सवय जीवन घडवणारा अदृश्य घटक
मानवाचे आयुष्य आकार घेते ते त्याच्या विचारांमधून आणि कृतीमधून; आणि या दोन्हींच्या मागे असतो तो एक अदृश्य, पण अत्यंत प्रभावी घटक म्हणजे सवय. सवय हा मनुष्याच्या दिनचर्येचा पाया आहे. एखादी कृती वारंवार केल्याने ती कृती नकळत आपल्या स्वभावाचा भाग बनते आणि त्यातून निर्माण होणारा परिणाम आपले संपूर्ण जीवन बदलू शकतो.
सवय म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करून तिचे स्वयंचलित होणे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक, जाणूनबुजून केलेली क्रिया कालांतराने सहज, आपोआप होऊ लागली की ती चांगली किंवा वाईट सवय म्हणून आपले ठरते. सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. बोलण्याची शैली, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, इतरांसोबत वागणूक, रोजचा आहार, अभ्यासाची इच्छा या सर्व व्यवहारामागे आपल्यातील सवयींचेच प्रतिबिंब दिसते.
चांगल्या सवयींचे फायदे अमूल्य आहेत. नियमित व्यायाम करणे, वेळेचे भान ठेवणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे, नेहमी सत्य बोलणे, धैर्याने काम करणे अशा सवयी मनुष्याला यशाच्या दिशेने घेऊन जातात. चांगल्या सवयी केवळ व्यक्ती सुधारत नाहीत तर त्याची नाती, आरोग्य, विचारसरणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक बनवतात. छोटीशी चांगली सवयही मोठा बदल घडवू शकते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दररोज फक्त दहा मिनिटं वाचनाची सवय लावली, तर काही महिन्यांत तिचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही समृद्ध होतात. सवयी दिसायला लहान जरी वाटत असल्या तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे असतात.
जशा चांगल्या सवयी जीवन घडवतात, तशाच वाईट सवयी जीवन बिघडवू शकतात. जंक फूड खाणे, वेळेचा अपव्यय करणे, टाळाटाळ करणे, अनावश्यक रागावणे, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे अशा वाईट सवयी हळूहळू मनुष्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या सवयी सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात, पण दीर्घकाळात त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.
सवय बदलणे अवघड वाटते, परंतु अशक्य नसते. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करण्याची गरज असते. चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी ठराविक वेळ, योग्य वातावरण आणि नियमित सराव आवश्यक आहे. सवयी बदलण्याची प्रक्रिया ही हळूहळू होत असली तरी तिचा परिणाम दीर्घकालीन आणि सकारात्मक असतो.
शेवटी, सवय ही आपल्या जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे. आपल्या प्रत्येक दिवसातल्या लहान सवयीच आपल्या उद्याचे भविष्य ठरवतात. म्हणूनच चांगल्या सवयी जोपासणे आणि वाईट सवयी दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य सवयी अंगीकारल्या तर यश, आनंद आणि समाधान हे नक्कीच आपल्या वाट्याला येते.
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769