Wednesday 13 February 2019

मध्यान्ह भोजन : एक संजीवनी

मध्यान्ह भोजन : एक संजीवनी

शाळेतील मुलांची उपस्थिती वाढावी म्हणून सन 2003 या वर्षांपासून शाळेत मध्यान्ह भोजन देणे सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी प्रति विद्यार्थी 03 किलो याप्रमाणे तांदुळाचे पाकीट मुलांच्या पालकांना दिल्या जात असे. बहुतांश पालक हे तांदूळ दुकानात विकून त्याचे पैसे करीत असे हे चित्र अनेक ठिकाणी अनुभवास मिळाले होते. ज्या मुलांसाठी ही योजना तयार करण्यात आली होती, त्या मुलांना या योजनेचा काहीच फायदा मिळत नव्हता. थेट मुलांना या योजनेचा फायदा मिळावा म्हणून शाळेत अन्न शिजवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोळा वर्षांपूर्वी फक्त पाचव्या वर्गापर्यंत खिचडी शिजवून देणे असा निर्णय झाला होता. दिवसेंदिवस त्यात बदल होत होत आज इयत्ता आठव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. आता खिचडीच नाही तर वरण भात, हरभरा, वाटाणा, चवळी आणि मुगडाळ देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे मुलांना आता चौकस आहार दिला जात आहे. त्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था शिक्षण विभागाने तयार केलेला आहे. त्यामुळे त्याची माहिती रोजच्या रोज ऑनलाईन भरली जाते. ज्यामुळे एका दिवशी किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला हे एका बटणवर कळते.
अधून मधून शालेय पोषण आहार च्या बाबतीत काही वेगळ्या बातम्या वाचण्यास येतात. जसे की शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करतांना एकास अटक, तांदळात सापडले अळ्या, मुलांना पिवळा भातच खाण्यास मिळतो, शालेय पोषण आहारातून विषबाधा, पोषण आहारावर मुख्याध्यापकांचे लक्ष नाही, शालेय पोषण आहाराच्या बिलात गोंधळ, साप असलेले खिचडी शिजवून देणाऱ्या एका मुख्याध्यापकांना केले निलंबित ( यात मुख्याध्यापकांचा काय दोष, मात्र यंत्रणा सरकारी अधिकारी यांनाच दोषी मानते. ) असे एक ना अनेक बातम्या याच्याशी निगडित वाचण्यात आले की, प्रत्येकाच्या तोंडून सहज बाहेर पडते की, ' शासनाने हे दुपारचे जेवण सरळ सरळ बंद करून टाकावं आणि पूर्वी सारखं तांदुळाची पाकीट देऊन टाकावं. ' बऱ्याच मुख्याध्यापकांना हे दुपारचे जेवण बंद व्हावे असे मनातून वाटते तर काही मुख्याध्यापक मंडळींना ही योजना बंद होऊ नये असे वाटते कारण ह्या योजने कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार केल्यास ही योजना त्यांच्यासाठी संजीवनी आहे, असे वाटते. काही मुख्याध्यापकांना या योजनेतून स्वतः ला भरपूर कमाई करता येते म्हणून ही योजना चालू राहावी असे वाटते. शालेय पोषण आहार योजनेतील दुपारचे जेवण शाळेच्या उपस्थितीवर किती परिणामकारक करते ? हे पाहायचं असेल तर ग्रामीण भागातील सरकारी शाळेत जाऊन पाहता येईल. सरकारी शाळा आणि गरीब विद्यार्थी हे नाते खूप जुने आहे. या शाळेत शिकायला येणारी विद्यार्थी खूप गरीब असते, यांची पालक मंडळी मोलमजुरी करून आपले जीवन कंठीत करतात. एका वेळच्या जेवण्यासाठी ते मोताज असतात. अश्या घरातील मुले दुपारच्या जेवण्याची रोजच वाट पाहतात. सकाळीच शेताला किंवा कामाला गेलेली आई-बाबा शाळेच्या भरवश्यावर घराला कुलूप लावून जातात. त्यांना जर दुपारचे जेवण दिलं नाही तर ते उपाशीच राहणार. ही मुले खूप मोठ्या आवडीने जेवण करतात. काही जणांच्या घरी तर भात केल्याचं जात नाही. त्यामुळे त्यांना शाळेतील भाताचं आकर्षण असते. मित्र परिवारासोबत जेवण करतांना मुलांना खूप आनंद मिळतो. त्यामुळे घरी काही ही न खाणारा इथे मात्र पोटभर खातो असे अनेक पालक नंतर येऊन शिक्षकांना सांगतात. ही झाली एक बाजू ज्यांना घरी जेवायला मिळत नाही त्यांच्यासाठी खरोखरच एक पर्याय होय. दुसरी बाजू जर विचार केला आणि शिक्षक मंडळींनी या योजनेच्या बाबतीत सकारात्मक विचार केल्यास मुलांवर या दुपारच्या जेवणातून जेवण्याचे संस्कार टाकता येतात. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे ही क्रिया जाणीवपूर्वक घेतल्यास ते घरी देखील जेवणापूर्वी स्वच्छ हात धुतील. रोजच्या सवयीचे शिस्तीत रूपांतर झाले की, त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. सर्वांसोबत जेवण केल्यामुळे त्यांच्यात सर्वधर्मसमभाव ही संकल्पना देखील पूर्ण करता येईल. ताटात जे काही मिळाले आहे ते पूर्ण संपविण्याची सवय त्यास लावता येते. बऱ्याच वेळेला ताटात नावडता पदार्थ देखील येऊ शकते. त्यावेळी ते देखील खाण्याची सवय त्यांना लागते. जेवण करतांना बोलण्याची अनेकांना सवय असते, ती सवय येथे मोडीत काढता येते. इतर कसे जेवण करतात याचे निरीक्षण ही मुले करतात आणि जेवण्याची पद्धत शिकून घेतात. याच दरम्यान मुलांना संगीताची मेजवानी देखील देता येऊ शकते. या सर्व बाबीचा विचार करून शालेय पोषण आहार योजनेकडे किटकिट म्हणून न पाहता त्यातून मुलांना सदृढ शरीर कसे प्राप्त करता येईल ? याकडे लक्ष दिल्यास ही योजना त्रासदायक वाटणार नाही. दिवसातला काही वेळ जर या योजनेकडे लक्ष दिल्यास ही योजना शाळेतील मुलांसाठी खरोखरच संजीवनी ठरेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर

लेखक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे उपक्रमशील शिक्षक आहेत

ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...