Saturday 24 March 2018

जय जवान, जय किसान

जय जवान, जय किसान

आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वी जेंव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून नुकतेच स्वातंत्र्य झाले होते त्यावेळी भारतातील जनता पूर्णपणे स्वयंपूर्ण होती. शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. मात्र हळू हळू काळ बदलत गेला. शेतकऱ्याच्या जीवनात कामाच्या बदल्यात धान्य ऐवजी पैसा आला आणि सर्व चित्र पलटत गेले. ही व्यापारी लोकांची चाल होती की अन्य कोणाची माहीत नाही मात्र देशात रुपया फुगू लागला तसा शेतकरी नागवू लागला. शेतकऱ्याला परावलंबी करून टाकले त्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर जात आहे. फार पूर्वी शेतात मिळालेले उत्पन्नातुन अस्सल धान्य ठेवून तेच बी म्हणून वापरत होते. गाई म्हशी आणि इतर जनावरांचे मलमूत्र खत म्हणून वापरत होते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळत होते मात्र दर्जेदार मिळत होते. आज भरमसाठ उत्पन्न मिळते मात्र त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी स्थिती आहे. गावागावात बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, ज्यामुळे प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पडत होते. शिक्षणाने आपल्या सर्वांचा विकास झाला मात्र शेती ओस पडू लागली. महात्मा गांधीजी खेड्याकडे चला असे म्हणाले यातून त्यांना असा संदेश द्यायचा होता की, खेड्यातील शेती टिकवा. पण ह्याकडे कुणी लक्ष दिले नाही. जो तो शिकून सवरून नोकरी करण्याच्या मागे धावू लागला. शेतकरी दरवर्षी लॉटरीचा खेळ खेळतो कधी त्यात त्याला यश मिळते तर बहुतांश वेळा त्यात अपयशच मिळते, तरी ही शेतकरी नाउमेद न होता दरवर्षी नव्या उत्साहात कामाला लागतो. यावर्षी तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा तो करीत असतो.
शेतकऱ्याने शेतात काम केले तरच देशातील इतर नागरिकांची भूक मिटू शकते, याची जाणीव सर्वप्रथम तयार होणे आवश्यक आहे.  सर्व काही कारखान्यात तयार करता येईल मात्र अन्न म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे पदार्थ निर्मिती करण्यासाठी शेतातच जावे लागते त्याशिवाय पर्याय नाही. शासनाने या शेतकऱ्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल असे मदत द्यायलाच हवे. कर्जमाफी करून कोणता शेतकरी स्वावलंबी होत नाही उलट तो आळशी बनतो त्यापेक्षा त्याला इतर जोड व्यवसाय कसे करता येतील याची माहिती गावोगावी देऊन शेतकऱ्यांना आज स्वतःच्या पायावर सक्षम उभे करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा आज जो मनोरथ ढासळलेला आहे त्यास कुठे तरी आधार मिळाला पाहिजे. साठ वर्षाच्या वरील वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची आपली योजना खरोखर त्यांना उभारी देईल आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करेल, अशी एक आशावाद निर्माण होत आहे. राजा शिवछत्रपतीच्या काळातील शेतकरी राजा पुन्हा एकदा तयार करण्यासाठी सर्वांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र तोच पोशिंदा आज कुपोषित होत आहे. त्यास निसर्ग ही।साथ देत नाही आणि सरकार ही अश्या दुहेरी कोंडीत तो सापडतो. प्रत्येकजण त्यास लुबाडण्यासाठी सज्ज असतो. बियाणे वाले लुबाडतात, खत वाले लुबाडतात आणि व्यापारी देखील लुबाडतात. या अश्या परिस्थितीमुळे त्याची खूपच बिकट अवस्था होते. त्याच्या विषयी मनात कोणालाही कणव निर्माण होत नाही किंवा खंत वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या देशातील शेतकरी हा एक महत्वपुर्ण व्यक्ती आहे. म्हणून प्रत्येकांनी त्याच्या कार्याला त्रिवार सलाम द्यायलाच हवे, त्याला।समाजात सन्मान मिळायलाच हवे. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. कारण जवान म्हणजे सैनिक हा देशाचे संरक्षण करतो तर किसान हा देशातील लोकांचे पोषण करतो. म्हणून हे दोन्ही देशाचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख प्रकाशित झाल्यावर pdf पाठवून सहकार्य करावे.

Friday 23 March 2018

श्रीरामनवमी विशेष

रघुपती राघव राजाराम

भगवान श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे व जनतेचे अधिष्ठान आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू येणारी श्रीराम जय राम जय जय रामचा उदघोष याची साक्ष आहे. भारतातील ग्रामीण भागात आजही दोन व्यक्ती समोरासमोर आले की परस्परांना दोन्ही हात जोडून राम राम म्हणतात. यातून एक अर्थ असाही निघतो की, प्रत्येक व्यक्तीत राम वसलेला आहे. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो. कारण त्यांचे राज्यच होते तसे आदर्श. एखाद्या व्याधी समस्येवर किंवा संकटावर शेवटचा उपचार म्हणजे रामबाण उपाय होय. कारण त्यांचा प्रत्येक कर्म हा जीवनातील प्रत्येक समस्येवर शेवटचा उपाय आहे. भगवान श्रीरामाचे प्रेमशासन भारतीयांच्या हृदयावर आजतागायत चालू आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात झाला. जेंव्हा जग आणि जीव आधि व्याधि आणि उपाधी यात तप्त होत होते तेव्हा जगाला सुख शांती देण्यासाठी प्रेम, पावित्र्य व  प्रसन्नतेचा हा पुंजजन्म घेतला. त्यांचा जन्माने संपूर्ण जगाला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग लाभलेला आहे. श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून एकेक गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास रामो भुत्वा राम यजेत. अर्थात राम होऊन रामाची पूजा करणे असा उजाडेल यात शंका नाही. कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय या सर्वच क्षेत्रात वावरताना आपली मर्यादा कोणती हे कळण्यासाठी भगवान श्रीराम चरित्रांचा अभ्यास करावा. श्रीरामांनी आपल्या विचारात, विकासात किंवा व्यवहारात सर्वच कार्यात कधीही मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. आजच्या श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांच्या गुणांचा परामर्श घेऊन त्याचा स्वीकार केल्यास खऱ्या अर्थाने नवमी साजरी केल्यासारखे होईल.
भगवान श्रीरामांनी आपल्या समोर एक कौटुंबिक आदर्श ठेवले आहे. रामाला दुसरे तीन बांध होते. परंतु त्यांच्यात कधीही कलह किंवा वाद झाला असे आपण कधी ऐकलेले नाही. त्यागात पुढे व भोगात मागे असा त्यांचा जीवन मंत्र होता. येथे नेहमी दुसर्‍यांचा विचार करण्यात येतो, त्यागाची तयारी ठेवण्यात येते, तेथे क्लेश, भांडण, झगडा, कलह, वाद  हे सर्व शेकडो कोस दूर रहातात. आज आपणाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे. पिता राजा दशरथाने वनात जाण्याची आज्ञा दिल्यावर ते थोडेदेखील दुःखी झाले नाही वडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे परमकर्तव्य आहे त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणारा पुत्रच आदर्श बनवू शकतो.
वृद्ध माता पित्याला सहारा देण्यात यावे  असा कायदा सरकारला तयार करावा लागतो. आपली फार मोठी नामुष्की आहे. जिच्या वचनामुळे श्रीराम यांना वनवास भोगावा त्या कैकयी मातेवर त्यांनी कधीच राग धरला नाही. आईला समजून घेणारे पुत्र बनणे म्हणजेच तिने आपणाला जन्म देताना घेतलेल्या त्रासाची परत केलेली पावती नव्हे काय ? श्रीरामाचे तीन ही आईवर सारखेच प्रेम होते. रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवून आणल्यानंतर अयोध्या नगरीतील लोकांची कुजबुज लक्षात घेऊन श्रीरामाने आपली पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. यामागे राज्यातील लोकांचा विश्वास संपादन करणे हे राजाचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे श्रीरामाने सीतेचा त्याग केला. त्यांच्या हृदयात फक्त एकच स्त्रीसाठी जागा होती ती म्हणजे सीता. एकपत्नी निष्ठ पती राहणे म्हणजेच त्याला सितापती म्हटले जाते. आज भारतात जो अनैतिक किंवा अत्याचार बोकाळला आहे त्यावर सितापती हा पर्याय सर्वोत्तम आहे.
ऋषी विश्वामित्र हे श्रीरामाचे गुरू होते. विश्वामित्रांचे श्रीरामावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त श्रीरामाचे विश्वामित्रावर होते. आश्रमात एक हृदय दुसऱ्या हृदयाशी बोलत होते. विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्येसोबत जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सुद्धा नकळत शिकविले. श्रीरामाच्या गुरुभक्तीमुळे व गुरुवर असलेल्या अपार श्रद्धेमुळे त्यांना ऋषींनी जगातील सर्व ज्ञान दिले. गुरुविना जीवन नाही आणि गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. याची जाणीव त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून होते. कष्किंध्येच्या असुरी व जुलमी वाली वानराला मारून श्रीरामाने सुग्रीवाचे मन जिंकले आणि सुग्रीवाने लंकेतील सीतेला सोडविण्यात श्रीरामाला सर्वतोपरी मदत करून क
मैत्री कायम केली. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे त्यांचे कार्य होते. संकटात मदत केलेला मित्रच खरा मित्र म्हणून ओळखला जातो. रावण हा रामाचा शत्रू होता. त्यांच्या निधनानंतर बिभीषण अग्निसंस्कार करण्यास नकार देतो त्यावेळी स्वतः श्रीराम हे काम करण्यास पुढे येतात यातून त्यांचे शत्रूवर असलेले प्रेम ही कळते. कष्किंध व लंका राज्य जिंकून त्यांनी आपले साम्राज्य वाढविले नाही. याउलट ते दान करून तेथील लोकांचे मन जिंकले. दुसऱ्याची वस्तू घेण्याने त्याच्यात प्रेम तर राहणारच नाही उलट वितुष्ट निर्माण होते. भगवान श्रीरामाच्या अंगी असलेल्या मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, शत्रूप्रेन, मित्रप्रेम, पत्नीप्रेम, राज्यप्रेम, जनप्रेम, आणि गुरूप्रेम या नऊ गुणांचा जीवन जगतांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास पृथ्वीतलावर असलेले दुःख, क्लेश, तणाव नक्की नाहीशे होतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा जनतेला रामाच्या जीवनाचे पालन करण्यास सांगितले होते. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम ह्या त्यांच्या धूनमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Thursday 22 March 2018

आत्महत्या : एक चिंतन

अात्महत्या : एक चिंतन

" कर्जाच्या चिंतेपायी एका शेतकऱ्याची आत्महत्या", 
"परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या", 
" परीक्षेचा पेपर अवघड गेल्यामुळे नदीत उडी मारून एका युवकाची आत्महत्या",
" नैराश्याच्या गर्तेत एका बेरोजगार युवकाची आत्महत्या", 
"बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या", 
"हुंड्यापायी नववधूने केली आत्महत्या", 
"महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाची आत्महत्या" 
" प्रेमात विफल झालेल्या एका युवकाची आत्महत्या " असे एक नाही अनेक आत्महत्येच्या बातम्या आपण रोज वाचत असतो आणि ऐकत असतो. आत्महत्येची बातमी प्रकाशित केल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही आणि अशी बातमी वाचल्याशिवाय वाचन पूर्ण होत नाही, अशीच काहीशी स्थिती आज दिसून येते. त्यांना आत्महत्या का करावी वाटली ? याचा जर विचार केला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते ते म्हणजे आत्महत्या करणारे लोक अत्यंत शेवटच्या टोकाचे विचार करतात. समाजात किंवा कुटुंबात त्यांची काही तरी पत असते आणि ती पत नष्ट होताना त्यांना पहावले जात नाही. स्वतःची अब्रू अशी वेशीला टांगताना उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही म्हणून ते कदाचित हा मार्ग स्वीकारत असतील असे वाटते. जेंव्हा जगणेच मुश्कील होऊन बसते आणि यापेक्षा मेलेले बरे असा जेंव्हा विचार मनात येतो तेंव्हा आपोआप ती पाऊले आत्महत्येकडे वळतात. एकाच बाबीवर जास्तीत जास्त वेळा विचार केला की माणूस टोकाची भूमिका घेऊ शकतो. माणसासमोर अनंत कष्ट आणि अडचणी असतात. त्या सर्व समस्येवर कुठे ना कुठे पर्याय असतो. मात्र ही समस्या सुटणार नाही आणि माझे काही खरे नाही असे जेंव्हा आपल्या मनाला वाटते तेंव्हा माणूस जीवन संपविण्याचा मार्ग धरतो. मात्र आजची वेळ उद्या नसते. उद्याची आपली सकाळ कदाचित वेगळी असू शकते. या आजच्या समस्येला उद्या पर्याय मिळू शकतो आणि समस्या संपू देखील शकते असा आशावाद जो ठेवतो तो कधीच आत्महत्येचा विचार करीत नाहीत. जे लोक आत्महत्येचा विचार करतात ते कमजोर मनाचे असतात. त्यांना काही गोष्टी सहन होत नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की, त्याचा परिणाम यांच्यावर होतो. आपल्या कुटुंबात, समाजात किंवा मित्र परिवारात असे आत्महत्येचे प्रसंग घडू नये यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कुटुंबात प्रेमाचे आणि हास्यमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. बहुतांश वेळा कौटुंबिक दूषित वातावरणामुळे लोकांचे मन विचलित होतात. नवरा-बायको यांचे भांडण मग ते कसल्याही प्रकारचे असेल त्यामुळे मन वितुष्ठ होतात. घरातील लहान मुलांना शक्यतो प्रत्येक गोष्टी साठी रागावून बोलणे उचित ठरत नाही. तसेच पालकांनी मुलांवर अपेक्षेचे ओझे न ठेवता मुलांकडून खूप मार्काची अपेक्षा ठेवू नये. कदाचित ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाही तर त्यांच्या मनात एक वेगळाच विचार चालू होतो. म्हणून त्याची कुवत जशी असेल त्या पद्धतीने तो प्रगती करीत राहतो. जेंव्हा तो शहाणा आणि समजदार होईल त्यावेळी तो खरीच चांगली प्रगती करून दाखवेल. परंतु आपण नेहमी आपल्या मुलांची तुलना शेजारच्या मुलांशी करीत असतो आणि येथेच आपली फार मोठी गल्लत होते. मुले जसे जसे एकलकोंडी होत जातील तसेतसे ते वेगळाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी हसत खेळत वातावरण असणे अत्यावश्यक आहे. बेरोजगार युवकांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही उदास होतात. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी देखील जातात. मात्र युवकांनी आपल्या जवळ असलेल्या ज्ञान आणि कौशल्य याचा वापर करून स्वतः रोजगार निर्माण केल्यावर तुम्हीच दोन माणसाला कामावर ठेवू शकता. तसे विचार आपल्या डोक्यात यायला हवे. आपले डोके नको असेल त्याठिकाणी भलत्याच वेगात धावते आणि स्वतः ला जेंव्हा सिद्ध करायची वेळ येते तेंव्हा शांत झोप घेते. भारतात असे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत ज्यातून आपणास रोजचे 50 रुपये तरी कमाई मिळते. माणसाच्या हातात पैसा नसला की काही सुचत नाही. मात्र हातात दहा रुपये असतील तर जो व्यक्तीचे दहाचे बारा कसे करायचे याचा जो विचार करतो तो कधी ही जीवनात असफल होत नाही. त्याच्या मनात कधी नैराश्य येत नाही. आत्महत्या करणाऱ्यात शेतकरी वर्गाची संख्या भरमसाठ आहे. निसर्गाची साथ चांगली मिळाली तर शेतकऱ्याला अजून दुसरे कोणी लागत नाही. मात्र दरवर्षी निसर्ग साथ देत नाही, वेळी यावेळी पाऊस पडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होते, हाता तोंडाशी आलेला घास जेंव्हा मातीत मिसळतो तेंव्हा काय वेदना आणि त्रास होत असेल ते शेतकरीच जाणतो. उभ्या जगाचा पोशिंदा आहे मात्र स्वतः उपाशी. डोळ्यासमोर नुकसान होत असताना जर शेतकऱ्यांना काही करता आले नाही तर त्याचे डोके चक्रावते. यावर्षी तरी कर्ज फेडू या विचारात असलेला शेतकरी परत एकदा त्या कर्जाच्या चक्रवाढ व्याजेत दाबला जातो. त्याच्या डोळ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. मात्र शेतकरी बांधवांनो असे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी एक वार आपल्या बायकोला, आपल्या लेकरांना एकदा वळून बघा. तुमच्याशिवाय खरोखर ते सुखी जीवन जगू शकतील काय ? वृद्ध आई बाबांना तुमच्या पश्चयात कोण पाहणार आहे. परीक्षा आणि निकाल या दोन्ही काळात विद्यार्थी ताणतणाव मध्ये वावरत असतो. हुशार मुलांना जास्त गुण घेण्याची काळजी तर काही मुलांना पास होण्याची काळजी. नापास झाल्याने काही आभाळ कोसळणार नाही, पुढील वर्षी अजून जास्त जोमाने अभ्यास करण्याचा सकारात्मक विचार मनात आणावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करून आत्महत्येला ठोकर मारावी. तसा विचार मनात आला तर मनाला जे आवडते ते करावे. आपले आवडते गाणे गुणगुणत राहावे, मित्रांच्या घोळक्यात राहावे, चित्रपट पाहावे, कुठे तरी फिरायला जावे, अश्या अवस्थेत एकटा कधी ही राहू नये, जवळच्या व्यक्तींनी अश्या अवस्थेत त्यांना एकटे ठेवू नये.  एकटा असलो की, काही ना काही विचार मनात घोळत राहतात. आज जे आहे ते उद्या राहणार नाही याचं आशेवर जीवन जगणारे आपले पूर्ण आयुष्य जगतात. या पृथ्वीतलावर जन्म घेणे जसे आपल्या हातात नाही तसे जीव संपविणे देखील आपल्या हातात नाही. आत्महत्या हा एक फार मोठा गुन्हा आहे, ज्याचे फळ आपल्या माघारी आपल्या प्रियजनाना मिळतो.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...