Sunday 24 February 2019

सर सलामत तो ......

सर सलामत तो ........

सकाळी सकाळी गावाला जात असताना, गाडीच्या समोर काही रानडुक्कर पळत आल्यामुळे आमच्या एका मित्रांच्या दुचाकी गाडीचा अपघात झाला आणि त्यात डोक्याला खूप मार लागल्यामुळे त्यास दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्यामुळे तो बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत होता पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे तो वाचला आणि हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली. आम्ही सर्व मित्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करीत होतो आणि देवाने आमचं ऐकलं. पण याच वेळी अजून एक चर्चा प्रकर्षाने झाली ती म्हणजे गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याची. आज आमच्या मित्राने गाडी चालवताना हेल्मेट वापरलं असतं तर कदाचित एवढा मोठा प्रसंग त्याच्यावर आला नसता. हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो. अपघातात त्या मेंदूला काही दुखापत झाली तर मनुष्याच्या जीवनाला धोका संभवतो. अपघातामध्ये शरीरातला कोणताही भाग, हाताला किंवा पायाला किती ही दुखापत झाली तरी त्याचे तेवढं नुकसान होणार नाही, किंवा ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून मिळविता येऊ शकते. मात्र डोक्याला मार लागून डोक्यात रक्तस्त्राव होणे हे अत्यंत धोकादायक आहे. यात प्रसंगी जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अपघात कधी ही वेळ, काळ सांगून येत नाही. आजकाल दुचाकी चालविणाऱ्यामध्ये मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला कर्मचारी साधारणपणे वीस किमीचा प्रवास दुचाकीने करत आहेत. मात्र ते देखील हेल्मेटचा वापर फार कमी करतांना दिसून येतात. आपल्या जीवनाची काळजी आपण न करता सरकार करीत असते. सरकारने नवीन गाडी खरेदी करतांना दोन हेल्मेट खरेदी करण्याची शक्ती केली होती. त्याशिवाय गाडीचा परवाना आर टी ओ ऑफिस मधून मिळत नव्हता. हा एक चांगला निर्णय आहे पण आपणास ते सरकार नाहक भुर्दंड टाकत आहे असे वाटते. केंव्हाही पहा चांगल्या गोष्टीला प्रथमतः विरोधच होते, जेव्हा त्याचे महत्व कळते त्यावेळी मात्र प्रत्येकजण त्याची प्रशंसा करत बसतात. सरकार आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटसक्तीचा कायदा करते आणि आपण त्याला विरोध करतो. हेल्मेटसक्ती नको म्हणताना एक वेळ विचार देखील करत नाही की हे कोणासाठी फायद्याचे आहे. आपल्या सुरक्षेसाठी खूपच महत्वाचे आहे. एवढंच नाही तर हेल्मेटमुळे गाडीवर डोळ्याला आणि कानाला वारा लागत नाही तसेच ऊन, थंडी, पाऊस या गोष्टीपासून देखील संरक्षण मिळते. शहरात तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यापासून वाचण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तोंडाला रुमाल बांधण्यापेक्षा हेल्मेट केंव्हा ही चांगले. आजकाल कॉलेजमध्ये जाणारी मुले बेफामपणे गाडी चालवितात. त्यांच्या अश्या गाडी चालविण्यामुळे त्यांचे तर नुकसान होतेच शिवाय हकनाक दुसऱ्याचे देखील अपघात होतात. त्यामुळे घरातील पालकांनी थोडी काळजी घ्यावी आणि लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये, दिल्यास सोबत हेल्मेट देखील द्यावे जेणेकरून त्यांना गाडी चालवताना अपघात झाल्यास दुखापत होणार नाही. आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचे आहे याची एकदा मनात आठवण ठेवावी. तेंव्हा हेल्मेटसक्ती ही आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे याचे महत्व जाणून घेऊन सर्वांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर नियमित करून सुरक्षित प्रवास करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...