Thursday 14 February 2019

My Students ; My Valentine

विद्यार्थी हेच माझे दैवत

शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे शिक्षक, फळा, शाळेची इमारत, मैदान आणि किलबिल आवाजात नाचणारी विद्यार्थी. विद्यार्थ्याशिवाय कोणतीच शाळा शोभून दिसत नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचे अतूट असे नाते असते. शाळेत सर्वात पहिल्यांदा कोण येत असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. काही विद्यार्थी तर शाळेला च आपले घर केलेलं असते त्यामुळे त्यांना शाळा सोडून जावे देखील वाटत नाही. शिक्षक शाळेत येण्याच्या अगोदर हे विद्यार्थी शाळेत येतात आणि शाळेतील केरकचरा आणि मैदानात असलेले घाण स्वच्छ करून टाकतात. काही मुले मिळालेल्या वेळात व्हरांड्यात बसून अभ्यास करतात तर काही मुलं मैदानात खेळतात. सर शाळेत आले म्हटले की धावत धावत सरांकडे धाव घेतात. त्यांच्या हातातील पिशवी किंवा जे काही वस्तू असेल ते आपल्या हातात घेतात. हे विद्यार्थी सरांची रोजच वाट पाहत असतात. थोड्याच वेळांत शाळेची पहिली आणि दुसरी घंटा वाजली जाते. परिपाठ साठी रांगा होतात आणि परिपाठ संपन्न होते. विद्यार्थी वर्गात जातो आणि सर देखील वर्गात जातात. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेला सुरुवात होते. सायंकाळी चार वाजले की शाळा सुटते आणि विद्यार्थी घरी जातात. अवघ्या एका क्षणात गजबजलेल्या शाळेत स्मशान शांतता पसरते. खरोखरच ज्या शाळेत विद्यार्थीच नसतील त्या शाळेत शिक्षकांना काही मजा वाटते काय ? असा प्रश्न पडतो. असो, शाळेत एक जरी विद्यार्थी असला काय हजारो विद्यार्थी असले काय त्याला शाळा असेच म्हटले जाते. शाळेत महत्वाचे काय आहे ? शाळेची इमारत, शाळेचे मैदान, शाळेतील डिजिटल खोली, शिक्षक की विद्यार्थी. ज्याच्याशिवाय शाळा ही शाळा वाटत नाही ते म्हणजे विद्यार्थी, होय विद्यार्थी. ज्याप्रकारे दुकानदार दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना आपला देव मानतो अगदी त्याच प्रकारे शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांसाठी देवच असतो. शिक्षकांनी त्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यामुळे शिक्षकांना चार पैसे मिळत आहेत, हे विसरून चालणार नाही म्हणून विद्यार्थी हेच शिक्षकांचे दैवत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तेंव्हा शिक्षकांनी आपल्या दैवताला चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा भविष्यात निश्चित असा फायदा होऊ शकतो. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत पटसंख्या नसल्यामुळे जवळपास दीड हजार शाळा शासनालाबंद कराव्या लागल्या. शाळा बंद झाल्या याचं सर्वात जास्त फटका कोणाला बसत असेल तर तो शिक्षकांना. कारण एवढ्या शाळेतील जवळपास अडीच हजार प्राथमिक शिक्षकांची पदे कमी झाली. अगोदरच शासनाला नवीन भरती करता येत नाही त्यात असे प्रकरण म्हणजे नवीन भरतीची परत आशा मावळली. त्या शाळा का बंद करण्यात आल्या याचे कारण वाचून परत धक्काच बसतो. गेल्या तीन वर्षांपासून या शाळांची पटसंख्या दरवर्षी घसरत चालली होती आणि पटसंख्या वाढविण्यासाठी कसलेही प्रयत्न करण्यात आले नाही. म्हणून शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात आले आहेत. येथील शिक्षकांनी विद्यार्थी हे माझे दैवत आहेत असे समजून कार्य केले असते तर कदाचित असे झाले नसते. काही ठिकाणी प्रयत्न झाले ही असतील पण दुसऱ्या विविध कारणामुळे पटसंख्येत वाढ होऊ शकली नसेल. पण काही शिक्षकांच्या अनुभवा वरून असे ऐकण्यात येते की, ज्या शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, विद्यार्थ्यांना दैवत मानून शिकविल्या जाते, त्या शाळेत गावातील मुले तर येतातच शिवाय गावाच्या आजूबाजूचे मूल तेथे प्रवेश घेतात. नातेवाईक मंडळी आपल्या नात्यातील लहान मुलांना आपल्याकडे खास करून ठेवून घेतात आणि त्या शाळेत प्रवेश घेतात. राज्यात अश्या काही शाळा आहेत जेथे पूर्वी 20 ते 25 पटसंख्या होती आणि आज शंभरी पार करत आहेत. प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावे. म्हणून ते चांगल्या शाळेच्या शोधात फिरत राहतात. इंग्रजीच्या किंवा खाजगीच्या शाळा केलेल्या कामाची जाहिरात करतात, पालक हुरळून जातील असे काही दाखविण्याचा प्रयत्न करतात, पालकांच्या मनाला ते योग्य वाटते आणि पालक सरकारी शाळा सोडून त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश देतात. शिक्षकांच्या मनात जोपर्यंत माझी शाळा आणि माझे विद्यार्थी ही भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत शाळेतील पटसंख्येत वाढ होणारच नाही. जे शिक्षक शाळेला वेळ देतात, विद्यार्थाना समजून घेऊन अध्यापन करतात, त्यांच्या पालकांपर्यंत जाऊन कौटुंबिक समस्या जाणून घेतात, नुसते जाणून घेत नाहीत तर ती समस्या कशी सोडविता येईल याचे मार्ग शोधून देतात, गावातील एकही मूल बाहेरगावच्या शाळेत जाणार नाही असे वातावरण तयार करतात, सर्वांशी प्रेमाने वागतात त्या शाळेचा विकास झाल्याशिवाय थांबत नाही. पण सरकारी शाळेत कोठे तरी थोडं चुकतंय ज्यामुळे दिवसेंदिवस सरकारी शाळेतील पटसंख्या कमी कमी होतांना दिसत आहे. गावात डिजिटल आणि आकर्षक प्राथमिक शाळा असून काही मुलं इंग्रजी किंवा खाजगी शाळेत जातात म्हणजे शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेला ही बाब विचार करण्यासारखी आहे. शासन एकीकडे सरकारी शाळा बंद करीत आहे आणि   दुसरीकडे स्वयंअर्थसह्यायीत शाळा वाटप करीत आहे. त्यामुळे आत्ता सरकारी शाळा वाचविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दैवत समजून शाळेत विद्यार्थी टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. निदान पहिली ते पाचवीच्या सरकारी शाळा टिकल्याच पाहिजे. याच शाळेतून मुलांना सर्वांगीण शिक्षण दिल्या जाऊ शकते याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करून त्यांची सरकारी शाळेविषयीचा दृष्टिकोन बदलवून टाकणे आवश्यक आहे. पालक आज ही सरकारी शाळेच्या बाबतीत जुन्या विचारसरणीमध्ये आहेत. 20 ते 25 वर्षांपूर्वी सरकारी शाळेतील शिक्षक आणि आजचा शिक्षक यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे, हे पालकांना दाखवण्याची ही खरी वेळ आहे. तेंव्हा शिक्षक बंधुनो उठा, जागे व्हा आणि विद्यार्थी दैवतला शाळेत टिकवून ठेवू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
09423625769

Wednesday 13 February 2019

मध्यान्ह भोजन : एक संजीवनी

मध्यान्ह भोजन : एक संजीवनी

शाळेतील मुलांची उपस्थिती वाढावी म्हणून सन 2003 या वर्षांपासून शाळेत मध्यान्ह भोजन देणे सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी प्रति विद्यार्थी 03 किलो याप्रमाणे तांदुळाचे पाकीट मुलांच्या पालकांना दिल्या जात असे. बहुतांश पालक हे तांदूळ दुकानात विकून त्याचे पैसे करीत असे हे चित्र अनेक ठिकाणी अनुभवास मिळाले होते. ज्या मुलांसाठी ही योजना तयार करण्यात आली होती, त्या मुलांना या योजनेचा काहीच फायदा मिळत नव्हता. थेट मुलांना या योजनेचा फायदा मिळावा म्हणून शाळेत अन्न शिजवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोळा वर्षांपूर्वी फक्त पाचव्या वर्गापर्यंत खिचडी शिजवून देणे असा निर्णय झाला होता. दिवसेंदिवस त्यात बदल होत होत आज इयत्ता आठव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. आता खिचडीच नाही तर वरण भात, हरभरा, वाटाणा, चवळी आणि मुगडाळ देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे मुलांना आता चौकस आहार दिला जात आहे. त्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था शिक्षण विभागाने तयार केलेला आहे. त्यामुळे त्याची माहिती रोजच्या रोज ऑनलाईन भरली जाते. ज्यामुळे एका दिवशी किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला हे एका बटणवर कळते.
अधून मधून शालेय पोषण आहार च्या बाबतीत काही वेगळ्या बातम्या वाचण्यास येतात. जसे की शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करतांना एकास अटक, तांदळात सापडले अळ्या, मुलांना पिवळा भातच खाण्यास मिळतो, शालेय पोषण आहारातून विषबाधा, पोषण आहारावर मुख्याध्यापकांचे लक्ष नाही, शालेय पोषण आहाराच्या बिलात गोंधळ, साप असलेले खिचडी शिजवून देणाऱ्या एका मुख्याध्यापकांना केले निलंबित ( यात मुख्याध्यापकांचा काय दोष, मात्र यंत्रणा सरकारी अधिकारी यांनाच दोषी मानते. ) असे एक ना अनेक बातम्या याच्याशी निगडित वाचण्यात आले की, प्रत्येकाच्या तोंडून सहज बाहेर पडते की, ' शासनाने हे दुपारचे जेवण सरळ सरळ बंद करून टाकावं आणि पूर्वी सारखं तांदुळाची पाकीट देऊन टाकावं. ' बऱ्याच मुख्याध्यापकांना हे दुपारचे जेवण बंद व्हावे असे मनातून वाटते तर काही मुख्याध्यापक मंडळींना ही योजना बंद होऊ नये असे वाटते कारण ह्या योजने कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार केल्यास ही योजना त्यांच्यासाठी संजीवनी आहे, असे वाटते. काही मुख्याध्यापकांना या योजनेतून स्वतः ला भरपूर कमाई करता येते म्हणून ही योजना चालू राहावी असे वाटते. शालेय पोषण आहार योजनेतील दुपारचे जेवण शाळेच्या उपस्थितीवर किती परिणामकारक करते ? हे पाहायचं असेल तर ग्रामीण भागातील सरकारी शाळेत जाऊन पाहता येईल. सरकारी शाळा आणि गरीब विद्यार्थी हे नाते खूप जुने आहे. या शाळेत शिकायला येणारी विद्यार्थी खूप गरीब असते, यांची पालक मंडळी मोलमजुरी करून आपले जीवन कंठीत करतात. एका वेळच्या जेवण्यासाठी ते मोताज असतात. अश्या घरातील मुले दुपारच्या जेवण्याची रोजच वाट पाहतात. सकाळीच शेताला किंवा कामाला गेलेली आई-बाबा शाळेच्या भरवश्यावर घराला कुलूप लावून जातात. त्यांना जर दुपारचे जेवण दिलं नाही तर ते उपाशीच राहणार. ही मुले खूप मोठ्या आवडीने जेवण करतात. काही जणांच्या घरी तर भात केल्याचं जात नाही. त्यामुळे त्यांना शाळेतील भाताचं आकर्षण असते. मित्र परिवारासोबत जेवण करतांना मुलांना खूप आनंद मिळतो. त्यामुळे घरी काही ही न खाणारा इथे मात्र पोटभर खातो असे अनेक पालक नंतर येऊन शिक्षकांना सांगतात. ही झाली एक बाजू ज्यांना घरी जेवायला मिळत नाही त्यांच्यासाठी खरोखरच एक पर्याय होय. दुसरी बाजू जर विचार केला आणि शिक्षक मंडळींनी या योजनेच्या बाबतीत सकारात्मक विचार केल्यास मुलांवर या दुपारच्या जेवणातून जेवण्याचे संस्कार टाकता येतात. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे ही क्रिया जाणीवपूर्वक घेतल्यास ते घरी देखील जेवणापूर्वी स्वच्छ हात धुतील. रोजच्या सवयीचे शिस्तीत रूपांतर झाले की, त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. सर्वांसोबत जेवण केल्यामुळे त्यांच्यात सर्वधर्मसमभाव ही संकल्पना देखील पूर्ण करता येईल. ताटात जे काही मिळाले आहे ते पूर्ण संपविण्याची सवय त्यास लावता येते. बऱ्याच वेळेला ताटात नावडता पदार्थ देखील येऊ शकते. त्यावेळी ते देखील खाण्याची सवय त्यांना लागते. जेवण करतांना बोलण्याची अनेकांना सवय असते, ती सवय येथे मोडीत काढता येते. इतर कसे जेवण करतात याचे निरीक्षण ही मुले करतात आणि जेवण्याची पद्धत शिकून घेतात. याच दरम्यान मुलांना संगीताची मेजवानी देखील देता येऊ शकते. या सर्व बाबीचा विचार करून शालेय पोषण आहार योजनेकडे किटकिट म्हणून न पाहता त्यातून मुलांना सदृढ शरीर कसे प्राप्त करता येईल ? याकडे लक्ष दिल्यास ही योजना त्रासदायक वाटणार नाही. दिवसातला काही वेळ जर या योजनेकडे लक्ष दिल्यास ही योजना शाळेतील मुलांसाठी खरोखरच संजीवनी ठरेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर

लेखक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे उपक्रमशील शिक्षक आहेत

ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Sunday 10 February 2019

आज सोनियाचा दिन : प्रतिक्रिया

*--शुभेच्छा संदेश*

प्रती;
श्री. ना.सा.येवतीकरसर,
सुप्रसिद्ध स्तंभलेखक.

माझे परमस्नेही, सुप्रसिद्ध स्तंभलेखक व आदर्श शिक्षक श्री.ना. सा. येवतीकरसरांनी एक फाईल पाठवली. नवीन पुस्तक प्रकाशित करत आहे, आपण सर्व लेख वाचून आपल्या शुभेच्छा पाठवाल का ? असे विचारले. 'आज सोनियाचा दिन' हे नावच असे आहे की, यामध्ये नक्की काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागणार आहे. तशी ती मलाही लागली होती. या नावाने येणा-या या पुस्तकाबद्दल व त्यातील आशयाबद्दल उत्सुक होऊन सर्व लेख अधिरतेने वाचले. ना. सा. सरांचे हे सहावे ई-बुक आहे. तसेच स्त॔भलेखक म्हणूनही त्यांचा प्रवास आणि प्रतिभा अनेक वर्ष व्यक्त झाली आहे. हाच अनुभव या पुस्तकातूनही येत आहे.

आपल्या समर्थ लेखनीतून साकारलेले 'आज सोनियाचा दिन'  लवकरच प्रकाशित होत आहे. आजपर्यंत फक्त दिनदर्शिकेवर दिसणारे व फक्त त्याच दिवसापूरते चर्चेचे ठरणारे 'जागतिक दिन किंवा विशेष दिन' यावर सखोल प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. सर्वप्रथम आपण अतिशय मेहनतीने लेखांकित केलेले हे ज्ञानकण आता एकत्रितपणे तमाम जनतेसाठी खुले होत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. या पुस्तकाच्या रूपाने नव्या पिढीसाठी एक नवे दालन खुले होत आहे. येणारा प्रत्येक दिन आपण स्वत:चे 'योगदान (देऊन) दिन' म्हणून पाळला तर तो प्रत्येक दिन 'सोनियाचा दिन' ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

जगभरात पाळल्या जाणा-या काही विशेष दिवसांना जागतिक दिन, आंतरराष्ट्रीय दिन असे म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थामध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यापैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्टसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस विशिष्ट देशातच पाळले जातात. अशा सर्व प्रकारच्या दिवसांची खोलवर व सर्वांगीण माहिती देणारी एक लेख मालिका 'आज सोनियाचा दिन' या पुस्तकात ना. सा. सरांनी मांडली आहे. असे दिवस पाळल्याने नक्की किती फायदा होतो हा वादाचा मुद्दा असू शकतो. 

मी वाचलेला एक लेख आठवतो, ज्यातून असे दिवस पाळण्याचे महत्व पटविणे सोपे होईल - वर्षभरात मातृ, पितृ, शिक्षक, रोझ, एड्स, व्हॅलेटीन असे वेगवेगळे 'दिन' साजरे केले जातात. अशा परिस्थितीत 'नो घटस्फोट डे' असा दिवस साजरा करायचे एखाद्या देशाने ठरविले तर..? त्या दिवशी कुणाचीही  सोडचिठ्ठी-घटस्फोटाचा अर्जच घ्यायचा नाही. असा एक 'पाळीक दिवस' 8 जुलै रशियातील नोव्हगोरोद प्रदेशात आहे. 'व्हॅलेंनटीन डे' च्या तोडीचा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. लग्नगाठ बांधायला महत्व दिले जाते. शुभमंगल विवाह करणे भाग्याचे समजले जाते. कुणाच्या तरी डोक्यातून आफलातून आयडिया निघते, समाज ती स्विकारतो. त्यामुळे घटस्फोट फार कमी होतील असे नाही... पण काडीमोडांच्या प्रकारावर किमान एक दिवस विचार करायला मिळेल. काही डोकी थोडीतरी थंडावतील. लग्नाचे आयुष्य एक दिवसाने वाढेल... तडजोड झालीच तर... आनंदच आहे..!

'आज सोनियाचा दिन' या पुस्तकात ना. सा. सरांनी हेच पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. जे जे आपणांस ठावे, ते ते दुस-या शिकवावे ! शहाणे करून सोडावे सकलजन !! या शिकवणुकीशी इमान राखणा-या ना. सा. येवतीकरसर या हाडाच्या शिक्षकाने अविरत साधनेचे आणि चौफेर व्यासंगाचे संचित जनतेला भरभरून दिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर चार वाचकांनी रक्तदान केले, एखाद्याला पाण्याबद्दल समाजात जनजागृती करावीशी वाटली, कोणाची देशभक्ती उसळून आली, कोणी आरोग्यासाठी सकाळी लवकर उठू लागले तर ना. सा. सरांचा हा पुस्तक प्रयत्न नक्की यशस्वी होईल. या पुस्तकाला मोजता न येण्यासारखी उंची त्यांनी दिली आहे.

आपल्यासारख्या माझ्या एका सन्मित्राचे पुस्तक तमाम जनतेसाठी अर्पण होत असताना मनोमन आनंद होत आहे. आपण आपला हा लेखनप्रवास असाच पुढे चालू ठेवावा. आपल्या हातून आणखी साहित्यकृती निर्माण व्हाव्यात आणि वाचकांना दर्जेदार   साहित्य वाचायला मिळावे यासाठी या पुस्तकाला व ना. सा. येवतीकरसरांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा !

श्री. संजय नलावडे, मुंबई
                             

व्हॅलेंटाईन डे स्पेशल

शतदा प्रेम करावे ....

प्रेम म्हणजे काय असतं ? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्या वर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर अपार प्रेम होते. त्याच्या हाताने टाकलेला भाकरीचा तुकडाच तो खात असे अन्यथा कशालाही तोंड लावत नसे. मालक कधी गावाला गेला तर तो येईपर्यंत वाट पाहत असे. इतके त्यांचे अपार प्रेम होते. एके दिवशी त्या मालकांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या प्रामाणिक कुत्र्याला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. त्यादिवशी तो दिवसभर अश्रू गाळत राहिला. एक दिवस - दोन दिवस असे करत सात दिवस तो उपाशी च राहिला आणि आठव्या दिवशी तो ही आपला प्राण सोडला. सांगायचा तात्पर्य म्हणजे एखाद्यावर जीवापाड प्रेम करा ते ही आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. पण मनात स्वार्थी भाव ठेवून प्रेम केल्याने ते कधी ना कधी उघडे पडते आणि त्याचा व्हायचा तेच परिणाम होतो. आई आपल्या मुलांवर जे प्रेम करते त्यात कोणताही स्वार्थ नसतो. निस्वार्थ भावनेने केलेले प्रेम अजरामर होते.
मुले देखील आपल्या आई - वडिलांवर खूप प्रेम करतात. मात्र काही वेळा प्रेम वयाच्या स्थित्यंरानुसार बदलत राहते. मुलांचा जन्म, बालपण आणि शिक्षण या क्रिया पूर्ण होईपर्यंत आई-वडील आणि मूल यांच्यात अतूट प्रेम असते. दोघे ही एकमेकांचे काळजी घेतात. त्यानंतर होते मुलांचे लग्न. यामुळे मुलगी असलेली आपली लाडकी परी दुसऱ्याची घरी सून म्हणून जाते तर आपला लाडका मुलगा कोणाचा जावई तर कोणाचा नवरा अश्या भूमिकेत जातो. त्याच्यावर एक जबाबदारी वाढते. ज्याप्रकारे आपल्या आई-वडिलांवर प्रेम करीत होता अगदी तसेच बायकोवर आणि बायकोकडील जे कोणते गणगोत आहेत त्यांच्यावर देखील तेवढेच प्रेम करावे लागते. येथे जे प्रेमाची वाटणी होते, असे वाटते की येथून मुलांचे आई - वडिलांवरील प्रेम कमी होत आहे असा अंदाज बांधला जातो. नव्हे कमी होतेच असा सर्वाना विश्वास वाटतो. बालपणी आई वडिलांवर प्रेम करणारा तरुणपणात आपल्या बायकोवर प्रेम करतो यात कुठे शंका घेण्यासारखी बाब नाही. मात्र काही मुलं बायकोच्या एवढ्या वशीकरण मध्ये जातात की, तिच्या शिवाय कोणाचे ही ऐकत नाही असा आरोप बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो. त्याचे प्रेम इथे थांबत नाही. तर संसारात अपत्याचे आगमन झाले की, तो लेकरांच्या प्रेमात पडतो. त्यांना काय हवं काय नको याची सर्व काळजी तो घेत राहतो. मुलं मोठी झाली की पुन्हा तेच चक्र चालू राहते. आजी - आजोबा झाले की आपल्या नातवंडावर खूप प्रेम दिसून येते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपली माणसं सर्व जवळ असावीत, आपल्या नजरेत असावी अशी तळमळ असते. काही जणांना यात यश मिळते तर काही जणांना अपयश मिळते. अपयश मिळालेल्या व्यक्तींनी नाउमेद किंवा हताश न होता कुठे प्रेम निर्माण करता येईल काय याचा शोध घ्यावा आणि इतरांना प्रेम देण्यासाठी नेहमी तत्पर असावे. पूज्य साने गुरुजी यांनी आपल्या खरा धर्म या कवितेत म्हटल्याप्रमाणे खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
खरोखरच आपल्या जीवनात प्रेम आणि माणुसकी तयार करायचे असेल तर जेथे खरी गरज आहे तिथे तन मन धन सर्वस्व अर्पण करून काम केल्याने जे समाधान मिळते ते किती ही पैसा खर्च करून मिळणार नाही. म्हणून वयापरत्वे बदलत जाणाऱ्या प्रेमाला आपण सर्व जण समजून घ्यावे. तरुणपणी मुलामुलींमध्ये आकर्षण असते. मात्र या वयात केलेली एक चूक आयुष्यभर वाळवी सारखी आपल्या जीवनाला पोखरत असते. म्हणून प्रेमाच्या नावाखाली कुणी ही फसू नका. जागरूकतेने राहा. मजेत आणि मस्तीत गाणे गुणगुणत राहावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...