले. त्यातील एकाने लागलीच ऑटो बोलावून त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत झाल्याचे सांगितले. डॉक्टरांचे बोलणे ऐकून ती तेथेच कोसळली. तो दारू पिऊन तिला काही ही बोलत होता, मारझोड करत होता तरी ही तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. तो कितीही वाईट असला तरी तिचा नवरा कुंकवाचा धनी होता. त्याचे असे अचानक निघून जाणे तिला सहन होत नव्हते. मोठा मुलगा जाऊन तीन महिन्यांच्या काळ उलटला नाही की जावई असा अपघाती निघून गेला. जावयाकडे स्वतःची अशी काहीच जमीन जुमला शेती घर काहीही नव्हते. त्यामुळे जावयाच्या मृत्युनंतर मोठी मुलगी आपल्या लेकरासह माहेरी येऊन राहू लागली. भाऊजी च्या अचानक जाण्याने सुशांतला देखील धक्का बसला. कंपनी मधून त्याला जो काही पगार मिळत होता, त्यातील काही रुपये जवळ ठेवून बाकीचे रुपये तो वडिलांकडे देत होता. आई-वडील आता थकायला आले होते. त्यांना पूर्वीप्रमाणे शेतीची कामे होत नव्हती. त्यामुळे सुशांतची नोकरी हेच एकमेव आधार होते. सुशांतची धाकटी बहीण उपवर झाली होती आणि तिच्या लग्नाची काळजी देखील वाटत होती. ती दहावी पर्यंत शिक्षण घेऊन कपडे शिवण्याचे काम शिकून घेतली होती. त्यामुळे आजूबाजूचे बायका तिच्याकडून शिवून घेत होते आणि घरच्या खर्चात तिचा देखील हातभार लागत होता. मोठा मुलगा वारल्यानंतर त्याची बायको आणि लेकरं तिच्या माहेरी गेल्याने बाजूची खोली मोठ्या मुलीला राहण्यासाठी दिली. आपापली कामे करून ती तेथेच राहू लागली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग सहावा

सुशांतच्या छोट्या बहिणीसाठी वर संशोधन चालू झाले होते. सुशांत देखील त्याच्या ओळखीच्या मित्राकडे बहिणी विषयी सांगून ठेवलं होतं. बहिणीला चांगल्या घरी द्यावं, त्यासाठी किती ही हुंडा द्यावा लागला तरी तो तयार होता. मोठ्या बहिणी सोबत जसे घडले तसे या बहिणी सोबत काही अनर्थ   घडू नये याची काळजी घेत होता. काही ठिकाणी यांना वर पसंत पडत होते तर तिकडून नकार मिळत होता. यांना एखादे स्थळ पसंतीस उतरत नव्हते ते होकार देत होते त्यामुळे ते धर्मसंकटात सापडत होते. सुशांतला कंपनीत काम करायला सुरू होऊन पाच वर्षे उलटली होती. त्याच्याकडे आता बऱ्यापैकी पैसा ही जमा झाला होता आणि त्याने पैश्यासोबत मित्र ही कमावला होता. सुशांत आपल्या नावाप्रमाणे सुशील आणि अगदी शांत स्वभावाचा तसेच इतरांना नेहमी सहकार्य करणारा असा होता. कधी कधी सुट्टीच्या दिवशी मोठ्या शहरात काही कामासाठी गेल्यास आपल्या कामासोबत इतर मित्रांचे काम देखील आवडीने आणि न विसरता पूर्ण करायचा. त्याच्या याच सवयीमुळे तो त्या कंपनीत सर्वाना हवासा वाटत होता. त्याच्या या सहकारी वृत्तीचा त्याला एक फायदा झाला. त्याच्या एका मित्राने सुशांतच्या बहिणीसाठी चांगले स्थळ सुचविले आणि सोबत एक अट देखील ठेवली की,  त्याच्या एका मित्राच्या बहिणीला सुशांतने लग्न करावं. एवढ्यात त्याला लग्न करायचे नव्हते त्यामुळे तो अट मान्य करण्यास तयार नव्हता. बहिणीचे लग्न झाल्यावर एक-दोन वर्षांनी मी लग्न करणार असा विचार सुशांतचा होता. मित्राची ही अट सुशांतच्या आई-वडिलांच्या कानावर गेली. तो एका सुट्टीत गावी आल्यावर आई-बाबांनी तो विषय काढला. आता तुझे ही लग्नाचे वय झाले आहे, किती दिवस असा एकटा राहणार आहेस म्हणून त्याची आई त्याला समजावून सांगू लागली. तो काही ऐकायला तयार होत नव्हता. त्यावेळी धाकट्या बहिणीने एक विलक्षण अट टाकली ज्यावर सुशांत काही म्हणू शकला नाही. ती म्हणाली, सुशांत तू लग्न केलंस तरच मी लग्न करणार. तिच्या या बोलण्यावर सुशांतला काही एक बोलता आले नाही. तो गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी मित्राला त्याची अट मान्य असल्याचे कळविण्यात आले. बहिणीसाठी अगोदर स्थळ बघण्यासाठी सारेजण गेले. चांगले घर होते, एकुलता एक मुलगा आणि पुण्यात एका कंपनीत काम करत होता. बघताक्षणी ते स्थळ सर्वाना पसंद पडले. त्यानंतर ते मित्राच्या मित्राच्या बहिणीला पाहण्यासाठी गेले. ते ही घर चांगले होते. मुलीचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी होते. मुलगी जीचे नाव सुमती होते, ती दिसायला सुंदर जरी नसली तरी नाका डोळ्यांनी सुरेख होती पण जरा स्थूल होती. सुशांतने आपल्या बायको विषयी जे स्वप्न पाहिलं होतं तशी ती स्वप्नातली परी नव्हती. तिथे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. त्यामुळे आई-वडिलांना ते स्थळ पसंत पडले. आई-वडिलांच्या आनंदासाठी त्याने देखील त्या स्थळास होकार दाखविला. काही दिवसांनी दोघांच्या स्थळांची बोलाचाली झाली. त्याला हुंड्यात आलेला सारा पैसा त्याने बहिणीच्या हुंड्यासाठी देऊन टाकला. सुशांत आज ज्या जागेवर उभा होता ते फक्त या धाकट्या बहिणीच्या पाठबळामुळे हे तो विसरला नव्हता. काही दिवसात त्याच्याच गावात बहीण-भावाचे लग्न सुरळीत पार पडले. अनेक लोकांच्या सांगण्यावरून धाकटा भाऊ आणि त्याची पत्नी लग्नाला आले होते. सारे घर पुन्हा एकदा भरून गेले होते. हे दृश्य पाहून आई-वडिलांच्या डोळयांत आनंदाश्रू वाहू लागले. सुशांतच्या चांगुलपणामुळे आज त्या घराला नवे घरपण मिळाले होते. गावातील प्रत्येक व्यक्ती सुशांतची प्रशंसा करत होते. इकडे धाकट्या भावाच्या मनात त्याची स्तुती व प्रशंसा डोळ्यात खुपत होती. लग्न होऊन पाच दिवस झाले नाही की, त्याने वाटणीचा मुद्दा सर्वांसमक्ष उपस्थित केला. धाकट्या मुलीचे लग्न झाल्यावर वाटणी पाहू असे त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे आता सुशांतच्या वडिलांचा नाईलाज झाला होता. लगेच गावातील पंच लोक एकत्र आले आणि वाटणी केली. त्यांच्याकडे एक दोन खोल्याचे घर होते आणि तीन एकर जमीन होती. यापलीकडे काहीच नव्हते. मोठा भाऊ वारल्यानंतर त्याला एक एकर तेव्हाच देऊन टाकण्यात आले होते. उरले दोन एकर त्यातील एक एकर धाकट्या भावाला आली. सुशांतने मात्र आपल्या वाटणीत जे काही मिळेल ते आई-वडील जिवंत असेपर्यंत त्याच्याकडे राहील असे सांगून टाकले. राहिला प्रश्न घराचा तर पंचांनी विचार करून निर्णय दिला की, त्याच्या मोठ्या बहिणीला एक खोली द्यावी आणि दुसरी खोली आई-वडिलांना द्यावी. धाकट्या भावाला वाटणी पसंत पडली आणि पंचासमोर त्या वाटणीवर सही करून शहरात निघून गेला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या घराची विभागणी होताना पाहून वडिलांना खूप दुःख वाटले पण सुशांतचा अभिमान वाटू लागला. लग्नासाठी घेतलेल्या सुट्ट्या संपल्यावर सुशांत कंपनीत काम करण्यासाठी आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी निघाला. आता त्या घरात आई आणि बाबा दोघेच राहणार होते. स्वतःची नीट काळजी घ्या, लागेल ते मी पाठवत राहतो, काळजी करू नका असे सांगून भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग सातवा

घरात सारे मुलं राहत असतांना घर कसं गोकुळ वाटत होतं. पण जसा काळ पुढे सरकत गेला तसं एक-एक जण आपापल्या मार्गाने सोडून निघून गेले. आता त्या छोट्याश्या घरात सुशांतचे आई-वडील दोघेच राहू लागले. बाजूला मोठी मुलगी व त्याचा एक मुलगा सोबतीला होता म्हणून थोडसं बरं वाटत होता. तो मोठ्या मुलीचा मुलगाच त्यांना लाडका झाला. घरातली छोटी छोटी कामे तो चुटकी सरशी पूर्ण करत होता. आजी-आजोबा या नात्याने त्यांनी देखील त्यालाच लळा लावू लागले. सुशांत अधूनमधून त्यांची चौकशी करत होता. महिन्याचे महिन्याला काही पैसे देखील पाठवत होता. आता त्या दोन जीवांना पैश्याची नाही तर मायेची व आपुलकीची गरज होती मात्र ती त्यांना मिळत नव्हती. सुशांतचे वडील कधी कधी शून्य नजरेत पाहत विचार करायचा तेव्हा त्याची आई त्याला म्हणायची, नका हो एवढं विचार करू, सर्वांच्या जीवनात असे प्रसंग येतात. सुशांतला कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी तेथे राहावेच लागते. त्याला त्याचा संसार देखील पहावा लागतो की नाही. तुम्ही एवढी काळजी नका करू. होईल सर्व ठीक. यावर तो चिंतीत मुद्रेत फक्त हुं एवढंच म्हणायचा आणि गप्प गुमान बसून राहायचा. माणूस काम करत राहिला तर वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. कामाविना बसून राहिलं की डोक्यात नाना विचार येतात असे तो नेहमी तिला बोलायाचा. यावर ती म्हणायची मग या वयात तुम्ही काय करू शकता ? कोणाच्या घरी सालगडी म्हणून राहता काय ? कोणी ठेवून घेतील का ? आता आपलं वय म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं आणि दिवस काढायचे. जेवण करताना दोघांचे संभाषण चालू होते. तिचं बोलणं ऐकून तो म्हणाला, मग असं करू या की, तू म्हटल्या प्रमाणे, देवाचे नामस्मरण करण्यापेक्षा देवाला भेटायला जाऊ या का ? यावर तिने प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, म्हणजे, मला नाही समजलं. यावर तो तिला समजाविण्याच्या सुरात म्हणाला, म्हणजे देवाच्या भेटीला पंढरपूरला जाऊ या. ते दोघे पांडुरंगाचे परमभक्त होते. ती जरा वेळ विचार केली आणि म्हणाली, सुशांत जाऊ देणार नाही, आपले दोघांचे थकलेले वय आहे, प्रवास शक्य होणार नाही, असे म्हणेल. यावर तो म्हणाला, तसं काही नाही, मी सांगतो त्याला, माझं तो नक्की ऐकतो. असे म्हणून जेवण आटोपल्यावर त्यांनी सुशांतला फोन लावला आणि पंढरपूरला जात असल्याबाबत कळविले. सुरुवातीला सुशांतने स्पष्ट नकारच दिला कारण सध्या पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप गर्दी आहे, या गर्दीत जाऊ नका, दिवाळीच्या सुट्ट्यात आपण सारे मिळून पंढरपूरला जाऊ या. सुशांतचे हे बोलणे त्याच्या वडिलांनी मान्य तर केले नाहीच उलट आषाढी एकादशीला गावातून महाराजांची दिंडी निघते त्यात आम्ही जाऊ. स्वतः भगवंत आम्हांला येण्यासाठी बोलावत आहे, तू नकार देऊ नको. वडिलांच्या या बोलण्यावर सुशांत निरुत्तर झाला आणि ठीक आहे, जाऊन या. असे म्हटल्यावर लहान मुलांना जसा आनंद होतो तसा आनंद त्या दोघांना झाला. कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा महाराजांना भेटून दिंडीत आम्ही पण येतोय हे सांगू असे त्यांना झालं होतं. त्याच आनंदाच्या भरात पांडुरंगाचे नामस्मरण करीत झोपी गेले.
पहाटे कोंबड्याचे आरवण्याने जाग आली. सकाळचा चहा पिऊन सुशांतचे वडील महाराजांकडे गेले. दिंडीत आम्ही नवरा-बायको येत असल्याची व सुशांतने होकार दिल्याचे देखील सांगितलं. महाराजांनी लगेच त्यांचे नाव दिंडीत समाविष्ट केले. आम्हाला पांडुरंग आजच भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. घरी येऊन सुशांतच्या आईला गोड वार्ता दिली, महाराजांनी आपले नाव दिंडीत घेतलं. तेव्हा घरात बाजूला राहत असलेली मोठी मुलगी होती. तिने ते ऐकलं आणि मी पण तुमच्यासोबत दिंडीत येते म्हणून विनवणी करू लागली. मुलीच्या इच्छेला नकार देणे खूपच अवघड गोष्ट असते. ठीक आहे, महाराजांना विचारून येतो म्हणून लगेच तो महाराजांकडे गेला आणि आमच्या सोबत मुलगी पण येणार आहे, तिचे ही नाव लिहून घ्या की यादीत म्हणून विनंती केली. यावर महाराजांनी होकार दिला पण मुलीच्या सोबत जो लहान मुलगा आहे, त्याचे काय ? यावर तो म्हणाला, तो पण येईल ना सोबत. आम्ही सांभाळून घेऊ. महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यांचे ही नाव यादीत समाविष्ट केले. दोन-चार दिवसात दिंडी पंढरपूर साठी निघणार होती. त्यांनी सारी तयारी पूर्ण केली. ते चार दिवस कसे संपले हे कळाले देखील नाही. गावातून दिंडी निघण्याचा दिवस उगवला. सुशांत सुट्टी घेऊन घरी आला होता. आई-बाबा, बहीण आणि भाचा यांना प्रवासात काळजी घेण्याविषयी सांगितलं. महाराजांनी एकच जयघोष केला, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ...... टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी गावातून बाहेर पडली. सर्वांनी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन सर्व वारकऱ्यांना निरोप दिला. पंढरीच्या वाटेने दिंडी चालू लागली आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना बोलावत आहे असे वाटू लागले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग आठवा

पाऊले चालती पंढरीची वाट, ज्ञानबा तुकाराम, अवघी विठाई माझी, विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात महाराजांची दिंडी मजल दर मजल करीत पंढरपूर च्या दिशेने निघाली. सुशांतचे आई-वडील सकाळच्या प्रसंगी दोन-तीन तास पायी चालायचे आणि नंतर त्याच्यासोबत असलेल्या गाडीत बसून राहायचे. सोबत लहानगा देखील असायचा. रात्रीला मुक्कामाच्या ठिकाणी महाराज कीर्तन करायचे, सोबती मंडळी भजन करायचे, त्या दिंडीत एक विलक्षण अशी शक्ती होती. तहानभूक सारे विसरून मंडळी तल्लीन व्हायचे. भक्तांच्या पोटाची चिंता पांडुरंगाला असायची. दिंडी ज्या गावात मुक्कामी राहणार त्या गावात दिंडी पोहोचेपर्यंत रात्रीचे जेवण तयार असायचे. जेवण एवढं सुंदर व्हायचं की कोणी त्याला नावं ठेवू शकत नव्हते. चालून चालून थकल्याने सर्व मंडळी मोकळ्या पटांगणात निद्रिस्त व्हायची. ना विंचूची भीती ना सापाची. पांडुरंगावर दृढ विश्वास ठेवून ही मंडळी घराबाहेर पडतात. नाना प्रकारची लोकं, वेगवेगळ्या स्वभावाची मंडळी भेटतात आणि त्यांना जवळून अनुभव घेता येतो. सकाळी झुंजूमुंजू च्या वेळी उठायचं आपले सकाळचे कार्यक्रम आटोपते घेतले की दिंडी निघाली पुढच्या मुक्कामाला. असे करत करत दहा-बारा दिवसात महाराजांची दिंडी एकदाची पंढरपूरला पोहोचली. पुण्य अश्या पावन पंढरपूर भूमीत पाय ठेवल्याबरोबर मन अगदी शांत आणि तृप्त होऊन जाते. पंढरपूर मध्ये माणसाचे महापूर आलंय की काय एवढी गर्दी. तरी देखील त्यांच्यात जी स्वयंशिस्त आहे ना ती कोणामध्ये दिसत नाही. थोड्याफार चोरीचे प्रकार होत असतील ही पण इतर काही प्रकार आजपर्यंत घडला नाही, पुढे घडणार देखील नाही. जो तो एकमेकाला माऊली नावाने हाका मारत प्रेमाने वागणूक देण्याची परंपरा फक्त इथेच पाहायला मिळते. पांडुरंग म्हणजे अख्या महाराष्ट्रातल्या लोकांचं दैवत आहे. त्याच्या विषयी प्रत्येकाच्या मनात एक विलक्षण ओढ असते. जन्मात येऊन एकदा तरी पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकाला वाटते. पंढरपूरला गेल्यावर एवढ्या गर्दीत पांडुरंगाचे दर्शन होईल काय ? हा प्रश्न देखील मनात येऊ द्यायचा नाही. कारण तो स्वतःहुन दर्शन करवून घेतो. पंढरपूरला गेल्या गेल्या दिंडी एका मोकळ्या जागेवर आपले निवास तयार केली. साऱ्या मंडळींनी चंद्रभागेत जाऊन डुबकी मारली आणि मग दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबली. मंदिरात खूप गर्दी होती. दर्शनासाठी किती वेळ लागेल याची कोणालाही माहिती नव्हती. एक तास दोन तास म्हणता म्हणता बारा तास उलटून गेले. रांगेत कोणालाही थकवा जाणवत नव्हता ना कंटाळा आला होता. वारकरी टाळ-मृदंगाच्या सुरात भजन गात होती, इतर मंडळी त्याला साथ देत होती अशी ही दर्शनाची रांग पुढे पुढे जात होती. सलग पंधरा तासांनी त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांत साठवून घेऊन आणि पदस्पर्श करून लेकरांना सुखी ठेव एवढं मागणी मागून ते दर्शन घेऊन बाहेर पडले. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना धन्य धन्य झाले असे वाटले. मंदिराचा परिसर फिरून बघितला. छोट्या लेकराला काही खेळणी घेऊन दिलं आणि आपल्या निवासाकडे परतले. विठ्ठलाच्या भेटीसाठी पंधरा दिवस कसे संपले हे कळालेच नाही. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पुढच्या वर्षीच्या वारीत पुन्हा येऊ असा एकमेकांना निरोप देत त्यांची परतीची यात्रा सुरू झाली. 

ही सारी मंडळी वारीसाठी पंढरपूरला गेलेली होती आणि या पंधरा दिवसात गावात मात्र वेगळंच नाटक घडलं. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग नववा 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावातील लोकांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुशांतचा धाकटा भाऊ जो की शहरात राहत होता, तो गावी आला. त्यांच्या नावाने एक एकर शेत होतं, ते शेत विकण्यासाठी तो गावात आला होता. त्याचे शेत विकत घेण्याची ऐपत फक्त एकाच व्यक्तीची होती तो म्हणजे गावाचा सावकार. त्याने थेट सावकाराचे घर गाठले. सावकार आपल्या ओसरीत बसले होते. सावकारला नमस्कार घालून त्यांच्याकडे येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर सावकारांनी त्याचे शेत घेण्यास सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता. त्याचे कारण सावकाराला चांगलेच ठाऊक होते, हा शेत विकून आलेला सारा पैसा जुआ मध्ये टाकतो. शेत विकत घेण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला पण सावकाराने त्याचे शेत घेण्यास शेवटपर्यंत नकारच देत राहिला. अगदी उदास आणि नाराज होऊन तो सावकाराच्या घराबाहेर पडला. गावाच्या बाहेरील मारोती मंदिराच्या पारावर बसला. गावात शेत विकत घेऊ शकेल असा कोणी ही नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. काय करावं ? हे त्याला सुचत नव्हतं. तेवढ्यात गावातील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि त्याच्या नाराजीचे कारण विचारलं, त्यावर त्याने शेत विकायचे आहे पण सावकार घेत नाही म्हणाला, गावात दुसरा कोण आहे ? यावर तो व्यक्ती म्हणाला, गावात एक माणूस आहे जो की, तुझे शेत विकत घेऊ शकतो, नुकतेच त्याला शासनाकडून मोठी रक्कम मिळाली. त्याचे शेत समृद्धी महामार्गात गेल्याने सरकारने त्याच्या शेतीची भरपाई म्हणून मोठी रक्कम दिली होती आणि तो शेतीच्या शोधात आहे. हे ऐकून त्याचे डोळे चमकले, कोण आहे तो सांग की. यावर ती व्यक्ती म्हणाली, मी त्याचे नाव सांगतो, त्याच्या घरी देखील घेऊन जातो, पण शेत विकल्यावर मला दहा हजार रुपये द्यावे लागतील. तात्काळ त्याने होकार दिला. दोघे मिळून त्या माणसाच्या घरी गेले. त्या व्यक्तीने सारी हकीकत सांगितली. थोडीफार घासाघीस करून पाच लाख रुपयाला एक एकर विकत घेण्याचा करार झाला. बोलाचली पूर्ण झाली. शेतीचा बयाना म्हणून त्याने एक लाख रु. दिले. दुसऱ्या दिवशी शेती त्याच्या नावाने केल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे कबूल करून ते दोघे तिथून बाहेर पडले. एक लाख रूपयातील पाच हजार त्या व्यक्तीला दिला आणि उद्या शहरात या म्हणून तो निघून गेला. शहरात गेल्यावर त्याने अगोदर सोनाऱ्याचे दुकान गाठले आणि त्या पैशातून एक तोळा सोन्याचे दागिने तो घरी गेला. आपला नवरा कधी नाही ते आपल्यासाठी सोन्याचा दागिना घेऊन आला म्हणून ती जाम खुश झाली. ती आपणाला टोकू नये म्हणून त्याने बायकोला खुश करण्यासाठी ही चाल खेळला होता. त्यात तो यशस्वी देखील झाला. पैसे कुठून आले ? कसे आले ? याची काही चौकशी केली नाही. ती आपल्याच दुनियेत गर्क होती. 

दुसऱ्या दिवशी ते दोघे शहरात आले. ठरल्या करार पत्रकान्वये त्याने आपले एक एकर शेत त्या माणसाच्या नावाने करून दिला. आणि त्या माणसाने चार लाख रु. त्याच्याकडे सुपूर्त केले. लागलीच मध्यस्थी व्यक्तीला त्याने राहिलेले पाच हजार देऊन एकमेकांचा निरोप घेतले. अगदी आनंदात तो घरी गेला आणि जातांना बरेच काही खाऊ घेऊन गेला. स्वारी एवढी आनंदात का आहे ? याचा उलगडा तिला होत नव्हता. सायंकाळी चारच्या सुमारास ते दोघे बसून चवीचवीने खाऊ खाल्ला आणि मस्त मसालेदार चहा घेतला. त्या दोघांना स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटत होते. थोडा वेळ गप्पा झाल्यावर मी बाहेर जाऊन येतो म्हणून तो घराबाहेर पडला. घरातून बाहेर पडलेली स्वारी थेट जुआच्या अड्ड्यावर जाऊन थांबली. आज त्याच्या खिशात खूप पैसा होता. कचऱ्यावर कचरा पडतो तसे लक्ष्मी जवळ लक्ष्मी येते अशी एक म्हण त्याने ऐकली होती. आज आपल्याजवळ खूप पैसा आहे, तेव्हा भरपूर पैसा जिंकून जाऊ या इराद्याने तो डाव खेळण्यास बसला. जवळ पैसा जास्त असल्याने किती आले नि किती गेले याचा काही पत्ता लागत नव्हता. रात्र झाली. बायको घरी वाट पाहत होती, पण तो डावावरून काही उठत नव्हता. रात्रभर वाट पाहत ती तशीच झोपी गेली. सकाळ झाली, दुपार झाली, सायंकाळ देखील झाली. आता येईल तेव्हा येईल म्हणून ती वाट पाहू लागली. तो कुठे जातो, काय करतो, याचा तिला कधी ही काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे ती त्याला शोधणार तरी कुठं. फोन देखील लावून बघितला तो ही स्वीच ऑफ म्हणून दाखवत होता. आजची रात्र वाट पाहू म्हणून ती वाट पाहत राहिली. रात्रीचे आठ वाजले, दहा वाजले, बारा वाजले तरी तो आला नाही. काय झालं असेल ? कुठे गेला असेल ? याचा विचार करत , ती वाट पाहत तशीच झोपी गेली. यापूर्वी त्याने असे कधी केले नाही. सकाळ झाली, तेव्हा तिला जरा काळजी वाटू लागली म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्याना विचारून पाहिली. त्यापैकी एकाने सल्ला दिला की, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कळवलेले बरे राहील. त्याचा सल्ला ऐकून ती पोलीस स्टेशनला हरवल्याची बातमी द्यावी म्हणून गेली. ती पोलीस स्टेशनमध्ये गेल्याबरोबर हादरून गेली कारण पोलीस लॉकअप मध्ये तो दिसला. तो लगोलग त्याच्याकडे वळली आणि त्याची विचारपूस करू लागली. तुम्ही इकडे कसे काय ? तुम्ही काय गुन्हा केला ? म्हणून तुम्हाला लॉकअप मध्ये टाकले. एक नाही अनेक प्रश्न विचारलं, पण तो काही बोलत नव्हता. तिने सरळ तेथे उभे असलेल्या पोलिसांना विचारलं की यांना लॉक अप मध्ये का ठेवलं ? यांनी काय गुन्हा केला ? त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, रात्री जुआच्या अड्ड्यावर धाड पडली आणि तेथे तो जुआ खेळतांना सापडला म्हणून लॉकअप मध्ये टाकलं आहे. हाय रे देवा म्हणून ती  कपाळावर हात मारून रडू लागली. तेव्हा त्या पोलिसाने रडण्यासाठी मज्जाव केला व बाहेर जाण्यासाठी सांगितले. तसे ती बाहेर गेली. आजूबाजूच्या लोकांना ती विचारू लागली, नवरा जुआ खेळतांना सापडला आहे, त्याला बाहेर कसं आणायचं ? अनेक लोकं अनेक मार्ग सांगू लागले. त्यापैकी एकजण म्हणाला काही नाही साहेबाला थोडं विनंती करा आणि काही रुपये द्या ते सोडून देतील. पण साहेबाला मी कशी बोलणार, साहेबाला मी ओळखत नाही आणि माझी देखील तेवढी ओळख नाही असे म्हणाल्यावर तो व्यक्ती म्हणाला मी करतो ना हे काम, मला या कामाचे दोन हजार द्यावे लागतील आणि साहेबांना पंचवीस हजार रु द्यावे लागतील. हे ऐकून तिला प्रश्न पडला एवढं पैसा आणायचं कुठून ? ती व्यक्ती पुढे म्हणाली, त्याच्यावर अजून FIR झाला नाही आणि तो जर झाला तर तो सुटू शकणार नाही. त्याचे बोलणे ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली. काहीही करून पैसा आणावा लागेल हा विचार करतानाच तीन चार दिवसांपूर्वी त्याने दिलेला एक तोळा सोन्याच्या दागिण्याची आठवण झाली आणि ती त्या व्यक्तीला म्हणाली, मी पैसा आणून देते, तुम्ही त्यांना सहीसलामत बाहेर काढायचा तेवढं बघा. म्हणून ती धावत पळत आपल्या घराकडे गेली. संदूकमध्ये ठेवलेले ते सोन्याचे दागिने काढली आणि सोनाऱ्याचे दुकान गाठली. चिठी नाही चपाटी नाही म्हणून सोनाऱ्याने त्या दागिन्यांचे पाऊण रक्कम तिच्या हातात ठेवलं. ती रक्कम घेतली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. ती व्यक्ती तिची वाट पाहत तिथे झाडाखाली उभा होता. तिने त्याच्या हातात साहेबांचे व त्याचे अशी सत्तावीस हजार रुपये हातावर ठेवली आणि त्याच झाडाखाली बसली. तो पैसे घेऊन स्टेशनच्या मध्ये गेला. थोड्या वेळाने परत आला. काम झालं असे सांगितले. ती बाहेरच त्याची वाट पाहत राहिली. एक तास झाला असेल तरी तो बाहेर अजून आला नाही म्हणून त्याची काळजी वाटू लागली. पोलिसांनी त्याची कान उघाडणी केली आणि बायकोच्या तोंडाकडे पाहून साहेबांनी तुला सोडलं म्हणून लॉक अप मधून बाहेर सोडलं. तसा तो बाहेर येताना पाहून ती धावतच त्याच्याकडे गेली. दोघे मग आपल्या घराकडे निघाले. तो काहीच बोलत नव्हता. अगदी शांत गप्प गुमान होता. त्याला जुआ खेळतांना पोलिसांनी पकडलं हे लोकांना कळाले तर माझी काय इज्जत राहील असा तो विचार करत होता. तर त्याची बायको त्याला समजावित होती. घरी गेल्यावर तिने स्वयंपाक केली, दोघे मिळून जेवण केले आणि झोपी गेले. दिवसभराच्या त्रासामुळे ती थकली होती, तिला डोळा लागला. पण त्याला डोळा काही लागत नव्हता. 

पहिल्या दिवशी तो हरला होता पण त्यादिवशी त्याने बरेच पैसे जिंकले होते आणि त्याच्याकडे पैसा भरपूर दिसत होता. हे कुणाच्या तरी डोळ्यात खुपले होते आणि त्याने पोलिसांना खबर दिली. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांची धाड पडली. त्यात सर्वजण पळून गेले मात्र हा सापडला. त्याच्याजवळ असलेला सर्व पैसा पोलिसांनी जप्त केला आणि त्याला अटक केले. हातात असलेला सारा पैसा गेला व नाव बदनाम झालं म्हणून तो रात्रभर विचारात पडला. असले जीवन जगण्यात काही अर्थ नाही म्हणून तो त्याच रात्री बाहेर गेला आणि घराशेजारील लिंबाच्या झाडाला फाशी घेतली. तिला पहाटे पहाटे जाग आली. आजूबाजूला तो दिसला नाही म्हणून तिने दार उघडले. दार उघडल्याबरोबर झाडाला लटकलेला तो दिसल्याबरोबर ती जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं ही आले. सर्वाना धक्काच बसला. याने आत्महत्या का केली ? याबाबत उलटसुलट चर्चा करू लागली. पोलीस स्टेशनला ती बातमी धडकली. लागलीच दोन पोलीस तेथे आले आणि झाडाला लटकलेला त्याचे शरीर खाली जमिनीवर टाकलं. जागेवरच पंचनामा करून पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आले. दोन दिवसांत तिच्या जीवनात अंधकार पसरला होता. सुशांतला ही बातमी कळाली तसा तो मिळेल त्या बसने पोहोचला. आई-वडील आणि बहीण पंढरपूरला गेले होते त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचविणे कठीणच होते. सुशांतने मग सर्व उत्तरक्रिया पूर्ण केली. सुशांतला आत्महत्येमागील कारण कळाल्यावर तो खूप दुःखी झाला. त्याच्या कर्माने तो गेला, जुआ खेळला नसता तर ही वेळ आलीच नसती असे मनातल्या मनात म्हणू लागला. 

क्रमशः

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग दहावा

पंढरपूरची वारी करून आई-वडील आणि मुलगी मोठ्या आनंदात घरी आले. घरी आल्याबरोबर त्यांच्या कानावर धाकटा मुलगा आत्महत्या केल्याची बातमी आली. तसे ते हादरून गेले. काय झालं ? म्हणून ते चौकशी केली पण कोणी पूर्ण माहिती दिली नाही. म्हणून जसे आले तसे शहराकडे निघाले. तिथे गेल्यावर कळाले की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या माहेरी गेली. तसे ते तिघे तिच्या माहेरच्या गावी गेले. धाकटी सून घरात एकटीच बसली होती. रडून रडून चेहरा खूप सुजला होता. आई-वडिलांना बघून तिला रडू आले. त्यांनी तिच्याजवळ बसून सांत्वन केले आणि अखेर हे कसे घडले याची विचारणा केली. तेव्हा तिला जे अर्धवट माहीत होतं ते तिने सांगितलं. त्याने एक एकर शेत विकली आणि आलेल्या पैश्यातून त्याने जुआ खेळला. एक तोळा सोन्याचा दागिना त्याच पैश्यातून घेऊन आला हे सारं तिला खूप उशिरा कळलं. तिच्याशी चार गोष्टी बोलून घरी चालण्यास विचारलं तर तिच्या आई-वडिलांनी आमची मुलगी इथेच राहील, असे सांगितले. यावर जास्त काही न बोलता ते तिथून निघून आले. पंढरपूरला जाऊन येईपर्यंत जो आनंद होता तो सारा आनंद क्षणात नाहीसा झाला. आपल्या डोळ्यासमोर मुलांचे निघून जाणे वडिलांना खूप जड जात होते. घरात उदासीचे वातावरण होते. तो कधीही घरावर माया लावला नाही, उलट त्रासच दिला होता. तरी त्याच्या अश्या अकाली जाण्याने सर्वाना धक्काच बसला होता. मधल्या सुट्टीच्या काळात सुशांत गावाकडे येऊन आई-वडिलांची भेट घेतली, त्यांच्याशी चार गोष्टी बोलून तो परत कंपनीत कामावर निघून गेला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. मोठ्या बहिणीच्या मुलाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठविणे गरजेचे होते. त्याला शहरात सुशांत जवळ राहायला पाठवू अशी आईची मनोमन ईच्छा झाली होती पण बहिणीची ईच्छा मुळीच नव्हती. घरात या विषयावर खूप चर्चा झाली. त्याला कारण ही तसेच होते. 

सुशांत आणि सुमती यांचे लग्न होऊन पाच वर्षांचा काळ लोटला पण त्यांच्या घरात अजून पाळणा हलला नव्हता. सुरुवातीचे दोन वर्षे काही वाटले नाही परंतु जसे जसे दिवस सरू लागले तसे तसे काळजी वाटू लागली होती. मूल व्हावे म्हणून अगदी सुरुवातीला त्याच्या आईने अनेक वैद्य व पूजा अर्चा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अनेक दवाखान्यात चकरा मारल्या. जे कुणी एखाद्या अमुक ठिकणी जा तेथे नक्की यश मिळेल असे सांगितले की ही जोडी त्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेऊन येत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत होती. याच गोष्टीवर त्या दोघात नेहमी वाद होत राहायचे. तो म्हणायचा तुझ्या दवापाणीवर माझा खूप पैसा खर्च होत आहे. तू काही वेळा औषध बरोबर घेत नाहीस. स्वतःची काळजी घेत नाहीस. तू खूपच आळशी आहेस. असे नाना प्रकारे तो बोलत राहायचा. मागील काही दिवसांपासून शांत स्वभावाचा सुशांत जरा चिडचिड करतांना दिसून येत होता. लेकरूबाळ होत नाही याचीच काळजी त्याला खात असावी, अशी त्याची आई त्याला नेहमी म्हणायची. म्हणूनच बहिणीच्या मुलाला आपल्या जवळ ठेवण्यासाठी त्याची आई त्याला अनेकदा बोलली पण त्याचे गावातील शाळा तर पूर्ण होऊ दे म्हणून आजपर्यंत चालढकल करीत चालला होता. खरं तर याच गोष्टीवर घरात त्या दोघांचे भांडण होत राहायचे. ती घरात कोणालाच येऊ देण्याच्या मनस्थितीत नाही हे आई-वडिलांना सांगता येत नव्हते. म्हणून तो आज उद्या करत पुढे ढकलत होता. पण पुन्हा तो प्रश्न आज निर्माण झालाच ......!

क्रमशः

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग अकरावा 

उन्हाळी सुट्या संपायला अजून काही दिवस शिल्लक होते. सुशांत आणि त्याची पत्नी सुमती या दरम्यान आपल्या गावी आलेले होते. आज घरात जरा तणावाचे वातावरण दिसत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी आईने विषय काढला. बहिणीच्या मुलांचं गावातील शिक्षण संपलं आहे तर त्याला तुम्ही घेऊन जा. आईच्या या बोलण्यावर सुमती उपरोधात्मक सुरात म्हणाली, त्यापेक्षा तुम्ही सर्वजणच चला की, तिथेच राहू, त्याचं शिक्षण देखील होईल. पण त्यावर त्यांनी नकार दिला. त्या विषयावर बोलता बोलता आईने सुमतीला न होणाऱ्या बाळाविषयी बोलली, एवढं वैद्य आणि दवाखाना केल्या पण हिला काही लेकरू होत नाही तेव्हा तू दुसऱ्या लग्नाचा विचार का करत नाहीस ? पाच वर्षात आईने असे कधीच बोलली नाही. आज तर तिने बॉम्ब टाकला होता. तिच्या बोलण्याने सुमतीच्या पाया खालची वाळू सरकल्यासारखं झालं. सुशांत आणि सुमती या विषयावर काहीच बोलले नाही. घरात थोडा वेळ नीरव शांतता होती. सगळ्याचे जेवण आटोपल्यावर जराशी विश्रांती घेऊन ते दोघे शहरात आपल्या घराकडे जाण्यास निघाले. जाता जाता आईने परत दुसऱ्या लग्नाचा विषय काढून त्यावर विचार करा अशी बोलली. 

सुशांत आणि सुमती सायंकाळी आपल्या घरी आले. आईच्या बोलण्यामुळे सुमती जरा नाराज झाली होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात आई कधी अशी बोलली नाही, याच वेळी का बोलली असेल ? यावर ती विचार करू लागली. दोघे ही अगदी गप्प होते. बोलायला सुरुवात कोण करणार ? याची ते वाट पाहू लागले होते. शेवटी सुमती म्हणाली, आज आई अशी का बोलली असेल बरं ? यावर सुशांत म्हणाला, हो, मला ही तिच्या बोलण्याचा जरा आश्चर्य वाटलं. 

मला वाटते मी तुमच्या बहिणीच्या मुलाला ठेवून घेण्यास नकार देत असल्याने आई अशी बोलली वाटते, ती म्हणाली

नाही, मला असे वाटत नाही. उलट मी आईला म्हणालो होतो, त्याचं गावातील शाळा संपू दे मग मी त्याला घेऊन जातो, तो म्हणाला.

पण मला तर तसंच वाटतंय, मी नकार दिल्यामुळे आई तशी बोलली. गेल्या पाच वर्षात मूल होत नाही म्हणून कधी अशी बोलली नाही, बोलता बोलता ती थोड्याश्या साशंक नजरेने सुशांतला म्हणाली, पण तुमच्या मनात तर नाही ना दुसरं लग्न करायचं. 

नाही, माझ्या मनात तसं काही विचार अजिबात नाही. पण मला वाटतं की, माझ्या बहिणीच्या मुलाला शिकण्यासाठी ठेवून घेण्यास तू होकार द्यावं, जरा लाडीगोडीत येऊन तो बोलला. यावर ती थोडा वेळ विचार केली, याच गोष्टीवर आईने दुसऱ्या लग्नाचा विषय काढला, ह्याच विषयावर जर सुशांतला जर नकार दिला तर त्याच्या मनात देखील दुसऱ्या लग्नाचा विचार येऊ शकतो. सवतीपेक्षा हा मुलगा परवडला म्हणून ती सुशांतच्या बोलण्याला होकार दिली. त्याबरोबर सुशांतचा चेहरा चांगलाच खुलला होता. सुमतीने सुशांतचा आणि त्याच्या आईचा डाव पक्का ओळखला होता. दुसऱ्या लग्नाचा विषय काढला की ती मुलाला ठेवून घेण्यास नक्की तयार होते आणि झाले ही तसेच. ती मनातून खूप नाराज झाली. मनात नसतांना सुद्धा त्या मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेण्यास तयार झाली. पण त्या परिस्थितीत तिच्याजवळ दुसरा पर्याय देखील नव्हता. काही दिवसांनी शाळा सुरू होणार होती आणि घरात एक पाहुणा म्हणून सुशांतच्या बहिणीचा मुलगा यांच्यासोबत राहायला येणार होता. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग बारावा 

सुशांत बाहेरच्या जगात खूप चांगला, शांत आणि सहकारी वृत्तीचा असला तरी घरात मात्र अगदी वेगळ्या स्वभावाचा होता. तो सुमतीला कधीच एका स्त्रीचा दर्जा दिला नाही. नेहमीच तिला टाकून बोलायचा. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय असते ? तिला ठाऊकच नव्हते. छोट्या कारणावरून तिला खूप बोलण्याची त्याला एकप्रकारे सवय लागली होती. घरात कुठे कचरा किंवा धूळ दिसलं की तो लगेच बोलायचा, आजकाल तू खूपच आळशी झाली आहेस, दिवसभर काय झोपा काढतेस की काय ? तुला हे धूळ आणि कचरा कसे दिसत नाही. त्याच्या अश्या बोलण्याने ती खूप नाराज व्हायची. पुढे चालून ती तेव्हा खूप दुःखी व्हायची ज्यावेळी तो तिच्या माहेरच्या आई-वडिलांच्या नावाने काही बोलायचा. तुझ्या आई-बाबाने तुला हेच शिकवलं का ? म्हणून तो नेहमी तिला बोलायचा. त्यादिवशी तर हद्द झाली, जेवणात एक केस निघालं म्हणून तो तिला खूप बोलला आणि सरळ तिच्या आई-बाबाला फोन लावून घरी बोलावून घेतलं. त्यादिवशी ती खूप रडली, कधी कधी तिचं काहीच कारण नसतांना तो तिला वाद करत होता. आई-बाबांनी तिला समजवून सांगितलं की, सुशांतच्या मनानुसार वागत जा, त्यांना दुःख होईल असं वागू नये, त्यांना जे आवडते त्याप्रमाणे करावे, थोडासा आळस बाजूला कर. असे नाना प्रकारे समजावून ते दोघे आपल्या घरी गेले. हे एका दिवसाचं नव्हतं तर चार-आठ दिवसातून एकदा हे वादळ असं चालूच राहायचं. गेल्या पाच वर्षात कदाचित तिला सवय झाली असेल म्हणून ती देखील तेवढं मनावर घेत नव्हती. कदाचित लेकरूबाळ नसल्याने तो असा चिडचिड करत असावा असे तिला आणि तिच्या आई-बाबांना वाटायचे. पण तसे काही नव्हते, त्याचा मुळात स्वभावच तसा होता. मी नवरा आहे आणि तू बायको आहेस. त्यांच्यामध्ये नवऱ्याचे मी पण स्पष्टपणे जाणवत होतं. नाहीतर बाहेर माणूस जसा वागतो, राहतो, बोलतो तसे घरात देखील असायला पाहिजे पण तसे दिसत नव्हते. त्यांच्याकडे पैश्याची कमतरता नव्हती तरीपण कधी बायकोला काय आवडते आणि काय आवडत नाही याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. उलट घरात माझ्या आवडीचे जेवण तयार करायला पाहिजे असा हट्ट मात्र असायचा. हौसेने कधी कोठे फिरायला नेलं नाही आणि स्वतः मात्र वर्षातून एकदा कंपनीतील मित्रांसोबत फिरायला जात असे. कपड्याच्या बाबतीत सुद्धा तसेच होते, ती साडी घेतो म्हटलं की, परवाच तर साडी घेतलीस ना. बघ साड्याने कपाट भरून गेले आहे. अजून किती घेतेस ? असे म्हणायचा आणि स्वतः मात्र वर्षातून दोन वेळेस दोन दोन ड्रेस विकत घ्यायची. आपली शान शौक पूर्ण करतांना एक वेळ सुद्धा आपल्या पत्नीचा विचार करीत नव्हता. अश्या विचित्र वागण्यामुळे ती पुरती कंटाळली होती. ह्या गोष्टी बाहेर कोणाला सांगता येत नाही. मूग गिळून गप्प बसून राहावे लागते. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितलं तर आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल. ती खूप विचार करायची आणि मोठ्या मनाने जाऊ द्या असे म्हणून दिवस काढत राहायची. तिला वाटायचं घरात आम्ही दोघेच असल्याने असे होत असेल कदाचित उद्या त्यांच्या बहिणीचा मुलगा भाचा आल्यावर तरी तो आनंदात राहील आणि मी देखील आनंदात राहीन अशी भोळी आशा तिच्या मनात होती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग तेरावा 

पावसाळा ऋतू सुरू झाला आणि शाळेला ही सुरुवात झाली. सुशांतच्या बहिणीचा मुलगा राजू माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी आपल्या मामाच्या घरी आला. शहरातील एक प्रसिद्ध आणि नामांकित शाळेत त्याला प्रवेश देण्यात आला. त्यानंतर बाजारात जाऊन त्याच्यासाठी दप्तर, गणवेश, वह्या, पुस्तक आणि इतर साहित्य खरेदी करून ते दोघे आपल्या घरी परतले. सुशांत आज थोडा आनंदात दिसत होता असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले. भाच्यासमोर जास्त काही न बोलता तो शांतपणे टीव्ही पाहत होता. सायंकाळ झाली. जेवण वगैरे झाल्यावर झोपी जाण्याच्या सुमारास राजुला त्याच्या आईची आठवणी येत होती म्हणून तो रडवेला चेहरा करून बसला होता. तो आजपर्यंत आईला सोडून कुठे राहिलाच नव्हता त्यामुळे त्याला आजचा दिवस खूपच जड वाटत होता. पण सुशांतने त्याला जवळ घेतले आणि आपल्याजवळ घेऊन झोपी गेला. मात्र सुमतीला अवघडल्यासारखे झाले. त्यांची राहायचे घर हे फक्त दोनच खोल्याचे होते. एका खोलीत स्वयंपाक करायचं आणि दुसऱ्या खोलीत उठणे, बसणे आणि झोपणे हे चालायचं. राजूच्या येण्याने त्यांची प्रायव्हसी संपली होती. कसेबसे पहिला दिवस संपला. सकाळी उठल्यावर सुशांत आणि राजू सकाळचे कार्यक्रम उरकून घेऊन तयार झाले. तोपर्यंत सुमतीने स्वयंपाक तयार केला. जेवण झाल्यानंतर डबा घेऊन सुशांत कंपनीला तर राजू शाळेला निघाले. मग सुमती आपल्या उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तयारीला लागली. हा एका दिवसाचा दिनक्रम तिचा रोजचा झाला होता. ती एखाद्या मोलकरीण प्रमाणे राब राब राबत होती. धन्यवाद चे एक शब्द ना सुशांत बोलत होता ना राजू. आठवड्यातून एक सुट्टी मिळते तर ती सुट्टी ते दोघे एकतर गावाकडे जायचे किंवा शहरात काही तरी खरेदी करण्यात घालवायचे. तिला मात्र घरातच बांधून ठेवल्यासारखं राहावं लागायचं. कधी तरी एखादे दिवस माहेरी जाण्याचा विषय काढलं की, राजुच्या जेवणाचा आणि डब्याचं काय होणार ? असे म्हणून नकार मिळू लागला. एक तर सुशांतसोबत दोन गोष्टी बोलता येत नव्हते आणि दोघांमधला एकांतपणा देखील संपला होता, यामुळे तिचा जीव मेटाकुटीला आला होता. पण ती काहीच करू शकत नव्हती. राजू शाळेला जाऊन आला की दप्तर एका बाजूला फेकायचा आणि मित्रांसोबत खेळत राहायचा. अंधार पडू लागला की घरी यायचा आणि टीव्हीसमोर बसायचा. मामा आता कंपनीतून येणार म्हटलं की तेव्हा तो पुस्तक घेऊन वाचन-लेखन करायचा. मामा घरी आल्यावर त्याला अभ्यास करताना पाहून आनंद वाटायचा. सुमतीने एके दिवशी त्याचे कारनामे सुशांतला सांगितले. शाळेतून आल्यावर तो काय काय करतो आणि अभ्यास तुम्ही येण्याच्या काही मिनिटे अगोदर सुरू करतो. सुमतीच्या या बोलण्यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. उलट तुझ्या मनात राजू विषयी खोट आहे म्हणून तू अशी बोलत आहेस असा तो म्हणायचा आणि इकडे राजूला अजून बळ मिळायचं. राजू बद्दल माझ्या मनात विष कालविण्याचं काम तू करत आहेस मात्र मी कधीच असे होऊ देणार नाही असे तिला बजावून सांगितले. अगदी सुरुवातीला राजू सुमतीला घाबरून राहत असे. पण काल झालेल्या घटनेमुळे राजू शेफारून गेला आणि आता सुमतीचे काही ऐकेनासा झाला. दुकानातून काही सामान घेऊन ये ? असे काम सांगितले तरी त्याकडे दुर्लक्ष करू लागला. याही पलीकडे जाऊन राजुने एक मोठे कारस्थान केले. सुमतीच्या विरुद्ध काहीबाही सांगून सुशांतचे कान भरले. शाळेतून आल्यावर मला चहा बिस्कीट देत नाही, भूक लागली म्हटलं तर जेवायला देत नाही, शेजारच्या घरी जाऊन घंटा बोलत असते असे अनेक कारणं सांगून त्याने सुशांतला भडकावून टाकले. म्हणजे एकप्रकारे राजुने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यादिवशी सायंकाळी आल्यावर राजुने मला टीव्ही पाहू दिली नाही म्हणून त्याने सुशांतला सांगितला. सुमती त्यावर काही तरी स्पष्टीकरण करणार त्यापूर्वीच तिच्या गालावर सुशांतने जोराची चापट मारली. गेल्या सहा वर्षात सुशांत खूप काही बोलला असेल पण असे हात कधीच उगारला नाही. पण आज भाचाचे बोलणे ऐकून माझ्यावर हात उगारले म्हणून ती दुसऱ्या खोलीत जाऊन बसली. घरात बराच काळ शांतता होती. जेवायची वेळ झाली. तरी सुमती जागेवरून उठली नाही की स्वयंपाक सुरू केला नाही. ती सुद्धा हट्टी होती. आज यांची खैर नाही म्हणून ती रुसून बसली. तेव्हा सुशांतच्या सांगण्यावरून राजू सुमतीजवळ आला आणि I am Sorry म्हणून कान पकडला. तशी त्याला बुद्धी सुचली नाही पण सुशांतचा इगो चा प्रश्न होता, तो कसा सॉरी म्हणेल. शेवटी तिने त्या लहान मुलाला भुकेला ठेवू नये म्हणून ताबडतोब खिचडी तयार केली. सर्वजण जेवण केले. जेवताना मात्र कोणीही बोलत नव्हते. सुशांतने राजुला समजावण्याच्या सुरात म्हणाला, लहान मुलांनी आपला अभ्यास पूर्ण करायचा असतो, टीव्ही पाहायचं नसते. राजू यानंतर टीव्ही पाहायचं नाही. मामी देखील तुला हेच म्हटलं असेल नाही का गं. यावर सुमती काहीच बोलली नाही. जेवण आटोपून घेऊन स्वयंपाक घर खोलीत जाऊन झोपली. ती डोळे मिटून घेतली आणि मनोमनी देवाच्या धावा करू लागली, पोटच्या लेकरांसाठी नवऱ्याचे मार खाल्ली तर मला वाईट वाटलं नसतं. पण मी त्याच्याच भल्यासाठी सांगायला गेलं आणि फुकटचा मार खाल्ला. देवा एवढी कठोर परीक्षा पाहू नको. पदरात फक्त एक मूल दे, बाकी तुला माझं काही मागणी नाही. देवाला आठवण करीत करीत ती झोपी गेली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग चौदावा

14

बघता बघता दोघांचे लग्न होऊन आठ वर्षे संपून गेले पण अजूनही घरात पाळणा हलला नाही. त्याच्या सोबत लग्न झालेल्या काही मित्रांना लेकरं झाली आणि ते शाळेत देखील जाऊ लागली. लेकरू व्हावं म्हणून  सुशांत आणि सुमती यांनी अनेक ठिकाणच्या दवाखानाच्या वाऱ्या केल्या. अनेक खाजगी उपचार केले. सुमतीने तर एवढा उपास तपास केला की,आठवड्यातले एक-दोन दिवसच ती जेवण करीत होती. बाकी सर्व दिवस कोणत्या ना कोणता देवाच्या वा देवीच्या नावाने उपवास करायची. पण अजून पावेतो त्यांना देवाने यश दिले नव्हते. राहूनराहून ही गोष्ट सुशांत पेक्षा सुमतीला अपार दुःख देऊन जात होती. प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी उत्सुकलेली असते, त्याशिवाय तिचे जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते. ज्यांना लेकरू होत नाही अश्या स्त्रियांना समाजात वावरताना अनेक गोष्टीला तोंड द्यावे लागते. पुरुष मंडळींना याचे काही सोयरसुतक नसते. याच जीवघेण्या अनुभवातून सध्या सुमती जात होती. आज तिच्या कानावर तर भलतेच ऐकू आले होते. सुशांतच्या आईने थेट तिला काही म्हटले नाही पण त्यांच्या शेजारी-पाजारी लोकांमध्ये ती सांगत सुटली की, सुशांतला आता लेकरूबाळ होत नाही, आता राजूलाच त्यांना दत्तक घ्यायला लावतो. ही वार्ता हळूहळू सुमतीच्या कानावर येऊन धडकली. तशी ती खूपच बेचैन झाली. काही दिवसापासून सुशांत देखील राजुच्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देऊ लागला असल्याचे जाणवत होते. कानावर आलेल्या बातमीची सत्यता कशी पडताळून पहावी ? याविषयी सुमती विचार करू लागली पण तिला काही तोडगा मिळत नव्हता. यावर्षी राजू दहावीची परीक्षा देणार होता. म्हणून तिने जेवता जेवता दहावीनंतर काय करायचा आहे ? असा सहज विषय काढला. पुढे इथल्याच शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पुढे शिकायचं आहे. असे राजुने आपले मत व्यक्त केले. त्यावर सुमतीला जराशी कुणकुण लागली की, आपल्या कानावर आलेली बातमी सत्य आहे. ती रोजच देवाकडे धावा करत होती. देवाला खूप विनवणी करत होती. राजुला दत्तक घेण्याच्या विषयावर सुशांत आणि सुमतीमध्ये खूपदा वाद झाले. आपण एखाद्या अनाथाश्रमातून एखाद्या वर्षाचे बाळ दत्तक घेऊ या असा विचार देखील तिने व्यक्त केला होता. पण त्यावर त्याने त्या अनोळखी बाळापेक्षा माझ्या ताईचा मुलगा काय वाईट आहे. तो गरीब आहे. त्याला एक सहारा मिळेल. त्याचे जीवन सुंदर होईल, तू असा का विचार करत नाही. शेवटी किती झालं तरी आपल्या रक्ताचं नातं आहे. यावर ती निरुत्तर झाली. देव वरचेवर परीक्षा कठीण करत आहे, असे तिला वाटू लागले. अजूनही तिचा देवावर विश्वास होता. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे तिचे दवाखान्यात जाणे-येणे चालूच होते. रुटीनप्रमाणे त्या दिवशी ते दोघे दवाखान्यात तपासणी करण्यासाठी गेले. डॉक्टरांनी तपासणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याची आनंदाची व गोड बातमी दिली. तब्बल आठ-नऊ वर्षानंतर तिला दिवस गेल्याची बातमी तिच्या तनामनाला आनंदाची लहर देऊन गेली. सुशांतला देखील खूप आनंद झाला. ही गोड बातमी त्याने आई-वडिलांना देखील कळविली. सारेच आनंदात होते फक्त काहीजणांना सोडून. डॉक्टरांनी गोड बातमी सांगितल्यापासून तिला तर स्वर्ग फक्त दोन बोटे उरली होती. देवाने शेवटी आपली हाक ऐकली, आपली मागणी पूर्ण केली म्हणून तिने देवाचे मनोमनी खूप आभार मानले. सुशांत देखील आपण बाबा बनणार असल्याची बातमी ऐकून मनोमन सुखावला होता. त्याच दरम्यान राजुची दहावीची परीक्षा संपली आणि तो सुट्टीमध्ये आपल्या गावी परत आला. सुमतीला आता विश्रांतीची आणि गर्भातील बाळाची काळजी घेण्याची आवश्यकता होती. तिथे राहून तिला कोणतेही काम करणे अशक्य होते. आपलं बाळ सुखरूप राहावे याची तिला चिंता आणि काळजी लागली होती. म्हणून तिने सुशांतला विनंती केली की तिला आपल्या माहेरी जाऊ देण्याची परवानगी द्यावी. तुम्ही काही दिवस मेस लावून घ्या आणि वेळेवर जेवण करत राहा. सुट्टीच्या दिवशी कधी गावाकडे तर कधी माझ्याकडे या, असे म्हणाली. यावर तो देखील आढेवेढे न घेता परवानगी देऊन टाकली. सुट्टीच्या दिवशी ते दोघे तिच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी तो परत आपल्या कामावर आला. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग - पंधरावा

घरात छोटे बाळ येणार या आनंदात सुशांत आणि सुमती यांचे दिवस आनंदात जात होते. याच दरम्यान अजून एक आनंदाची गोष्ट घडली की, सुशांतला त्याच्या कंपनीत बढती मिळाली. आता तो पंधरा कर्मचाऱ्याचा बॉस झाला होता. बॉस झाल्यामुळे जरा मेहनत कमी झाली पण जबाबदारी वाढली. पूर्वी काम संपले की घरी निघून जाता येत असे पण बॉस झाल्यामुळे सर्व कामाची देखरेख करून सर्व व्यवस्थित पूर्ण झाले का याची खातरजमा करूनच बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे घरी परत येण्यासाठी वेळ लागू लागला. कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कंपनीत थांबून काम पाहावे लागू लागले. सुमतीला सातवा महिना लागला होता. त्यानिमित्ताने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला सुशांत, त्याचे आई-वडील, बहिणी सर्वजण उपस्थित झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अनेक पाहुणे, नातलग आणि मित्र परिवारात डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले आणि सुशांत आपल्या कामावर परतला. 

सुमतीला एक एक दिवस मोजावे लागत होते. तिला त्रास होता पण बाळाच्या सुखासाठी ती सर्व त्रास सहन करत होती. आपले मन रिझविण्यासाठी ती चांगले पुस्तक वाचत होती, धार्मिक पुस्तकाचे पारायण करीत होती. बाळावर चांगले गर्भसंस्कार व्हावे म्हणून ती सदा आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होती तर तिची आई देखील तिची खूप काळजी घेत होती. महिन्यातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध पाणी घेत होती. इकडे सुशांत आपल्या कंपनीत व्यस्त राहत होता. दुपारच्या जेवणाचा डबा कंपनीत मिळत होता पण सायंकाळच्या जेवणाचे मात्र वांदे होऊ लागले होते. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यात एक राणी नावाची महिला कर्मचारी होती. राणी त्या कंपनीत येऊन जेमतेम एक वर्ष झाले असेल, तिने कंपनीत चांगला जम बसविला होता. ती दिसायला काळी सावळी होती पण तिचा चेहरा हसमुख होता आणि सुडौल बांध्याची होती. त्यामुळे तिला पाहताक्षणी जो तो तिच्याकडे आकर्षिला जात होता. सुशांतच्या घरापासून चार-पाच घरे सोडून ती एकटीच राहत होती. ती गरीब घरातील होती आणि तिचे आई-बाबा गावाकडे राहत होते. आर्थिक परिस्थितीमुळे ती या कंपनीत नोकरी करण्यासाठी आली होती. सुशांत सुरुवातीला तिच्यासोबत एक कर्मचारी म्हणून काम करत होता. मात्र बढती मिळाल्याने तो तिचा बॉस झाला होता. आपल्या बॉसचे सायंकाळच्या जेवणाचे वांदे होत आहेत हे तिला लक्षात आल्यावर तिने एक-दोन वेळा आपल्या घरी जेवायला बोलाविले. सुरुवातीला सुशांतने जेवण्यासाठी घरी येण्यास नकार दिला होता. मात्र बाहेरच्या जेवणामुळे त्याला ही अपचनाचा त्रास होत होता म्हणून नाईलाजाने तो एक-दोन वेळा राणीकडे जेवायला गेला. लगेच कंपनीत सुशांत आणि राणी यांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली. काही काम पडले की, राणी सुशांतकडे जात होती. कामानिमित्त जरी ते एकत्र आले तरी सहकारी कर्मचारी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. दोघांच्या मनात तसे काही नव्हते. पण लोकांच्या कुजबुज करण्यामुळे त्यांना कसे तरी वाटायला लागले. त्यांच्या मनात नसले तरी नियतीने त्यांना वारंवार एकत्र येण्याची योग घडवीत होता. कंपनीत आता सर्वत्र त्या दोघांच्या नावाची खूपच चर्चा होऊ लागली होती. राणीच्या मनात काय आहे ? हे सुशांतला माहीत नव्हते आणि सुशांतच्या मनात काय चालू आहे ? हे राणीला माहीत नव्हते. पण दोघेही मूक संमतीने वागत होते. लोकांची चर्चा त्यांच्या कानावर येत होती तसे ते दोघे चलबिचल होत होते. सुशांत एक विवाहित पुरुष आहे आणि त्याची पत्नी बाळंतपणसाठी माहेरी गेली आहे हे सर्वाना माहीत होतं पण राणी कोण आहे ? तिची पार्श्वभूमी काय आहे ? याविषयी कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि सुशांतला देखील काहीच माहिती नव्हती. ती एक गरीब, असहाय आहे एवढंच काय ते माहिती सर्वाना होती. पण राणीचे खरे रूप जरा वेगळे होते. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग सोळावा

सुशांतच्या कंपनीत काम करणारी राणी ही एक घटस्फोटित महिला होती. त्याच आधारावर तिला कंपनीत नोकरी मिळाली होती. ती एक महत्त्वाकांक्षी स्त्री होती. स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवावे असे तिला वाटायचे. पाच वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. पण तिचे नवऱ्यासोबत कधीच जमले नाही. त्याचे म्हणणे होते की, स्त्रियांनी नोकरी करण्यासाठी घराबाहेर जायचं नाही. नवरा कमावतो आणि बायकोच्या सर्व ईच्छा तो पूर्ण करत असेल तर बायकांनी नोकरीसाठी बाहेर जायचे कशाला ? यावर ती म्हणायची, मग मी जे शिक्षण घेतलं, त्याचा उपयोग कशासाठी करायचा. मी सुद्धा नोकरी केली तर आपल्या घरालाच हातभार लागेल. तसेच मी नोकरी केली नाही तर मला काही काम पडले तर प्रत्येकवेळी नवऱ्यासमोर हात पसरून पैसे मागावे लागतील, हे मला पटणारे नाही. याच गोष्टीवरून त्या दोघांचे रोज वाद व्हायचे. शेवटी तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि हेकेखोर नवऱ्यापासून मुक्ती मिळविली. काही दिवस आपल्या माहेरी राहिली. आई-बाबा तिच्या हट्टीपणामुळे काहीच बोलू शकत नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोकं कितीही काही बोलले तरी ते गप्प ऐकून घेत होते. एक-दोन महिन्यांनी कंपनीचा कॉल आला आणि ती या कंपनीत रुजू झाली. कोणी काही बोलो तिला काही फरक पडणार नाही अशी ती एक बिनधास्त महिला होती. सुशांतचा स्वभाव तिला खूप आवडला होता म्हणून तर ती त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती. पण सुशांतच्या मनात तसे काही नव्हते. तो एक भोळा आणि सरळ माणूस होता. याचाच फायदा घेऊन ती त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होती. सुशांतच्या मित्रांनी त्याला राणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ती जशी दिसते तशी नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याविषयी त्याला अनेकांनी सांगितलं पण तिच्या गोड बोलण्यात सुशांत फसत चालला होता. काही ना काही काम काढुन ती सुशांतच्या जवळ जायची आणि प्रेमाने बोलायची. सुशांतला ते हवेहवेसे वाटू लागले. तो नकळत कधी तिच्या जाळ्यात अडकला हे त्याला कळालेच नाही.
इकडे दवाखान्यातून सुशांतला गोड बातमी समजली. त्याला ट्विन्स मुली झाल्या होत्या. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे कळविण्यात आले. त्याने कंपनीत सर्वाना पेढे आणून वाटले आणि लगेच बाळाच्या भेटीसाठी गेला. दवाखान्यात तिची आई सोबत होती. तो थेट दवाखान्यात गेला. दोन्ही लेकरांना पाहून तो एकदम खुश झाला आणि त्याला धन्यवाद देखील दिला. त्यादिवशी तो तिथेच दवाखान्यात थांबला. सुमती आणि सुशांत खूप वेळ गप्पा मारल्या. बाळ झाल्यावर सुमती आनंदी दिसायला हवं पण ती जरा उदास दिसत होती. हे सुशांतच्या नजरेतून सुटले नाही. लगेच तो म्हणाला, " काय झालं, एवढी उदास का दिसतेस ? मुलगी जन्मास आली म्हणून तू नाराज आहेस का ? " यावर ती म्हणाली, " नाही हो, तसे काही नाही. " वास्तविक पाहता सुशांतचे आणि राणीचे किस्से तिच्या काना पर्यंत पोहोचले होते. पण यावेळी विषय काढणे तिला जरा अवघडल्यासारखे वाटले म्हणून ती विषय बदलत म्हणाली, " तुमच्या जेवणाचे खूप वांदे झाले आहेत, बघा किती रोड दिसत आहात तुम्ही. अजून तीन महिने तरी तुमच्या जेवणाचे वांदे होऊ शकतात." यावर तो काहीच बोलला नाही. फक्त होय एवढंच बोलला. सुमतीच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते तर सुशांतच्या डोक्यात काही वेगळेच चालत होते. सकाळी तो दवाखान्यातून थेट कंपनीकडे गेला. मुलगी जन्माला आल्याबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. तसे राणीने ही अभिनंदन केले आणि म्हणाली, " बॉस, पार्टी द्यावी लागेल सर्वाना." राणीच्या बोलण्यावर सर्वांनी सुशांतला पार्टीची मागणी केली. आनंदाची गोष्ट आहे तेव्हा नकार देऊन कसे चालेल. म्हणून त्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पार्टी देण्याचे निश्चित केले. कामाच्या घाईत दोन-चार दिवस निघून गेले. रविवारचा दिवस उजाडला. कंपनीतील सर्व कर्मचारी त्याच कॅम्पस मध्ये राहत होते. त्यामुळे सर्वांनी सायंकाळी सुशांतच्या घरी एकत्र येण्याचं ठरलं आणि नियोजित वेळेनुसार सर्वजण उपस्थित झाले. पार्टी म्हटले की, काही जणांना दारू पिण्याची लहर येते. त्यानुसार दोन-चार मित्रांनी आपले आवडते पेय सोबत आणलेले होते. सुशांतने छान पैकी नॉन व्हेज भाजी तयार केली. एका मित्राने घरून येताना भाकरी आणल्या होत्या. त्या पार्टीत राणी मात्र आली नाही. सर्वांचे जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. राणीला या पार्टी मध्ये केलेली भाजी नेऊन द्यावे म्हणून सुशांत भाजी घेऊन राणीच्या घरी गेला. घरात ती एकटीच बसलेली होती. त्याने दारावर टकटक केल्याबरोबर राणीने दरवाजा उघडला. तेव्हा तो म्हणाला, " ही घे भाजी, स्वतः मी बनविली आहे." त्यावर तिने धन्यवाद म्हणाली आणि मी जेवण करेपर्यंत घरात येऊन बैस, मला एकटीला जेवण करताना कंटाळा येतोय, असे बोलली. यावर तो तिच्या घरात जाऊन बसला. ती आपले जेवायचे ताट घेऊन आली आणि गप्पा मारू लागली. गप्पा मारता मारता ती बाळाची व तिच्या आईच्या तब्येतीविषयी विचारली आणि त्याने उत्तर दिले. गप्पा मारता मारता तिचे जेवण संपले. छान भाजी केलंस म्हणून तिने कौतुक केलं. त्याला बरं वाटलं. माझी बायको सुमती कधी अशी लाडात येऊन बोलतच नाही, जेव्हा केव्हा मोठ्या आवाजात नाहीतर रागात बोलते. हे ऐकून राणी जरा लाजली. तिचे लाजणे देखील त्याला आवडले. गुड नाईट म्हणून तो आपल्या घरी निघून गेला. पण त्या रात्री त्याला डोळ्याला डोळा लागला नाही. वारंवार राणीचे बोलणे आणि लाजणे त्याच्या डोळ्यासमोर तरळत राहत होते. त्याच्या मनात राणीविषयी कुठे तरी प्रेम व आपुलकी निर्माण होऊ लागली होती. जेव्हापासून राणी व सुशांत यांच्या विषयीचे किस्से सुमतीच्या कानावर आले त्या दिवसापासून ती बेचैन होती. सुशांतवर तिचा विश्वास होता मात्र राणी वर अजिबात नव्हता. त्यामुळे ती जरा चिंतेत दिसत होती. कधी एकदा सुशांतकडे जातो असे तिला न्हाळे होते. तिच्या घरी बाळाच्या अगमना प्रित्यर्थ एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ती सुशांत सोबत जाणार होती. त्या कार्यक्रमाला अनेक पाहुणे, मित्रमंडळी, नातलगांना आमंत्रण दिले होते. सुशांतने कंपनीतील आपल्या मित्रांना देखील आमंत्रण दिले होते. त्यामुळे ते सर्व मित्र देखील त्या कार्यक्रमाला आले होते, त्यात राणी देखील होती. कंपनीतील सर्व मित्रांची जवळपास ओळख होतीच त्यामुळे सुशांतने फक्त राणीची ओळख करून दिली. राणीला ती वरून खालपर्यंत एक वार नजर टाकली. तिला पाहताक्षणी कोणीही तिच्यावर भाळून जावं अशी ती बला होती, हे पाहिल्यावर लक्षात आलं. तिने बाळाच्या हातात शंभराच्या नोटा ठेवली व हसत हसत तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुमती, सुशांत व त्यांच्या दोन मुली रिद्धी व सिद्धी आपल्या घरी जाण्यास निघाले. गेली वर्षभर सुमती माहेरीच होती. दोन लेकरांना घेऊन कशी सांभाळ करील अशी चिंता तिच्या आईला लागली होती तर घरी गेल्यावर डोळ्याला काय बघायला मिळेल आणि अजून काय काय कानावर ऐकायला मिळेल याची काळजी सुमतीला लागली होती. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग सतरावा

कामवाली बाईच्या मदतीने ती आल्या आल्या आपले घर स्वच्छ व टापटीप करून घेतले. गेली वर्षभर घरात बाई माणूस नसल्याने घराचा पुरता उकंडा झाला होता. तसे तर सुशांतला स्वच्छ राहायची सवय आहे, घरात सुमतीला स्वछतेच्या बाबतीत कित्येकदा बोलणी खावे लागले होते, याची तिला जाणीव होती. पण ती काही एक न बोलता घरातील जाळी व जलमटी काढून घर एकदम चकाचक केले. त्या कामवाली बाईला एका दिवसासाठी नाही तर अजून काही महिने कामावर येण्याची विनंती केली. ती बाई देखील काम करण्यासाठी तयार झाली. घर साफ सफाई करणे, घरातील भांडे घासणे, कपडे धुणे आणि बाळाला अंघोळ घालण्याची दिवसभराची कामे तिला करायची होती. शक्य असेल तेव्हा अडचणीच्या वेळी स्वयंपाक देखील करण्यासाठी तिने होकार दिला. हे ऐकून तिला जरा बरे वाटले. घराची सफाई झाल्यावर तिने गरमागरम चहा केला आणि दोघांनी त्याचा आस्वाद घेतला. रिद्धी आणि सिद्धी चांगले खेळत होते. त्या लेकरांना पाहून कामवाली बाई म्हणाली, किती सुंदर आहेत हो बाई, तुमच्या जुळी मुली.' म्हणून लगेच त्यांची दृष्ट देखील काढली. ती घरी जाऊन येतो म्हणून बाहेर पडली. सायंकाळच्या वेळी सुशांत कंपनीत घरी येताना रात्रीसाठी भाजीपाला घेऊन आला. तिने छान स्वयंपाक केला आणि दोघे गप्पा मारत मारत जेवण केले. कामवाली बाई सकाळी कामावर येणार होती म्हणून ती सर्व भांडी कुंडी तशीच ठेवली. आनंदात दोघे ही झोपी गेले. 
राजू दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. आपल्यासारखे त्याने राजुला आयटीआय करण्याचा सल्ला दिला आणि शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजुला आता स्वतःजवळ ठेवून घेणे सुशांतला अवघड जाणार होते, याची त्याला कल्पना होती आणि घराकडून देखील तसे काही बोलणे झाले नव्हते. पण राजू गावाकडून कॉलेज ला कसा येईल म्हणून त्याने एक जुनी सायकल खरेदी करून दिली. त्या सायकलवर तो रोज कॉलेजला यायचा आणि कधी तरी घरी यायचा. सुमतीला आता राजू विषयी आपुलकी वाटू लागली कारण ती स्वतः आता एक आई बनली होती. तिच्या मनात राजू विषयी कणव निर्माण झाली. ती त्याची चांगली विचारपूस देखील करू लागली. शिकून आपल्या मामासारखा मोठा माणूस हो अशी त्याला नेहमी म्हणायची. तो देखील हो मामी म्हणून काही वेळ तेथे थांबायचा आणि आपल्या गावी परत यायचा. 
रिद्धी आणि सिद्धी चंद्रकलेप्रमाणे वाढत होते. त्यांच्या बोबडी बोलीने घर सारा आनंदून जात होता. सुशांत आणि सुमिता दोघांच्या जीवनात लेकराने एक नवी लर आणली होती. असेच सुखाचे दिवस नेहमीच राहावे असे प्रत्येकांना वाटत असते मात्र नियतीला ते मान्य नसते. सुशांतच्या वडिलांचे अपघात झाल्याची बातमी आली, तसा सुशांत गावाकडे गेला. अंगणात चालत असताना वडिलांचा तोल गेला आणि ते खाली पडले. एक बाजू काम करत नव्हती. त्यांना लकवा मारला होता.  दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. दोन-चार दिवसांनी ते घरी आले. त्यांना स्वतःहुन काहीच हालचाल करता येत नव्हती. तोंड देखील जरा वाकडे झाल्याने नीट बोलता देखील येत नव्हते. एकप्रकारे ते आता अधू झाले होते. त्यांना बेड रेस्ट आवश्यक होती. सर्व औषधपाणी देऊन काळजी घ्या म्हणून तो परत गेला. माणसाच्या जीवनात आजारपण येऊ नये, कारण आजार माणसाला एवढा विकलांग करून टाकतो की, जीवन जगावे असे त्याला वाटतच नाही. सदा ना कदा त्याच्या मनात माझी या मरणयातनेतून कधी एकदा सुटका होते, असे वाटते. नाना प्रकारचे विचार डोक्यात येत राहतात. त्यातल्या त्यात लकवा झालेल्या माणसाची अवस्था तर खूपच बिकट असते. त्याच्या आजारपणात चांगला धडधाकट व्यक्ती देखील बेजार होऊन जातो. तीच काही अवस्था सुशांतच्या आईची होत होती. पलंगावरच जेवणे आणि पलंगावरच त्यांच्या सर्व क्रिया होत होत्या. सोबतीला बघायला गेलं तर मुलगी होती पण कधी कधी ती देखील घरी राहायची नाही त्यावेळी खूप पंचायत होत असे. ती राहून राहून विठ्ठलाच्या धावा करीत असे, पांडुरंगा, काय पाप केलं म्हणून असे दिवस माझ्यापुढं आणून ठेवलास, असे ती म्हणायची. सुशांतचे वडील सुद्धा आजाराने त्रस्त झाले होते. त्यांनी देखील देवाकडे मागणी केली, पांडुरंगा मला या जाचातून मुक्ती दे. पांडुरंगाने त्याची आर्त हाक ऐकली आणि रात्री झोपेतच तो निद्रिस्त झाला. सकाळी बाबा गेल्याची बातमी सर्वत्र पसरली. सुशांत आपल्या पत्नी लेकरासोबत आला. पुण्याहून बहीण व तिचा नवरा आला. धाकट्याची पत्नी काही आली नाही. सुशांतने आपल्या हाताने अंत्यसंस्कार केला. काही दिवस त्याला गावाकडेच राहावे लागले. कंपनीत किती दिवस सुट्टी मिळू शकते. जास्तीत जास्त एक आठवडा त्यानंतर कामावर जाणे आवश्यक असते. पण बाबांचे सर्व क्रियाक्रम केल्याशिवाय त्याला गाव सोडणे अशक्य होते. कोणतीही तिथी अर्धवट सोडून गेल्यास लोकं काय म्हणतील ? या विचाराने तो थांबला. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग आठरावा

वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व क्रियाक्रम करेपर्यंत तीन आठवड्याचा काळ उलटला. तोपर्यंत त्याला गावाकडेच राहणे आवश्यक होते. म्हणून तो थांबला. इकडे कंपनीत त्याच्या जागेवर एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली. सुशांतच्या जागेवर आलेला कर्मचारी मन लावून काम करत होता. तीन आठवड्यानंतर कंपनीत रुजू होण्यासाठी गेला. पण त्याला त्याच्या पूर्वीच्या जागेवर नोकरी मिळाली नाही. कंपनीत सुरुवातीला जे पद होते त्या पदावर एक कर्मचारी म्हणून काम करण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याचे बॉस असलेले पद मिळाले नाही. याविषयी तो कंपनीच्या मालकांशी बोलला पण काही फायदा झाला नाही. शेवटी नाईलाजास्तव त्याने ते मूळ पद स्वीकारले. बॉस म्हणून काम केलेल्या सुशांतला त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून काम करतांना कसे तरी वाटत होते. काम करण्यात विशेष रुची वाटत नव्हते त्याला दुसरे एक कारण म्हणजे आता त्याच्या ग्रुप मध्ये राणी देखील नव्हती. त्यामुळे अजून त्याला अस्वस्थ वाटत होते. दुसरीकडे याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळणार ही नव्हते त्यामुळे तो रडत पडत तिथे काम करू लागला. राणीला देखील सुशांत शिवाय काम करण्यात विशेष रस वाटत नव्हता. सुशांतची आणि तिची भेट अशी सहजासहजी होत नव्हती. जेव्हा दुरावा निर्माण होते, भेटी होण्यात अनेक संकटे येतात त्यावेळी प्रेम उफाळून येते. मनात एक प्रकारची उत्कंठा व उत्सुकता लागलेली असते आणि भेट होण्यासाठी मग नाना प्रकारच्या कल्पना डोक्यात येत राहतात. सुशांत तिच्या घरासमोरून जात होता पण विनाकारण घरात जाण्याची हिंमत होत नव्हती. यावर राणीने एक शक्कल लढवली. सुशांतला बाजारातून एक वस्तू आणण्यासाठी विनंती केली. सुशांतला तर इतरांना मदत करण्याची सवय होती. आपल्या सवयीप्रमाणे तो राणीने सांगितलेल्या वस्तू बाजारातून आणून दिल्या. त्यानिमित्ताने त्याला राणीच्या घरी जाता आले. हा चांगला बहाणा राणीला मिळाला होता. त्यामुळे ती नेहमीच त्याला काही ना काही बाजारातून वस्तू आणण्यासाठी सांगू लागली व तो देखील ती वस्तू राणीला आणून देऊ लागला. आता त्यांची रोजच गाठीभेटी होऊ लागल्या. तशी ही गोष्ट सुमतीच्या कानावर जायला वेळ लागला नाही. घरी जी कामवाली बाई होती, ती एका जासूस प्रमाणे तिला हर एक माहिती देत होती. त्यामुळे तिचे डोके अजून गरगरत होते. त्यादिवशी सायंकाळी देखील सुशांत राणीच्या घरी जाऊन आला होता. घरी आल्याबरोबर सुमतीने त्याला त्याबाबत विचारणा केली. असता तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. ती वारंवार एकच प्रश्न विचारत होती, ' तुम्हीच का मदत करता तिची ? दुसरे कोणी मिळत नाही का तिला ? हे बंद व्हायला पाहिजे.' असे बोलणे ऐकून सुशांतचे डोके भनकले, तो तिला गप्प राहण्याच्या सूचना केल्या. ती बिचारी एकटी आहे, तिला काही गोष्टी बाजारातून आणून देऊन मी फक्त तिला मदत करतो. यापलीकडे काही नाही असे तो म्हणाला. पण लोकं तुमच्याविषयी व राणीविषयी काय बोलतात ? हे तरी तुम्हाला माहित आहे की नाही. तिच्या या बोलण्यावर तो म्हणाला, लोकं काय म्हणतात याचे मला काही घेणे देणे नाही. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे की नाही. की तू पण लोकासारखे समजतेस मला. यावर ती काय बोलणार ? बिचारी निरुत्तर झाली. दोघे ही अगदी चुपचाप जेवण करून झोपी गेले. दिवसेंदिवस त्यांचे दोघांचे भेटणे वाढत होते आणि इकडे सुमतीच्या मनात चलबिचल चालू होतं. सुशांतवर पूर्ण विश्वास होता पण राणीवर नव्हता. ती एक ना एक दिवस सुशांतला आपल्या मुठीत घेईल आणि माझा संसार उध्वस्त होऊन जाईल ही अनामिक भीती तिच्या काळजात घर करून होते. म्हणून ती जास्त काळजी करत होती. पण सुशांत काही समजून घेण्यास तयार नव्हता, तो फक्त एवढंच म्हणायचा, मी तसा माणूस नाही. मला जर वाटले असते तर केव्हाच की मी तिच्यासोबत घरोबा केला असतो. पण मी तसा केलोय का ? नाही ना ! नेहमी हेच उत्तर ऐकून सुमती देखील त्याला त्या विषयावर बोलणे सोडून दिले. कितीदा जरी सांगितलं तरी सुशांत ऐकत नाही म्हणून ती आता गप्प गुमान काय होते हे बघत राहण्याचा निश्चय केली. 

सुटीचा दिवस होता. सुशांत अगदी सकाळीच तयार होऊन बाहेर पडला. जातांना फक्त ' जातो मी' एवढंच बोलला. तेव्हा ती म्हणाली, जाताना कधी ही जातो मी म्हणू नये तर येतो मी असं म्हणायचं. पण तो न ऐकताच निघून गेला. आज राणीचा वाढदिवस होता. त्यामुळे तो तिच्यासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. ठरल्या वेळाप्रमाणे ते शहराबाहेरील एका ठिकाणी भेटण्याचे ठरविले होते. त्याठिकाणी ते दोघे भेटले. सुशांत एकीकडे तिच्यावर प्रेम नाही असे छाती ठोकून सांगत होता. आज ही तो तिच्या हट्टीपणामुळेच गेला होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सांगितलेल्या ठिकाणी आला नाहीस तर माझं मेलेलं तोंड पाहशील अशी ती बोलली म्हणून तो तिला भेटण्यासाठी गेला. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर ते दोघे परत जाण्यासाठी निघणार तेवढ्यात तोंडावर रुमाल बांधलेले दोन तरुण तिथे आले. एकाने सुशांतवर हल्ला करून त्याला गच्च पकडले. जवळच असलेल्या झाडाला त्याला बांधून टाकले. राणी खूप ओरडू लागली होती पण ऐकायला तिथे जवळपास कुणीच नव्हते. दोघांपैकी एकाने राणीला गच्च धरून ठेवला आणि सुशांत समोर तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसऱ्या तरुणाने देखील आपली हवस पूर्ण केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर तिचा गळा दाबून खून केला. त्या दोघांच्या वर्तनावरून असे वाटत होते की, ते दोघे पूर्वीपासून राणीला ओळखत असावे आणि आपली जुनी दुश्मनी काढण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. अन्यथा सुशांतला असे जिवंत सोडले नसते. तोंडावर रुमाल बांधलेले असल्याने ते दोन तरुण कोण होते ? कुठले होते ? हे सुशांतला ओळखू येणे कठीण होते. थोड्याच वेळात राणी जमिनीवर शांत झाली. तसे ते तिथून पळून गेले. सुशांतने कसेबसे बांधलेल्या दोरीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्याला काहीच सुचत नव्हते. झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी की नाही ? या विचारात तो विचार करू लागला.  पुढे काय करावं ? त्याला काहीच सुचत नव्हतं. आपल्या डोळ्यासमोर राणीचा खून झाला आणि आपण काहीच करू शकलो नाही याचा त्याला स्वतःवर खूप राग येत होता. तो प्रश्नार्थक चेहऱ्याने राणीच्या मृतदेहाकडे टकमक बघत होता. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग - एकोणीसावा

सायंकाळ होत आली होती. सुशांतच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. पोलिसांना जाऊन सांगावं तर उलट पोलीस मलाच त्रास देतील ? तुम्ही दोघे इथे कशासाठी आलात ? तुमच्या दोघांचा संबंध काय होता ? राणीचा खून कोणी केला ? त्यावेळी तू काय करत होतास ? खून केलेल्या लोकांना तुम्ही ओळखता का ? असे नाना प्रकारचे प्रश्न पोलीस विचारतील आणि त्यांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे काय उत्तर राहणार आहे. खरं तर मी राणीच्या हट्टामुळे येथे आलोय. पण आता लोकं काय विचार करतील ? असे विचारचक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. शेवटी आपले मन घट्ट करून सुशांतने आपला काढता पाय घेतला. सकाळी आनंदात गेलेली स्वारी सायंकाळी मात्र उदास चेहरा घेऊन परत आली. खूप वेळ लावलात, कुठे गेला होतात, एवढा वेळ ? सुमतीने आल्या आल्या त्याला विचारलं पण तो काहीच बोलला नाही. हात-पाय धुतला आणि पलंगावर जाऊन बसला. डोकं दुखतंय का, चहा करून देऊ का म्हणून तिने विचारपूस केली. पण त्याने नको एवढंच बोलला. जेवताना तो देखील तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त राणी आणि तिच्यासोबत आज झालेली घटना तरळत होती. तो मनातून घाबरलेला होता. उद्याची सकाळ कशी असेल ? उद्या काय होईल ? याची त्याला काळजी लागलेली होती. त्याच विचारात तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता पण त्याला झोप काही लागत नव्हती. मोबाईल रिंगने त्याला जाग आली. तो मोबाईल उचलला तसं पलीकडून त्याच्या मित्राचा आवाज होता, तो म्हणाला, " सुशांत, काल राणीचा खून झाला म्हणे, आज सकाळी पोलिसांना तिचा मृतदेह शहराच्या बाहेर सापडला." त्याला यातलं काहीच माहीत नसल्यासारखे तो फोनवर मित्राला म्हणाला, " ऑ .... खरं काय ? " मित्राने हो म्हणून फोन कट केला. राणीचा खून झाल्याची बातमी हा... हा.... म्हणता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तशी बातमी सुमतीच्या कानावर देखील आली. पहिल्यांदा तर तिला वाईट वाटलं पण नंतर मनातल्या मनात म्हणाली, बरं झालं, सटवी माझ्या नवऱ्याला गिळायला चालली होती. कंपनीत देखील राणीच्या खुनाची सर्वत्र चर्चा चालू होती. थोड्याच वेळात दोन पोलीस राणीच्या खुनाबाबत काही माहिती मिळते का म्हणून कंपनीत आले. त्यांनी सर्वांची कसून चौकशी केली. तशी सुशांतची पण चौकशी केली. कालचीच घटना होती त्यामुळे तो मनाने चलबिचल व अस्वस्थ होता. पण त्याने मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती की, कालची घटना कुणालाही सांगायचं नाही. म्हणून तो पोलिसांसमोर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. राणी सोबत तुमचे संबंध चांगले होते असे अनेकजण सांगितले त्याविषयी सांगा म्हटल्यावर तो म्हणाला, " होय, आमचे संबंध मैत्रीपूर्ण होते. ती एक चांगली महिला होती. तिला काही गरज पडेल तेव्हा मी तिला माणुसकी या नात्याने मदत करत होतो. त्यापलीकडे काहीही नव्हते. ठीक आहे म्हणून सुशांतला जाऊ देण्याची परवानगी दिली. पण पोलिसांची संशयाची सुई सुशांत भोवतीच फिरत होती. पोलिसांना घटनास्थळी कोणताच पुरावा सापडला नाही. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून गळा दाबून खून करण्यात आला. जर सुशांतचे राणीवर खरोखरच प्रेम राहिले असते तर तो तिचा खून का करेल ? तिचा खून झाल्याने खरंच सुशांतला काही फायदा होणार होता का ? सुशांतच्या जवळच्या मित्रांनी सुशांतचे वर्णन केले त्यावरून तो खून करेल असे पोलिसांना वाटले नाही. काही दिवसांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट आले. त्यानुसार सुशांतची रक्त तपासणी झाली. त्यांचे बोटाचे ठसे घेतले गेले. पण कुठेही त्याच्याशी या खुनाचा संबंध येत नव्हता. दरम्यानच्या काळात सुशांत खूप तणावाखाली वावरत होता. आपल्या परम दैवत पांडुरंगाला त्याने साकडं घातलं तेव्हा या संकटातून सावरून घे. असाच वर्ष-दोन वर्षांचा काळ निघून गेला. राणीची फाईल काहीही तपास निष्पन्न न झाल्यामुळे बंद करण्यात आलं. सुमती आणि सुशांत या आषाढी एकादशीला आपल्या आईला सोबत घेऊन पायी वारी करण्यासाठी निघाले. पांडुरंगाच्या विटेवर नतमस्तक होऊन मनोमन दर्शन घेतले आणि दरवर्षी न चुकता वारी करण्याचा निश्चय केला. 

••••••••••• - समाप्त - •••••••••••••

Sunday 18 June 2023

कथा - नवऱ्याचे मी पण ( Navryache mi pan )

कथा - नवऱ्याचे मी पण
- नासा येवतीकर, धर्माबाद

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि कथा वाचनाचा आनंद घ्या. 
~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग आठवा ......... लवकरच येत आहे.

कथा वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका.

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...