Saturday, 6 September 2025

राजे उमाजी नाईक ( Raje Umaji Naik )

शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक 
राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक शूर क्रांतिकारक व लोकनायक म्हणून ओळखले जातात. त्यांना "पहिला क्रांतिकारक" असेही संबोधले जाते. ई.स. १७९१ मध्ये भिवडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांचा जन्म झाला. ते नाईक घराण्यातील होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य व न्यायप्रियता होती. सामान्य जनता, शेतकरी व गावकरी यांना ब्रिटिशांच्या अन्यायकारक करप्रणालीमुळे अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी गावकऱ्यांवर लादलेले कर, महसूल व अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांचे साथीदार म्हणजे शेतकरी, धनगर व स्थानिक गावकरी होते. ते "गनिमी कावा" पद्धतीने लढा देत, त्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे कठीण होत असे. इंग्रजांना उमाजी राजे यांच्या लढ्याची भीती वाटू लागली. शेवटी विश्वासघातामुळे ते इंग्रजांच्या ताब्यात आले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली.
त्यांच्या जीवनातील काही प्रसंग खूप महत्वाचे आहेत. 
शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला उमाजी
एकदा ब्रिटिश सरकारचे महसूल अधिकारी एका गावात कर वसुलीला आले होते. शेतकऱ्यांची पिके नीट आलेली नव्हती, त्यामुळे ते कर देऊ शकत नव्हते. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी निर्दयीपणे कराची वसुली सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची साधने आणि अन्नधान्य जप्त करायला सुरुवात केली. गावकऱ्यांची अवस्था पाहून उमाजी राजे नाईक संतापले. ते थेट त्या अधिकाऱ्यांच्या तंबूत शिरले व म्हणाले, “हा शेतकरी हा आपल्या मायभूमीचा कणा आहे. याच्या घामावर राज्य उभे आहे, आणि तुम्हीच याला लुबाडता ? शेतकऱ्यांवर असा अन्याय मी सहन करणार नाही ! ” असे म्हणत त्यांनी इंग्रजांच्या सिपायांवर झडप घातली. तेव्हा गावकरीही धैर्याने उमाजींना साथ देऊ लागले. इंग्रज सिपाई पळून गेले आणि गावकरी मुक्त झाले. या प्रसंगानंतर शेतकऱ्यांमध्ये उमाजी राजेंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. लोक त्यांना "शेतकऱ्यांचा राजा" म्हणू लागले.
उमाजी राजे हे शेतकरी–शोषित समाजाचे तारणहार म्हणून ओळखले जात. "शेतकऱ्यांचा राजा" अशी उपाधीही त्यांना लोकांनी दिली.
दुसरा प्रसंग म्हणजे गनिमी काव्याचा प्रसंग
ब्रिटिश सैन्याने उमाजी राजे नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी एक मोठी छावणी उभारली होती. त्या छावणीत शेकडो सिपाई होते. शेतकऱ्यांना दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी गावकऱ्यांकडून धान्य व जनावरे जप्त केली होती.
हे पाहून उमाजी राजेंनी आपल्या मावळ्यांना एकत्र केले आणि गनिमी काव्याने हल्ला करण्याचे ठरवले. रात्रीच्या अंधारात ते सर्वजण छावणीभोवती शांतपणे लपून बसले. अचानक त्यांनी मशाली पेटवल्या, शिट्ट्या मारल्या, डफ वाजवले, आणि चारही बाजूंनी "हर हर महादेव!" असा जयघोष करत छावणीवर धावा चढवला.
इंग्रजांना वाटले की हजारो सैनिकांनी छावणी घेरली आहे. घबराटीत त्यांनी शस्त्रास्त्रे व सामान सोडून पलायन केले. उमाजी राजेंनी जप्त केलेले धान्य, जनावरे पुन्हा शेतकऱ्यांना परत दिले. या प्रसंगानंतर शेतकरी अधिक निर्भय झाले आणि उमाजी राजेंची कीर्ती संपूर्ण पुणे-जुन्नर भागात पसरली. इंग्रज मात्र अधिकच चिडले आणि त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले.
त्यांच्या जीवनातील विश्वासघाताचा प्रसंग
उमाजी राजे नाईक इंग्रजांना बराच काळ चकवून गेले. त्यांच्या शौर्यामुळे व गनिमी काव्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे अशक्य झाले होते. इंग्रजांनी मग चलाखीचा डाव खेळला. त्यांनी जाहीर केले, “ जो उमाजींना पकडून देईल, त्याला मोठे बक्षीस व जमीनजुमला दिला जाईल.”
काही लोभी लोक त्यांच्या या प्रलोभनाला बळी पडले. त्यातीलच एकाने उमाजी राजेंचा ठाव इंग्रजांना सांगितला.
एकदा उमाजी राजे आपल्या मावळ्यांसोबत जंगलात विसावले होते. त्यावेळी त्या विश्वासघातकाने इंग्रज सैन्याला गुप्त खूण दिली. अचानक इंग्रज सिपायांनी सर्व बाजूंनी छापा टाकला. उमाजी राजे शूरपणे लढले, पण संख्येने प्रचंड असलेल्या इंग्रज सैन्यापुढे ते पकडले गेले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यातील फाशीच्या चौकात उमाजी राजेंना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. तेव्हा त्यांनी शेवटचे वाक्य उच्चारले –
“हा बळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे ; माझा आत्मा मुक्त झाला ! ”
अशा रीतीने एका विश्वासघातामुळे शेतकऱ्यांचा राजा, मराठ्यांचा पहिला क्रांतिकारक हरपला. पण आजही त्यांचे नाव ऐकले की लोकांच्या डोळ्यांत आदर व अभिमान दिसतो. महाराष्ट्रात त्यांच्या स्मरणार्थ पुतळे, स्मारके उभारण्यात आली आहेत.
थोडक्यात, उमाजी राजे नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी, अन्यायाविरुद्ध व स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध झुंज देऊन आपले प्राण अर्पण केले. ते मराठी जनतेच्या मनात आजही क्रांतिकारक आदर्श म्हणून जिवंत आहेत.
त्यांच्यासाठी ही कविता 
🌾 उमाजी राजेंची शौर्यगाथा 🌾

होता शेतकऱ्यांचा राजा, 
जनतेचा होता आधार, 
उमाजी नाईक तो शूरवीर
अन्यायाशी सदैव लढणार

गनिमी कावा शास्त्राने
इंग्रजांच्या छातीत धडकी भरली 
गावकऱ्यांच्या हक्कासाठी 
इंग्रजी सिपाईवर झडप घेतली 

उमाजीची पसरली कीर्ती 
इंग्रजाची डोकेदुखी वाढली 
मग केला जालीम उपाय 
लाखोची बक्षीस जाहीर केली 

काही लोकांना झाला लोभ 
उमाजीचा विसरला त्यांनी त्याग 
राहण्याचा सांगून ठावठिकांना
पकडून दिले उमाजी नाईकाना 

असा विश्वासघात त्यांचा झाला
पण ते झुकले नाही कधी
त्या फाशीच्या दोरीवरही 
झळकली त्याची जिद्दी

आजही संपूर्ण महाराष्ट्रात 
गायली जाते त्यांची गाथा,
उमाजी राजे नाईक म्हणजे 
आपल्या स्वातंत्र्याचा प्रणेता

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Friday, 5 September 2025

गणपती बाप्पा मोरया ( Ganpati Bappa Morya....)

सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप
सुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. समाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ? अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या  गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. त्यास आज 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते  यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्या वर वेळ आली आहे असे वाटते.
खरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का ? त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.
गणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप हौस होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघारी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते. कान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कनवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात. असे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का ? जी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा  आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उड़वतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो. दरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय ? कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.
रोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे. आज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळीकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल ! साधारणपणे एका पेपरसाठी महीनाकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी. मग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही तुमच्या गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळेल. गावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 - 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील ? याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.
श्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का ? नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही. वाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात 
गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल. एखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील. गेल्या वर्षी असे एक मंडळ वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.
काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मध्ये वाचाण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही दान द्यायचा असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 - 200 वह्या जमा होतील. त्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हित केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.
तेंव्हा या वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येकाच्या तोंडून निघावे असे कार्य करु या

 गणपती बाप्पा मोरया  ...............

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद 
 ता. धर्माबाद जि. नांदेड 
  09423625769

Wednesday, 3 September 2025

शिक्षक दिन विशेष ( Teachers Day Special )

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

राजे उमाजी नाईक ( Raje Umaji Naik )

शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक  राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक श...