Saturday 10 December 2016

सन 2016 या वर्षात विविध वृत्तपत्रात प्रकाशित झालेले लेख


सन 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या सर्व लेखाचा आढावा घेतला तब्बल तीन तास लागले सर्व साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी.

मित्रांनो सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो की जवळपास सव्वाशेच्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. सर्व लेखाची कात्रण आणि यादी करताना पूर्ण तीन तास लागले.

*Feelings so Happy*

1) नविन वर्ष सुखाचे जावो
2) पत्रकार दिन 
3) जागरूक पालकच खरे मालक
4)शिक्षक विद्यार्थी नाते घडते बिघडते
5) व्यसनी शिक्षकावर करडी नजर
6) मोबाईल क्रांती आणि जीवन
7) दुष्काळ उठला शेतकऱ्यांच्या मुळावर
8) रुपयाला अच्छे दिन येतील काय
9) शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . !
10) नोंदणीचे महत्व
11) युवकांच्या चांगल्या सवयी
12) मुलींच्या शिक्षणात शासनाची भूमिका
13) अनाठायी खर्च टाळू या
14) गावाला शाळेचा अभिमान असावा
15) पूरक वाचनाचा एक तास
16) शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल ?
17) मोबाईल महत्वाचे की शौचालय
18) जीवनात हसण्याचे महत्व
19) मी भारतीय आहे
20) मुख्याध्यापक खास तर शाळेचा विकास
21) छडी लागे (ना) छम छम
22) बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक
23) महिलांच्या प्रगतीत पुरुषांची भूमिका
24) टी व्ही न पाहण्याचा संकल्प
25) जीवनात वाचनाचे महत्व
26) जनतेचा आधार
27) अभ्यासाशिवाय पर्याय नाही
28) शाळा व्यवस्थापन समितीची यशस्वीता
29) तस्मै श्री गुरवे नमः
30) तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?
31) श्रध्दा आणि अंधश्रद्धा
32) स्त्री जन्माचे स्वागत करू या
33) अप्रगत मुलांची प्रगती होईल ?
34) जीवनातील अनमोल मित्र
35) देशासाठी माझे योगदान काय ?
36) पर्यावरण आणि मानवी जीवन
37) माझे गुरु : एक आठवण
38) जिंदगी का नाम दोस्ती
39) पितृदेवो भव किंवा वडिलांची सजग भूमिका
40) जेथे मनाई तेथेच घाई
41) परिपाठातून संस्कार
42) प्राथमिक शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी
43) शून्य टक्के निकाल का लागतो ?
44) शाळेचा पहीला दिवस
45) शाळेतून हद्दपार करावी जातीभेदपणा
46) मुलां-मुलींत अंतर कशासाठी ?
47) बेरोजगार तरुणांचा देश
48) बालिका वधू कशी थांबेल ?
49) यशस्वी जीवनात शिस्तीचे महत्व
50) मोबाईल क्रांती
51) स्वयंशिस्त हाच प्रभावी उपाय
52) मोबाईलचा अति वापर टाळावे
53) आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम
54) आई म्हणजे संस्काराचे माहेरघर
55) बालविवाह थांबविण्याचे उपाय
56) गोष्ट लहान पण काम महान
57) जगाला प्रेम अर्पावे
58) मोफत जमान्यातील मोफत वाचक
59) शालेय पोषण आहार योजनेचा इतिहास
60) सर, मला गणवेष द्या ना . . !
61) शेतीप्रधान देशांतील दुर्दैवी शेतकरी 
62) स्त्री भृण हत्या : एक शाप 
63) सरपंचाची निवड थेट जनतेमधून व्हावी 
64) शाळा डिजिटल झाल्या पुढे काय . . ? 
65) खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल काय ? 
66) सार्वत्रिक बदल्या आवश्यक 
67) शिक्षण : जीवन विकासाचे साधन 
68) 25 % प्रवेश मिळेल . . पण विद्यार्थी टिकेल काय ? 
69) स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी
70) शाळेचा कणा : मुख्याध्यापक 
71) भारतमाता की जय 
72) भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार
73) दारूबंदी महत्वाचे की दारूमुक्ती
74) शिक्षकाच्या हातात खडु द्या
75) मोफत जमन्यातील मोफत वाचक
76) आई माझी गुरु 
77) मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण
78) अनिष्ट रुढी परंपरा
79) जगाला प्रेम अर्पावे
80) मोबाईलचे वेड
81) भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार
82) भारतमाता की जय
83) जिल्हा परिषद शाळा कात टाकतय
84) सुंदर हस्ताक्षर : एक दागिना
85) शिक्षण अधिकार कायद्यात सुधारणेची गरज
86) विकारी विचारावर विजयाचा दिवस - गुढीपाडवा
87) शिका, संघटित व्हा अन संघर्ष करा 
88) रामनवमी 
89) शिक्षण : जीवन विकासाचे साधन
90) वसुदैव कुटुंबकम
91) बालमजूरी कशी संपेल
92) कॉमनसेन्स
93) खेड़ोपड़ी ATM ची आवश्यकता
94) शाळेला चाललो आम्ही
95) उत्सव शाळा प्रवेशोत्सवाचा
96) पालक सभा : स्तुत्य उपक्रम
97) हे विश्वची माझे घर
98) लोकसंख्या दिन
99) माझे गुरु : एक आठवण
100) नो हेल्मेट ; नो पेट्रोल 
101) शिक्षणाचा काय फायदा ?
102) तस्मै श्री गुरवे नमः
103) तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज
104) मरावे परी कीर्तीरूपी उरावे
105) भारतीय स्वातंत्र्याची सत्तर वर्षे
106) गोष्ट एका रूपयाची
107) शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्त्व
108) तरुण भारत देश घडवू या
109) शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस
110) बैलाचा सण : पोळा
111) सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप
112) दप्तराच्या ओझ्यापासून सुटका होईल ?
113) मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिन
114) सुंदरता महत्त्वाची की गुणवत्ता
115) ऑफलाइन शाळेची ऑनलाइन कामे
116) संतुलित आहार
117) महागड़े शिक्षण
118) जीवन सुंदर आहे
119) स्वच्छता आणि आरोग्य
120) मनुष्य गौरव दिन
121) पेंशन : निवृत्तीचा आधार
122) भारतीय संस्कृती वाचविण्याची गरज
123) से नो टू सेल्फी
124) जीवघेणा प्रवास टाळा
125) मुलांना समजून घेताना
126) नोटावर बंदी ; बाजारात मंदी
127) देशाच्या विकासात रस्त्याचे महत्त्व
128) भारतीय संविधान दिन
129) हेडफोनपासून दुरच रहा
130) खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय
131) असून अडचण नसून ......!
132) माणुसकी जागवू, विषमता संपवू
133) हमें तो लूट लिया
134) गीता जयंती 
135) निवडणूक कर्मचारीच मतदानापासून वंचित

136) आयोगाचा योग्य निर्णय

137) एका पुरुषाची आत्मकथा

138) मला माणूस व्हावेसे वाटते

139) टाचण काढण्यापासून सूट हवी ?

140) सरकारी शाळेत हाऊसफुल्ल पाटी

141) मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

142) चूलीच्या धुराड्यातून महिलांची उज्ज्वला मुक्ती

143) माझ्या नजरेत 2016 वर्ष

- नागोराव सा. येवतीकर



Friday 9 December 2016

*सरकारी शाळेत हाउसफुल्ल पाटी*

*सरकारी शाळेत हाउसफुल्ल पाटी*

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून 14 हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित झाले असल्याचे वृत्त वाचून सरकारी शाळेमधील तमाम शिक्षक मंडळींना खुप अभिमान वाटला आणि छाती फुलून गेली. पुढील एक दोन वर्षात सरकारी शाळेत हाऊस फुल्ल ची पाटी बघायला मिळेल असे स्वप्न पाहण्यास हरकत नाही. गेल्या दीड- दोन वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षणाचे परिर्वतनाचे वारे मोठया प्रमाणात वाहत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत राज्यातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शाळा, रचनावादी शिक्षण आणि स्पोकन इंग्रजीचे धडे आणि विविध मार्गाने विद्यार्थ्यांना प्रगत करत आले आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर चालूच आहे. या शिक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी ख-या अर्थाने अधिक दर्जेदार शिक्षण मिळू लागले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याचा परिणाम असा झाला की राज्यातील अनेक खाजगी अनुदानीत शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील अनेक विदयार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेले आहेत, आता पर्यंत सुमारे 14 हजार विदयार्थानी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घतला आहे, असे अधिकृत आकडा सांगण्यात येतो कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकते. आज पालकाचा सरकारी शाळा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला याचे सर्व श्रेय शिक्षक मंडळींना जातो. यात काही वाद नाही. पण खरोखरच अजुन काही वेगळे प्रयत्न केले असते तर ही संख्या लाखाच्या घरात गेली नसती काय ? असाही प्रश्न निर्माण होतो.

शिक्षक संख्या - शाळेत शिकविणारे शिक्षक संख्या पूर्ण असेल तर पालक जवळची शाळा सोडून जातच नाही. येथे वर्ग तितके शिक्षक संख्या नसल्यामुळे सरकारी शाळेतील अत्यंत हलाखीचे चित्र रोज पाहणारा पालक आपल्या पाल्यास येथे प्रवेश काय म्हणून देईल ? तो इंग्रजी शाळा किंवा खाजगी मराठी शाळेकडे वळतो. वर्गाला एक शिक्षक संख्या असल्या शिवाय प्राथमिक वर्गात दर्जेदार अध्यापन होऊ शकणार नाही आणि ते शिक्षक त्या विद्यार्थ्यास न्याय देऊ शकणार नाही. विद्यार्थी संखेच्या आधारावर संचमान्यता करून दरवर्षी शिक्षक पदाचे समायोजन करता करता अधिकारी लोकांची दमछक होऊन जात आहे. सरकारी शाळा टिकविने, वाढवीने आणि त्याचा विकास करणे ही जबाबदारी पूर्णपणे शिक्षक मंडळी वर येऊन पडली आहे. शाळेत टिकून राहायचे असेल तर आणि अतिरिक्त होऊन बाहेर पडायचे नसेल तर तसेच 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्येमुळे शाळा बंद होऊ द्यायचे नसेल तर काहीही करा पण विद्यार्थी मिळवा असे बंधन शिक्षक लोकांवर आहे. दरवर्षी होणाऱ्या या समायोजन प्रक्रियामुळे शिक्षक वर्षभर चिंताग्रस्त राहतो. त्यामुळे जेवढे वर्ग तेवढे शिक्षक असे धोरण तयार केल्यास सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या नक्की वाढली असती. शासनाने असे धोरण जर तयार करुन या बाबीवर नक्की विचार करावे.
शिक्षक भरती - गेल्या पाच-सहा वर्षा पासून शिक्षक भरती पूर्णतः बंद आहे. दरवर्षी हजारोच्या संखेने डी. टी. एड. पदविका धारक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्या हाताला काहीच काम मिळत नाही. 
विद्यार्थी संख्या वाढ होऊन देखील शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न सुटत नाही. आज ही कित्येक शिक्षक अतिरिक्त आहेत ज्याना शाळा ही नाही, शासन त्यांना फुकट पोसत आहे. दरवर्षी तेच ते समायोजन करून नव्याने शिक्षक भरती केव्हा करणार ? शिक्षक भरती बंद असल्यमुळे डी. टी. एड. धारक लाखो विद्यार्थी नोकरीच्या शोधात बेकार फिरत आहेत. त्यांचे हाल बघवत नाही. जर हे हात सरकारी शाळेसाठी मदतगार ठरले असते तर आजचे सरकारी शाळा चे चित्र नक्की वेगळे दिसले असते. राजकीय इच्छाशक्ति कुठे तरी कमी पडतेय त्यामुळे शिक्षक भरती चा प्रश्न निदान यावर्षी तरी सुटणार नाही कारण यावर्षी जेवढे पद रिक्त आहेत तेवढेच पद अतिरिक्त आहेत. म्हणजे बरोबर ला बरोबर. पुढील वर्षात अशीच सरकारी शाळेत प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या वाढ झाली तर ही भरती ची प्रक्रिया करता येईल. समायोजन ही न संपणारी आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे.
विविध योजना - विद्यार्थी शाळेत यावा, शिकावे, आणि टिकावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना तयार करते आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा करते. मात्र सर्वच योजना फक्त सरकारी शाळेला दिली असती तर कदाचित आज दिसत असलेले चित्रापेक्षा वेगळे चित्र बघायला मिळाले असते असे वाटते. यामुळे इंग्रजीच नाही तर खाजगी अनुदानित मराठी शाळेतील मुले देखील सरकारी शाळेत आले असते म्हणजे सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली असती म्हणून सरकारी योजना फक्त सरकारी शाळेलाच देण्यात यावे जसे की, मोफत पाठ्यपुस्तक योजना - ही योजना सरसकट सर्व शाळेला विनाअनुदानित सोडून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिल्या जाते. त्यामुळे साहजिक आहे पालक आपल्या पाल्यास सरकारी शाळेऐवजी खाजगी शाळेत प्रवेश देतो. सरकारी शाळेच्या सर्वसोईसुविधा इतर शाळेत मिळत असतील तर इथे कोण प्रवेश घेईल ? याचा कोणी विचार करताना दिसून येत नाही. आपल्या मुलांना खाजगी शाळेत प्रविष्ट करून पालकाची खर्च करण्याची तयारी असेल तर त्यांना का म्हणून योजना द्यायची त्यापेक्षा त्यातील पैसा सरकारी शाळेवर खर्च केल्यास सरकारी शाळेचा दर्जा नक्की वाढेल. खाजगी शाळेला योजना देणे बंद करावे मग पहा सरकारी शाळा फुल्ल होतात की नाही ते. अशीच दुसरी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि विद्यार्थी शाळेत टिकून रहावे यासाठी शासनाने सन 2003 पासून ही योजना मध्यान्ह भोजन योजनेत रूपांतरित केली. तत्पूर्व मुलांना महिन्याकाठी 2 किलो 30 ग्राम तांदूळ मिळायचे. शाळेत जेवण सुरु झाल्यापासून खरोखरच मुलांची उपस्थितीत वाढ झाली आणि ते नियमित शाळेत येऊ लागली. शहरी भागात हे चित्र तुरळक प्रमाणात दिसत असेल पण ग्रामीण भागात मात्र हे वास्तव आहे. एखाद्या दिवशी अचानक शाळेत अन्न शिजविण्यात आले नाही तर मुलासमोर प्रश्न पडतो की आत्ता मी काय खाऊ ? कारण घरची सर्व मंडळी शाळेच्या भरवश्यावर घराला कुलूप लावून शेताला जातात. म्हणून ग्रामीण भागात आज ही योजना म्हणजे विद्यार्थ्यासाठी वरदान आहे. जशी सरकारी शाळेत ही योजना राबविली जाते तसे खाजगी अनुदानित शाळेत देखील राबविली जाते. त्यामुळे पालकाचा ओढा अर्थातच खाजगी शाळेकडे असणार यात शंका नाही. सरकारी शाळेत विद्यार्थी संख्या वाढ करायची असेल तर ही योजना फक्त आणि फक्त सरकारी शाळेस लागू करावी म्हणजे पालकाना आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने आकर्षित करता येऊ शकेल.
RTE ची अंमलबजावणी - 
शिक्षणाचा अधिकार कायदा सन 2009 मध्ये तयार करण्यात आला आणि एप्रिल 2010 पासून राज्यात त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली. आज सहा वर्षा नंतर सुद्धा या कायद्यातील काही गोष्टीची अंमलबजावणी झालेली नाही. इयत्ता चौथी वर्गास पाचवा वर्ग जोडने आणि सातव्या वर्गास आठवा वर्ग जोडण्याची प्रक्रिया अजून ही पूर्ण झाली नाही. अधिकार कायद्यातील नियमानुसार शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. उच्च प्राथमिक वर्गास आज डी. टी. एड. धारक शिक्षक अध्यापन करीत आहे. यावरून त्या शाळेची आणि विद्यार्थ्याची काय गुणवत्ता अपेक्षित करणार ? कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शिक्षक संख्या कशी वाढविता येईल याचा विचार केल्यास नक्कीच दर्जा सुधारेल. खाजगी शाळेत काम करणाऱ्या कर्मचारी मंडळीना शासन वेतन देते मात्र तेथे त्यांचे काहीही चालत नाही. हा एक विरोधाभास चित्र बघायला मिळते. काम करायचे एकाचे आणि त्याचा मोबदला मात्र दुसऱ्यानी द्यायचा. मध्यंतरी खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याची भरती शासन करणार असल्याचे वृत्त वाचण्यात आले होते. पण पुढे काय झालं ? कुठे माशी शिंकली माहित नाही, ते ही गुलदसत्यात आहे. शाळेला पूर्ण अनुदान मिळत असेल तर त्या शाळावर शासनाचे नियंत्रण आल्यास सरकारी शाळा नक्कीच सुधारणा होईल असे वाटते. शहरात आज ही सरकारी शाळा ओस पडलेल्या आहेत. माध्यमिक शाळाची अवस्था तर पाहू वाटत नाही म्हणून काही तरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यास पूर्णपणे राजकीय ईच्छाशक्तीची गरज आहे. त्याच्यापुढे कोणाचे काही काही चालत नाही. सरकारी शाळा हेच लक्ष्य ठेवल्यास खुप काही बदल होऊ शकतो. यातून अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा व शिक्षक यांचे मन दुखावण्याचा अजिबात हेतू नाही फक्त सरकारी शाळा कसे टिकतील ? याविषयी विचार मांडले आहे.

- नागोराव सा. येवतीकर
  स्तंभलेखक
  9423625769

Thursday 8 December 2016

गीता जयंती

गीता जयंती विशेष प्रासंगिक लेख

" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन "

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन अर्थात फळाची आशा न करता कर्म करीत जा असे पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. पाच हजार वर्षापुर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या सुप्रभाती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला समोर ठेऊन संपूर्ण मानवमात्राला जीवनाभिमुख करणेस्तव श्रीकृष्णाने आपल्या मुखारविंदातून जे जीवनाचे सार मांडले ती म्हणजे गीता. आज गीता जयंतीचा दिवस. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ही जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जाते. गीता ही भगवंताने स्वतः गायिली आहे, हेच याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. गीता हे वैश्विक ग्रंथ आहे. गीता ही मानव धर्मासाठी आहे, त्यावर आधारीत मानव आपले आदर्श असे आयुष्य जगू शकतो. मानवाचे जीवन चरितार्थ कसे असावे ? याबाबत मोलाचे मार्गदर्शन यात सांगितले आहे. "योगक्षेमं वहाम्यहम" ची संकल्पना यात दिसून येते. अहं ब्रम्हास्वी ची जाणीव सुद्धा मिळते. लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत ,साधू संन्यासापासून संत महात्म्यापर्यंतच्या सर्वच लोकांना यातून मार्ग मिळतो. हीच गीता लोकांना सहज समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरानी मराठी मायबोलीतून 'ज्ञानेश्वरी' लिहली. गीता ही प्रत्येकासाठी पथदर्शी आहे. मानवाला लाभलेले जीवन खुप अनमोल आहे म्हणून जीवनात रडण्यापेक्षा हसण्याला जास्त महत्व द्यावे. संकटाला भिवून पळण्यापेक्षा त्यास तोंड देण्याची शक्ती या गीतेतून मिळते.
एखाद्या कामात यश मिळाले नाही की व्यक्ती निराश होतो. परंतु निराश न होता अधिक शक्तिने प्रयत्न केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. निराशेच्या अंधारात भटकणाऱ्या मानवाच्या जीवनात गीता प्रकाश पसरवते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, याची शिकवण सुद्धा गीता देते. निरुत्साही माणसाला उत्साह मिळवून देते. मानवाला स्वतः वरील श्रद्धा नष्ट होऊ देत नाही. वारंवार स्वतः चा आत्मविश्वास जागृत करीत राहते. त्यामुळे मानव जीवनात विफल होत नाही व अपयशातुन यश मिळविण्याचा प्रयत्न करतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला गीता जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सांगते. त्या मार्गावरुन गेलेला व्यक्ती आजपर्यंत असफल झाला नाही.
या गीतेत एकूण 18 अध्याय असून 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट असे नाव आहे जसे की बाराव्या अध्यायाला भक्तीयोग असे नाव आहे ज्यात भक्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे.
मानवाचे जीवन बालपण, तारुण्य व वार्धक्य या तीन अवस्थेतून जातो तेव्हा तो काही महत्त्वाचे गुण स्वीकारूनच दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करतो. बालपणात बालक असून बालिश नाही, तरुण बनेल परंतु उत्श्रृंखल नाही, वृद्ध होईन परंतु निराश नाही ही जीवनाची त्रिसूत्री गीतेतून मिळते . जीवनात प्रत्येक मनुष्य मृत्यूला घाबरतो, मरण कोणालाच नको वाटते. परंतु जन्म घेणारा प्रत्येक जीव मरतोच, याची जाणीव गीता लोकांना करून देते त्यामुळे माणूस हसत-हसत मृत्यूचे स्वागत करतो. भगवे कपडे अंगावर टाकले की कोणी संन्यासी होत नसतो त्यासाठी मनावर भगवे कपडे टाकण्याची गरज आहे. खरा संन्यासी बनण्यासाठी त्याग, बलिदान आणि समर्पणाची भावना गीतेतून सांगण्यात आली. तरीही काही साधू, संन्यासी ढोंगीपणा करून समस्त समाजाला दुःख पोहोचवितात . त्यास्तव संत चोखामेळा या संताने म्हटले की '' ऊस डोंगा परि रस नाही डोंगा, काय भुललासि वरलिया रंगा .'' नुसते बाह्यरूप पाहून कोणाचे शिष्य न होता प्रथम त्याचे सर्व ज्ञान जाणून घ्यावे आणि त्यानंतर योग्य दिशा ठरवावी. जसे आपले कर्म असतील तसेच आपणाला फळ मिळत राहतील. करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे. तंबाखुचे बी लावून कापसाच्या पिकाची अपेक्षा ठेवताच येत नाही असे गीता सांगते .
स्त्रियांच्या बाबतीत गीता सांगते ,''कीर्ती श्रार्वाक नारीच , स्मृतिमेर्धा धृती: क्षमा: " अर्थात लज्जा हा स्त्रीचा खरा दागिना आहे व मर्यादेतच तिचे सौदर्य साठवलेले आहे. स्त्रीची वाणी प्रेमळ, पावन आणि प्रेरक असली पाहिजे. स्त्री ही महान कार्य करायला जन्मलेली आहे याची तिला स्मृती असायला पाहिजे आजच्या काळातही वरील ओळ तंतोतंत जुळत नाही का ? 
विद्यार्थी कसा असावा ? या बाबतीत गीता सांगते " तद्विध्दी प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया:"  अर्थात विद्यार्थी म्हणजे ज्ञान घेणारा, ज्ञान प्राप्त करणारा. जर त्याला विद्या मिळवायची असेल तर त्याच्याकडे प्रणिपात म्हणजे नम्रता, परीप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा या तीन बाबी त्यांच्या जवळ असाव्याच लागतात. नम्रतेशिवाय ज्ञान मिळतच नाही. जर मिळालेच तर टिकत नाही टिकलेच तर शोभत नाही. म्हणूनच म्हटले आहे . "विद्या विनयेन शोभते ." आजचा विद्यार्थी असा आहे का ? आजन्म विद्यार्थी राहायचे असेल तर वरील तीन बाबी आपणाजवळ असावेच लागतात .
गुरुच्या बाबतीत सांगताना गीता म्हणते की, "उपदेक्ष्यन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तवं दर्शिन" अर्थात ज्ञानाचा उपदेश करणारा मनुष्य ज्ञानी आणि तत्वदर्शी असला पाहिजे. गुरु हा विचाराने विद्वान आणि आचाराने सज्जन असला पाहिजे. साधी राहणी पण उच्च विचारसरणी असलेल्या गुरुला समाजात मानाचे स्थान मिळवावे लागत नाही तर ते आपोआपच प्राप्त होते. गुरुनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा. संतानी म्हंटल्याप्रमाणे "जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकळजन". या उक्तिप्रमाणे गुरुनी आपल्या जवळ असलेले ज्ञान समाजात देऊन जनकल्याण करावे. ज्याप्रमाणे साठवून ठेवलेल्या पाण्याचे रूपांतर डबक्यात होते,तर वाहत्या पाण्याचे रूपांतर ओढा, नाला, ओहोळ, नदी आणि शेवटी सागरात जाऊन मिसळते, तेंव्हा त्या पाण्याचे अथांग स्वरुप बघण्यास मिळते, ज्ञानाचे सुद्धा असेच आहे. जेवढे ज्ञान देत राहू तेवढेच ज्ञान उत्तरोत्तर समृद्ध होत राहते. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांना तडा बसेल असे काही वर्तन गुरुनी करू नये असा संदेश यातून मिळतो.
          परिश्रमाशिवाय कोणतीच वस्तू प्राप्त होत नाही. विना मेहनत फळाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा, संत रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे "आधी कष्ट मग फळ, कष्टाविना सर्व निष्फळ." कर्म करीत असताना फळाची अजिबात आशा न ठेवता अविरत काम करत राहिल्यास केलेल्या कार्याचे चांगलेच फळ मिळतील. नुसते दहावीच्या वर्षात कठोर अभ्यास केल्याने यश मिळत नाही.  राज्यातून पहिला वा दूसरा नंबर मिळावा अशी आशा ठेऊन अभ्यास केले  आणि त्यात यश मिळाले नाही तर निराशा येते. म्हणून कसलीही आशा न ठेवता अविरत मन लावून अभ्यास केले तर त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात. असे अनेक मौलिक संदेश या गीतेतून मिळतात. त्यास्तव आज गीता जयंतीच्या दिवशी यातील काही मौलिक गोष्टी लक्षात घेऊन तसा वागण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपले जीवन सुखी, समृध्दी व आनंदी निश्चितच होईल, यात संदेह नाही

            - नागोराव सा.येवतीकर
             मु.येवती ता. धर्माबाद
             9423625769

Wednesday 7 December 2016

हमें तो लूट लिया

*हमें तो लूट लिया ...........*

मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून....? सासरी गेलेल्या मुलींचे पत्र आले काय म्हणून आई वाट पहायची तर, माहेराहुन काही खुशाली आहे काय म्हणून मुलगी वाट बघत असायची. महिनोनमहीने आई-मुलींची बातचीत व्हायची नाही. पत्राद्वारे काय ते ख्यालीखुशाली कळायचे. त्यामुळे महिन्यात कधी भेटले तर दिवसरात्र गप्पा मारायच्या, पण आज काळ बदलला. मोबाईलच्या सुविधेमुळे आज मुलगी सासरी आहे असे वाटतच नाही कारण दिवसातुन दोन-तीन वेळा तरी मोबाईल वर त्यांचे थेट बोलणे होत असते. त्यामुळे पूर्वी असलेली तळमळ आणि आस्था हे दोन्ही आज दिसत नाही, हे ही सत्य असेल कदाचित. बाहेरगावी शिकायला असलेला मुलगा दर महिन्याला पैसे पाठविण्यासाठी घरी पत्र पाठवायाचा. तब्बल 15 - 20 दिवसा नंतर त्याला ते मिळायचे. आपला अभ्यास आणि निकाल मुले पत्राद्वारे कळवायचे. पण आज मुलांच्या अगोदर आई-बाबाना त्यांचे गुण कळत आहेत. हे सर्व मोबाईल मुळे शक्य होत आहे. म्हणजे मोबाईल चांगले आहे तर....! आम्ही ही त्यास काही नावे ठेवत नाही, मात्र याच मोबाइलने आज कित्येक लोकांना तंगुन सोडले आहे. सोडता ही येत नाही अन धरता ही येत नाही अशी कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाली आहे. फोनचा प्रवास ही थक्क करून टाकणारी आहे. पूर्वी घरात ट्रिंग ट्रिंग करणारी फोन हळूहळू मोबाईल चे रूप कधी घेतले हे कळले देखील नाही. एवढेच नाही तर मोबाईल स्मार्ट फोनचे रूप धारण केले हे ही कळले नाही. आज प्रत्येक जण यामुळे स्मार्ट झाला आहे. क्षणात त्यांना हवी ती माहिती मिळत आहे आणि एकमेकांना संपर्क करणे अधिक सोपे झाले आहे. मात्र याच स्मार्ट फोनमुळे त्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे, हे ही विसरून चालणार नाही.
स्मार्ट फोन चांगले जरी वाटत असेल तरी यामुळे लोकं आता चुप झाली आहेत. पूर्वीसारखे बडबड करेनाशी झाली. कारण चोवीस तास त्यांचे डोके त्या मोबाईलच्या स्क्रीन वरच चिकटुन राहत आहे. कधी गाणे पाहणे, तर कधी चित्रपट पाहणे यामुळे मोबाईल सदैव त्यांच्या हाती दिसत आहे. तरुण आणि युवकाना तर या स्मार्ट फोनने अक्षरशः वेड लावले आहे. मागे काही दिवसा पूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की, वडिलांनी स्मार्ट फोन घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काय म्हणावे या तरूण पिढीला .....! आपले अभ्यास आणि मेहनत करण्याच्या या वयात कशाला पाहिजे आपणास स्मार्ट फोन ? त्यांचे उत्तर फार मजेशीर असते ते म्हणतात की माझे सारे मित्र फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करतात आणि मी एकटाच वापरत नाही त्यामुळे सर्व मुले माझी टिंगल उडवतात. मला ही फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करायचे आहे आणि मित्राशी सदा कनेक्टेड राहायचे आहे. यापेक्षा त्यांना अभ्यास महत्वाचे वाटत नाही ही आजची युवा पिढी. त्यांचे पुढील भविष्य कसे असेल काही कल्पनाही करवत नाही. याचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर ठीक आहे अन्यथा ती पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुक वरुन युवकास काही भविष्याचे मार्गदर्शन मिळेल असे वाटत नाही कारण निव्वळ करमणुकीचे एक माध्यम म्हणजे फेसबुक. ज्याला निवांत वेळ आहे, ज्याला कशाचीही काळजी किंवा चिंता नाही अश्या लोकांनी हे वापरावे म्हणजे त्यांचा वेळ मित्रासोबत घालाविता येईल आणि वेळ निघुन जाईल. तेंव्हा युवकानी आपला वेळ संपविण्यासाठी स्मार्ट फोन वापरायचे का ? याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. फेसबुकने सर्वात जास्त भुरळ घातली आहे ती नवयुवकांना. दिवस रात्र फेसबुकवर चैटिंग करत फिरताना घरातील कोणत्याच व्यक्ती सोबत बोलत नाहीत. चिडिचुप व्यवहार चालू असतो. आईने जेवायला बोलावले तरी 'आत्ता एका मिनिटात आलो' म्हणत एक तास उलटतो तरी त्यांची जेवण करण्याची तयारी नसते. म्हणजे तहानभूक विसरून ते या फेसबुकचा वापर करतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी तरुणाचे याबाबतीत समुपदेशन करणे आवश्यक आहे. वेळेचे काही बंधन स्वतः ला लावून याचा वापर केल्यास हे माध्यम आपणास देणगी ठरु शकते.
फेसबुकच्या नंतर वापरली जाणारी सर्वात जास्त लोकप्रिय झालेली सोशल साइट म्हणजे व्हाट्सएप्प होय. यामुळे तर आबालापासून वृद्धापर्यंत पुरुष आणि स्त्री सारेच जण वेडे बनले आहेत की काय अशी शंका मनात येते. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत येथे एकमेकांच्या गप्पा न बोलता गपगुमान चालू राहते. घरात कोण आले ? कोण गेले ? याचे त्यांना काही सोयरसूतक नसते. ते आपल्या धुंदीत मदमस्त होऊन रंगून गेलेले असतात. सध्या भारतात जेवढे मोबाईल धारक आहेत त्यातील पाऊण टक्के हे व्हाट्सएप्प चा वापर करतात नव्हे करावेच लागते.
सरकार म्हणते व्हाट्सएपचा वापर करा आत्ता सर्व माहिती यावरच मिळणार, घरी गेल्यानंतर बायको म्हणते पहिले ते व्हाट्सएप बंद करा, घरात काय चालले आहे याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही, लेकराचे अभ्यास घेणे नाही, बाजारात जाऊन काही सामान आणने नाही, घरातल्या कामात कसलीच मदत नाही,  दिवसरात्र त्या मोबाईल मध्येच डोके खुपसून बसायची सवय लागली, नाही रोगच लागलाय. स्त्री कर्मचारीच्या बाबतीत यापेक्षा काही वेगळे नाही. दिवसभर मोबाईल बघितल्यावर खायला कधी करणार ? या प्रश्नाने ती जागी होते. अन कामाला लागते. हे संवाद कर्मचारी वर्ग असलेल्या घरात सध्या ऐकू येत आहे. कोणत्याही कार्यालयात जावे तेथे हे दोन माध्यम चालूच राहतात. शाळा-महाविद्यालययात सुध्दा हेच चालू असते. त्यामुळे ' शांतता मोबाइल चालू ' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सोशल मिडीया मध्ये पालकानी खुप जागरूकपणे पाऊल उचलायला हवे. आपला जास्तीत जास्त वेळ जर पालकानी सोशल मिडीया तील फेसबुक किंवा व्हाट्सअप वर घालवू लागले तर आपले पाल्य बिघडणार नाही हे कश्यावरुन. म्हणून दिवसातील ठराविक वेळ यासाठी देऊन बाकी च्या वेळी आपल्या घरातील पती, पत्नी आई वडील आणि मुले यांच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. आज घराघरात अशा तक्रारी ऐकायला येत आहेत की, आमचे हे सदानकदा मोबाईलवरच असतात. घरातल्या कोणाकडे मुळी लक्षच नसते. घरी तेच आणि बाहेरही तेच काय करावे कळत नाही. हे स्मार्ट फोन आल्या पासून ना खुप गप्प गप्प असतात. त्यांचे पूर्वी सारखे बोलणे आत्ता खुप कमी झाले आहे. खळखळुन हसणे आणि हसविणे देखील कमी झाले. जेवताना देखील ते बोलत नाहीत. नेहमी त्यांच्या डोक्यात कश्याचे तरी विचार चालूच असतात. सायंकाळी बाहेर फिरायला जाणे कमी झाले आहे. मित्रासोबत बोलणे कमी झाले. नातेवाईकासोबत वागणे विक्षिप्त झाले. हे सर्व या सोशल मिडीया तील फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे घडत आहे. मुलांचे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी पालकावर आहे म्हणून सोशल मिडीया चा वापर करीत असताना जरा स्वतः ला जपणे आवश्यक आहे. पालक असलेल्या माता भगिनी यांनी सुद्धा या माध्यमापासून दूर रहावे. महिलांचे व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मिडीया वर जास्त वावर नसेल ही कदाचित मात्र फोनवर बोलण्याचे प्रमाणा वर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही महिला फोनवर एक-एक तास संभाषण करतात. त्याचे देखील परिणाम कुटुंबावर होतात. त्यामुळे फोनचा वापर शक्यतो कमी करावा. आजच्या काळात फोन जवळीक आणणारे साधन असले तरी फोनच्या माध्यमातून काही जरी गैरसमज पसरले तर दुरावा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्याचा वापर योग्य पध्दतीने करणे पालकासाठी खुप आवश्यक आहे.

व्हाट्सएपचा वापर करण्यावर काही घरात वादविवाद भांडणतंटे होत असल्याचे ऐकू येत आहेत. यावरून लक्षात येईल की, लोकांना या सोशल मीडियातील फेसबूक आणि व्हाट्सएप किती वेड लावले आहे. एखाद्या दिवशी जर इंटरनेट बंद असेल तर मानसिक स्वास्थ्य बिघडेल की काय अशी शंका सध्या मनात निर्माण होत आहे. याशिवाय मी जगूच शकत नाही असे सध्या ज्याला त्याला वाटत आहे. पण ते आभासी आहे. तेंव्हा फेसबुक आणि व्हाट्सएप व्यसन होणार नाही यांची काळजी आजपासून प्रत्येकानी घ्यावे. येणारा काळ अजुन कठिण येणार आहे. यावर एक जुने गीत आठवते ते म्हणजे ' हमें तो लूट लिया मिलके ......' याच गीतास ऐका वेगळ्या शब्दाने असे म्हणता येईल.

*हमें तो लूट लिया मिलके सोशल मीडियाने*
*फेसबुकवालोंने और व्हाट्सएपवालोंने*

- नागोराव सा. येवतीकर
   स्तंभलेखक
9423625769

Sunday 4 December 2016

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

माणुसकी जागवू ; विषमता संपवू

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक या देशात एकत्र राहतात. देशातील लोकांची एकता हीच राष्ट्रीय शक्ती आहे आणि वेळप्रसंगी ही शक्ती अनुभवास ही येते. सुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वी भारत हा देश मागासलेला होता मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे समृध्द होता. भारताला सोने की चिडिया असेही म्हटले जायचे. परंतु भारतावर ब्रिटिश सरकारची वाईट नजर पडली. सुमारे दीडशे वर्षे भारतावर अधिराज्य केले शिवाय येथील सर्व साधनसंपत्ती लुटून नेली. इंग्रज नीती कधीही चांगली नव्हती. फोडा आणि राज्य करा हे त्यांचे तंत्र होते. भारतात ग्रामीण भागात राहणारी जनता इंग्रज येण्यापूर्वी खुप सुखात आणि आनंदात राहत होती. मात्र व्यापारी म्हणून ब्रिटिश भारतात आले आणि राज्यकर्ते बनून त्यांनी संपूर्ण भारताचा चेहरा पार बदलून टाकला.

इंग्रज जेंव्हा भारतातून गेले त्यावेळी देशात अनेक प्रकारची विषमता दिसून येत होती.

*धार्मिक विषमता :-*

देशातील सर्वात पहिली विषमता म्हणजे धार्मिक विषमता होती. धर्माच्या नावावर भारत आणि पाकिस्तान राज्याची निर्मिती झाली. हिंदू साठी भारत आणि मुस्लिम धर्मासाठी पाकिस्तान अशी सरळ फाळणी करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तो तिढा गेल्या 60 ते 65 वर्षात सोडविता आला नाही. ब्रिटिशाच्या मनात जे कूट विचार होते ते त्यांनी जाता जाता करून गेले. मात्र आजपर्यंत ही धार्मिक विषमता नष्ट झाली नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे प्रत्येकाची विचारधारा भिन्न असते. त्यामुळे काही लोक या गोष्टीला मानतात किंवा काही लोक कट्टर विरोध करतात. पण हिंदू असो वा मुस्लीम या दोघांनी सुद्धा सामंजस्यपणाने ह्या प्रश्नांची सोडवणूक केली तर अंर्तगत असलेला वाद मिटविण्यासाठी लवादाची काय गरज ? परंतु तसे होताना दिसत नाही. दररोज सीमारेषेवर गोळीबार होत आहेत आणि रोज सैनिक मारला जात आहे. कधी आपला तर कधी त्यांचा. बंदुकीच्या गोळीने ही समस्या धार्मिक विषमता संपणार नाही. खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे ही परमपूज्य साने गुरुजीं यांचे वचन लक्षात घेणे आवश्यक आहे.

ग्रामीण भारतामध्ये आज ही हिंदू-मुस्लिम एकोपा दिसून येतो. मात्र या उलट चे चित्र शहरात पाहायला मिळते. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मंडळीनी समाजातील लोकांना आपल्या धर्माचे चांगले शिक्षण द्यावे यात काही संदेह नाही मात्र दुसऱ्या धर्मावर टीका, टिपण्णी न करता त्या धर्मात काय चांगले आहे किंवा काय घेता येते यांची माहिती द्यावी. यामुळे धर्मा-धर्मात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. ही धार्मिक विषमता कमी होण्यासाठी प्रत्येक जण विशेष करून प्रयत्न करणे गरजेचे आहे. धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे वर्तन ठेवल्यास भविष्य नक्कीच चांगले असेल.

*जातीय विषमता :-*

भारतात विविध जातीचे लोक एकत्र राहतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण जगावेगळा असतो, मग तो कोण्या ही जातीचा का असेना. पण भारतात सध्या जातीयतेवरुन खुप गढुळ वातावरण तयार होताना दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती आपलीच जात सर्वश्रेष्ठ कशी आहे हे दाखविण्याची शर्यत लागली आहे की काय असे वाटू लागले. प्रत्येक जातीतील लोक आपली शक्ती प्रदर्शन दाखवित आहेत. एका समाजातील जातीचा मोर्चा निघाला म्हणाले की असे प्रत्येक जातीचे लोक मोर्चा काढत आहेत आणि यात सामान्य लोकांना विविध संकटाना तोंड द्यावे लागते. जातीयतेचे सर्वात जास्त चटके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहन करावे लागले. त्यातून त्यांना बरेच काही अनुभव आले. म्हणून तर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरच्या दीक्षाभूमी वर हजारो अनुयायीना सोबत घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आज समाजातील ही जातीयतेची विषमता नष्ट झाली काय ? याचे उत्तर नाही असे मिळते. आजही समाजात जातीवरुन लोकांना उच्च-नीचतेची वागणूक दिली जाते. अमक्या कमी जातीचा आहे म्हणून त्यांच्या सोबत कुणी संपर्क करीत नाहीत की जवळ येऊ देत नाहीत. माझा एका मित्राला राहण्यासाठी किरायाने घर सुध्दा मिळाले नाही. कारण काय तर तो अमक्या जातीचा आहे. काय ही विषमता ? लोकांच्या आडनावावरुन ही लोक एकमेकाला दूर करताना दिसतात. ही जातीय विषमता नष्ट होणे आवश्यक आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही म्हणून प्रत्येकाने सामंजस्यपणाने राहाणे आणि वागणे आवश्यक आहे ?  याचा एक वेळा विचार करावा.

*आर्थिक विषमता :-*

ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे सर्व काही उपलब्ध होते तर जो गरीब आहे त्यास एक वेळचे पोट भरण्यासाठी जेवण ही मिळत नाही अशी विदारक स्थिती भारतात बघायला मिळते ही आहे आर्थिक विषमता. श्रीमंत लोक गरीब व्यक्ती कडे फारच तुच्छ नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांच्यात कधीच समानता दिसून येत नाही. समाजाने सुद्धा तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. श्रीमंत माणसे आलीशान बंगल्यात रहावे आणि गरीब लोक झोपडीत रहावे असा विधिलिखित नियम केला आहे असे वाटते. दारिद्रयरेषेखालील लोकांच्या नावाच्या यादीतील नावे कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. या यादीत नाव यावे म्हणून लोक धडपड करताना पाहून या लोकांची कीव आल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत लोकांची नावे या यादीत पाहून हसावे की रडावे हेच मुळात कळत नाही. दारिद्रयरेषेखालील जीवन जगणे खुप हालअपेष्टाचे असते असे चित्र कुठे ही दिसत नाही कारण मूळ दारिद्रयरेषेखालील लोक बाजूला राहतात आणि इतर लोक मात्र योजनेचा फायदा घेतात, याचा विचार सामान्य लोकांनी करावा. या देशात एका बाजूला घरात मुबलक अन्न आहे तर भूक लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला भूक आहे पण त्यांना खायला अन्न मिळत नाही असे विरोधाभास असलेले चित्र दिसते. ही आर्थिक विषमता संपविणे आवश्यक आहे असे वाटते. यासाठी स्वातंत्र्य काळात विनोबा भावे यांनी संपूर्ण भारतात भूदान चळवळ सुरु केली होती. प्रत्येक व्यक्ती कडे संपत्ती किती प्रमाणात रहावा याविषयी एखादा कायदा निर्माण केले तर संपत्ती एका व्यक्ती जवळ एकवटल्या जाणार नाही. जसे की सध्या भारताचे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी सोने वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. विवाहित स्त्री 50, पुरुष 10 आणि अविवाहित स्त्री 25 तोळे सोने वापरता येईल असा नियम केला आहे. असेच काही नियम घर, बंगला, गाडी, पैसा याबाबत करायला हवे तरच ही आर्थिक विषमता दूर होऊ शकते.

*शैक्षणिक विषमता :-*

स्वातंत्र्यपूर्वी भारत देशात शिकलेल्या लोकांची संख्या फारच कमी होती त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशापुढे लोकांची निरक्षरता हा फार मोठा प्रश्न होता, यास शैक्षणिक विषमता असे म्हटले जाते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जे कुणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. या सारख्या तत्ववेत्या महान लोकांच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक क्रांती होत गेली आणि समाजात आज थोडी फार समानता दिसून येत आहे. पण ती समानता पुरेशी नाही कारण आज ही शैक्षणिक विषमता भरपूर प्रमाणात दिसून येते. इयत्ता पाहिली ते आठव्या  वर्गापर्यंत मोफत शिक्षण दिले म्हणजे शैक्षणिक समानता मिळणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन देखील आज किती लोक उच्च शिक्षण पूर्ण करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. जर आरक्षण मिळालेच नसते तर या भारतात आज काय चित्र राहिले असते याचा कधी एक वेळा तरी विचार केला आहे का ? या प्रश्नवार एकदा विचार करा अन बघा आपले मन  किती अस्वस्थ होते ते. तरी सुध्दा ही शैक्षणिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक शिक्षित व्यक्तिनी स्वतः हुन पुढाकार घेतला पाहिजे लोकांना शिक्षित आणि सजग करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. तरच ही शैक्षणिक विषमता दूर होईल.

*स्त्री-पुरुष विषमता :-*

स्त्री पुरुष समानता हे फक्त कागदा वर लिहिण्यापुरते आणि भाषणात बोलण्यापुरते छान वाटते. पण प्रत्यक्षात मात्र स्त्री पुरुषा मध्ये कुठेच समानता आढळून येत नाही. घराच्या उंबरठ्यापासून ते थेट संसदेच्या दारापर्यंत पदोपदी आपणास स्त्री आणि पुरुषात विषमता दिसून येते. स्त्री सुद्धा एक व्यक्ती आहे म्हणून तिला घटनेने सर्व प्रकारचे हक्क दिले आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण दिलेले आहे त्यामुळे तिचा विकास होईल आणि ही विषमता संपेल. पण या आरक्षण प्रणालीचा काही उपयोग होताना दिसत नाही. ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदापर्यंत महिला निवडून जात आहेत. पदभार स्विकारत आहेत मात्र कार्यभार त्यांच्या पती, दीर, मुलगा यांच्या हाती आहे. ती फक्त सही पुरती शिल्लक उरली आहे. अश्याने स्त्री पुरुष  विषमता संपेल काय ? आज मुलीचा जन्मदर दर हजारी पुरुषामागे नऊशेच्या घरात आहे म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या जन्म दरात शंभर चा फरक आहे. ही विषमता भरून निघाली नाही तर भविष्यकाळ खुपच अवघड आहे. प्रत्येक जण वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असा हट्ट धरतात. मुलगी परया धन म्हणून तिच्या जन्माने नाके मुरडली जाते, तिचा जन्म नकोशी वाटते. ही विचारधारा संपुष्टात येणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विचाराने संविधान तयार केले ते स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे तरच धार्मिक, जातीय, सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुषातील विषमता दूर होण्यास मदत मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो गुलामगिरीविरुध्द बंड करून उठेल. त्यांच्या याच वचनाचा आपण असा अर्थ घेऊ या माणसाला माणूस असल्याची जाणीव करून द्या तो नक्की माणुसकी जपल्याशिवाय राहणार नाही. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकांची माणुसकी जागी व्हायला पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक , 9423625769

nagorao26@gmail.com

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...