Monday 27 February 2023

सौ. चंदा मॅडम यांचा निरोप समारंभ Retierment of Chanda Madam

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आठवणीतल्या चंदा मॅडम


प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवानिवृत्तीचा दिवस येतोच येतो. नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त होणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना गरजेचे असते. त्याच नियमानुसार आज जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद येथील प्रभारी मुख्याध्यापिका सौ. चंदा हमीदसाब सय्यद मॅडम या आपली वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.....
दिनांक 05 फेब्रुवारी 1965 रोजी हमीदसाब आणि महेबुबबी या गरीब आणि कष्टाळू दाम्पत्याच्या पोटी चंदा मॅडम यांचा उमरी जि. नांदेड येथे जन्म झाला. घरातील वातावरण आर्थिक स्वरूपात अगदी विषम होते. विशेष करून चंदा मॅडम या मुस्लिम धर्मातील असल्याने मुलींना शिकविण्याच्या बाबतीत घरातून खूप विरोध होत होता. पण त्यांची आई महेबूबबी यांनी समाजाचा विरोध पत्करून आपल्या मुलीला म्हणजे चंदा मॅडमला शिकविले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण उमरी येथील नुतन विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षण घेतांना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पण सावित्रीबाईचे बाळकडू त्यांना शालेय जीवनात मिळाले त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा मनाशी घट्ट निर्धार केला होता. दहावीनंतर ते डी. एड. ला प्रवेश घेतला आणि चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होऊन 13 जानेवारी 1986 रोजी त्या शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लघुळ ता. बिलोली याठिकाणी रुजू झाल्या. त्यांच्या जीवनातील व कुटुंबासाठी देखील हा एक आनंदाचा व अविस्मरणीय असा क्षण होता. त्या शाळेवरील बंडेवार, कानगुलवार आणि पांचाळ या सहकारी शिक्षकांना ते कधीही विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी त्यावेळी चंदा मॅडम यांना भरपूर मदत केली आणि प्रोत्साहन देखील दिले. त्यानंतर त्यांची बदली फक्त तीन महिन्यांसाठी केंद्रीय प्राथमिक शाळा रत्नाळी येथे झाली. अल्प कालावधीत येथे सेवा करून त्यांनी अनेक माणसे जोडली. तसे तर चंदा मॅडम यांचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि गरजूना नेहमी मदत करणे असा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत माणसे सहज जोडली जात असे. त्यानंतर त्यांची बदली धर्माबाद येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये झाली. याठिकाणी त्यांनी सलग 20 वर्षे सेवा केली. याठिकाणी केलेले त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. या प्रशालेत शिकणारी मुलं हे गरीब घरातील असतात याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हवी ती मदत ते करीत असतात. याच शाळेवर असतांना त्यांना नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हा गुरूगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत संपन्न झालेल्या विविध क्रीडा स्पर्धा गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अश्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक देखील मिळविला आहे, हे विशेष. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे सर, धर्माबाद तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी इनामदार सर आणि धर्माबाद प्रशाळेचे वर्ग 2 मुख्याध्यापक पठाण सर यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.  एकाच ठिकाणी सलग वीस वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा बु. ता. उमरी याठिकाणी झाली. याठिकाणी त्यांनी अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीत तीन वर्षे सेवा केली. त्यानंतर उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे बढती मिळाली. मुख्याध्यापक पद जेवढे मानाचे आहे तेवढेच कठीण देखील आहे. याची अनुभूती त्यांना येथे येऊ लागली. या काळात त्यांना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागले. नऊ वर्षे या पदावर काम केल्यानंतर वाढते वय आणि तब्येतीच्या तक्रारी यामुळे त्यांनी पदोन्नत मुख्याध्यापक पदाचा त्याग करून प्राथमिक शिक्षक म्हणून धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद याठिकाणी 29/05/2018 मध्ये रुजू झाले. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी एकूण 37 वर्षे सेवा केले आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. हळव्या मनाचे आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले चंदा मॅडम कित्येक वेळा तरी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबवू नका असे ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतात. तसेच तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता यांच्या काळात ते धर्माबाद पोलीस स्थानकातील शांतता कमिटीचे सदस्य देखील होते.
त्यांचे पती नवाब हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांना तीन मुले आहेत मोठा मुलगा डॉ. असद हा व्यवसायाने डॉक्टर असून त्यांची पत्नी नशरा खानम ह्या देखील डॉक्टर आहेत. दुसरा मुलगा अहमद नवाब हा एम. सी. ए. केला आहे तर त्यांची पत्नी अमेजा महमंद ह्या रेम्बो हॉस्पिटल हैद्राबाद येथे बालरोग तज्ञ आहेत. तिसरा मुलगा अझर हा डी. फॉर्मसी केला असून त्यांची पत्नी नेहा ही यशवंत विद्यालय, धर्माबाद येथे इंग्रजी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे की, घरातला एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो पण घरातील एक स्त्री शिकली तर सारे घर शिकते. त्याची अनुभूती चंदा मॅडम यांच्या परिवाराकडे पहिल्यानंतर लक्षात येते. सेवानिवृत्तीनंतरच्या भावी जीवनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

शब्दांकन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...