Thursday, 8 December 2016

गीता जयंती

गीता जयंती विशेष प्रासंगिक लेख

" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन "

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन अर्थात फळाची आशा न करता कर्म करीत जा असे पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. पाच हजार वर्षापुर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या सुप्रभाती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला समोर ठेऊन संपूर्ण मानवमात्राला जीवनाभिमुख करणेस्तव श्रीकृष्णाने आपल्या मुखारविंदातून जे जीवनाचे सार मांडले ती म्हणजे गीता. आज गीता जयंतीचा दिवस. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ही जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जाते. गीता ही भगवंताने स्वतः गायिली आहे, हेच याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. गीता हे वैश्विक ग्रंथ आहे. गीता ही मानव धर्मासाठी आहे, त्यावर आधारीत मानव आपले आदर्श असे आयुष्य जगू शकतो. मानवाचे जीवन चरितार्थ कसे असावे ? याबाबत मोलाचे मार्गदर्शन यात सांगितले आहे. "योगक्षेमं वहाम्यहम" ची संकल्पना यात दिसून येते. अहं ब्रम्हास्वी ची जाणीव सुद्धा मिळते. लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत ,साधू संन्यासापासून संत महात्म्यापर्यंतच्या सर्वच लोकांना यातून मार्ग मिळतो. हीच गीता लोकांना सहज समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरानी मराठी मायबोलीतून 'ज्ञानेश्वरी' लिहली. गीता ही प्रत्येकासाठी पथदर्शी आहे. मानवाला लाभलेले जीवन खुप अनमोल आहे म्हणून जीवनात रडण्यापेक्षा हसण्याला जास्त महत्व द्यावे. संकटाला भिवून पळण्यापेक्षा त्यास तोंड देण्याची शक्ती या गीतेतून मिळते.
एखाद्या कामात यश मिळाले नाही की व्यक्ती निराश होतो. परंतु निराश न होता अधिक शक्तिने प्रयत्न केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. निराशेच्या अंधारात भटकणाऱ्या मानवाच्या जीवनात गीता प्रकाश पसरवते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, याची शिकवण सुद्धा गीता देते. निरुत्साही माणसाला उत्साह मिळवून देते. मानवाला स्वतः वरील श्रद्धा नष्ट होऊ देत नाही. वारंवार स्वतः चा आत्मविश्वास जागृत करीत राहते. त्यामुळे मानव जीवनात विफल होत नाही व अपयशातुन यश मिळविण्याचा प्रयत्न करतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला गीता जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सांगते. त्या मार्गावरुन गेलेला व्यक्ती आजपर्यंत असफल झाला नाही.
या गीतेत एकूण 18 अध्याय असून 700 श्लोक आहेत. प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट असे नाव आहे जसे की बाराव्या अध्यायाला भक्तीयोग असे नाव आहे ज्यात भक्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे.
मानवाचे जीवन बालपण, तारुण्य व वार्धक्य या तीन अवस्थेतून जातो तेव्हा तो काही महत्त्वाचे गुण स्वीकारूनच दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करतो. बालपणात बालक असून बालिश नाही, तरुण बनेल परंतु उत्श्रृंखल नाही, वृद्ध होईन परंतु निराश नाही ही जीवनाची त्रिसूत्री गीतेतून मिळते . जीवनात प्रत्येक मनुष्य मृत्यूला घाबरतो, मरण कोणालाच नको वाटते. परंतु जन्म घेणारा प्रत्येक जीव मरतोच, याची जाणीव गीता लोकांना करून देते त्यामुळे माणूस हसत-हसत मृत्यूचे स्वागत करतो. भगवे कपडे अंगावर टाकले की कोणी संन्यासी होत नसतो त्यासाठी मनावर भगवे कपडे टाकण्याची गरज आहे. खरा संन्यासी बनण्यासाठी त्याग, बलिदान आणि समर्पणाची भावना गीतेतून सांगण्यात आली. तरीही काही साधू, संन्यासी ढोंगीपणा करून समस्त समाजाला दुःख पोहोचवितात . त्यास्तव संत चोखामेळा या संताने म्हटले की '' ऊस डोंगा परि रस नाही डोंगा, काय भुललासि वरलिया रंगा .'' नुसते बाह्यरूप पाहून कोणाचे शिष्य न होता प्रथम त्याचे सर्व ज्ञान जाणून घ्यावे आणि त्यानंतर योग्य दिशा ठरवावी. जसे आपले कर्म असतील तसेच आपणाला फळ मिळत राहतील. करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे. तंबाखुचे बी लावून कापसाच्या पिकाची अपेक्षा ठेवताच येत नाही असे गीता सांगते .
स्त्रियांच्या बाबतीत गीता सांगते ,''कीर्ती श्रार्वाक नारीच , स्मृतिमेर्धा धृती: क्षमा: " अर्थात लज्जा हा स्त्रीचा खरा दागिना आहे व मर्यादेतच तिचे सौदर्य साठवलेले आहे. स्त्रीची वाणी प्रेमळ, पावन आणि प्रेरक असली पाहिजे. स्त्री ही महान कार्य करायला जन्मलेली आहे याची तिला स्मृती असायला पाहिजे आजच्या काळातही वरील ओळ तंतोतंत जुळत नाही का ? 
विद्यार्थी कसा असावा ? या बाबतीत गीता सांगते " तद्विध्दी प्रणिपातेन परीप्रश्नेन सेवया:"  अर्थात विद्यार्थी म्हणजे ज्ञान घेणारा, ज्ञान प्राप्त करणारा. जर त्याला विद्या मिळवायची असेल तर त्याच्याकडे प्रणिपात म्हणजे नम्रता, परीप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा या तीन बाबी त्यांच्या जवळ असाव्याच लागतात. नम्रतेशिवाय ज्ञान मिळतच नाही. जर मिळालेच तर टिकत नाही टिकलेच तर शोभत नाही. म्हणूनच म्हटले आहे . "विद्या विनयेन शोभते ." आजचा विद्यार्थी असा आहे का ? आजन्म विद्यार्थी राहायचे असेल तर वरील तीन बाबी आपणाजवळ असावेच लागतात .
गुरुच्या बाबतीत सांगताना गीता म्हणते की, "उपदेक्ष्यन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तवं दर्शिन" अर्थात ज्ञानाचा उपदेश करणारा मनुष्य ज्ञानी आणि तत्वदर्शी असला पाहिजे. गुरु हा विचाराने विद्वान आणि आचाराने सज्जन असला पाहिजे. साधी राहणी पण उच्च विचारसरणी असलेल्या गुरुला समाजात मानाचे स्थान मिळवावे लागत नाही तर ते आपोआपच प्राप्त होते. गुरुनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा. संतानी म्हंटल्याप्रमाणे "जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकळजन". या उक्तिप्रमाणे गुरुनी आपल्या जवळ असलेले ज्ञान समाजात देऊन जनकल्याण करावे. ज्याप्रमाणे साठवून ठेवलेल्या पाण्याचे रूपांतर डबक्यात होते,तर वाहत्या पाण्याचे रूपांतर ओढा, नाला, ओहोळ, नदी आणि शेवटी सागरात जाऊन मिसळते, तेंव्हा त्या पाण्याचे अथांग स्वरुप बघण्यास मिळते, ज्ञानाचे सुद्धा असेच आहे. जेवढे ज्ञान देत राहू तेवढेच ज्ञान उत्तरोत्तर समृद्ध होत राहते. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांना तडा बसेल असे काही वर्तन गुरुनी करू नये असा संदेश यातून मिळतो.
          परिश्रमाशिवाय कोणतीच वस्तू प्राप्त होत नाही. विना मेहनत फळाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा, संत रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे "आधी कष्ट मग फळ, कष्टाविना सर्व निष्फळ." कर्म करीत असताना फळाची अजिबात आशा न ठेवता अविरत काम करत राहिल्यास केलेल्या कार्याचे चांगलेच फळ मिळतील. नुसते दहावीच्या वर्षात कठोर अभ्यास केल्याने यश मिळत नाही.  राज्यातून पहिला वा दूसरा नंबर मिळावा अशी आशा ठेऊन अभ्यास केले  आणि त्यात यश मिळाले नाही तर निराशा येते. म्हणून कसलीही आशा न ठेवता अविरत मन लावून अभ्यास केले तर त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात. असे अनेक मौलिक संदेश या गीतेतून मिळतात. त्यास्तव आज गीता जयंतीच्या दिवशी यातील काही मौलिक गोष्टी लक्षात घेऊन तसा वागण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपले जीवन सुखी, समृध्दी व आनंदी निश्चितच होईल, यात संदेह नाही

            - नागोराव सा.येवतीकर
             मु.येवती ता. धर्माबाद
             9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...