Saturday 11 August 2018

अवयवदान

13 ऑगस्ट - जागतिक अवयवदान दिनानिमित्त प्रासंगिक लेख

मरावे परी अवयवरूपी उरावे

जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ही कविता मनात शिरली. मराठीच्या शिक्षकांनी तसा जीव ओतून शिकविला त्यामुळे ती कविता आज ही मनात घर करून आहे. कवितेतील प्रत्येक ओळीतून एकच अर्थ मिळतो की, आपल्या मरणानंतर आपले येथे काहीच उरत नाही. जसे राम आणि कृष्ण आले व गेले तसे आपण ही आलो आहोत आणि एके दिवशी जाणार आहोत. आपल्या मृत्यूनंतर घरातील मंडळी आणि नातलगामधील लोक काही काळासाठी शोक करतील, दुःख व्यक्त करतील आणि त्यानंतर नित्यनेमाने कामाला लागतील. जो जन्माला आलेला आहे तो उद्या मरणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे यात शंकाच नाही. या पृथ्वीवर जन्माला येताना रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. याबाबतीत जगजेत्ता सिकंदराचे उदाहरण तंतोतंत लागू पडते. त्याची शेवटची ईच्छा होती की, दोन्ही हात बाहेर दिसतील असे ठेवा म्हणजे लोकांना कळेल की, एवढं श्रीमंत असून देखील त्यांनी सोबत काही नेले नाही. आपण केलेली कमाई, धनदौलत, जमीनजुमला, घर, संपत्ती, सर्व काही येथेच राहते. फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे आपले नाव तेवढे जिवंत राहते. म्हणूनच म्हटले जाते की, पैसा कमाविण्यापेक्षा माणुसकी कमवा. धनाने गरीब असाल तरी चालेल पण मनाने गरीब राहु नका. चांगली कर्मे करणारा व्यक्ती हा कधी ही गरीब राहू शकत नाही. समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा , मानसन्मान ह्या सर्व गोष्टी अगदी फुकटात मिळतात. पैसा खर्च करून सुध्दा ह्या बाबी सहजासहजी मिळत नाहीत. समाजाला आणि देशाला उपयोगी पडेल असे कार्य केल्यास आपले जीवन व्यर्थ जाणार नाही. देशाच्या रक्षणापायी आजपर्यंत कित्येक जवान मृत्यूमुखी पडले. त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. ते अजरामर झाले आहेत. आपले अनमोल जीवन ही व्यर्थ जाऊ नये, आपण ही या देशाचे व समाजाचे ऋण फेडावे असे वाटत असेल तर अगदी फारच सोपे कार्य आपणासमोर आहे ते म्हणजे आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संगणक युगात वावरत आहोत. अवयवदाना बाबत आपल्या देशात प्रचंड उदासीनता आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामुळे आपण अवयवदानापासून कोसो दूर आहोत. अमेरिका आणि श्रीलंका या देशात अवयवदानाचे प्रमाण 100 टक्के असून आपल्या देशात तेच प्रमाण एक टक्का देखील नाही. कवी केशवसुत यांनी आपल्या तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. जुन्या चालिरिती, पध्दती, प्रथा यांना तिलांजली देऊन आपल्या मृत्यूनंतर अवयवदान देण्याची तयारी ठेवणे गरजू लोकांसाठी एक संजीवनी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की.
आपल्या शरीरातून जेंव्हा चेतना नष्ट होते तेंव्हा आपला मृत्यू झाला असे जाहीर केल्या जाते. आपल्याला मृत्यू म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. हा विषय देखील चर्चिला जाऊ नये असे वाटते. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे.  आपल्या मृत्यूनंतर परंपरेनुसार त्या शरीराची काही जण दफन करतात तर काही जण दहन करतात. म्हणजेच मृत्यूनंतर ते शरीर काहीच कामाचे नाही म्हणून ही कृती केल्या जाते. परंतु आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधातुन माणसाच्या मृत्यूनंतर काही तास शरीरातील काही अवयव त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतात. जसे की, डोळे ( सात ते आठ तास ) किडनी, हृदय, त्वचा, इत्यादी ठराविक वेळासाठी मेलेल्या व्यक्तीमध्ये जिवंत राहतात. तसेच ते अवयव गरजू लोकांना ठराविक कालावधीत प्रत्यारोपण करून बसविता येते. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीची ती गरज पूर्ण होते आणि त्यास दीर्घकाळाचे जीवन मिळू शकते. अवयवदान तीन प्रकारचे असते. जिवंतपणी आपण एक किडनीचा भाग दान करू शकतो, परंतु आपल्या नात्यातील व्यक्तीलाच. दुसरा प्रकार म्हणजे निसर्गत: मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे आणि त्वचा दान करता येते. तसेच तिसरा प्रकार म्हणजे अपघाताने किंवा ब्रेन हॅमरेज झाल्यास ब्रेनडेड झाल्यास हृदय, किडनी, लिव्हर, डोळे, हृदयाच्या झडपा, कानाचे पडदे, हाडे आणि त्वचा दान करता येतात. जसे रक्त कोठेच तयार करता येत नाही अगदी तसेच  मानवाच्या शरीरात असलेले अत्यंत महत्वाचे असे डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयव कोणत्याच कारखान्यात तयार करता येत नाही. त्यास मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्यास्तव तो देह जाळणे आणि पुरणे एवढ्याच कामासाठी शिल्लक असेल तर त्यास दान दिल्याने काय बिघडते ? मात्र यामुळे अनेकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक गरजूना नवजीवन मिळू शकते. तसे जिवंत असताना आपण अनेक प्रकारचे दान देऊन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्ती त्यालाच म्हटले जाते जो आपल्या जवळील सर्व वस्तूचे दान देतो. यासाठी महाभारतातील कर्णाचे उदाहरण दिले जाते. बहुतांश लोक अन्नदान करतात. काही नवयुवक मंडळी रक्तदान करतात. काही लोक पैसा दान करतात तर काही कपडे दान करतात. काही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प करतात. या सर्व दानाच्या प्रकारात अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आपणास पूर्ण माहिती झाल्याशिवाय तसेच प्रचिती आणि स्वअनुभव आल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. अवयवदान केल्यामुळे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा त्या अवयवाच्या रुपात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत असू शकतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या स्लोगनप्रमाणे. दक्षिण भारतीय चित्रपटातील नागार्जुना, सौंदर्या आणि श्रीकांत या अभिनेत्यांनी नुवस्तावनी या तेलगू चित्रपटात या अवयवदानाचे महत्त्व फार सुंदररित्या अधोरेखित केले आहे. प्रशासन आणि वैद्यकशास्त्र विभागानी या अवयवदानाबाबत लोकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीनी या विषयावर चांगला चित्रपट तयार करून लोकांमध्ये अवयवदानाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करावा. नांदेडचे मुक्त पत्रकार श्री माधव अटकोरे यांनी यावर पार्थिवाचे देणे नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. तसेच नांदेड येथील।प्रसिद्ध निवेदक दिवाकर चौधरी हे देखील याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावे म्हणून खूप मोठे कार्य करीत आहेत. आज 13 ऑगस्ट म्हणजे जागतिक अवयवदान दिनानिमित्त कविवर्य भा. रा. तांबे यांच्या " मी जाता राहील कार्य काय ? " या प्रश्नाचे उत्तर अवयवदानाच्या संकल्पनेतून नक्कीच करता येईल. याविषयी सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे पूर्वी म्हटले जायचे पण आत्ता मरावे परी अवयवरूपी उरावे असे म्हणणे उचित ठरेल.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday 10 August 2018

आरोग्यदायी चांगल्या सवयी

आरोग्यादायी सवयी

मुलांनो, आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे ? याचा कधी आपण विचार केला आहे काय ? सहसा आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काहीच काळजी घेत नाही. त्यामुळे भविष्यात आपणास अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. जसे की, आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते. बरीच मुले।सूर्यवंशी घराण्यातील।असतात म्हणजे सूर्य उगल्यावर उशिरा उठतात. उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी ही सवय घातक आहे. जी मुले।सकाळी लवकर उठून अभ्यास करतात भविष्यात ते उत्तम प्रकारे काम करू शकतात. सकाळी उठल्यानंतर पहिले काम।असते स्वच्छ दात घासणे आणि चूळ भरणे. यामुळे आपल्या दातांची योग्य निगा राखल्या जातो. आपल्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी दात हे फार महत्वाचे आहेत. पण आपण त्यास कधी महत्व देत नाही. अनेक मुलाचे दात किडलेले दिसून येतात कारण लहानपणी ते खूप चॉकलेट खाल्लेले असतात. वास्तविक पाहता यात मुलांचे काही।दोष असेल असे म्हणता येणार नाही पण पालकांनी स्वतः याची काळजी घ्यावी लागते. तसेच रोज नियमित अंग घासून स्वच्छ स्नान करण्याची आपणास सवय असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण स्नान करताना साबण वापरत नाही आणि मारोतीला पाणी टाकल्यासारखे अंगावरून ओतून घेतो. यामुळे कालांतराने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे जेवण. जेवण्याच्या बाबतीत आपल्या असंख्य तक्रारी असतात. जेवणात आवडीचे खाद्य दिसले की पोट भरून खायचे आणि नावडते खाद्य असले की अर्धवट पोटाने उठून जातो. यामुळे आपल्या शरीराला संतुलित आहार मिळत नाही आणि मग आपणास काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होते. फळभाजी आणि पालेभाजी न खाणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आढळून येते. पण याच फळभाजी आणि पालेभाजी खाणाऱ्या मुलांत कोणत्याच तक्रारी दिसून येत नाही. शक्यतो सायंकाळच्या वेळी एक तास तरी मैदानावरचे खेळ खेळावे. आजकालची मुले आपला वेळ मोबाईलच्या खेळावर किंवा टी व्ही वरील कार्टून पाहण्यात घालवितात. त्यामुळे मुले दिवसेंदिवस एकलकोंडी होत आहेत. चला तर मग आज जागतिक आरोग्य दिन त्यानिमित्त आपण आपले उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयी अंगीकार करू या.

- नागोराव सा. येवतीकर

लघु कथा

भुकेले पोट - (लघु कथा)

एक दहा वर्षांचा मुलगा राधाच्या गेटजवळ खेळत होता. राधा बाहेर आली आणि ओरडली " हे काय आहे रे ?"
"मावशी, मी तुमच्या बागेला स्वच्छ करू का?"
"नाही, करू नको, काही गरज नाही."
मुलगा हात जोडून अगदी करुणाजनक स्थितीमध्ये, "कृपया करून घ्या ना, मी ते चांगले स्वच्छ करीन."
"बरे, ठीक आहे, किती पैसे घेशील ?"
"पैसे वगैरे काही नको, मला खायला द्या." "ओह! ठीक आहे." "गरीब भुकेला दिसतोय, मी तुला प्रथम जेवण देतो."  राधा म्हणाली
"ए पोरा ! अगोदर जेवून घे, मग काम कर." "नाही, मावशी, सर्वप्रथम मी काम करतो, मग  मला खायला दे."
"ठीक आहे!" असे म्हणत राधा तिच्या कामाला गेली.
एका तासांनंतर, "मावशी, पहा आपल्या बागेची स्वच्छता चांगली आहे की नाही".
"ओह, वाह! तु उत्तम सफाई केली आहेस, आणि साहित्य देखील एकत्र गोळा केले आहेस
" इथे बस, मी जेवण आणतो. " राधाने त्याला जेवण दिले. तेवढ्यात तो आपल्या खिशातून एक चिंधी काढली आणि त्यात बांधून घेऊ लागला. " मी एका भुकेल्या मुलाला काम दिले आहे, अरे इथेच खा जर तुला अजून लागत असेल तर मी अजून देईन"
"नाही मावशी, माझ्या घरी माझी आई आजारी आहे, सरकारी हॉस्पिटलमधून मोफत औषध मिळाले,  परंतु डॉ. म्हणाले की जेवल्याशिवाय गोळ्या-औषध घेता येणार नाही."
हे ऐकून राधा रडू लागली .. आणि स्वत: च्या हातांनी, त्या मुलाची दुसरी आई बनून त्यास जेवू घातले.  मग ... तिच्या आईसाठी भाकरी तयार केली .. आणि त्याच्याबरोबर घरी जाऊन त्याच्या आईकडे भाकरी दिली आणि ती म्हणाली ... "बहीण, तू खूप श्रीमंत आहेस .. तु तुझ्या मुलाला जे काही दिले आहे ते आम्ही आमचा मुलांनाही देऊ शकलो नाही स्वावलंबी जीवनाची शिकवण .....✍🏻

( मला आवडले म्हणून आपल्याशी share केले )

आपण समाजातील / गटांना अशा लहान आणि शैक्षणिक गोष्टी सांगून समृद्ध भारत घडवू या.

( मूळ लेख हिंदी भाषेत )
अनुवाद : नासा येवतीकर, धर्माबाद

उद्याची काळजी आज कशाला

उद्याची काळजी आज कशाला ?

आपल्या जीवनाचा काही भरवसा नाही हे प्रत्येकाला ठाऊक असते. मरण कधी व कोणत्या रूपाने येणार आहे ? हे कुणालाही सांगता येत नाही. त्याच्यापासून दूर पळता सुद्धा येत नाही. मानव सोडल्यास कोणतीच सजिव आपल्या जीवाची एवढी काळजी करीत नाहीत. परमेश्वराने मानवाला विचार करण्यासाठी मेंदूची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे फक्त तेच आपल्या जीवनातील भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करू शकतात. या विचार प्रक्रियेमुळे मानव विनाकारण आपल्या आयुष्यातील काही आनंदी क्षण घालवित असतो. भविष्यकाळाविषयी खूप विचार करून हातात असलेला वर्तमानकाळ बिघडवून टाकतात. जो काळ आनंदाचा आहे त्या काळात तो आनंद उपभोगला नाही तर त्या जीवनाला काही अर्थ आहे काय ? बालपणीचा काळ खेळण्यात, मौजमजेत, खोड्या करण्यात घालवला तरच ते बालपण चिरकाल स्मरणात राहील. परंतु आज पूर्वीप्रमाणे बालपण राहिलेले नाही. धावपळीच्या युगात मुलांची अतिसंरक्षणातून घेण्यात येणारी काळजी आणि त्यांच्या भविष्याविषयी विचार करून मुलांचे बालपण हिरावून घेण्याचे काम पालक करीत आहेत. अगदी लहान वयातच शाळेत पाठविणे, जेवण व झोप एवढा वेळ सोडला तर बाकी असलेला सर्व वेळ मुलांना शाळा, ट्युशन कोचिंग, होमवर्क या शैक्षणिक बाबीत गुंतवून ठेवले जात आहे. त्यास्तव आजच्या मुलांचे बालपण त्यांच्यापासून दुरावले जात आहे. तारुण्यात पदार्पण करताना जर तो लहानपणीचे खेळ खेळू लागला तर लगेच टोमणे तयार असतात, तू काय आता लहान आहेस ! पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांमध्ये बालपणापासूनच द्वेष व राग उत्पन्न होत आहे. त्यामुळे मुले कळती सवरती झाली की ती पालकांनाच उलटे बोलत आहेत. लहानपणापासून त्यांच्या मनात असलेला रागाचा हा विस्फोट असू शकतो. त्या लहान मुलांची काळजी आपणच करावी लागते. परंतु पंधरा वीस वर्षानंतर दिसणारे किंवा जाणवणारे भविष्याची काळजी करून आपण त्यांचा आजचा वर्तमान काळातील आनंद का हिरावून घ्यावा ? देशात आज एका पेक्षा एक हुशार तरुण-तरुणी आहेत, मात्र त्यांच्यात जीवन जगण्याची थोडीसुद्धा नैतिकता शिल्लक नाही. शिक्षणाबरोबर नैतिकतेचे संस्कार दिले असते तर त्यांच्या उद्याच्या भविष्याची काळजी करायची गरजच राहिली नसती.
तारुण्यातील काळ हा मौजमजेचा तसेच जबाबदारीची जाणीव देणारा ही असतो. या काळात जो आपली कर्तव्य आणि जबाबदारी योग्य प्रकारे ओळखून काम करतो तो भविष्याची काळजी न करता यशस्वी होतो. ज्याच्या हातात बळ आहे आणि दंडात शक्ती आहे त्याला उद्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. भिकारी लोकांना असते उद्याची काळजी. जत्रेत खूप जनता आली आणि त्यांना खूप भीक ही  मिळाली. परंतु जत्रा संपल्यावर काय? अशी काळजी त्यांना लागते. आळशी लोकांना वाटते उद्याची काळजी. कारण दे रे हरी पलंगावरी याची त्यांना सवय जडलेली असते. रोज जेवण तयार करून वाढणारी आई किंवा बायको कुठे गावाला गेली की या जेवण तयार करता न येणाऱ्या आळशी लोकांना उद्याच्या जेवनाची काळजी लागते. असेच काही सर्व प्रकारच्या कामात लागू पडते. त्यास्तव आपण जर सर्व बाबतीत कार्यक्षम, तत्पर व तयार राहू तर आपणाला उद्याची काळजी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
कमावत्या व्यक्ती आपला संसार खूप चांगला चालावा, कुटुंबातील कोणत्याच सदस्याला कसल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी रात्रंदिवस काम करतात आणि संपत्ती जमा करून ठेवतात. म्हणजे एक प्रकारे मुलांच्या भविष्याचे प्रश्न आधीच सोडवून ठेवतात. पण मुलांना आयती संपत्ती मिळवून देणे म्हणजे आपल्या मुलांना आळशी करणे नव्हे का ? याचा ही विचार व्हायला हवे.  काही महाभाग  आपल्या नंतरची मंडळी नुसती सुखातच नव्हे तर ऐषोआरामात राहावी म्हणून गैरमार्गाचा अवलंब करून खूप संपत्ती जमा करून ठेवतात. भविष्याची काळजी करताना वर्तमानाचा विचार न करता केलेले हे कार्य एके दिवशी उघडे पडते आणि भविष्यासोबत वर्तमानात सुद्धा सर्वत्र अंधकार पसरतो. विविध प्रकारचे भ्रष्टाचार उघडे होताना त्यांच्याजवळची संपत्ती पाहून सामान्य लोकांचे डोळे विस्फारले नसतील तर नवलच ! भविष्याची काळजी करताना रात्रीची झोप कधी उडाली हे कळतच नाही. भुकेला कोंडा अन निजेला धोंडा असणारी माणसे जेवढी काळजी करीत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मखमलीवर झोपणारी व तूप खाणारी माणसे काळजी करतात. यासाठी उद्याच्या काळजीवर चिंता करण्यापेक्षा आजच्या वर्तमानाकडे लक्ष देऊन गीतेतील याओळी नेहमी स्मरणात ठेवाव्यात, जे झाले ते चांगलेच झाले, जे होत ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. तेंव्हा उद्याची काळजी आज कशाला ?

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

मुलांनो जर कोणी तू असा आहेस किंवा तू तसा आहेस अशितोष दाखवणारे वाके ऐकविली की आपणाला समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो आणि आपल्या गुणांची प्रशंसा किंवा तारीफ केली की आपला आनंद गगनात मावेनासा होतो. हे साहजिकच आहे. मात्र जर कोणी आपल्यातील दोष दाखवत असतील तर त्यांना आपण धन्यवाद म्हटले पाहिजे. कारण त्या निमित्ताने आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न तरी करीत असतो. डेल कार्नेगी तत्त्वज्ञाने म्हणतो की 99% लोक असे असतात की स्वतःच्या दोष किंवा स्वतःची चूक कबूल करायला ते तयार नसतात. म्हणून त्यांच्यातील ते दोष कधीच जाऊ शकत नाहीत. आरशावर जेव्हा धूळ असते तेव्हा त्याच्या वरून आहात फिरवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरशा वरील दूर जात नाही. प्रतिमादेखील चांगली दिसत नाही. घरामध्ये वावरत असताना आई-वडील भाऊ-बहीण हे आपल्याला आपल्यात असलेले दोष दाखवितात तर शाळेत गुरुजींकडून हे काम होते. लहान असताना प्रत्येक जण आपल्यातील गुणदोषांचे विवेचन करतात आपण मोठे झाल्यावर आल्यावर आपणाला मग कोणी याविषयी बोलत नाही. विशेषकरून शाळेतील शिक्षकांकडून आपल्यातील दोष उणिवा व कमतरता स्पष्टपणे कळल्या तर त्यांच्याकडून मिळालेली दोष दूर करण्याचे उपाय व त्यावरील मार्गदर्शन सुद्धा फारच मोलाचे ठरते. गुरु इयर यांनी म्हटल्याप्रमाणे हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे परंतु एक दोष दूर करणे फार कठीण आहे. म्हणूनच शालेय वयात सर्व दोष दूर कसे करता येतील याचं विचाराने वागत राहिल्यास नक्कीच सुधारणा होऊ शकते. आपल्याकडे भरपूर गुण असून सुद्धा एका अवगुणामुळे आपली प्रगती खुंटते. समाजात मान सन्मान मिळत नाही. एवढेच काय कधीकधी नोकरीसुद्धा मिळत नाही. जमा लोक आपल्या बाबतीत त्यांचे सर्व गुण चांगले आहेत मात्र एकच अवगुण आहे असे बोलतात तेव्हा मन उदास होते. म्हणूनच फ्रान्क्लीन म्हणतो की आपल्या मृत्यूपूर्वी स्वतःचे दोष नष्ट करा म्हणजेच सर्वांच्या स्मरणात राहू जगात भगवंताशिवाय परिपूर्ण असा कोणीच नाही. मध्ये काही ना काही दोष उणीव किंवा कमतरता नक्कीच असते. अजून एक बाब आपण नीट लक्ष नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे इतरांचे दोष दाखविताना ते दोष आपल्यात नाहीत ना याचे आत्मपरीक्षण करून जाणून घ्यावे अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण म्हणीप्रमाणे आपली अवस्था होऊ शकते.

लेख एकत्रित

मा. संपादक साहेब,
सप्रेम नमस्कार

खास लहान मुलांसाठी लिहिलेले लेख आहेत. कृपया आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी. ही विनंती

- नासा येवतीकर

*खेळांकडे ही लक्ष द्यायला हवे*

राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध करून द्यायला हवे. तर काही मैदानांना हेरिटेजचे स्वरूप आले आहेत. खेळाचा प्रसार होण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळाचा स्वतंत्र विषय म्हणून समावेश करावा. मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसते तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय ने आपले विचार बदलले तरच आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे मित्रासोबत वेळ घालवणे दंगा करणे तितकेच आवश्यक आहे. आपली शक्ती योग्य गोष्टींमध्ये आपण गुंतवायला हवे असे परखड मत भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अँड फिट इंडियाच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल तसेच स्वतःच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारखे अनेक भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर आपले नाव तर प्रसिद्ध केलेच त्याशिवाय भारताचे नाव देखील जगजाहीर केले. 
तसे पाहिले तर मुलांना खेळ हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळ असा शब्द जरी मुलांसमोर उच्चारला गेला तरी मुलांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. खेळाची आवड नसलेली मुलं शोधून काढणे फार मोठे अवघड काम आहे. वास्तविक पाहता आपल्या शरीरासाठी खेळ सर्वात महत्त्वाचे आहे. करण्यामुळे शारीरिक हालचाल होते आणि आपण सुदृढ व तंदुरुस्त बनतो. आपले शरीर चांगले असेल तर आपली बुद्धी सुद्धा चांगली असते. Sound in Body is Sound in Mind असे इंग्रजीत म्हटले आहे ते या अर्थानेच. आपले शरीर निरोगी व बळकट ठेवण्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. म्हणून सदानकदा खेळत राहणे हे सुद्धा वाईट आहे. शाळेत जाणाऱ्या बहुतांश मुलांना खेळायला वेळच मिळत नाही अशी तक्रार ही मुले करतात, तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटणारच. पण त्यांचे वेळापत्रक जवळून निरखून तपासून पाहिल्यास त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटते. बहुतांश मुलांना सकाळच्या अगदी सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर शिकवणीला जावे लागते. त्यानंतर शाळेची तयारी करून शाळेला जाणे आणि शाळेत खेळासाठी अर्ध्या तासाची फक्त एकच तासिका असते त्यात कधी खेळायला मिळते तर कधी वर्गातच बसून राहावे लागते. सायंकाळी घरी गेल्यावर गृहपाठ करण्यात तासभर निघून जातो तोच सायंकाळच्या शिकवण्याची वेळ होते. रात्री नऊ किंवा दहा वाजता शिकवणी संपून घरी आले की जेवण करा आणि झोपी जा. अशा वेळापत्रकात त्यांना फार कमी वेळा खेळायला मिळते. त्यामुळे आजची मुले आरोग्याच्या बाबतीत फारच कमकुवत निघत आहेत. मोबाईलवरील किंवा संगणकावरील गेम खेळायचा प्रचंड नाद मुलांना लागत आहे, ही वाईट सवय आहे. सर्वात पहिल्यांदा आई-बाबांची किंवा भाऊ-बहिणीच्या मोबाईलला अजिबात हात न लावण्याची शपथ घ्यावी व त्याची अंमलबजावणी करावी. त्यापेक्षा बाहेर सायकल फिरवणे, मित्रांसोबत उड्या मारणे व गप्पा मारणे केव्हाही चांगले हे आपल्या शरीराला तारक आहे. मात्र मोबाईल किंवा संगणक आपणासाठी मारकच ठरतात. त्यामुळे ऋतुमानानुसार खेळल्या जाणाऱ्या खेळाकडे लक्ष द्या. अभ्यासासाठी जसे वेळ देता तसे खेळासाठी सुद्धा वेळ राखून ठेवा म्हणजे अभ्यास करताना ताजेतवाने वाटते. अन्यथा ऐन परीक्षेच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*लोभाचे फळ*

मुलांनो, आपणाला सोन्याचे अंडे देणार्‍या एका कोंबडीची गोष्ट माहीत असेलच. एका माणसाजवळ सोन्याचे अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज नित्यनेमाने सकाळी सोन्याचे अंडे देत होती. त्यामुळे त्या माणसाचे दारिद्र्य दूर झाले आणि तो चैनीत व ऐषोआरामात दिवस घालवीत होता. मात्र तो समाधानी नव्हता. त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. लवकर श्रीमंत व्हावे ह्या लोभापायी त्याने विचार केला की रोज एक सोन्याचे अंडे घेण्यापेक्षा कोंबडीला कापून तिच्या पोटातील सर्वच्या सर्व सोन्याची अंडी एकदाच मिळवावी आणि खूप श्रीमंत व्हावे. म्हणून त्यांने ती कोंबडी कापली. तेव्हा त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट रोजचे अंडीसुद्धा कोंबडीसोबत संपले. हे असे का झाले ? अति लोभामुळे झाले. वेदव्यास ऋषी म्हणतात की, पाण्याने तुडुंब भरलेली नदी समुद्रास मिळते तरी त्याचे समाधान कधीच होत नाही. तेंव्हा आपणाजवळ जे काही उपलब्ध असेल तर त्याच उपलब्धतेवर समाधानी असणे अत्यावश्यक आहे. जेव्हा केव्हा आपण एकाचे दोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात लोभ निर्माण होतो. त्यासाठी शेख सादिक यांनी सांगितले वचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणतात की, मनुष्य जर लोभाला धुडकावून लावेल तर सम्राटापेक्षाही उच्च दर्जा त्याला प्राप्त होईल. समाधानी मनुष्यच समाजात ताठ मान करून वावरत असतो. आजपर्यंत जे कोणी महात्मा किंवा महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या जीवनात लोभाला शून्य महत्त्व होते. ते जर लोभाच्या आहारी गेले असते तर समाजात ते ताठ मानेने राहू शकले नसते. जीवन जगत असताना पदोपदी आपणाला लोभ निर्माण होतील असे प्रसंग घडतात. लॉटरी लागेल म्हणून मनुष्य रोज शंभर रुपयांचे तिकीट खरेदी करतो. झटपट श्रीमंत व्हावे म्हणून आपली कमाई लॉटरीच्या तिकिटात खर्च करणारा लवकरच कंगाल बनतो. म्हणून अश्या मोठमोठ्या स्वप्न दाखविणाऱ्या बाबीकडे दुर्लक्ष केलेले केंव्हाही बरे. फुकटच्या गुलाबजामुन पेक्षा कष्टाची चटणी भाकर केंव्हाही गोड लागते. अनेक वेळा आपणास लोभाचे आमिष दाखविल्या जाते. मात्र वेळीच आपण सावध होणे गरजेचे आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावू नये या अर्थाची म्हण सुद्धा आपणाला लोभापासून वाचून राहा असे सांगते. संस्कृत सुभाषितांमध्ये म्हटले आहे की लोभी माणसाला कोणी मित्र असत नाही किंवा कोणी गुरूही असत नाही. कारण तो सदानकदा एकटा जीव सदाशिव प्रमाणे एकलकोंडा बनतो आणि त्याच्या मनाला सदोदित लोभांचे विचार चालू असतात. दिलदार मनुष्य अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो तर कंजूष अर्थात लोभी मनुष्य शेवटपर्यंत दुःखी असतो असे कैसे बिनइल खतीम यांनी सांगून ठेवले आहे. त्यास्तव नेहमी आनंदी राहण्यासाठी समाधानी राहायला शिकावे व लोभापासून शक्यतो दूरच राहावे. कारण लोभाचे फळ आज नाहीतर उद्या दुःखातच परिवर्तित होणार आहे याची जाणीव ठेवावी.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*दृष्टी तशी सृष्टी*

मुलांनो, परमेश्वराने सर्वांनाच दोन डोळे व विचार करण्यासाठी बुद्धी दिली. मात्र प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे एक समान नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार एकसारखे असूच शकत नाही. रोमा रोला यांनी म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही वस्तूचे सौंदर्य हे पाहणार्‍याच्या दृष्टीमध्ये असते. म्हणूनच दृष्टी तशी सृष्टी असे म्हटले जाते. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूचे उत्तम सौंदर्य दिसावे असे वाटत असेल तर आपली दृष्टी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपले ज्ञान आहे. सदगुणाशिवाय आपणाला सौंदर्य दिसत नाही आणि ते प्राप्त सुद्धा होत नाही. जर आपणाला खरच सौंदर्य मिळावे असे वाटत असेल तर पहिल्यांदा आपण सुंदर व्हायला शिकायला पाहिजे असे कवि कलापी याने म्हटले आहे. जेम्स रोस म्हणतात की,  ज्या माणसाच्या अंगी सत्य, सदाचार, शील, आणि सहिष्णुता असते ती व्यक्ती सौंदर्य प्राप्त करते. याच संदर्भात संत चोखामेळा यांनी खूप सुंदर दृष्टांत देताना म्हटले आहे की, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा ? एखाद्याचे बाह्य सौंदर्य पाहून त्याची प्रशंसा वा स्तुती करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी मिळविता येणे फार चांगले. दुरून डोंगर साजरे किंवा दिसतं तसं नसतं या म्हणीप्रमाणे वरवरच्या गोष्टीला भुलून न जाता त्याविषयी सखोल ज्ञान माहिती मिळविल्यास आपणास खरी दृष्टी लाभते आणि तेव्हाच उत्तम दृष्टी व सौंदर्य पाहण्यास मिळते. आचार्य प्र. के. अत्रे यांची दृष्टी खूपच महान होती त्यामुळे त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य तयार झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीचे सौंदर्य म्हणजे त्यांचे सामर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य म्हणजेच सौंदर्य आहे. यासंदर्भात धूमकेतू यांचे विचार ही लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणतात की, सौंदर्य जर तुमच्या अंतरंगात नसेल तर सौंदर्याचा शोध घेण्यासाठी सर्व पृथ्वी पालथी घातली तरी ती तुमच्या हाती लागणार नाही. म्हणूनच मनाचे पावित्र्य राखा म्हणजे तुम्हाला सर्वच सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडेल अशी महात्मा गांधीजींचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*मी गरीब नाही*

इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जाते. याचा अर्थ येथील सर्वच लोक श्रीमंत होते असा अर्थ  काढण्यास हरकत नसावी. मात्र इंग्रज लोकांनी जवळपास दीडशे वर्षे भारतावर राज्य करून या देशाला पूर्णपणे पिळून काढले आणि भारत देश गरीब झाला, असेही म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर भारत स्वतःच्या कर्तुत्वावर आज जगात महत्त्वाच्या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे, हे निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, तरीही देशातील लोकांची स्थिती जर बघितली तर एकीकडे खूप श्रीमंत लोक दिसतात तर दुसरीकडे अत्यंत गरीब लोक बघायला मिळतात. दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे स्वतःला गरीब म्हणवून घेणाऱ्याची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. सरकारच्या योजना मिळविण्यासाठी बरीच मध्यमवर्गीय मंडळीसुद्धा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात समाविष्ट होण्याचा खटाटोप करतात, हे अत्यंत क्लेशदायक वाटते. याविषयी प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांचे म्हणणे योग्य वाटते. ते म्हणतात की गरिबीचे प्रदर्शन करणे हे गरीबीचे दुःख भोगण्यापेक्षा ही अधिक कष्टदायक आहे. मुळात जी व्यक्ती मी गरीब आहे असे वारंवार लोकांना सांगते ती व्यक्ती गरीब नसतेच मुळी. कारण जोपर्यंत त्यांच्या बाहूत शक्ती आहे आणि पायात बळ आहे तो या दोन गोष्टींच्या हिमतीवर गरीबीला पळवून लावू शकतो. मात्र मुळात आपण याच दोन गोष्टीचा वापर न करता गरिबाला मदत करा म्हणून इतरांपुढे हात पसरतो. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपल्या शक्ती व बळाचा वापर केल्यामुळेच श्रीमंत होऊ शकले. विद्यार्थी आयुष्यभर गरीब राहू नये म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी युवकांमध्ये " कमवा व शिका " हा मंत्र दिला. पैसा नाही म्हणून कोणी गरीब समजले जात नाही, याविषयी महात्मा गांधी म्हणतात की, धनवान असुन देखील ज्यांची धनाची लालसा कमी होत नाही ते सर्वात अधिक गरीब आहेत. स्वतःला गरीब समजणे म्हणजे आपला आपल्यावरचा आत्मविश्वास कमी असणे होय. जे स्वतःला गरीब समजतात तेच लोक गरीब असतात वास्तविक गरिबी स्वतःला गरीब समजण्यात असते असे इमर्सन ने म्हटले आहे, ते सत्यच आहे. त्यास्तव स्वतःला गरीब म्हणत रडण्यापेक्षा आपले भाग्य आपल्या शक्ती व बळाने बदलविण्याचा विचार करून मी गरीब नाही हे आपल्या मनाला ठासून सांगितले पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक 
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*

मुलांनो, तुम्ही शाळेत कशासाठी जाता ? असा प्रश्न जर कोणी विचारला असता, मुले उत्तर देतात की,  शिकण्यासाठी तर कोणी म्हणतो की ज्ञान मिळवण्यासाठी. मग शिक्षण किंवा ज्ञान आपणाला फक्त शाळेतूनच मिळते काय ? प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. शाळेतून फक्त आपणाला अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान मिळते, तर समाजात वावरताना जे अनुभवाचे ज्ञान मिळते त्यावर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणूनच आचार्य विनोबा भावे म्हणतात की, यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. मानवाच्या आयुष्याचा शिक्षणाशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणूनच ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले आहे. शाळेतून आपणाला अक्षर किंवा संख्येची ओळख तर दिली जातेच शिवाय समाजात कसे राहावे ? कसे वागावे ? याचेही ज्ञान विविध उपक्रमाद्वारे दिले जाते. उपक्रमाशिवाय शाळा म्हणजे देवाविना मंदिर असल्यासारखे होय. त्यास्तव प्राथमिक शाळांमधून जास्तीत जास्त उपक्रम सर्वत्रच राबविले जातात. आपणाला जर उत्तम शिक्षण मिळवायचे असेल तर केथराल यांनी सांगितलेल्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बारीक निरीक्षण करणे, खूप अनुभव घेणे आणि खूप अभ्यास करणे ह्या तीन गोष्टी मुळे आपले शिक्षण नक्कीच परिपक्व होऊ शकते. जे शिक्षण उपजीविकेचे साधन असते ती कला असते आणि जे शिक्षण जीवनविकासाचे साधन असते ती विद्या असते असे स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी म्हटले आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जे साहस वा शक्ती मिळते ती या शिक्षणातूनच मिळते. शिक्षण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपणाला अवघड किंवा माहीत नसलेली बाब कळणे व लक्षात येणे. यावरून शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते असे जे लोक म्हणतात ते याच अर्थाने. शिक्षणाचा मूळ अर्थ आहे विचार करणे. खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. चांगला विचार करून चांगला आचार केला नाही तर अजून आपणाला शिक्षणाची गरज आहे असे समजण्यास हरकत नसावी.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक 
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*बालपणीचे संस्कार*

एकविसावे शतक हे ज्याप्रमाणे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते तसे धावपळीचे सुद्धा युग आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे आज मनुष्य काम करीत आहे. आपल्या लेकरांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आई आणि वडील हे दोघेही विविध क्षेत्रात नोकऱ्या करीत आहेत. घरातील चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांही कुटुंबाच्या प्रगतीसाठी घराबाहेर पाऊल ठेवले आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे. परंतु या बदलामुळे घरात काही समस्यांचा देखील जन्म झाला आहे, हे विसरून चालणार नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमधील दोघेही नवरा बायको नोकरी करणाऱ्या कुटुंबात तणावाचे वातावरण दिसून येते. जिथे योग्य समायोजन होते तेथे शांतता सुद्धा दिसून येते. परंतु ती शांतता अल्पकाळासाठी टिकून राहते. कामाच्या व्यापात मुलांवर संस्कार करायचे राहून चालले आहे. पैशाच्या बळावर सर्वकाही मिळविता येईल परंतु संस्कार मिळविता येणार नाहीत. संस्कार हा जीवनाचा अनमोल ठेवा आहे. बालपणी मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील या बाबीकडे प्रत्येक पालकाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपले पारंपरिक सण किंवा उत्सव साजरे करताना त्यातून मुलावर संस्कार कसे टाकता येतील ? याचा विचार करून कार्यक्रम साजरे केल्यास तेथे एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. त्याचप्रमाणे मुलांना याच वयात स्वावलंबनाची ही शिकवण द्यायला हवी. लहान वयापासून दिलेले हे स्वावलंबनाचे धडे मुलांना भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतील. लहान वयात मुलांवर योग्य संस्कार करणे ही एक प्रकारे हिऱ्याच्या खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे त्यांचे जीवन हे हिर्‍याप्रमाणे प्रकाशमान होऊन चमकत रहाते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक 
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*सुख पाहता जवापाडे*

सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख एकानंतर एक येतात. परंतु प्रत्येकाला वाटते की माझ्या जीवनात दुःख येऊच नये. नेहमी मी सुखातच राहावे. रात्र झाली तरच दिवस उगवत असतो. रात्र झाली नसती तर दिवसाला ही किंमत राहिले नसते. त्याचप्रमाणे जेथे सुख असेल तेथे दुःखाचा वास हा राहणारच. दुःखानंतर येणाऱ्या सुखाला आपल्या जीवनात फार मोठे महत्त्व आहे. यावरूनच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की " सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे. "
बरेच लोक सुखाच्या मागे असे धावतात की सुख केव्हा आले अन केव्हा गेले याचा त्यांना पत्ताही नसतो. परिसाच्या गोष्टीप्रमाणे बर्‍याच जणांची अवस्था होते. हे सांगताना संत रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे । आपली सद्सद्विवेकबुध्दी जागे करून विचार केल्यास कळते की, जगात कोणीही सुखी नाही. सर्वांना थोडाफार तरी दुःख आहेच आहे. कोणी भूक लागल्यावर अन्नाच्या काळजीने दुःखी आहे तर कोणी खाल्लेले अन्न कसे पचणार ? याच्या काळजीत दु:खी आहे. जर खरोखरच आपणाला जीवनात सुखी व्हायचे असेल तर काही गोष्टी व नियम पाळावे लागतात.
आपल्या मनात कोणतीही कसल्याही प्रकारची शंका येऊ देऊ नये. शंकेची पाल चुकचुकली की, दु:खाला सुरुवात होते. इतरांच्या बाबतीत आपल्या मनात इर्षा, मत्सर, द्वेष वा कूटनीती आणू नये. त्यामुळे सुखात असलेला जीव दुःखात बुडून जातो. कशाचाही बाबतीत असंतुष्ट वा नाराज राहू नये, जे आहे त्यात समाधानी राहावे. जे नाही त्याच्याविषयी दुःख करण्यात काय अर्थ ? दुसर्‍याचे दुःख वाटून घेतल्याने त्याचे दुःख कमी होते आणि त्यांच्यासोबत आपणासही समाधान मिळते. असे म्हटले जाते की दुःख वाटल्याने कमी होते तर सुख वाटल्याने ते वाढत जाते. म्हणून आपल्या सुखात सर्वांना सामावून घ्यावे व जगाला सुखी करावे. दुःख पर्वताएवढे आहे असे कधीच न मानता दुःखात कोठे सुख मिळते का ? याचा शोध घ्यावा

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक 
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*बुडती हे जन न देखवे डोळा*

स्वकियांसाठी प्रत्येक जण झटतात परंतु इतर लोकांसाठी आपण का झटावे ? असा विचार करणारे लोक जीवनात काय मिळवतात ?  काहीच नाही. कुठलाही स्वार्थ मनात न आणता केलेले काम व ती व्यक्ती क्षणात जगभर पोहोचते. भारतात असे बरेच संत-महात्मे ऋषीमुनी होऊन गेले आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध हे सर्वजण लोकांच्या सुखासाठी जगत राहिले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा यांनी सुद्धा याच कार्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. देशातल्या गरीब लोकांना अंगभर कपडा मिळावा म्हणून महात्मा गांधीजींनी आपल्या अंगावरील कपड्यायाचा त्याग करून आयुष्यभर पंचा नेसले व चरख्यावर सूत कातले. दलित लोकांना न्याय मिळावा, त्यांना सन्मान मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी 1956 साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लोकांना विशेष करून स्त्रियांना सन्मानाने जगता यावे यासाठी मदर तेरेसा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिल्या. कशासाठी ? कारण एकच, या सगळ्यांना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी होती. त्यांनी आपल्या कुटुंबाचा किंवा परिवाराचा कधी ही विचार केलेला नाही. त्यांनी नेहमीच वसुधैव कुटुम्बकम समजले होते. त्यांनी स्वार्थी, आपमतलबीपणाने जर विचार केला असता, तर काय झाले असते ? या प्रश्नावर प्रत्येकाने विचारमंथन करणे गरजेचे आहे. मला पोटभर खायला मिळाले की मी दुसर्‍याचा काय म्हणून विचार करावा ? ही मानसिकस्थिती बदलून टाकणे महत्त्वाचे आहे. म्हणून संत तुकाराम महाराज यांचे " बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणऊनि " ही ओळ लक्षात ठेवल्यास देशात शांतता, समता आणि बंधुता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही एवढे मात्र खरे ?

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*माणुसकी हाच खरा धर्म*

आपला देश विविध जातींचा व पंथाचा आहे. येथे सगळ्याच लोकांना जगण्याचा समान हक्क प्रदान करण्यात आला आहे. भारत हे  धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अर्थात येथे सर्वच धर्माना समान महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन असून त्याची स्थापना आपले पूर्वज ऋषीमुनींनी केली आहे. मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लीम धर्माची, गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची, गुरुनानक यांनी शीख धर्माची तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आहे. धर्म स्थापनेमागे प्रत्येक संत महात्म्यांचा एकच विचार होता तो म्हणजे माणुसकी. आपण सारे एक आहोत आणि प्रत्येक माणसाचा एकच माणूसकी धर्म आहे. परंतु याच गोष्टीचा विसर समाजात व राज्यकर्त्यास पडला आहे म्हणूनच आज धर्माच्या नावाखाली अराजकता माजलेली दिसून येत आहे.
वास्तविक धर्माची संकल्पना आपणच तयार केली आहे. धर्म म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून कर्तव्य हा मूळ अर्थ आपण पार विसरून गेलो आहोत. वृद्धांचे पालनपोषण करणे हा प्रत्येक मुलाचा धर्म आहे. शिष्यांना जीवन उत्तम प्रकारे जगता यावे असे शिक्षण देणे हा गुरुचा धर्म आहे. मुलांना प्रत्येक बाब मिळवून देणे हा प्रत्येक आई-वडिलांचा धर्म आहे. समाजात जगताना प्रत्येकाला प्रेम देणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. याविषयी सानेगुरुजी अगदी मार्मिक भाषेत म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या उक्तीचा अर्थ सर्वांनी समजून घेऊन जीवन जगल्यास धर्मावरून होणारी वादळे नक्कीच थांबतील यात शंका नाही.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*शिक्षक हेच शिल्पकार*

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूला समाजात मानाचे स्थान आहे. येथील संस्कृतीने शिक्षकाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढेच नाही तर परब्रह्म असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीने शिक्षकाला एवढे मोठे मानाचे स्थान का दिले असेल ? या प्रश्नाचा सद्सद्विवेक बुद्धीने थोडासा विचार केला तर लक्षात येते की, शिक्षक हाच फक्त आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. ज्याप्रमाणे पाथरवट दगडावर घाव टाकून टाकून सुंदर मूर्ती तयार करतो. पाथरवटा शिवाय दगडाची मूर्ती दुसरा कोणी करू शकत नाही. कच्या मातीला आकार फक्त कुंभार देऊ शकतो. अगदी तसेच व्यक्तीचे जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी शिक्षकाची प्रत्येकाला गरज असते. त्याशिवाय आपण यशस्वी जीवन जगू शकत नाही.
पूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे आश्रमामध्ये जाऊन शिकावे लागत असे. धनुर्विद्या असो किंवा इतर विद्या हे शिकणे फक्त राजघराण्यातील लोकांचे काम होते. त्यामुळे एकलव्यासारख्या कनिष्ठांना गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यास शिकविण्यास नकार दिला. मात्र त्या गुरूंच्या पुतळ्यानेच एकलव्याला बरेच काही शिकविले. आज तशी स्थिती नाही. शिक्षक आज कोणाला विद्या घेण्यापासून रोखू शकत नाही. उलट सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर टाकलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्यासारखी आई आणि गुरू मिळाली म्हणूनच राजे शिवाजी घडले. त्यांनी तलवार चालविणे, घोडेस्वारी करणे इत्यादी रणनीती तर शिकविल्याच. तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना त्यांनी माणुसकीचे धडे ही दिले. डॉक्टर बाबासाहेब यांना आंबेडकर आणि केळुस्करासारखे चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपणाला महामानव अनुभवता आले. त्यांच्या शिक्षकाने आपल्या शिष्यांना आडनाव दिल्याची घटना कदाचित पहिलीच आहे. परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जगालाच प्रेमाचा संदेश देऊन शिक्षकांचे समाजात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या जीवनात चांगले शिक्षक येतात त्यांचे जीवन फळाला येऊन नक्कीच यशस्वी होते. म्हणून सर्वांनी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्यावा, कारण शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जसे चारित्र्य तसे जीवन

पावित्र्य म्हणजे पवित्रता, शुद्धता व सच्चरित्र. मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याची उत्तम चारित्र्य होईल असे स्माईल्स यांनी म्हटले आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास भारतीय संस्कृतीत या पावित्र्याचे व चारित्र्याचे किती महत्व आहे हे समजून येते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आराध्य देवदेवतांची पूजा करणे ही आपल्या मनाची शुद्धता आहे. घराची वास्तुशांती असो किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ त्यात देवतांना स्मरण केल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही, अशी आपल्या मनाची धारणा असते. भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माची व्यक्ती स्नान केल्याशिवाय मंदिरात पाऊल टाकत नाही. यात तनाची म्हणजे शरीराची पवित्रता दिसून येते. त्याशिवाय मंदिरात प्रवेश केलेल्या व्यक्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते, अस्वस्थता वाटते. कारण स्नान न केल्यामुळे तो स्वतःला अपवित्र समजतो. याचप्रमाणे व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष तिचे वर्तन सुद्धा शुद्ध व पवित्र असायलाच पाहिजे, त्याच सच्चरित्र म्हणतात. प्रसिद्ध विचारवंत एनन म्हणतात की, जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याची चारित्र्य बिघडते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होत असते. चारित्र्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रियांना फारच जपून राहावे लागते. श्रीरामाच्या पत्नीला पवित्रता सिद्ध करून दाखविण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. परंतु आज कालच्या स्त्रियांना अशी दिव्य परीक्षा देणे अशक्य आहे. त्यासाठी स्त्रियांनी फारच काळजीपूर्वक वागावे लागते. समाज त्यांना अपवित्र म्हणणार नाही असे वर्तन ठेवावे लागते. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. भारतात सध्या पाश्चिमात्य संस्कृतीची घुसखोरी वाढीस लागली आहे. भारतात असलेली प्राचीन व पवित्र संस्कृती हळूहळू लोप पावते की काय ? अशी शंका मनात येत आहे. सुंदर चारित्र्य ही सर्व कलांमध्ये सुंदर कला आहे. ही विचारधारा आजच्या युगातील व्यक्ती विसरत चालल्या आहेत. एकीकडे शहरी भागातून ही पवित्रता व चारित्र्य हद्दपार होत असताना ग्रामीण भागात ते आजही जपली जात आहे. ज्या भागातून संस्कृतीचा उगम झाला या भागात तरी नष्ट होऊ नये एवढे तरी प्रयत्न करायलाच पाहिजे. फेडरिक सॅडरिस यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनावर तुमच्या चारित्र्याचे शासन चालत असते, जसे चारित्र्य तसे जीवन.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...