नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. काल आपण भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केलेलं आहे.
आजच्या कार्यक्रमात आपण जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका...... Video पाहण्यासाठी
ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म दिनांक २७ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे वडील जिल्हाधिकारी होते. त्यांचे शिक्षण मुंबई व पुण्यात झाले. लहानपणापासूनच त्यांना शिस्त, देशभक्ती व नेतृत्वगुणांची आवड होती. पुढे त्यांनी लष्करी शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला. त्यानंतर ३० जानेवारी १९४५ रोजी ते रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कायम रुजू झाले. भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या लढ्यातील अतुलनीय शौर्याबद्दल अरुणकुमार वैद्य यांना ६ सप्टेंबर १९६५ रोजी महावीर चक्र (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
त्यानंतर त्रिपुरा, आसाममधील नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीसुद्धा अरुणकुमार वैद्य यांनी पार पाडली.
सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुखपदही अरुणकुमार वैद्य यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. १९७१ साली पुन्हा पाकिस्तानच्या सैन्याशी अरुणकुमार वैद्य यांचा सामना झाला. यावेळी वसंतार नदीवर पाकिस्तानच्या सैन्याशी झालेल्या लढाईत सोळाव्या सशस्त्र तुकडीचे प्रमुख अरुणकुमार वैद्य यांनी अतुलनीय लढत दिली.
१९८३ मध्ये भारताचे सरसेनानी होईपर्यंत सोपवण्यात आलेली प्रत्येक कामगिरी अरुणकुमार वैद्य यांनी चातुर्याने पार पाडली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत १ ऑगस्ट १९८३ रोजी अरुणकुमार वैद्य यांना भारताचे सरसेनानी म्हणून नियुक्त करण्यात आलं.
जनरल अरुणकुमार वैद्य यांनी केलेली प्रत्येक कामगिरी वाखाणण्यासारखीच होती.
दिनांक १ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर भारतीय लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचं यशही अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झालं. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात खलिस्तानवाद्यांनी मांडलेला उद्रेक मुळापासून नष्ट करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची घोषणा केली. या मोहिमेची जबाबदारी त्यांनी अरुणकुमार वैद्य यांच्याकडे सोपवली. वैद्य यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे सूत्र खुद्द जनरल अरुणकुमार वैद्य यांनी आखून दिले होते.
जनरल वैद्य हे अत्यंत स्पष्टवक्ते, कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी होते. सैन्यात आधुनिकता आणणे, जवानांचे प्रशिक्षण सुधारणे आणि सीमांचे संरक्षण अधिक सक्षम करणे यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय लष्कर अधिक सुसज्ज आणि सज्ज झाले.
सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या पत्नी आणि मुलींसह पुण्यात रहायला आले. जनरल अरुणकुमार वैद्य यांना वाचनाबरोबर संगीत ऐकणे आणि रोज घोड्यावरून रपेट मारण्याचा छंद होता. या काळात ऑपरेशन ब्ल्यू स्टारमधील कामगिरीमुळे त्यांना धमकीवजा पत्रे येत होती. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक अंगरक्षक तैनात केला होता, पण १० ऑगस्ट १९८६ रोजी दोन शिख तरूणांनी जनरल अरुणकुमार यांची त्यांच्याच गाडीत हत्या केली. सैन्यातील अतुलनीय कामगिरीमुळे जनरल अरुणकुमार वैद्य यांना २ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक या सन्मानाने गौरविण्यात आले. सैन्यातील बहुमानाची पदके मिळविणारे जनरल अरुणकुमार वैद्य एकमेव मराठी लष्करी अधिकारी ठरले.
जनरल अरुणकुमार वैद्य हे भारतीय लष्करातील एक धाडसी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनातून शिस्त, धैर्य, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थ्यांसाठी व तरुण पिढीसाठी ते एक आदर्श आहेत.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - सुवर्णमंदिर कोठे आहे ?
बरोबर उत्तर आहे, पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्णमंदीर आहे.
दुसरा प्रश्न - जनरल अरुणकुमार वैद्य यांना कोणते छंद होते ?
बरोबर उत्तर आहे, वाचनाबरोबर संगीत ऐकणे आणि रोज घोड्यावरून रपेट मारण्याचा त्यांना छंद होता.
तिसरा प्रश्न - ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी कोणी बजावली आहे ?
बरोबर उत्तर आहे, जनरल अरुणकुमार वैद्य हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
चौथा प्रश्न - ऑपरेशन ब्ल्यू स्टार ची घोषणा कोणी केली होती ?
बरोबर उत्तर आहे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार ची घोषणा केली होती.
शेवटचा पाचवा प्रश्न - पाकिस्तानविरुद्धच्या अतुलनीय शौर्याबद्दल अरुणकुमार वैद्य यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
बरोबर उत्तर आहे - पाकिस्तानविरुद्धच्या अतुलनीय शौर्याबद्दल अरुणकुमार वैद्य यांना महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769