Saturday 3 June 2017

युवकांच्या हाती हुंड्याची दोरी
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ही हुंडयासारखी सामाजिक समस्या आजही ज्वलंत आणि उग्र स्वरुप धारण केले आहे. लातूर जिल्ह्यातील शीतलच्या बळीने हा प्रश्न समाजापुढे एका वेगळ्या स्वरुपात समोर आले आहे. हुंड्यामुळे कोण कोण त्रस्त होत असतो ? याची जराशी कल्पना यामुळे आली. समाजात आजही हुंडयापायी कोणाचे लग्न थांबणे, नववधुंचा छळ करणे, या सर्व हुंडाबळीच्या घटना आपण डोळ्याने आजही पाहतो आणि वाचन करीत आहोत. समाजातून हुंडा पध्दती समूळ नष्ट करणे  म्हणजे समाजातील रुढी आणि परंपरा यांच्याविरुध्द दिलेला एक लढाच नव्हे काय ?
प्रत्यक्षात समाजात काय घडते ? वधू पिता आपल्या मुलींसाठी वर शोधत फिरत असतो. चांगले स्थळ मिळावे यासाठी तो सर्व प्रयत्न करतो. प्रत्येक वधू पित्याची ईच्छा असते की आपली मुलगी ज्या घरी पाठवित आहोत ते घर सुख समृद्धिचे असावे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सोयरीक जुळविली जाते. मग त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारी वधूपिता दर्शवितो. याच गोष्टीचा फायदा वरपक्षाकडील मंडळी घेतात. त्यातल्या त्यात मुलगा सरकारी नोकरी किंवा चांगल्या हुद्यावर आणि पगारीवर असेल तर मग मनाला वाटेल ती रक्कम मागितली जाते. सध्या डॉक्टर, इंजिनियर, पोलिस आणि शिक्षक नवरदेवाचे भाव गगनाला भिडले आहेत.
लग्नाच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नवरदेव. त्याने जर मनात आणले तर ही हुंडा पध्दत समूळ नष्ट होऊ शकते. लग्न जुळते वेळी ही नवरदेव मंडळी याविषयी ब्र ही काढत नाहीत त्यामुळे ही पध्दत फोफावत चालली आहे. सध्या जे युवक लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढणार आहेत त्यांनी हुंडा न घेता साध्या पध्दतीने लग्न करून घेतल्यास त्याची नोंद समाज नक्की घेईल. प्रत्येक नवरदेवाने याविषयी एक वेळ तरी आत्मचिंतन करावे. आपल्या एवढ्या शिक्षणाचा काही अर्थ राहणार नाही असे वाटते. हुंडा न घेतल्याने समाजात जे मान सन्मान आणि स्वतः ला जो मानसिक समाधान मिळते ते किती ही पैसा देऊन मिळविता येत नाही, हे सत्य आहे. वधूने किंवा वधूच्या पित्याने हुंडा घेणाऱ्या नवरदेवाला मुलगी देणार नाही अशी शपथ घेऊन काही फायदा होईल असे वाटत नाही त्या ऐवजी नवरदेव किंवा त्यांच्या आई-वडिलांनी हुंडा घेणार नाही ही शपथ जास्त फलदायी ठरेल असे वाटते. जे युवक असे लग्न करतील अश्या कुटुंबाचे समाजाने नागरी सत्कार करावा म्हणजे हुंडा न घेता लग्न करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि जे अनपेक्षित घटना घडत आहेत ते घडणार नाहीत. हुंडा ही आपणच पेरलेले बी आहे तर त्याचे उच्चाटन आपणालाच करावे लागेल, एवढे मात्र खरे आहे.
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
*आर्थिक व्यवहार सुरळीत होतील ?*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा वर बंदी आणली आणि एका रात्रीत देशामध्ये अनेक लोकांच्या संकटाला सुरुवात झाली. फक्त पन्नास दिवसात सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन पंतप्रधानानी जनतेला दिले. मात्र तसे काही झाले नाही. या नोटाबंदीच्या काळात अनेक लोकांना फटका बसला तर काही लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांचे घर वाऱ्यांवर आले. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला अच्छे दिन पाहण्यास मिळेल असे वाटत होते मात्र आज दोनशे दिवसाचा काळ उलटला तरीही बँकेतील आर्थिक व्यवहार अजुनही सुरळीत झाले नाही. बँकेत पैश्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहून देखील पाहिजे तेवढी रक्कम मिळत नाही त्यामुळे जनता पुरती वैतागली आहे. काही ठिकाणी तर काउंटरला क्रमांक येईपावेतो पैसे संपून जात आहेत त्याचा मनस्ताप वेगळाच आहे. मोंढा मार्केट मध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विकल्यानंतर त्यांच्या हातात महिना दीड महिन्यानंतर तेही पाच-पाच हजार रूपयाच्या हिशोबात मिळाले त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. स्वतःच्या हक्काचे पैसे आपल्या बँक खात्यावर असून ही वेळेवर मिळत नसल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.
त्याच सोबत बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी एटीएम निर्माण करण्यात आले होते. मात्र नोट बंदीचा फटका याठिकाणी सुध्दा जाणवत आहे. पूर्वी हवी तेवढी रक्कम एटीएममधून मिळत असे मात्र नोटाबंदी जाहिर झाल्यापासून एटीएमवर निर्बंध घलण्यात आले आणि एटीएममध्ये पैश्याचा तूटवडा जाणवू लागले. सुरुवातीला फक्त अडीच हजार, त्यानंतर चार हजार आणि मग आज चाळीस हजार रुपया पर्यंत रक्कम उचलू शकत आहे मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने जनता त्रस्त होत आहे. रोज एटीएमकडे नागरिक चकरा मारत आहेत मात्र त्यांच्या पदरी निराशेच्या खेरीज काहीच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याउलट बाजुच्या तेलंगाना राज्यात एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे दिसून येते. या भागातील काही गरजू मंडळी थेट तेलंगाना मध्ये जाऊन आपल्याला हवी असेल तेवढी रक्कम आणित आहेत. मात्र विनाकारण जाण्यायेण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
ज्यांच्या घरी एखादे लग्न कार्य किंवा कार्यक्रम आहे ती मंडळी मात्र पैश्याअभावी पुरती वैतागली आहे. प्रत्येक कामाला पैसे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे शक्य नाही. विविध कारणामुळे जनतेला ऑनलाइन व्यवहार देखील अडचणीचे ठरत आहे. बहुतांश दुकानात अजुनही स्वीप मशीन उपलब्ध केल्या गेले नाहीत आणि ज्या ठिकाणी मशीन उपलब्ध केले आहेत ते शंभरामागे दोन रुपये जास्तीचे बील आकारत आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंट करा म्हणायचे आणि जनतेकडून शंभरामागे दोन रुपये जास्त घेणे हा कुठला न्याय आहे हे ही कळत नाही. आमचे पैसे असून आम्हालाच मिळत नाही ही अवस्था सध्या निर्माण झाली. येत्या एका महिन्यात शेतकरी मंडळीचे शेतातील कामे सुरु होणार आहेत. बी-बियाणे आणि औषधाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातावर पैसा असणे अत्यावश्यक आहे अन्यथा ज्यांच्या साठी एवढा खटाटोप केला तीच व्यक्ती दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कदाचित याचे परिणाम सरकारवर उलटे होऊ नये त्यापूर्वी बँकेतील आणि एटीएममधील स्थिती पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
लहानपणी टीवी पाहिलेली आठवण
वीस-पंचविस वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवतात. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणा कडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन किमी अंतरावर असलेल्या शेजारच्या गावात एका श्रीमंत व्यक्ती कडे टीव्ही होती. दर रविवारी न चुकता तीन किमी पायी धावत पळत टीव्ही समोर जाऊन बसायचो. काही दिवसा नंतर खुप गर्दी होऊ लागली तर एक तासा पूर्वी हजर व्हायचो. घरात मात्र कोणाला ही याचा पत्ता लागू दिला नाही. मात्र एके दिवशी घरच्याना पत्ता लागलाच. त्याचे असे झाले की, ज्यांच्या घरी टीव्ही पाहायला जात असे तेच व्यक्ती एके दिवशी माझ्या घरी प्रकटले. बाबांची आणि त्यांची जुनी ओळख होती. त्याच ओळखीवर मी त्यांच्या घरात प्रवेश मिळविला होता. त्यांनी माझा विषय सरळ बाबांना सहज बोलता बोलता सांगून टाकले. झाले त्या दिवशी पासून माझे *रामायण* बंद झाले. माझ्यावर रविवारी कठोर पहारा होत होता. काय करावे सुचेना.
काही दिवसानंतर गावात एकाच्या घरी टीव्ही आली. तसे तीन किमी पायी जाणारे आत्ता गावातच टीव्ही पाहण्यास जाऊ लागले. मी ही जाऊ लागलो. त्यांचे घर खुप मोठे होते. त्यामुळे लहान लहान मुले आम्ही सर्वात पुढे बसायचो आणि मोठी माणसे सर्वात मागे. आमच्या आजूबाजूला गावातील वयोवृद्ध आजी बसायच्या. टीव्ही वर राम किंवा सिता आल्या की ते हात जोडायचे आणि नमस्कार करायचे. मी मनात विचार करायचो की ते खरे खुरे राम-सीता नाहीत हात जोडायला. ते तर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया आहेत. पण कोण सांगणार त्यांना. मला रविवार ची नेहमी प्रतिक्षा असायची. त्याच सोबत हे चालणारे चित्र कसे दिसतात ? याची उत्सुकता पण असायची. या रामायण सोबत दर बुधवारी रात्री आठ वाजता प्रसारित होणारी *चित्रहार* याचे ही आकर्षण होते. हे सुद्धा न विसरता पहायचो. क्रिकेट खेळण्याचे, ऐकण्याचे आणि पाहण्याचा भन्नाट शौक. बहुतांश वेळा शाळेला दांडी मारुन हे शौक पूर्ण केलो. टीव्हीवर क्रिकेट मैच पाहता यावे यासाठी त्या घरातील मुलांशी मैत्री केली होती.
क्रिकेटच्या संघात त्या मित्राचा समावेश करण्यात आला. टीव्ही बघण्यासाठी त्याची प्रत्येक हट्ट पूर्ण केल्या जायचे. त्याच्या मनाविरुद्ध काही केले की टीव्ही पाहायला मिळायचे नाही या भावनेने आम्ही सर्व टीम त्रस्त असायचो. भारताचा क्रिकेट सामना असला की हमखास त्याच्या घरी दिवसभर बसून राहायचो. इकडे शाळा बुडली, अभ्यास बुडाले तरी काही देणे घेणे नव्हते. ही बाब घरच्याना शेवटपर्यंत कळू दिले नाही. वर्गात जेमतेम हुशार असल्या मुळे माझ्या घरा पर्यंत कधीच तक्रार गेली नाही. त्यावेळी सर देखील खुप छान होते. क्रिकेटचे वेड मात्र वर्षागणिक वाढत होते. मोठ्या संघात सहभाग घेऊन खेळू लागलो. गावात आमच्या संघाची चर्चा होऊ लागली. तेंव्हा घरात ही बाब कळाली तेंव्हा अभ्यास न बुडविता क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. लाईट नसेल तेंव्हा रेडियो वर समालोचन घरी ऐकत बसायचो. रस्त्याने येणारा जाणारा स्कोर विचारत असे आणि मी न थकता सांगत असू
टीव्ही पासून कसा दूर झालो ? त्याचा एक अनुभव आपल्या सोंबत शेयर करायाला नक्की आवडेल
गावातील शिक्षण संपवून जवळच्या मोठ्या शहरात पुढील शिक्षणासाठी जाण्याची तयारी झाली. तेथे घरोघरी टीव्ही आहेत असे मी ऐकून होतो. त्यामुळे मनात लड्डू फुटू लागले होते की, आत्ता टीव्ही पाहायला मिळेल..! पण जेव्हा तेथे राहायला गेलो आणि जे अनुभव आले ते फार वाईट. गावात कोणाच्याही घरी डायरेक्ट जाता येत असे मात्र शहरात तसे करता येत नव्हते. कुणी ही आपल्या घरी टीव्ही पाहण्यास येऊ देत नव्हते. त्यामुळे माझी खरी पंचायत सुरु झाली. रामायण, महाभारत, चित्रहार, आणि क्रिकेट हे सर्व मला पाहता येत नव्हते. रुमच्या शेजारी एक जोडपे होते, खुप मायाळू आणि प्रेमळ. त्यांच्याकडे अधुनमधून मी टीव्ही पाहू लागलो.
शनिवारी शाळेला दुपारी सुट्टी असायची. जेवण झाल्या नंतर थोडा वेळ अभ्यास करायचो. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मराठी चित्रपट चालू होत असे ते रात्री साडे सात पर्यंत चालत असे. असेच एका शनिवारी चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. रात्री साडे सात पर्यंत टीव्ही पाहून रूम वर परत आलो. पाहतो तो काय माझे वडील बंधू हजर. त्यांना पाहून मला खुप भीती वाटत होती. एव्हाना त्यांना कळले होते की मी टीव्ही पाहण्यास गेलो. त्यांनी मला खुप समजावून सांगितले. शेवटी एकच वाक्य म्हटले जे की मला आज ही आठवते " टीव्ही पाहायला खुप आयुष्य पडले आहे. आज अभ्यास केलास, मेहनत घेतलास तर पुढे पूर्ण जीवन टीव्हीच पहायचे आहे. पण आत्ता जर टीव्ही पाहत बसलास तर आयुष्यात तुला टीव्ही पाहता येणार नाही." त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनावर खुप मोठा परिणाम झाला आणि मी नेहमीसाठी टीव्ही पासून दूर झालो.
खरेच टीव्ही चे आकर्षण लहानपणी वेगळीच असते नाही काय ?
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक धर्माबाद

कमवा आणि शिका


कमवा आणि शिका हेच उपयोगी

स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले. सुमारे दोनशे वर्षा पूर्वी महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. शिक्षण हेच समाजाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले होते म्हणून तर त्यांनी अस्पृश्यासाठी, मुलीसाठी पहिली शाळा काढली. नुसती शाळा काढून थांबले नाहीत तर समाजातील गोरगरीब आणि तळागाळातल्या मुलींना तेथे प्रवेश मिळवून दिला. शाळेत शिकविण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत हे पाहून स्वतःची पत्नी सवित्राबाई फुले यांना साक्षर करून भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्यास प्रोत्साहित केले. सावित्रीबाई फुले शिकल्या त्यामुळे बावनकशी लिहू शकल्या. त्यांनी अनाथाश्रम काढले, वृत्तपत्रे काढली. धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. शिक्षणामुळे मनुष्याच्या जीवनाचा विकास होतो म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाकडे एक कटाक्ष टाकले तर लक्षात येईल की त्याकाळी शिक्षण घेणे किती अवघड बाब होती. भारतावर इंग्रजाचे राज्य होते आणि ते लोक फक्त त्यांच्या कामासाठी कारकुन तयार होतील असेच शिक्षण देत होते. सर्वसामान्य लोकासाठी त्यांचे शिक्षण काही कामाचे नव्हते. म्हणून महात्मा फुले यांनी हंटर कमीशन पुढे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे अशी साक्ष दिली. देशात उच्च वर्णीय लोकासाठी फक्त शिक्षण चालु होते. गरीब लोकांसाठी कसलीच व्यवस्था नव्हती. देशात अज्ञानी आणि पारंपारिक अंधश्रधेमध्ये असलेली जनता भरपूर प्रमाणात होती. त्यांच्या वर्तनात आणि वागणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सारेच समाजसुधारकानी ओळखले म्हणून तर सर्वानी शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला तरी म्हणावे तेवढे लोकांनी शिक्षणाकडे वळले नाहीत. लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळले नव्हते. अति मागास असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या सोई सुविधा देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात. अगदी कडक शिस्तीचे गुरुजी असायचे. कुठल्याच प्रकारची तडजोड त्यांना चालायचे नाही. छडी लागे छम छम चा प्रत्यय त्या काळातील लोकांना आला. आज ही त्या शिक्षकांना पाहिल्यावार मनात आदरयुक्त भीती जाणवत राहते. माझ्या मुलाना का मारलात अशी तक्रार करायला कोणी पुढे येत नसत कारण शाळेत काय घडले हे कोणीही घरी काही सांगत नव्हते. शिक्षकांच्या या भीती पोटी बऱ्याच मुलांचे जीवन सुधारले तर तितक्याच मुलांचे जीवन बरबाद ही झाले असतील यात शंका नाही. मात्र ज्यांच्या जीवनात या प्रणालीमुळे सुधारणा झाली ते ते यास दोष देणार नाहीत, विसरून चालणार नाही, हे ही खरे आहे. त्याकाळी पालकापेक्षा मुलांना आपल्या शिक्षणाची काळजी जास्त होती. तहान लागलेल्या प्राण्याला विहीर, नदी किंवा तलावापर्यंत नेता येते पण, पाणी पिणे अथवा न पिणे हे सर्वस्वी त्या प्राण्यावर अवलंबून असते. अगदी त्याच प्रकारचे शिक्षणाविषयी बोलता येईल. पालकापेक्षा मुलांना शिक्षणाची गोडी आणि काळजी लागली तरच विकास शक्य आहे अन्यथा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असुन देखील आज मुलाची शैक्षणिक प्रगती म्हणावी तेवढी दिसत नाही असे का ?
* अपत्याची संख्या -
पूर्वी कुटुंबात एका दाम्पत्याला चार-पाच मुले असायची. त्यामुळे कोणाचे लाड किंवा कोडकौतुक व्ह्ययचे नाही. स्वतःच्या बळावर ही मुले शिकायाची. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले असायचे. वेळप्रसंगी कमवा आणि शिका या तत्वाचा देखील त्यांनी अवलंब करीत असत. त्यांचे स्वावलंबी जीवन त्यांना जीवनात खुप काही शिकविले आहे. एका घरात दहा-दहा माणसे राहायची. कमवायचे एक हात आणि खायाची दहा तोंडे त्यामुळे घरातील कर्ता पुरुषाना घरातील लेकरां-बाळाच्या शिक्षणाकडे बघण्यास अजिबात वेळ राहत नसे. म्हणून त्यांचे पालकत्व बरोबर नव्हते अशातली बाब नव्हती. पण त्यांचे आस्तित्वच घरातील सर्वाना प्रेरणा देणारी होती. परंतु आज वेगळी परिस्थिती बघायला मिळते. हम दो हमारे दो असे कौटुंबिक चित्र असलेल्या घरात आई-बाबा दोघे पण कमावते झाली आहेत. आजचे कुटुंब खुप सीमित झाले आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत हे पालक खुप जागरूक झाली आहेत. हवे नको असलेले सर्व काही क्षणात पुरवठा करू शकतात. तरी देखील मुलांची प्रगती म्हणावी तशी का होत नाही. त्याला कारण आहे जास्तीची घेतलेली काळजी. जेंव्हा मुलांना आपण अति संरक्षण किंवा खुप काळजी घेतो तेंव्हा ती मुले एक तर डरपोक होतात किंवा एकलकोंडी होतात. त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही एखादी बाब करण्याची त्यामुळे ते यांत्रिक पध्दतीतने वागतात. पैश्याची काहीच कमतरता नसते आणि पैश्याच्या जोरावर सर्व काही विकत घेता येऊ शकते अशी धारणा असलेले पालकाना संस्कार नावाची वस्तू बाजारात कुठे मिळते ? याचा पत्ता मात्र मिळत नाही. आजची मुले फक्त आणि फक्त पुस्तकी कीडे बनत चालली आहेत. पालकाना सुध्दा आपली मुले तसेच व्हावीत असे वाटते. असे होताना मात्र ही मुले संस्कारहीन होत आहेत याकडे दुर्लक्ष चालू आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये जे नकळत संस्कार पडत होते त्याचा कुठे तरी शोध घेणे आजच्या पालकाना जड जात आहे. विभक्त कुटुंब पध्दत ही क्षणिक सुखाची आणि खुप आकर्षक वाटते मात्र आपल्या समोरील पिढी बरबाद करीत असते याची जाणीव ज्या पालकांत निर्माण होईल ते आपले पालकांची भूमिका निश्चितपणे निभावतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपाल्टीच्या विद्युत प्रकाशात अभ्यास करून जीवनात एवढे महान कार्य करू शकले. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री, परमपूज्य साने गुरुजी यासारखी अनेक व्यक्ती आहेत ज्याना घरातील पालकानी नाही तर स्वतःच्या हिमतीवर जीवनात यशस्वी होता आले. फक्त आणि फक्त शिक्षणामुळे त्यांना जीवन विकास साधता आले. समाजात आज असे ही चित्र बघायला मिळते की ज्याला कसल्याच प्रकारची सुविधा नाही अशी मुले विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवित आहेत. कारण त्यांना गरीबीचे चटके लागलेले असतात. जेंव्हा जळते तेंव्हाच कळते या म्हणीनुसार अशी मुले रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. तर दूसरीकडे आपले पाल्य परीक्षेत यशस्वी व्हावे म्हणून त्याची सर्व प्रकारची सोय करून देखील त्याला कसलेही यश मिळत नाही. उलट यावेळी पेपर खुप अवघड होते. माझे नशिब खराब आहे असे नशिबावर खापर फोडून वर्षभर बाप कमाई वर फिरणारे मुले खरोखर यश मिळवतील काय याबाबत शंकाच आहे. नांदेड, औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात अभ्यासाच्या नावाखाली राहणाऱ्यां मुलांविषयी पालकानी एकदा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या शिक्षणाची पध्दत पूर्ण बदलून गेली आहे. कारण आज पालक मुलांपेक्षा जास्त जागरूक झाले आहेत. अभ्यासाची गोडी आणि महत्त्व जेवढे पालकाना आहे तेवढे मुलांना नाही त्यामुळे शिक्षणात पालकांची खुप गोची होत आहे. पालक मंडळीनी आपल्या मुलांकड़ून खुप मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे आजची मुले खुपच दबावाखाली वावरत असतात. काही दिवसापूर्वी एका मुलाने अभ्यासाचे ओझे सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. हे कश्याचे द्योतक आहे. पूर्वीच्या पालकांत आणि आजच्या पालकांत एकच फरक आहे ते म्हणजे आजचे पालक आपल्या मुलांविषयी खुप स्वप्न बाळगुन आहेत. स्वप्न भंग होऊ नये या काळजी मध्ये मुले वावरत आहेत. जे पालक आपल्या मुलाना कसलाही दबाव ठेवत नाहीत त्यांचीच मुले जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे पालकानी मुलाना त्यांच्या मनानुसार अभ्यास करू द्यावे आणि आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका करणे हेच खरे आपले पालकत्व आहे ,असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  9423625769
अवघड सोप्यामध्ये अडकलेल्या बदल्या

                      मे महिना उजाडला की सर्वत्र बदल्याचे वारे सुरु होतात. त्यातल्या त्यात शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहते. पूर्वी केव्हाही बदल्या केल्या जायचे त्यामुळे शिक्षक मंडळीना नाहक त्रास होत असे. या कटकटी पासून वाचण्यासाठी गेल्या दहा एक वर्षापासून मे महिन्यात बदली करण्याची पध्दत सुरु झाली. जे सर्वांसाठी सोइस्कर आणि उपयुक्त आहे, यात वाद नाही. बदल्या म्हटले की राजकारण येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. शिक्षक मंडळी देखील आपल्या सोईच्या गावाची शाळा मिळावी म्हणून राजकारणी लोकांकडे फील्डिंग लावतात आणि मग सुरु होतो सत्ता आणि पैश्याचा खेळ. सर्वसाधारणपणे एका शिक्षकाची बदली त्यांच्या मनानुसार करायची ठरविल्यास अर्धा लाख रूपयाची मागणी केली जाते आणि तेवढी रक्कम कसल्याही प्रकारचे आढेमुढे न घेता दिली जाते. काही लोकप्रतिनिधी याच दिवसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहतात. याच बदल्याच्या मौसममध्ये ते मालामाल होऊन जातात. इकडे शाळेवर एक रूपया खर्च न करणारा शिक्षक आपल्या सोईच्या गावसाठी वाटेल ती रक्कम मोजण्यास तयार होतो. हीच सर्व देवाणघेवाण पूर्णतः बंद करण्यात यावे यासाठी यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा प्रयोग शालेय शिक्षण विभाग करीत आहे. खरोखरच ऑनलाइन पध्दतीने शिक्षकांच्या बदल्या होतील काय ? याबाबत शिक्षकांच्या मनात संभ्रम अवस्था आहे.
दरवर्षी बदल्याच्या मोसम सुरु झाला की, शिक्षकांच्या बदल्याबाबत पेपर मध्ये पानभरून लिहिले जाते. तसे जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी काम करतात मात्र शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे त्यांच्या बदल्या लक्षवेधी ठरतात हे ही सत्य आहे. गेल्यावर्षी शिक्षकांच्या बदल्या पेसा कायद्यामुळे सर्वाना अवघड ठरले होते तर यावर्षी अवघड आणि सोपे क्षेत्र या बाबीमुळे कठिण बनले आहे.
शिक्षण विभाग सध्या ऑनलाइनच्या बाबतीत खुप महत्वाचे कार्य करीत आहे. गेल्या वर्षी सरल प्रणाली शिक्षणात आणून राज्यातील सर्व शाळा, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना ऑनलाइन केले आहे. एका क्लिक वर राज्यातील शैक्षणिक आढावा घेता यावा यासाठी सरल प्रणाली विकसित करण्यात आली. त्या प्रणालीद्वारे काम करताना राज्यातील शिक्षकांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागले. अनेकांनी या ऑनलाइन प्रक्रियेच्या विरुध्द आवाज देखील उठविला परंतु आज जेव्हा एका क्लिकवर राज्यातील कुठल्याही शाळेची स्थिती जगात कुठून ही पाहता येते ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे यात शंकाच नाही. शाळेत असलेल्या सर्व सोईसुविधा आणि शाळेची निश्चित अशी जागा ही बाब ऑनलाइन वर दिसून येते.  विद्यार्थी पोर्टल वर राज्यातील सर्व विद्यार्थ्याची माहिती त्याच्या आधार क्रमांक आणि इतर माहिती सह उपलब्ध करण्याची किमया येथे करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बोगस विद्यार्थी संख्येवर आळा बसला. त्याच प्रकारे शाळेत शिकविणारे कर्मचारी त्यांची इत्यंभूत माहिती कर्मचारी पोर्टल वर दिसून येते आणि याच पोर्टलच्या आधारे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा विचार शासन करीत आहे. ज्यामुळे राजकारणी लोकांचा बदल्या मध्ये जो हस्तक्षेप वाढत चालले आहे त्यास कुठे तरी आळा बसेल अशी विचारधारा शिक्षकांसाठी अनुकूल आहे. राज्यातील सर्व शिक्षक मंडळीना पोर्टल वर आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक असताना पोर्टल अजुन ही नीट चालत नसल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. अजुन त्यातल्या त्यात शाळेचे सोपे क्षेत्र आणि अवघड क्षेत्र अश्या दोन गटात विभागणी करून सर्व शिक्षकांना संभ्रम अवस्थेमध्ये टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या स्तरावर काही जिल्ह्यात अजुनही सोपे आणि अवघड गावे ठरली नाहीत. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात ह्या गावाच्या बाबतीत एकी नाही. सोपे गाव कशाला म्हणावे आणि अवघड गावे कशी ठरवावी याबाबत प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्यावर शिक्षकानी दाद कुठे मागावी ? यावर्षीच्या बदल्याच्या शासन अद्यादेशानुसार प्रत्येक शिक्षकांना आपली बदली होते की काय ? अशी अनामिक भीती मनात निर्माण होऊन या बदली बाबत अनिश्चितता वाढत चालली आहे. या बदली प्रक्रियेत तालुका सेवाजेष्ठता गृहीत न धरल्यामुळे गेल्या वर्षी जे तालुक्यातुन प्रशासकीय बदलीद्वारे आपल्या घरापासून दूर गेले त्यांच्या मनात हळहळ निर्माण झाले आहे. कारण जुन्या नियमानुसार ज्यांची तालुक्यात सेवा जास्त झाली अश्या दहा टक्के लोकांची यादीनुसार बदली होत असे. त्याच बरोबर त्यांची बदली करताना रिक्त जागेचा ही विचार केला जात असे. मात्र नव्या नियमानुसार रिक्त जागेचा विचार न करता बदल्या होणार असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्याच्या जागेवर कोणी बदलीने आला तर ज्याची बदली होणार नाही त्यास ती जागा सोडावी लागणार आहे. म्हणजे त्याची ही बदली होणार आहे. ह्या अनिश्चितपणा मुळे प्रत्येक शिक्षकांच्या मनात धस्स करीत आहे.
वास्तविक पाहता शाळेच्या विकासासाठी शाळेत अध्यापन करणारे शिक्षक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाजूने त्रस्त नसेल तर शाळेत आपले सर्वस्व अर्पण करून अध्यापन करू शकतो आणि या उलट जर त्याची बदली घरापासून दूर किंवा नको असेल त्या ठिकाणी देऊन सर्व प्रकारचा त्रास झाल्यास खरोखर शाळेचा विकास होईल काय ? हा ही प्रश्नच आहे. निवडक वीस गावाच्या शाळेची नावे या बदलीच्या वेळी शिक्षकांकडून मागविण्यात येत आहेत, याचा अर्थ असा नाही हे संपूर्णपणे त्याच्या मनासारखे आहे. शिक्षकांना एकप्रकारे चलबिचल करण्याचा प्रकार आहे. शिक्षक मंडळी आत्ता तर कुठे डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आपापली शाळा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करीत असताना ह्या बदलीच्या प्रक्रियेने शिक्षकांना हलवून ठेवले आहे. मे महिन्यात शाळेला सुट्टी असते मात्र बदल्याची प्रक्रिया महिना भर चालते त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील शिक्षकांना कुठे ही जाता येत नाही, हे वास्तव आहे. बदल्याची प्रक्रिया जितकी सोपी करावी असे वाटते तितके ते अवघड आणि क्लिष्ट बनत चालले आहे. यापेक्षा जुनी पध्दत बरी अशी म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
निकालात मुलींच अग्रेसर का ?

नुकतेच बारावीचा निकाल जाहिर झाला. त्यात नेहमीप्रमाणे मुलींची निकालाची टक्केवारी मुलांच्या निकालापेक्षा जास्त दिसून आली. असे का ? शाळेच्या प्राथमिक स्तरापासून जर अवलोकन करण्यात आले तर एक बाब प्रकर्षाने दिसून येते की वर्गात मुलांपेक्षा मुलीं जास्त प्रमाणात अग्रसर दिसून येतात. दिलेले प्रत्येक काम मन लावून पूर्ण करतात. वेळेत आपला अभ्यास पूर्ण करतात.सांगितलेले काम चोख पूर्ण करतात. याउलट मुले वागतात, असे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे खुप गरजेचे आहे असे वाटते. याचा शोध लावताना अनेक बाबी डोळ्यासमोर आल्या जसे की अभ्यासावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मित्र परिवार. मुलांचा मित्र परिवार अर्थात मुलीं पेक्षा जास्त असतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ मित्रासोंबत खेळ खेळण्यात, चित्रपट पाहण्यात, गप्पा मारण्यात वाया जातो. या उलट मुलीं सोबत घडते. आपला जास्तीत जास्त वेळ मुलीं घरात घालवितात आणि त्या वेळात त्यांच्या हातात पुस्तकाशिवाय इतर काही नको वाटते. मुलींना थोडा सुद्धा अपमान सहन करावे असे वाटत नाही तर मुले किती ही अपमान सहज पचवितात. त्यांना त्याचे काही वाटत नाही.  शिक्षा झाले तरी त्यांना काही वाटत नाही. शहाण्याला शब्दाचा मार हे मुलांना कुठे ही लागू पडत नाही.
त्याचसोंबत मुलांना घरात मिळत असलेली वागणूक ही सुद्धा परिणाम करणारी बाब आहे. आज काल असे दिसून येते की, मुलांचे सर्व काही मागण्या ताबडतोब पूर्ण केल्या जातात. त्या प्रमाणात मुलींच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे मुलीं शिक्षणा द्वारे घरातील पालकांचे लक्ष आपल्या कडे वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. मुलींची महत्वाकांक्षा खुप मोठी असते आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मुलींच्या शिक्षणावर सरकारच्या विविध योजना हे ही मुलींच्या टक्केवारीत वाढ होण्या मागे एक प्रमुख कारण आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. बेटी बचाओ आणि बेटी पढाओ सारख्या योजना आज शासन मुलीं जन्मल्या पासून अवलंबित आहेत. मुलींच्या शिक्षणावर विविध प्रकारच्या योजना तयार करून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना मुलांच्या शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्याच्या मनात मुलगा-मुलगी असा भेद निर्माण केल्या जातो. मुलगी म्हणून तिला वेगळ्या प्रकारे आणि मुलगा म्हणून ह्याला वेगळ्या प्रकारचे वागणूक पालक आणि शिक्षकां कडून दिल्या जाते. त्याचा काही अंशी परिणाम मुलांच्या लहान मनावर होत असतो. ज्याचे कोणी ही विचार करीत नाही. पहिल्या वर्गात शिकणाऱ्या यशराज आणि शिवानी दोघांनी समान चूक केल्यावर गुरुजींनी यशराजला हातावर एक छडी मारली आणि शिवानी ला जवळ घेत बेटा असे चूक करू नये म्हणत पाठीवर हलका सा धपाटा देऊन बसविले. सहा वर्षाचा यशराजचे मन समजू शकले नाही की, दोघांची चूक सारखी राहून शिक्षा समान का नाही. घरी आल्या नंतर त्याने आपल्या वडिलांजवळ तशी तक्रार केली. मग वडिलांनी पण त्याला समजावून सांगताना म्हटले की, ती मुलगी आहे म्हणून सर तसे केले असतील. म्हणजे मुलांच्या डोक्यात अगदी लहानपणा पासून मुलगा-मुलगीचा भेद चालू असतो. त्यामुळे त्याच्या लहान मनावर वेगळाच परिणाम होतो. एक सातव्या वर्गातील मुलगा ज्याला शासना कडून काहीच मिळत नाही तो वैतागुन काय म्हणतो, सर सर्व काही मोफत मुलींनाच का दिल्या जातो, आम्हाला मुलांना का दिले जात नाही. आम्ही काय पाप केलो. अश्या प्रश्नाला गुरुजीं किंवा पालक काय उत्तर देणार.
निकालाची टक्केवारी वाढ करण्यात ह्या बाबी कदाचित काही महत्वाची भूमिकेत नसतील ही मात्र विद्यार्थ्याच्या मनावर कुठे तरी आघात करीत असतील. त्याच सोंबत मुलगा असो वा मुलगी त्यांची अभ्यासाची तयारी हेच निकालामधून प्रदर्शित होत असते.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
सायरन

रमजानच्या महिन्यात रोज सायंकाळी सायरन वाजल्यानंतर मुस्लीम बांधव आपला उपवास सोडतात. ठराविक वेळेला नमाज करण्यासाठी मोठ्या आवाजात सर्वाना सूचित केल्या जाते. पूर्वीचे लोक याच आवाजावरुन दिवसाचे वेळ ओळखून घेत असत. आज सुद्धा सकाळच्या वेळी नमाजाचे आवाज ऐकून लोक अलार्म न लावता उठतात आणि आपल्या कामाला सुरुवात करतात. कारखान्यात मोठा भोंगा वाजले की कामगाराची सुट्टी होते. महत्वाच्या लॉकरला एखाद्याने चोरीच्या उद्देश्याने हात लावल्याबरोबर तेथे सायरन वाजले जाते आणि अधिकारी मंडळी सतर्क होतात. आमदार, खासदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाना विशेष सायरन असलेली गाडी दिली जाते मात्र नुकतेच त्यांची लाल दिव्याची गाडी कमी करण्यात आली. रात्रीच्या वेळी गस्त देणाऱ्या पोलीसाकडे असलेली गाडी विशिष्ट आवाज करीत फिरत असते. आकाशवाणी किंवा दूरदर्शन वरील बातम्या सुरु होण्यापूर्वी एक विशेष धुन वाजते आणि त्यानंतर बातम्या सुरु केल्या जातात. आज वाहिन्याची संख्या खुप वाढली. त्यातल्या त्यात बातम्या देणाऱ्या वाहिन्याची संख्या तितक्याच प्रमाणात वाढले आहे त्यामुळे दूरदर्शनची ती धुन आज ही आपले वेगळेपण जपून आहे. आकाशवाणी केंद्र सुरु होण्याची धुन ऐकल्यावर आज ही वाटते की आकाशवाणी केंद्र आता सुरु होत आहे, मन प्रसन्न होते. शाळेत वाजविली जाणारी घण घण घंटीचा आवाज ऐकून गावातील सर्व मुले शाळेच्या मैदानात जमा होतात आणि तीच घंटा ऐकून सायंकाळच्या वेळी घराकडे पळतात. ट्रिन ट्रिन घंटी ऐकून दारावर उभा असलेला सेवक धावत पळत येऊन साहेबापुढे उभे राहतो. जर साहेबाना जास्त वेळा घंटी वाजविण्याची वेळ आली तर सेवक शिव्या खाल्याशिवाय राहणार नाही हे ही सत्य आहे. म्हणून घंटी वाजल्या बरोबर धावत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. शाळेच्या मैदानात खेळाच्या शिक्षकांने शिटी मारली की सर्व मुले एका रांगेत येऊन उभे राहतात, ज्याला शिटी ऐकू आली नाही किंवा शिटीचा अर्थ समजले नाही, त्यास काही ना काही शिक्षा होणार हे ठरलेले असते. रेल्वेस्थानकावर थोड्याच वेळात रेल्वे येणार असल्याची सूचना दिली जाते त्याची ही ठराविक पध्दत असते. नियमित प्रवास करणारे लोक त्याचा बरोबर अर्थ लावून स्थानकावर येत असतात. पूर्वी रेल्वे येण्याच्या वेळेत घंटा वाजविला जायचे. रेल्वे स्थानकावरुन सुटते वेळी दोन शिटी देते. यावरून प्रवाशी सहज अंदाज बांधतात आणि आपला प्रवास सुखमय करतात.
घरात स्वयंपाक करीत असताना दाळ किंवा भात शिजवि ण्यासाठी ठेवालेला कुकर तीन शिटी दिली की बंद केल्या जाते. कुकरच्या शिटीकडे लक्ष दिले नाही तर जेवण नाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही घरात असे घड्याळ असतात की जेवढे वाजले असतील तेवढे घड्याळमध्ये टोल पडतात. रात्री बाराच्या सुमारास हे ऐकावे असे वाटत नाही. कोणतीही परीक्षा देण्यासाठी गेल्यावर आपल्या कडे घड्याळ नसेल तरी तिथे दर अर्ध्या तासाला टोल देण्याची व्यवस्था असते त्यावरून परीक्षार्थी आपल्या वेळेचे नियोजन करू शकतो. परिक्षेच्या काळातील टोल आपणास वेळेचे महत्त्व स्पष्ट करून सांगत असते. सिनेमा संपायला आल्या वर ही सिनेमा हॉल मधील घंटी वाजविल्या जाते यामुळे काही मंडळी चित्रपट पाहण्यासाठी येत नसतात तर वातानुकूलित भागात झोप घेण्यासाठी येतात. त्यांना उठवि ण्यासाठी ह्या बेलचा उपयोग होतो असे म्हणने संयुक्तिक ठरेल. आजकाल सर्वाजवळ मोबाईल आवश्यक बाब बनली आहे. विविध रिंगटोन च्या माध्यमातून फोन आल्याची वर्दी दिली जाते. ते आवाज जर बंद केले तर फोन आल्याची सूचना मिळत नाही आणि संवाद होत नाही. या मोबाईल मध्ये सर्व बाबी पुन्हा आठवण करून द्यावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे एक मेमरीयोबल वस्तू झाले आहे. पूर्वी घराघरात टेलीफोनची घंटी वाजली जायची आणि हैलो म्हणून संवाद सुरु व्हायचे. आज टेलीफोनची घंटी फार दुर्मिळ झाले आहे. रास्त्याने जात असताना लोक बाजूला सरकले जावे म्हणून सायकलस्वार आपल्या सायकलची घंटी वाजवित असे. त्यानंतर मोटरसायकल आली ज्याला मोठा हॉर्न बसविन्यात आले. त्यानंतर मोटारकार, ट्रक, बस यासारखी मोठी वाहने आली. तेंव्हा प्रत्येकाचे हॉर्न वेगवेगळे. दुरवर कुठे तरी टिन टिन असा आवाज ऐकू आला की जवळपास एखादे मंदीर असल्याची जाणीव होते. मंदिरात जाऊन देवळातील घंटा वाजविली नाही तर रुख रुख लागते. मोठ्या शहरात कचरा गोळा करणारी गाडी असते. प्रत्येक नगर, वॉर्ड किंवा गल्लीमध्ये जाऊन कचरा गोळा केल्या जाते. त्यासाठी विशिष्ट कचऱ्याची घंटी किंवा शिटी वाजविली जाते तेंव्हा घरातील लोक आपला कचरा त्या गाडीत टाकू शकतात. हे असे आवाज म्हणजे लोकांचे लक्ष वेधुन घेणे होय.
विविध पक्षी आणि प्राणी विविध आवाजाद्वारे एकमेकाला सूचना देऊन एकत्र येतात. त्यांचा आवाज त्यानाच कळतो. जे नेहमी जंगलात राहतात त्यांना त्यांच्या आवाजाचे महत्त्व लक्षात येते. मृग नक्षत्र सुरु होत असताना एक पक्षी विशिष्ट आवाज करतो आणि शेतकऱ्याला म्हणतो पेरते व्हा. तो पक्षी असा आवाज दिल्या शिवाय पूर्वी लोक शेतात काही पेरत नव्हते . तो पक्षी त्यांचा खरा साथीदार होता. आज ही तो पक्षी त्या वेळेला पेरते व्हा म्हणून संदेश देत असतो पण त्यांच्या संदेशाकडे कुणाचे ही लक्ष नाही. जो तो धावत्या युगात सुसाट धावत आहे. त्यामुळे कधी कधी नुकसान देखील होत आहे.
रात्रीच्या वेळी कुत्रे जास्त भूंकु लागले किंवा रडण्याचा आवाज काढले की, म्हातारी माणसे म्हणायचे आज कुणी तरी देवघरी गेलं. सकाळी उठले की बातमी यायची हमखास. आज असे काही घडत नाही किंवा घडत ही असेल पण कोणा जवळ वेळ आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायला. पूर्वी गावात काही महत्वाची बातमी असली की दवंडी दिली जायची ज्यामुळे काही बातमी कळायाची मात्र आज ते ही बंद आहे. काही गावात चालू आहे. भूक लागली की लेकरु कशी रडते अगदी तसेच वासरु देखील सायंकाळ होत आले की हंबरडा फोडते आणि आपली माय म्हणजे गायीला बोलविते आणि गाय आवाज ऐकून गोठ्याकड़े पळत येते. लहान मूल जास्त रडू लागले की आपण वेगवेगळे आवाज काढून त्याचे मन रिझविण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक आवाजाला प्रसंगानुरूप वेगवेगळे महत्त्व आहे. राष्ट्रगीताची धुन कानावर पडल्या बरोबर आपण आपोआप उभे राहतो हे राष्ट्रावरील प्रेमापायी होय. असे समाजात विविध सायरन, आवाजाचा अनुभव येतो ज्यावरुन आपले रोजचे व्यवहार चालत असतात.
- नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद
*सरकारी शाळेतच प्रवेश द्यावा*

जून महिना उजाडला की सर्वत्र प्रवेश प्रक्रियेस आरंभ होतो. पालक मंडळी या महिन्यात खुप चिंतातुर असतात विशेष करून पहिल्या वर्गात प्रवेशित असणारे मुलांचे पालक. तेंव्हा यावर्षी आपल्या पाल्याना पहिल्या वर्गात प्रवेश देणाऱ्या पालकाना नम्रतेची विनंती आहे की आपल्या मुलाला कोणत्याही शाळेत प्रवेश देण्यापूर्वी थोड़ा वेळ तरी विचार करा. आज तुम्ही विचार करून घेतलेला निर्णय तुमच्या लेकरांसाठी भविष्य ठरणार आहे. तो चांगला भविष्य असावा असे वाटत असेल तर आपल्या मुलांना प्रवेश देण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपले मूल साडे पाच वर्ष पूर्ण केले आहे काय ? जर नसेल तर एक वर्ष वाट पाहण्यात शहानपण आहे. कारण त्या वयोमानानुसार अभ्यासक्रम तयार केला जातो. एक दोन वर्ष सोपे आणि बरे वाटते पण त्या पुढील अभ्यासक्रम झेपत नाही. म्हणून योग्य वयात मुलांना शाळेत प्रवेशित केलेले केव्हाही योग्य. घराजवळील शाळेत प्रवेश देण्याचा प्रथम विचार करावा. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय साधारणपणे सहा वर्षाचे असते. या वयातील मुलांना घरा पासून दूर ठेवल्याने त्यांच्यावर शारीरिक व मानसिक त्रास होतो तर पालकाना मुलांच्या रोजच्या जाण्या-येण्यासाठी रिक्षा करावी लागते म्हणजे आर्थिक झळ सोसावे लागते. याउलट घराजवळ असलेल्या शाळेत आपले मूल प्रवेशित केल्याने सर्व बाबी सोइस्कर घडत असतात. आपल्या माघारी आपले घरची मंडळी देखील देखरेख करू शकतात.  मुलांना सुद्धा शाळेला जाणे किंवा येणे कंटाळवाणे वाटत नाही. भविष्यात त्याची चांगली प्रगती होऊ शकते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामुळे आज इंग्रजीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, यात शंका नाही. मात्र आपल्या मुलांना इंग्रजी आले नाही तर त्याचा टिकाव लागेल की नाही अशी शंका किंवा समस्या आजच्या पालकांच्या मनात निर्माण होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले मूल तग धरून रहावे म्हणून प्रत्येक पालक आपल्या मुलांना अगदी लहान वयापासून इंग्रजी शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रवेश देत आहेत. प्ले ग्रुप, नर्सरी, एल के जी आणि यू के जी असे अभ्यासक्रम झाल्या वर त्यास पहिल्या वर्गात प्रवेश दिला जात आहे. खरोखर इतक्या लहान वयापासून मुलांना बांधून ठेवणे योग्य आहे काय ? त्याला मुक्तपणे खेळू द्यायचे नाही म्हणजे त्यांच्या खेळावर गदा आणण्याचे काम पालक म्हणून आपण करीत आहोत. आपली आर्थिक क्षमता आणि मुलांची बुद्बिमत्ता या बाबीचा विचार करून मुलांना प्रवेश देणे योग्य वाटते. काही शाळेत बाहेरील सौंदर्याने आकर्षित करतात. मात्र प्रत्यक्षात तिथे कसलीच गुणवत्ता नसते. म्हणून दिसण्या पेक्षा असण्याला महत्त्व द्यावे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ही सध्या कात टाकत आहेत. बहुतांश शाळा डिजिटल स्वरुपात समोर येत आहेत. शाळेत लोकांचा सहभाग देखील वाढतो आहे. पूर्वी प्रमाणे या शाळेचा दर्जा आत्ता राहिला नसून शाळेतील सर्व विद्यार्थी प्रगत होण्याकडे शासनाच्या अधिकारी पासून कर्मचाऱ्यापर्यंत प्रयत्न करीत आहेत. विविध उपक्रम, प्रकल्प आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तीला वाव दिला जातो. मुलींना आणि मागासवर्गीयासोंबत दारिद्रयरेषेखालील मुलांना मोफत गणवेष दिला जातो. दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते. पहिल्या वर्गा पासून सेमी इंग्रजी शिकविण्याची देखील सुरुवात या शाळेत करण्यात आली आहे. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचे वारंवार शाळेना मार्गदर्शन मिळत राहते आणि या अधिकारी लोकांच्या नियंत्रणा मुळे शाळा व्यवस्थित वेळेवर भरतात आणि सुटतात. तसेच दर पंधरा - वीस दिवसांनी गुणावत्तेची तपासणी देखील केली जाते. या शाळेत अध्यापन करणारे शिक्षक स्वतः खुप हुशार आणि बुद्धिमान असल्यामुळे ते विद्यार्थ्याना उत्तम ज्ञान देवू शकतात. या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकाना शासन विविध कामाला जुंपतो हे जरी सत्य असेल तरी त्या वेळेमधून ही येथील शिक्षक जीवाचे रान करून मुलांना घडविण्याचे काम करतात, हे सत्य आहे. या शाळेतील एखादा शिक्षक चुकी चे वागत असेल तर सर्व शिक्षक एकाच माळेचे मणी समजून सर्वाना दोष देण्यात काही अर्थ नाही. एक वेळा त्यांच्या वर विश्वास टाकणे आवश्यक आहे. आजपर्यंत जे कोणी वर्ग एकचे अधिकारी झाले आहेत ते सर्व जिल्हा परिषद च्या शाळेत शिक्षण घेतले आहेत, हे ही विशेष आहे. म्हणून पालकानी एक वेळ जरूर विचार करावे आणि जवळच्या जिल्हा परिषद च्या शाळेत आपल्या पाल्याना पहिल्या वर्गात प्रवेश देऊन मुलांचे उज्जवल भविष्य बनवावे.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...