गणित आणि आपले जीवन
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक विषय अभ्यासाला असतात. जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित. गणित हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो केवळ गुण मिळवण्यासाठीचा विषय नसून विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे शास्त्र आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात गणिताचे स्थान अनन्यसाधारण आहे.
गणितामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, अचूकता आणि संयम शिकायला मिळतो. उदाहरणार्थ, एखादी गणिती समस्या सोडवताना प्रत्येक पायरी काळजीपूर्वक आणि योग्य क्रमाने करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढते. तसेच गणितामुळे निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच गणिताचा अभ्यास किंवा सराव बुद्धीला ताजेतवाने करून टाकते. इतर विषयाचा अभ्यास करून कंटाळा आला असेल तर एखादे गणित सोडवले की, मन प्रसन्न होते.
दैनंदिन जीवनात गणिताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. गणिताशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. जीवनात पावलोपावली गणिताचे काम पडते. वेळेचे नियोजन, पैशांचा व्यवहार, मोजमाप करणे, खरेदी-विक्री, तंत्रज्ञान, संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांमध्ये गणित आवश्यक आहे. त्यामुळे गणित शिकणे म्हणजे जीवनासाठी तयार होणे असेच म्हणावे लागेल.
मात्र अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण वाटते. गणित म्हटलं की नाक मुरडतात, पोटात कळ येते. कारण लहानपणापासून गणिताची भीती मनात बसलेली असते. परंतु प्राथमिक वर्गात योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि समजून शिकण्याची पद्धत वापरल्यास गणित सोपे आणि रंजक होऊ शकते. शिक्षकांनी उदाहरणे, खेळ, कोडी व कृतींच्या माध्यमातून गणित शिकवले तर विद्यार्थ्यांच्यामनातून गणिताची भीती निघून जाते आणि गणितातला रस नक्कीच वाढतो. गणित आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट आहे. गणितामुळे विद्यार्थी सक्षम, आत्मविश्वासू आणि विचारशील नागरिक बनतो. जीवन जगण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. जीवनात येत असलेल्या अनेक संकटाना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी गणिताकडे भीतीने नव्हे तर मैत्रीच्या नजरेने पाहिले पाहिजे. आज प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस जो की संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी असा संकल्प करू या की गणित समजून घेऊ या आणि आनंदात जीवन जगू या.
खाली श्रीनिवास रामानुजन यांचा एक जादुई चौकट आहे. त्याचा अभ्यास करा आणि आपलं ही एक चौकट तयार करा.
नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769
No comments:
Post a Comment