Saturday 29 May 2021

Andelwad S. D.

शिक्षक ते केंद्रप्रमुख पर्यंतचा यशस्वी प्रवास करणारे संतुकराव देवराव आंदेलवाड

धर्माबाद :- तालुक्यातील बाळापूर केंद्राचे प्रयोगशील केंद्रप्रमुख श्री संतुकाराव देवराव आंदेलवाड हे आज दिनांक 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.  
संतुकाराव देवराव आंदेलवाड यांचे मूळ गाव भोपाळा ता. नायगाव (खै. ) असून त्यांचा जन्म 21 मे 1963 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरात खूप गरिबी होती तरी त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावी म्हणजे भोपाळा ता. नायगाव ( खै. ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यापुढील उच्च शिक्षण बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तदनंतर त्यांनी अध्यापकाची पदविका म्हणजे डी. एड. चे शिक्षण नांदेड येथील शासकीय अध्यापक विद्यालयातून प्राप्त केली. त्याकाळी डी. एड. पूर्ण झाल्याबरोबर शिक्षकांची नोकरी लागत होती. त्यामुळे त्यांना जास्त काळ प्रतीक्षा करावे लागले नाही. दिनांक 19 जून 1986 रोजी त्यांनी आपल्या शिक्षकी पेशेला भोकर तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथून सुरुवात केली. त्यानंतर 04 जुलै 1990 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोमनाळा ता. भोकर येथे झाली. त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा ता. हिमायतनगर येथे 22 ऑक्टोबर 2002 प्राथमिक पदवीधर म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर 20 जून 2005 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर येथे झाली. येथील प्रदीर्घ सेवेनंतर 01 जून 2013 रोजी त्यांची पदोन्नतीने बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा भोकर येथे पदोन्नत मुख्याध्यापक पदी झाली. त्यानंतर त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आणि धर्माबाद येथील बाळापूर केंद्रात पर्यवेक्षीय अधिकारी केंद्रप्रमुख म्हणून 07 ऑगस्ट 2015 रोजी रुजू झाले.तेव्हापासून त्यांनी धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख पदाचे कार्य सेवा अत्यंत यशस्वीपणे व प्रभावीपणे पूर्ण केले. 
तत्कालिन गटशिक्षणाधिकारी डॉ. डी. एस. मठपती व सध्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले यांच्या प्रेरणेने  व मार्गदर्शनाखाली त्यांनी केंद्रप्रमुख पदावर रुजू झाल्यापासून आजतागायत त्यांच्या कार्यकाळात केंद्रातील सर्वच्या सर्व शाळा डिजिटल केल्या आहेत, माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम प्रत्येक शाळेतून यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. 
संतुकराव देवराव आंदेलवाड हे हसतमुख स्वभावाचे, सर्वाना मार्गदर्शन करणारे, विद्यार्थीप्रिय आणि नेहमी कार्यात मग्न असणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे अल्पावधीत त्यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मने जिंकली होती. प्रत्त्येक शाळेला भेट देणे, त्यांना सूचना करणे, मार्गदर्शन करणे, शिक्षकांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्याशी संपर्कात राहणे, शासकीय कामे वेळेत पूर्ण करणे, शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांशी गप्पा मारणे या त्यांच्या स्वभावामुळे शिक्षकांना ते नेहमी अधिकारी कमी नि मित्र जास्त वाटत होते. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून तळागाळातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असे. तसेच गावातील माझी विद्यार्थी मेळावा, माता पालक मेळावा घेऊन त्यांनी 30 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून त्याचा विनियोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी,  अध्ययनपूरक वातावरण निर्मितीसाठी केला. तसेच लोकसहभागातून देखील त्यांनी केंद्रातील अनेक शाळेचा परिसर सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले आहे. 
संतुकराव देवराव आंदेलवाड यांनी एकूण 35 वर्षे सेवा केली आहे. या काळात त्यांनी शिक्षक, प्राथमिक पदवीधर, पदोन्नत मुख्याध्यापक पदाचा यशस्वीपणे कार्यभार सांभाळले. तसेच धर्माबाद येथील गटसाधन केंद्राचे प्रभारी गटसमन्वयक म्हणून दोन वर्षे काम पाहिले आहे.
आज दिनांक 31 मे 2021 रोजी सोमवारी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण होत असल्याने श्री संतुकराव देवराव आंदेलवाड केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्याच्या यशस्वी सेवापूर्तीसाठी अनेक शिक्षकांनी, गावकऱ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी सेवापूर्तीच्या अनंत शुभेच्छा दिलेल्या आहेत. कोरोना महामारीमुळे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेता येऊ शकले नसले तरी अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियावरून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रप्रमुख श्री संतुकराव देवराव आंदेलवाड यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जावे अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. 
....................................
प्रतिक्रिया - 
उत्तम प्रशासक व पर्यवेक्षीय अधिकारी

धर्माबाद बीटमधील केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूरचे पर्यवेक्षीय अधिकारी केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड एस. डी. हे एक उत्तम प्रशासक व पर्यवेक्षीय अधिकारी होते. गेल्या आठ वर्षाच्या काळात त्यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रोत्साहित करून लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ दिसून आली. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामपूर ( ध.) या द्वि शिक्षकी शाळेने घरातूनच शाळा व सुपर संडे हा अभिनव उपक्रम वर्षभर राबविण्यात यश आले. केंद्रातील आलुर शाळेस सुशोभित करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रोत्साहित केले. आज ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना भावी सुखी, समृद्ध आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ......!

श्री गोडबोले एल. एन. 
गटशिक्षणाधिकारी, धर्माबाद
....................................

उत्तम सहकारी व मार्गदर्शक

माझे जुने मित्र व सहकारी बाळापुर केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख मा. श्री आंदेलवाड एस.डी. हे आज  नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत.
एक मित्र व सहकारी पर्यवेक्षीय अधिकारी आपल्यापासून दूर होत आहे ह्याचे दुःख तर होणारच. पण त्यांच्या सहवासात दोन वर्षाच्या कालावधीत मला बरेच काही शिकायला मिळाले. त्यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना व आम्हा शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन लाभले. सरांच्या कार्यकाळात त्यांनी शाळेला भेटरूपात व वस्तूरुपात मदत केली आहे. त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू. सेवानिवृत्तीनंतर त्यांना उत्तम आयु व आरोग्य लाभो हीच आम्हा सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

संतोष नाईक, पदोन्नत मुख्याध्यापक
 के. प्रा. शा बाळापुर.
....................................

अधिकारपणा कमी नि मित्रत्व जास्त 

बाळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड एस. डी. सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत हे आमच्यासाठी खूपच दुःखद बाब आहे. कारण त्यांनी आमच्या रामपूर ( ध. ) शाळेत अनेक उपक्रमासाठी नेहमीच प्रेरणा देत आले होते. त्यांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनामुळे कोरोनाच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू .... या उपक्रमात आम्ही घरातूनच शाळा आणि सुपर संडे हा उपक्रम वर्षभर राबवू शकलो. अशी सुट्टी घालवू या उपक्रमात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलांना गाणे, गप्पा, गोष्टी या विषयावर मार्गदर्शन केले. ते विद्यार्थी प्रिय, उत्तम प्रशासक होते सोबतच एक चांगले मार्गदर्शक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे होते. सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ....! 

- नंदकुमार राजमल्ले, उपक्रमशील शिक्षक, जि. प. प्रा. शाळा रामपूर ( ध. ) केंद्र बाळापूर ता. धर्माबाद
....................................
शब्दांकन :-
नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...