Monday 3 April 2017

परीक्षा गुरुजींची

परीक्षा गुरुजींची

आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्‍त दिसत होते. त्‍यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्‍यांना कळतच नव्‍हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते.  ज्‍यांना काहीच येत नाही ते नेमके आज परीक्षेला हजर होते आणि ज्‍यांना ब-यापैकी लिहिता-वाचता येते ते गैरहजर होते.  त्‍यामूळे गुरूजीला काळजी लागली होती.  तसे गेल्‍या आठवडाभरांपासून गुरूजी परिपाठमध्‍ये सर्व मूलांना सूचना देतच होते की पुढच्‍या आठवड्यात आपली ‘प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र’ कार्यक्रमांतर्गत संकलित चाचणी होणार आहे तेव्‍हा कोणी गैरहजर राहू नका, गावाला जाऊ नका, मुलांच्‍या पालकांना देखील या परीक्षेची आगाऊ सूचना देऊन ठेवली होती.  एवढे सारे करून देखील आज वर्गातील अर्धे मुले गैरहजर होती.  काय करावे?  या प्रश्‍नाने गुरूजींचे डोके सकाळी सकाळीच उठले होते.
शहरांपासून १५-२० किमी अंतरावर असलेल्‍या जेमतेम ५०० लोकसंख्‍या असलेल्‍या बोरगाव वस्‍तीत सदा पायमोडे गुरूजी गेल्‍या दोन वर्षापासून गुरूजी म्‍हणून काम करू लागले होते.  तसे पाहिले तर त्‍यांचे आडनाव पाटील होते. पण त्‍यांचे वडिल जे की याच शाळेत गुरूजी होते.  आणि येथूनच सेवानिवृत्‍त झाले. मुलांना काही आले नाही किंवा गैर‍हजर राहिले तर ते मुलांच्या पायावर मारायचे. एके दिवशी दुस-या वर्गातील रमेश चार दिवस शाळेत आला नाही म्‍हणून दामोदर गुरूजी त्‍यांच्‍या घरी भेटण्‍यास गेले. रमेश अंगणात खेळतांना पाहून गुरूजींच्‍या तळपायाची आग मस्‍तकाला गेली. त्‍याच्या पायावर छडी मारत मारत गुरूजी शाळेत त्याला शाळेत आणले.  पायावर जास्‍त मार बसल्‍यामुळे रमेश जवळपास लंगडूच लागला. त्‍या दिवशी पासून त्‍यांचे नाव पायमोडे गुरूजी असे नाव पडले.  ( शाळेत दोन शिक्षक होते आणि दोन्‍ही शिक्षकांचे नाव पाटीलच होते. मग पाटील सर म्‍हटले की कोणते पाटील?  असा कोणी विचारले की शाळेतील पोरं आणि गावातील लोकं पायमोडे गुरूजी असे म्‍हणायचे ) गुरूजी आपल्‍या संपूर्ण परिवारासह त्‍याच गावात राहायचे. शेवटचे १५-२० वर्षे त्‍यांनी त्‍याच गावात काढले. तेथेच त्‍यांनी शेती विकत घेतली, घर बांधले आणि तेथेच राहू लागले. त्यांचा एकुलता एक मुलगा सतिश हा मुळातच हुशार होता. तो डॉक्‍टर व्‍हावा असे घरातील सर्वांना वाटायचे कारण तसा त्‍याचा अभ्‍यासही होता. मात्र सरकारच्‍या विविध जाचक नियम अटी व असुविधेमूळे त्‍याला कोणत्‍याच मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्‍हणून आणि आई-वडिलांच्‍या आग्रहाखातर त्‍याने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. मूळात हुशार असल्‍यामूळे तो शासनाच्या सर्व प्रकारच्‍या परीक्षा सहज उत्‍तीर्ण होत होता. तीनच वर्षात त्‍याला शिक्षण सेवक म्‍हणून त्‍याच्‍याच गावात नोकरी मिळाली. डॉक्टर होण्याचे स्वप्न विसरून तो शाळेत मन लावून मुलांना शिकवत होता.  स्‍वत:च्‍या ज्ञानाचा फायदा मुलांना व्‍हावा यासाठी त्‍याने सर्व प्रकारे प्रयत्‍न करत होता.  वडिल मुलांना मारत मारत शाळेत आणत होते पण सदा गुरूजी मात्र अत्‍यंत प्रेमाने समजावून सांगून आणण्‍याचा प्रयत्‍न करत असत. 

बघा ना! आज प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र अंतर्गत परीक्षेला सर्व मुले उपस्थित रहावे म्‍हणून त्‍याचा सर्व खटाटोप पाण्‍यात मिसळला होता.  स्‍वत: गावात राहत असल्‍यामुळे गावातील प्रत्‍येक कुटूंबाची जवळून ओळख होती.  गुरूजी सकाळीच लवकर तयार होऊन प्रत्‍येक मुलांच्‍या घरी भेट देत होते.  काल शाळेला जे आले नव्‍हते त्‍यांच्‍या घरी पहिल्‍यांदा भेट द्यायचे ठरविले अन शिल्‍पाच्‍या घरी गेले आई बाहेरच सोयाबीनचे शेंगा खालीवरी करीत होती.  गुरूजी म्‍हणाले, राधा मावशी, शिल्‍पा कोठे आहे? काल शाळेला आली नाही.  ती म्‍हणाली, घरात हाय, अन बापू आजपण येणार नाय ! यावर गुरुजींच्या कपाळावर आट्या पडल्या, चिंतेच्या स्वरात गुरुजी म्हणाले “अहो मावशी, आज महत्‍वाची परीक्षा आहे. आज तरी तिला पाठवा हो”.  यावर शिल्पाची आई जवळ जवळ रागात बोलली “ सोयाबीन कोण जमा करणार ?  आधीच माणसं भेटेनाशी झाली.  तुमची परीक्षा उद्या नाही तर परवा घ्‍या".  नाही मावशी तसे चालत नाही.  आज सगळीकडे परीक्षा आहे तिला शाळेला पाठवा.  शिल्‍पा शाळेला ये ती गुरूजीला पाहून घरात लपून बसली.  तशी ती हुशार म्‍हणता येणार नाही पण ब-यापैकी लिहिता-वाचता येणारी पण आठवड्यातून २-३ दिवस घरकामासाठी शाळा बुडवते ती तरी काय करणार?  गुरूजीला प्रत्‍येक वेळी हाच अनुभव यायचा.
तेथून त्‍यांचा मोर्चा वळला कृष्‍णाकडे त्‍याचे वडिल गाडीवरून पडले होते आणि जबर मार लागला होता. आईला मदत करणेसाठी घरात कृष्‍णाच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणीच नव्‍हते म्‍हणून तो गेल्‍या दोन दिवसांपासून शाळेला आलेला नव्‍हता.  कृष्‍णाची शाळेला यायची इच्‍छा होती. गुरूजी परिस्थिती पाहून काही एक न बोलता ‘काळजी घ्‍या’ म्‍हणून घराबाहेर पडले. तेथून बाजूलाच स्‍नेहाचे घर होते.  ती काल शाळेला आली होती. हुशार चुणचुणीत आणि रोज शाळेला येणारी मुलगी म्‍हणून तिची शाळेत ओळख होती. गुरूजीला आश्‍चर्य वाटले, की तिच्‍या घराला कुलूप होते. शेजारच्‍यांना विचारले की स्‍नेहाचे घरचे कुठे गेले?  केव्‍हा येणार आहेत ? शेजारच्‍याने सांगितले “गुरूजी, काल रात्री स्‍नेहाला खूप ताप आला होता. ताप डोक्‍याला चढला होता म्हणून सकाळी पहिल्‍या गाडीला स्‍नेहाला घेऊन त्यांचे आई-बाबा शहरात गेलेत. गुरूजींनी लगेच मोबाईल काढले आणि स्‍नेहाच्‍या बाबांना फोन लावला, हॅलो, रामराव काका नमस्‍कार, काय झालं स्‍नेहाला?” “गुरूजी तिला  रात्री डोक्याला ताप चढला होता. सकाळी पहिल्या गाडी ला घेऊन आलोय डॉक्टर कडे "
"काय म्हणाले डॉक्टर ? "
" डेंगू ताप आहे म्हणे एक-दोन दिवस लागतील बरे व्ह्ययला." 
" ठीक आहे काळजी घ्या तिची " असे म्हणून गुरुजी शाळेकडे निघाले. वर्गात येऊन बघतात तर काय अर्धे मुले उपस्थित झाली होती. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये सचिन, सौरव, राहुल आणि धोनी नसेल तर टिमची जी हालत होते तीच काही हालात आज सदा गुरुजींची झाली होती. कशी बशी परीक्षा घेतली. कोणी ही जास्त मार्क घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांच दिवशी ते तपासलेले मार्क ऑनलाइन भरायचे असल्यामुळे लगेच तपासून त्याचे गुण भरण्यात आले आणि सर्व पेपर्सचा गट्ठा मुख्याध्यापकांच्या हाती देऊन सदा गुरुजीं जड पावलाने घरी पोहोचला. परीक्षा मुलांची होती मात्र काळजी गुरुजींना लागली होती. 

नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

कथा - हरवलेले डोळे

हरवलेले डोळे

शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं.  गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच.  रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम.  त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.  मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खुप अभ्‍यास करणे आणि आपले ठरवलेले ध्‍येय गाठणे एवढेच माझे लक्ष्‍य होते.  त्‍यामुळे रेल्‍वेत मिळालेल्‍या फावल्‍या वेळेचा सदुपयोग करताना पुस्‍तकातील महत्‍वाच्‍या ओळी अधोरेखित करून घरी त्‍याची टिपण तयार करायची.  तारूण्‍य आणि कॉलेजचे जीवन हे दोन्‍ही पण एकमेकांच्‍या हातात हात घालून येतात.  त्‍यामुळे कॉलेजातील मुलांकडे समाज एका वेगळ्या नजरेतून पाहत असतो.  कॉलेजची पोरं म्‍हणजे शिकणे कमी आणि पोरीच्‍या मागे धावणे जास्‍त.  योग्‍य त्‍या वयात योग्‍य ते कार्य वयाला साजेशी करणे यालाच तर प्र.के.अत्रे यांनी जीवन म्‍हटले आहे.  म्‍हातरपणी प्रेम करणे जमत नाही तसे तारूण्‍यात शहाणपणाच्‍या गोष्‍टी समाजाला रूचत नाही.  खूप शहाणा झालास हे वाक्‍य हमखास ऐकायला मिळते.  जर तारूण्‍यात शहाणपणा दाखवला तर ! प्रत्‍येक मुलगा तरूण मुलगी दिसली की शायनिंग मारतो, आपल्‍याकडे आकर्षित करून घेण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करतो.  हा त्‍याचा दोष नसून तो तारूण्‍याचा आहे.  तसे आमचे मित्रमंडळी रेल्‍वेत एखादं पाखरू (कॉलेज विश्‍वात सुंदर मुलींना पाखरू म्‍हणत) दिसते का? म्‍हणून प्रत्‍येक पाखरू असेल त्‍या ठिकाणी घुटमळत राहात.  मला सोबत नेण्‍याचा त्‍यांचा हेका रोजच असे.  मात्र माझे उत्‍तर ठरलेले “तुम्‍ही शोधून या तोवर मी येथेच बसतो” पुस्‍तकी कीडा म्‍हणून डिवचत सारे मित्र पाखराच्‍या शोधार्थ डबा न् डबा फिरत असत.  दिवस मजेत जात होते.  हळूहळू अंतिम परीक्षेची तारीख जवळ येत चालली तसा एकाकी होऊ लागलो.  सराव परीक्षा सुरू झाली.  त्‍या दिवशी गणिताचा दुसरा पेपर होता.  मला तो विषय कठीण असल्‍यामुळे सोबत आणलेले नोटस् काढून रेल्‍वेत चाळत बसलो.  त्‍या डब्‍यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते.  सर्वांवर एक नजर टाकली आणि अभ्‍यासाला लागलो.  माझ्या अगदी समोर एक पडदानशीन महिला होती.  तिचे फक्‍त डोळे तेवढे दिसत होते.  तिच्‍या आजुबाजूला कदातिच तिचे आई-वडील बसले होते.  पंधरा-वीस मिनिटांच्‍या प्रवासानंतर मी एकटक त्‍या महिलेकडे पाहिलं.  तिच्‍या डोळ्यात मला करूणा, कीव जाणवली.  तेव्‍हा तिच्‍या आजुबाजूला बसलेल्‍या दोघांचे निरीक्षण केले असता ते दोघे कदाचित मुस्लिम धर्मीय जाणवत होते.  परीक्षा असल्‍यामुळे ते सर्व विचार बाजूला सारून परत अभ्‍यासाकडे डोळे वळविले;  पण का? कोण जाणे? वाचनात लक्षच लागत नव्‍हते.  परत एकदा त्‍या महिलेकडे पाहिले तेव्‍हा तिचे डोळे अश्रुंनी पाणावलेले दिसले.  ती का रडत होती? तिचे ते दोघे खरेच आई-वडील किंवा नातलग असतील काय? अशा नाना शंका मनात आल्‍या; पण करावे तरी काय? विचार करता करता माझं कॉलेजचं स्‍टेशन आलं.  तसं त्‍या गावात ते तिघेपण उतरले.  परीक्षेची वेळ जवळ येत होती.  यांचा पाठलाग करावा तर परीक्षा बुडेल! त्‍यांच्‍यामागे मागे ऑटो स्‍टँण्‍डपर्यंत गेलो; परंतु ते कोठे चालले याचा पत्‍ता लागला नाही.  ती ऑटो भुर्रकन निघून गेली.  मी तसाच त्‍या पाणावलेल्‍या डोळ्यांचा विचार करीत कॉलेजकडे चालू लागलो.  त्‍या दिवशी परीक्षेचा पेपर जेमतेम गेला.  परीक्षा लवकर संपल्‍यामुळे सायंकाळच्‍या ऐवजी दुपारच्‍या गाडीने निघालो.  मनाने हताश झालेलो.  स्‍टेशनवर आलो आणि मनातील मरगळ दूर करण्‍यासाठी डबे फिरू लागलो.  या डब्‍यातुन त्‍या डब्‍यात फेरफटका मारताना त्‍या पडदानशीन सोबत असलेले ते दोघे मला दिसले; परंतु त्‍यांच्‍यासोबत ते डोळे दिसले नाहीत.  आता मात्र माझं मन संशयाच्‍या खाईत पडलं.  काय केलं असेल या दोघांनी तिच्‍यासोबत.  हे जर आई-वडील किंवा नातलग असतील तर तिच्‍या डोळ्यांत अश्रु का आले? त्‍याच तंद्रीत माझं  गाव आलं, मी उतरलो.  गाडी दोन शिट्या वाजवून निघून गेली.  मी मात्र एकसारखा त्‍या धावत्‍या गाडीकडे पाहत राहिलो.  मी त्‍या असहाय महिलेला मदत करू शकलो नाही याची खंत मला वाटत राहिली.  एकन्एक दिवस ते हरवलेले डोळे मिळतील काय? या प्रतीक्षेत अजूनही रेल्‍वेचा प्रवास नित्‍य नियमाने लोकल टू लोकल करीत आहे.

- नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.

कथा - मुख्यालय

मुख्‍यालय

शिक्षकांनी मुख्‍यालयी राहण्‍याची सक्‍ती करण्‍याचा ठराव जिल्‍हा परिषदेत पारित करण्‍यात आला हे वृत्‍त वाचल्‍याबरोबर रामराव गुरूजीच्‍या छातीत धस्‍सं केल.  आज काही तरी अवघड बातमी वाचायला मिळणार याची गुरूजीला खात्री होती.  कारण आज जिल्‍हा परिषदेत शिक्षण विभागासाठी फक्‍त खास बैठक बोलाविण्‍यात आली होती आणि त्‍यात जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषद शाळांची गुणवत्‍ता वाढविता यावी यासाठी विविध उपाय योजनेवर चर्चा अपेक्षित होती.  झाले ही तसेच शिक्षक मंडळी मुख्‍यालयी म्‍हणजे शाळेच्‍याच गावात राहिल्‍याशिवाय शाळा सुधारणार नाही आणि विद्यार्थ्‍याची गुणवत्‍ता सुद्धा, त्‍यासाठी शिक्षकांना मुख्‍यालयी राहण्‍याची सक्‍ती करण्‍याचा ठराव सर्वांच्‍या संमतीने पारित करण्‍यात आला.  तीच बातमी प्रत्‍येक पेपरच्‍या मुखपृष्‍ठावर प्रकाशित झाली होती.  शाळा सुरूवात होवून आठवडा सुद्धा उलटला नाही की या बातमीने गावात चर्चेला उधाण भरलं.  गावातले काही उडाण पोरान बातमी वाचली होती, त्‍यांनी गुरूजीला बघून मग, काय मास्‍तर केव्‍हा येणार गावात राहायला?  अशी उपरोधात्‍मक बोलू लागली.  शाळेला येता येताच ही बातमी वाचल्‍यामुळे गुरूजी अस्‍वस्‍थ मनाने शाळेत आले होते.  शाळेची घंटा वाजली, परिपाठ संपला नियमित वर्गाला सुरूवात झाली परंतु गुरूजीचे मन कोठेच लागेना बायको लेकरं याच काय?  त्‍यांना सोबत ठेवू की मी एकटाच गावात राहू?  या विचाराच्‍या तंद्रीत दिवसभर राहिल्‍यामुळे चेहरा कोमजून गेला होता.  चेह-यावरचा रोजचा तेज आज लुप्‍त झाला होता.  दुपारी डब्‍बा जेवताना सुद्धा त्‍यांचे लक्ष जेवणावर नव्‍हते.  त्‍यांच्‍यासोबत इतर ४-५ सहकारी मंडळी होती.  ती मात्र ही बातमी वाचून अजिबात डगमगले नाहीत त्‍यांना कसलीच काळजी वाटत नव्‍हती.  या त्रासातुन सुद्धा काही तरी नक्‍की मार्ग काढू असा विश्‍वास त्‍यांना वाटत होता.  त्‍यामुळे ते कधीच घाबरत नव्‍हते.  रामराव गुरूजी मात्र छोट्या मोठ्या घटना वाचल्‍या की, त्‍यांच्‍या छातीत धडकी भरे.  म्‍हणूनच त्‍यांचे मित्र त्‍यांना विनोदाने भित्रे गुरूजी म्‍हणत असत.  तसे त्‍यांचे नाव रामराव कात्रे परंतु ते नेहमी भितात त्‍यामुळे त्‍यांचे नाव कात्रे च्‍या ऐवजी भित्रे असे नामकरण करण्‍यात आले.
रामराव कात्रे गुरूजी हे वडगावचे राहणारे जेमतेम शे पाचशे लोकांच्‍या वस्‍तीतील त्‍या गावात गुरूजीचे एक छोटेसे घर होते आणि त्‍या घरात आई बाबा सोबत त्‍याची बायको राधा आणि दोन लेकर आनंदात राहत होती.  वडगावच्‍या जवळ म्‍हणजे साधारणपणे १२-१५ किमी अंतरावरील बोरगाव येथे गुरूजीला नौकरी मिळाल्‍यामुळे तो खुश होता.  आई बाबा पण आनंदातच होते.  घरीच भाकर खावून नौकरी करणे फार सोपे काम असते.  चांगले स्‍थळ बोलून आलं गुरूजींचे लग्‍न थाटात झाले.  वर्षामागून वर्ष सरली आणि गुरूजींना दोन लेकरं ही झाली.  राधाच्‍या मनात राहून राहून वाटत असे की, आपण शहरात जावून राहावं.  परंतु गुरूजी आई बाबाचा एकूलता एक मुलगा.  त्‍यामुळे त्‍यांना एकटे सोडून जाणे गुरूजींना शक्‍यच नव्‍हते.  याच कारणावरून त्‍यांच्‍यात नेहमीच धुसफूस चालत असे.  परंतु गुरूजी कसे तर समजावून करून राधाला पटवीत असत आणि संसाराचा गाडा चालवित असत.
परंतु आजच्‍या बातमीने गुरूजी खूपच चिंताग्रस्‍त होवून शाळा सुटल्‍यानंतर घरी परतले. घरी आल्‍यानंतर ही त्‍यांचे कुठेच मन लागेना शेवटी राधा न राहवून म्‍हणते की, काय हो, काय झालय?  या प्रश्‍नावर गुरूजी काय उत्‍तर देणार त्‍यांनी राधाला पेपर दिला आणि वाचण्‍यास सांगितले.  ज्‍या बातमीने गुरूजी दु:खी कष्‍ट व नाराज झाले होते तीच बातमी वाचताना राधाच्‍या मनात आनंदाच्‍या उकळ्या फुटत होत्‍या.  कारण या निमित्‍ताने तरी घर सोडायला मिळेल असे तिला वाटायला लागले परंतु तिने आपल्‍या चेह-यावरील भाव कोणाला समजू दिले नाही.  दिवे लावली आणि रात्री जेवण्‍याच्‍या वेळी गुरूजींनी आपल्‍या आई-बाबासमोर त्‍या बातमीचा विषय ठेवला.  सगळ्यांच्‍या चेह-यावर प्रश्‍नचिन्‍ह फक्‍त त्‍यास राधा अपवाद होती.  जेवताना एकदम नीरव शांतता होती.  शेवटी बाबांनी दीर्घ श्‍वास घेत म्‍हटले, रामा तु तुझ्या बायको लेकरासह बोरगावला जा राहायला.  आम्‍ही राहतो इथे शेती घर बघत.  काही काळजी नको.  सरकारने नियमच केला तर त्‍याला कोण काय करणार?  यावर गुरूजी काय बोलणार अगदी गुमाण जेवण करून आपल्‍या खोलीत झोपायला गेला.
झोपण्‍यापूर्वी राधाने आपल्‍या मनातील विचार व्‍यक्‍त करण्‍यासाठी तोंड उघडले, बाबांनी तर परवानगी दिली चला आपण सर्व बोरगावला राहू.  राधेला ही बातमी म्‍हणजे सुवर्णसंधीच वाटत होती आणि ही संधी सोडायची नाही असा ठाम निर्धार केला होता.  यावेळी सुद्धा गुरूजींनी राधेची समजूत काढली प्रथम १-२ महिने मी एकटा राहतो त्‍यानंतर आपण सर्वजण राहू असे बोलून दोघेही गाढ झोपी गेले.  सकाळ झाली गुरूजी बोरगावला जाण्‍याची तयारी करू लागले आज त्‍यांच्‍या सोबत फक्‍त जेवणाचा डबा नव्‍हता तर निदान चार पाच दिवस त्‍या गावात मुक्‍काम करायच्‍या तयारीने सर्व साहित्‍याची बांधाबांध केली.  आई बाबांचा आशीर्वाद घेऊन गुरूजी निघाले.  ते थेट शाळेतच आले आपल्‍या सर्व सामानासह गावात खोली साठी शोधाशोध केली नाही कारण राहण्‍यायोग्‍य घरे त्‍या ठिकाणी नव्‍हतीच मग काय करणार शाळेतील एका वर्गाच्‍या कोप-यात बांधून आणलेले सर्व साहित्‍य ज्‍यात अंथरूण, पांघरूण, स्‍वयंपाकाचे सामान, ड्रेस, अंडरवियर, बनियान, टॉवेल इ. टाकून ठेवले तेथेच शिकवायचे आणि तेथेच रहायचे असा बेत गुरूजींनी आखला तेथे ना लाईटची सोय ना पाण्‍याची.  सकाळी कोणी उठण्‍याच्‍या अगोदर पानवाल्‍याच्‍या विहीरीवर जायचे दोन बादल्‍या आपल्‍या अंगावर टाकायचे एक भांडे पाणी भरायचे आणि परत शाळेवर यायचे.  मुले शाळेत येण्‍यापूर्वीच सकाळचा स्‍वयंपाक व जेवण आटोपून घ्‍यायचे.  सकाळी काहीच सवड मिळत नव्‍हती.  हे सगळं करेपर्यंत शाळेचीच वेळ व्‍हायची.  सायंकाळी मात्र हमखास वेळ मिळायचा.  एक दोन दिवस गुरूजीला सुद्धा याचा कंटाळा आला.  सायंकाळची वेळ काही केल्‍या कटत नव्‍हती.  शाळा सुटल्‍यावर चार पाच पोरांना शिकवावे असे एका मताने म्‍हटले परंतु दिवसभराचा कलकलाट ऐकून कंटाळा आलेला असतांना पुन्‍हा पोरांना शिकविणे नको रे बाबा वाटले.  शनिवारच्‍या दिवशी दुपारच्‍या शाळेला सुट्टी असत म्‍हणून शाळा संपल्‍यावर गावी जाण्‍याचे नियोजन केले.  सायंकाळी पर्यंत गावी आल्‍यानंतर पोर बाबा आले बाबा आले म्‍हणत पळत गुरूजीला बिलगली आई बाबांना पण आनंद वाटला अन् राधेची तर कळी खुलली होती.  गावात खोली भेटली असेल आणि रविवार नंतर सोमवारी बोरगावला जाण्‍याचा योग येईल या विचाराने राधा खुश होती परंतु गुरूजींनी जेवण झाल्‍यानंतर राधेला सांगितले की, गावात खोली मिळाली नाही आणि ते शाळेच्‍या एका खोलीत बस्‍तान मांडले आहेत.  राधा ते ऐकून निराश झाली आणि काही न बोलता झोपी गेली.
रविवार सुट्टीचा दिवस अगदी मजेत गेला.  दुस-या दिवशी सकाळी लगबगीने तयार होऊन गुरूजी शाळेच्‍या रस्‍त्‍याला निघाले.  गावी दीड दिवस कधी संपला हे कळालेच नाही.  स्‍वयंपाक करून खाण्‍याचा कंटाळा येऊ लागला सायंकाळी खुप कंटाळवाणे वाटू लागले.  शाळेतल्‍या गावात कोणी मित्र नाही ना नातलग ज्‍याच्‍या सोबत गप्‍पा गोष्‍टी करता येईल.  कादंबरी वा गोष्‍टीचे पुस्‍तक वाचून सुद्धा कंटाळा येऊ लागला.  त्‍यातच एके दिवशी गावातील चांडाळ चौकडी गुरूजी जवळ आले, काय गुरूजी काय चाललय?  गुरूजी आपल्‍या नेहमीच्‍या सुरात काही नाही, बोअर होतय वाटत मध्‍येच नानाने आपल्‍या तोंडात तंबाखुची मसाला कोंबून म्‍हणाला.  गुरूजी पत्‍ते खेळता येतात का? लंगड्या माधवने विचारले.  गुरूजींना पत्‍ते खेळता येत असूनही त्‍यांनी नाही असे उत्‍तर दिले.  गावात दिवाळी, नागपंचमी, होळी या सणाच्‍या दिवशी मित्रासोबत गुरूजी रम्‍मी खेळत असे.  त्‍यामुळे पत्‍ते खेळणे त्‍याला नवीन नव्‍हते मात्र नौकरीच्‍या गावात मुळीच खेळायचे नाही असे त्‍यांनी पक्‍के ठरविले होते.  रिकामा वेळ कसा घालावयाचा यावर उपाय काही सुचना आणि चांडाळ चौकडी रोज येऊन गुरूजींना तंग करू लागले.  अन् एके दिवशी गुरूजींचा पाय घसरला आणि चांडाळ चौकडी सोबत पत्‍याचा डाव सुरू झाला.  एक वा दोन तासावरचा डाव आता रात्रभर चालू लागला.  पानवाल्‍याच्‍या विहीरीवर स्‍नान करणे हळूहळू कमी होऊ लागले.  शाळेत मुलांना काही तरी काम देवून वामकुक्षी घेण्‍याच्‍या प्रकारात वाढ झाली.  मित्रासोबत अधूनमधून झिंग व्‍हायची सवय या चांडाळ चौकटमुळे खूपच वाढली.  आता सकाळी उठल्‍यावर चहाची जागा देशीने घेतली.  दर शनिवारी गावी जाणारे गुरूजी महिना महिना घरी जाणे बंद झाले.  पगार तर उरतच नव्‍हती शिवाय गावात उधारी वाढली.  जेवण्‍याचे वांदे झाले.  लोक कोणी जवळ येऊन देईनात शाळेतील मुले सुद्धा दूर राहू लागले.  आता राधाच फक्‍त मला समजून घेऊ शकते म्‍हणून राधा, मला माफ कर असे म्‍हणू लागले.  बाजुलाच झोपलेली राधा गुरूजीला उठवते, अहो, उठा काय झालं काही स्‍वप्‍न बघितलात काय?  गुरूजी उठून बघतात तर काय हे आपल्‍या घरी आहेत.  तेव्‍हाच पेपर हातात पडते.  बातमी वाचून गुरूजी खदाखदा हसतात.  बातमीमध्‍ये सभा बारगळली असा मथळा असतो.
- नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.

कथा - साहस

साहस
सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता एक मुलगा अश्‍या पोरासोबत सुधानं नशीबचं काढलं प्रत्‍येक जण बोलत होते.  परंतु सुधाला शाळा सोडावी असं वाटत नव्‍हती.  शाळेत ती एक हुशार, चुणचुणीत व गोड मुलगी होती परंतु तिच्‍या मनाने काही करायला तिला संधी कोठे होती?
सुधाचे सासरीचे दिवस नवीन लुगडी नेसण्‍यात व गोडधोड खाण्‍यात मजेत होते.  काही दिवस आनंदात उलटले एके दिवशी सायंकाळी स्‍वयंपाक आटोपून ती आपल्‍या यजमानाची वाट पाहत बसली.  वाट बघता बघता ती तशीच झोपी गेली.  मध्‍यरात्री केव्‍हातरी दारावरच्‍या टकटक आवाजाने ती उठली दार काढले तर तिचे पतीदेव दारू पिवून तर्रर्र होवून आला होता.  जेवायचे तर होशच नव्‍हते.  तसेच ते दोघे झोपी गेले.  सुधाच्‍या नशिबात आता हे रोजचे होते.  नव-याच्‍या विक्षीप्‍त वागण्‍याने सुधा पुरती कंटाळली.  अशातच तिला दिवस गेले.  सासरी-माहेरी सर्वांना खूपच आनंद वाटले.  सासू सुधाला नेहमी म्‍हणायची, बाई, वंशाचा दिव्‍याला जन्‍म दे.
वयाच्‍या सोळाव्‍या वर्षी सुधा माता बनली.  तिला मुलगी जन्‍मल्‍यामुळे सासरचे मंडळी तर पहायला सुद्धा आले नाही.  मुलगी जन्‍माला दिल्‍यामुळे सासू, सासरे, नवरा सर्वच मंडळी तिला खूप हिणवू लागले.  मानसिक व शारीरिक त्रासामुळे सुधा मनातून खूपच खंगू लागली.  लहान वयात माता बनल्‍यामुळे प्रसूती वेळी खूप रक्‍तस्‍त्राव झाला होता आणि बाळाची वाढ ही चांगली झाली नव्‍हती.  त्‍यामुळे सुधा व तिची मुलगी दोघेही कृश आणि सदा आजारी पडत होते.  त्‍यातच दीड एक वर्षाने सुधाला परत दिवस गेले.  सासूबाईंनी तिला चेकअप साठी दवाखान्‍यात घेऊन गेली.  तिच्‍या उदरात परत मुलगी आहे म्‍हणून तिचे गर्भ मोकळे करून घरी निघाले.  असे तिच्‍यासोबत दोन तीन वेळा घडलं.  वंशाचा दिवा पाहिजे या हट्टापायी तिचं गर्भपात करण्‍यात आलं.  त्‍यामुळे दिवसेंदिवस तिची शक्‍ती कमी कमी होत गेली.  ती आत्‍ता निरशक्‍त व बेढव दिसू लागली.  तसं सासू व नव-याच्‍या मनात दुसरं लग्‍नाचा विचार घोळू लागलं.
एके दिवशी अचानक सासूबाईंनी सुधाच्‍या सवतीला घरात आणलं.  ही बातमी सुधाच्‍या आई वडीलांना कळाली तसे ते धावत पळत आले.  भांड भांड भांडले तेव्‍हा सासूबाईने घेऊन जा, आपल्‍या मुलीला घरी, असा निर्वाणीचा इशारा दिला.  परंतु ते गरीब घराचे, एकदा बाहेर पडलं तर तिला परत त्‍या घरात प्रवेश मिळणार नाही, या धास्‍तीने ते आपला काळजाचा तुकडा तिथेच संकटात सोडून निघून गेले.  सुधाचा अतोनात छळ सुरूच होता.  जीवन जगण्‍याच्‍या सर्व आशा-आकांक्षा संपुष्‍टात आले होते.  सुधाची आई शेजारी पाजा-यांना तिची करूण कहानी सांगत रोज रडत होती.  काय करावं तिला कळेना सुधाची एकप्रकारे ती परीक्षाच होती.
तो दिवस तिच्‍यासाठी सुवर्ण दिवस होता.  एका वकिलांच्‍या भाषणाने तिच्‍या अंगात सुप्‍त साहस जागे झाले.  त्‍या वकिलाने अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी मार्ग सुचविले होते.  त्‍या मार्गाचा अवलंब करण्‍यासाठी तिला आई वडील आणि शेजारी पाजा-यांनी धीर दिलं.  त्‍या दिवशी ती सासरच्‍या सर्व मंडळीसोबत वाद घालून, मी परत येईन परंतु तुम्‍हाला सजा देण्‍यासाठी, म्‍हणून ती अर्ध जग जिंकल्‍याच्‍या अविर्भावात माहेरी निघाली.  आज ती मनात ठाम निर्धार केली होती की, मी थांबवलेल शिक्षण पुढे चालू करणार आणि यांना धडा शिकविणार.
दहावीची परीक्षा खासगी विद्यार्थी म्‍हणून बसली आणि पास झाली.  त्‍यानंतर तालुक्‍याच्‍या गटविकास अधिका-यांना भेटून बचत गटाची स्‍थापना केली.  त्‍या गटाअंतर्गत भेटून बचत गटाची स्‍थापना केली.  त्‍या गटाअंतर्गत चार पाच शिलाई मशीन घेऊन ती माहेरी शिवणकाम करू लागली आणि इतर मुलींना शिकवू लागली.  बघता-बघता तिच्‍याकडे संपत्‍तीचा ओघ सुरू झाला.  आई-वडिलांना सुधा ही ओझं न वाटता आधारवड वाटत होतं.  कोर्टात सुधाने बायको जिवंत असताना दुसरी बायको केली, म्‍हणून कोर्टात केस दाखल केली.  तेव्‍हा सासरच्‍या मंडळीच्‍या कोर्ट कचे-या वाढतच होता.  सून म्‍हणून नातलगातली आणलेली पोरगी काही दिवसातच निघून गेली.  पोराच्‍या रोजच्‍या दारूनं पाच सात एकर जमीन काही गुंठ्यावर आलं तर गोठ्यात दहा-पंधरा जनावराच्‍या जागी कुत्र्याची दहा-पंधरा पिलं राहत होती.  सासरची मंडळी आज रस्‍त्‍यावर आली होती.  त्‍यांचे दिवस फिरले होते.
सुधाला सासरी परत बोलावून नेण्‍यासाठी ती सर्व मंडळी खूप मनधरणी केले परंतु सुधाचा विचार पक्‍का होता.  मी माझ्या मुलीवर तुमची सावली पडू देणार नाही.  मी परत एक सुधा निर्माण होऊ देणार नाही.  असे म्‍हणून ती सर्वांना हाकलून दिलं आणि कोर्टातून आपल्‍या नव-यापासून फारकत मिळवलं.  आज सुधा आणि तिची मुलगी सुखाने नांदत आहेत.  कायद्याच्‍या आधारासोबत सुधाने केलेल्‍या साहसामुळे तिला पुनर्जन्‍म मिळाला होता.  समाजामध्‍ये अशा अनेक सुधा आजही सासू, सासरे, नवरा यांचा हकनाक बळी पडतात.  जीवनात आपली मुलगी सुधा बनू नये असे वाटत असल्‍यास तिला खूप शिकवा.  शिक्षणामुळे मनुष्‍याला ज्ञान प्राप्‍ती होते आणि संकटाला तोंड देण्‍याचे साहस, बळ निर्माण होते.
- नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...