विद्यार्थी हेच माझे दैवत
शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे शिक्षक, फळा, शाळेची इमारत, मैदान आणि किलबिल आवाजात नाचणारी विद्यार्थी. विद्यार्थ्याशिवाय कोणतीच शाळा शोभून दिसत नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचे अतूट असे नाते असते. शाळेत सर्वात पहिल्यांदा कोण येत असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. काही विद्यार्थी तर शाळेला च आपले घर केलेलं असते त्यामुळे त्यांना शाळा सोडून जावे देखील वाटत नाही. शिक्षक शाळेत येण्याच्या अगोदर हे विद्यार्थी शाळेत येतात आणि शाळेतील केरकचरा आणि मैदानात असलेले घाण स्वच्छ करून टाकतात. काही मुले मिळालेल्या वेळात व्हरांड्यात बसून अभ्यास करतात तर काही मुलं मैदानात खेळतात. सर शाळेत आले म्हटले की धावत धावत सरांकडे धाव घेतात. त्यांच्या हातातील पिशवी किंवा जे काही वस्तू असेल ते आपल्या हातात घेतात. हे विद्यार्थी सरांची रोजच वाट पाहत असतात. थोड्याच वेळांत शाळेची पहिली आणि दुसरी घंटा वाजली जाते. परिपाठ साठी रांगा होतात आणि परिपाठ संपन्न होते. विद्यार्थी वर्गात जातो आणि सर देखील वर्गात जातात. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेला सुरुवात होते. सायंकाळी चार वाजले की शाळा सुटते आणि विद्यार्थी घरी जातात. अवघ्या एका क्षणात गजबजलेल्या शाळेत स्मशान शांतता पसरते. खरोखरच ज्या शाळेत विद्यार्थीच नसतील त्या शाळेत शिक्षकांना काही मजा वाटते काय ? असा प्रश्न पडतो. असो, शाळेत एक जरी विद्यार्थी असला काय हजारो विद्यार्थी असले काय त्याला शाळा असेच म्हटले जाते. शाळेत महत्वाचे काय आहे ? शाळेची इमारत, शाळेचे मैदान, शाळेतील डिजिटल खोली, शिक्षक की विद्यार्थी. ज्याच्याशिवाय शाळा ही शाळा वाटत नाही ते म्हणजे विद्यार्थी, होय विद्यार्थी. ज्याप्रकारे दुकानदार दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना आपला देव मानतो अगदी त्याच प्रकारे शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांसाठी देवच असतो. शिक्षकांनी त्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यामुळे शिक्षकांना चार पैसे मिळत आहेत, हे विसरून चालणार नाही म्हणून विद्यार्थी हेच शिक्षकांचे दैवत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तेंव्हा शिक्षकांनी आपल्या दैवताला चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा भविष्यात निश्चित असा फायदा होऊ शकतो. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत पटसंख्या नसल्यामुळे जवळपास दीड हजार शाळा शासनालाबंद कराव्या लागल्या. शाळा बंद झाल्या याचं सर्वात जास्त फटका कोणाला बसत असेल तर तो शिक्षकांना. कारण एवढ्या शाळेतील जवळपास अडीच हजार प्राथमिक शिक्षकांची पदे कमी झाली. अगोदरच शासनाला नवीन भरती करता येत नाही त्यात असे प्रकरण म्हणजे नवीन भरतीची परत आशा मावळली. त्या शाळा का बंद करण्यात आल्या याचे कारण वाचून परत धक्काच बसतो. गेल्या तीन वर्षांपासून या शाळांची पटसंख्या दरवर्षी घसरत चालली होती आणि पटसंख्या वाढविण्यासाठी कसलेही प्रयत्न करण्यात आले नाही. म्हणून शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात आले आहेत. येथील शिक्षकांनी विद्यार्थी हे माझे दैवत आहेत असे समजून कार्य केले असते तर कदाचित असे झाले नसते. काही ठिकाणी प्रयत्न झाले ही असतील पण दुसऱ्या विविध कारणामुळे पटसंख्येत वाढ होऊ शकली नसेल. पण काही शिक्षकांच्या अनुभवा वरून असे ऐकण्यात येते की, ज्या शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, विद्यार्थ्यांना दैवत मानून शिकविल्या जाते, त्या शाळेत गावातील मुले तर येतातच शिवाय गावाच्या आजूबाजूचे मूल तेथे प्रवेश घेतात. नातेवाईक मंडळी आपल्या नात्यातील लहान मुलांना आपल्याकडे खास करून ठेवून घेतात आणि त्या शाळेत प्रवेश घेतात. राज्यात अश्या काही शाळा आहेत जेथे पूर्वी 20 ते 25 पटसंख्या होती आणि आज शंभरी पार करत आहेत. प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावे. म्हणून ते चांगल्या शाळेच्या शोधात फिरत राहतात. इंग्रजीच्या किंवा खाजगीच्या शाळा केलेल्या कामाची जाहिरात करतात, पालक हुरळून जातील असे काही दाखविण्याचा प्रयत्न करतात, पालकांच्या मनाला ते योग्य वाटते आणि पालक सरकारी शाळा सोडून त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश देतात. शिक्षकांच्या मनात जोपर्यंत माझी शाळा आणि माझे विद्यार्थी ही भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत शाळेतील पटसंख्येत वाढ होणारच नाही. जे शिक्षक शाळेला वेळ देतात, विद्यार्थाना समजून घेऊन अध्यापन करतात, त्यांच्या पालकांपर्यंत जाऊन कौटुंबिक समस्या जाणून घेतात, नुसते जाणून घेत नाहीत तर ती समस्या कशी सोडविता येईल याचे मार्ग शोधून देतात, गावातील एकही मूल बाहेरगावच्या शाळेत जाणार नाही असे वातावरण तयार करतात, सर्वांशी प्रेमाने वागतात त्या शाळेचा विकास झाल्याशिवाय थांबत नाही. पण सरकारी शाळेत कोठे तरी थोडं चुकतंय ज्यामुळे दिवसेंदिवस सरकारी शाळेतील पटसंख्या कमी कमी होतांना दिसत आहे. गावात डिजिटल आणि आकर्षक प्राथमिक शाळा असून काही मुलं इंग्रजी किंवा खाजगी शाळेत जातात म्हणजे शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेला ही बाब विचार करण्यासारखी आहे. शासन एकीकडे सरकारी शाळा बंद करीत आहे आणि दुसरीकडे स्वयंअर्थसह्यायीत शाळा वाटप करीत आहे. त्यामुळे आत्ता सरकारी शाळा वाचविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दैवत समजून शाळेत विद्यार्थी टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. निदान पहिली ते पाचवीच्या सरकारी शाळा टिकल्याच पाहिजे. याच शाळेतून मुलांना सर्वांगीण शिक्षण दिल्या जाऊ शकते याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करून त्यांची सरकारी शाळेविषयीचा दृष्टिकोन बदलवून टाकणे आवश्यक आहे. पालक आज ही सरकारी शाळेच्या बाबतीत जुन्या विचारसरणीमध्ये आहेत. 20 ते 25 वर्षांपूर्वी सरकारी शाळेतील शिक्षक आणि आजचा शिक्षक यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे, हे पालकांना दाखवण्याची ही खरी वेळ आहे. तेंव्हा शिक्षक बंधुनो उठा, जागे व्हा आणि विद्यार्थी दैवतला शाळेत टिकवून ठेवू या.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
09423625769
No comments:
Post a Comment