Friday 6 April 2018

जागतिक आरोग्य दिन

07 - एप्रिल जागतिक आरोग्य दिन यानिमित्त प्रासंगिक लेख

*आरोग्यम धनसंपदा*

मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण आपले आरोग्य कसे चांगले राहील ? याकडे विशेष लक्ष देत असतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अभिनेता अमिताभ बच्चन आज ही न थकता चित्रपटात काम करताना दिसतो. याचे काय कारण असू शकते तर ते म्हणजे त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे. सर सलामत तो पगडी पचास अशी एक हिंदी मधील म्हणीचा अर्थ काय सांगतो, आरोग्य चांगले असेल तर किती ही धन कमाविता येऊ शकेल. आपले आरोग्य म्हणजे आपले धन होय. परंतु एकूण लोकसंख्यापैकी फारच कमी म्हणजे 10 ते 20 टक्के लोक आपल्या शरीराची देखभाल करून आरोग्याची काळजी घेतात. बाकी इतर मंडळी मात्र आपल्या अमूल्य अश्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना आरोग्याच्या विविध तक्रारीला तोंड द्यावे लागते. असे म्हटले जाते की, दवाखाना मागे लागले की कुटुंबाचा विकास होत नाही. म्हणून दवाखाना आपल्या मागे लागू नये यासाठी काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वप्रथम आपणांस चांगली सवय असावी लागते. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही सवय माणसाला निरोगी राहण्यास मदत करते. ज्याप्रकारे शाळा-महाविद्यालयात प्रत्येक विषय आणि कृतीचे नियोजनानुसार एक वेळापत्रक असते. अगदी त्याचप्रकारे माणसाने सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीचे नियोजन करून त्याचे एक वेळापत्रक आपल्या मेंदूला दिले की, रोज त्या वेळेला मेंदू आठवण करून देते. एखाद्या दिवशी वेळापत्रकात मागे पुढे होईल पण वारंवार त्यात चुका करू नये. स्वच्छतेच्या आपल्या सवयी आपणाला निरोगी राहण्यास मदत करतात. कधी कधी आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. आपले जेवण हे देखील आपले आरोग्य वाढविण्यासाठी नेहमी मदत करतात. आपल्या जेवणात संतुलित आहार नियमितपणे असेल तर आपल्या आरोग्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात असतात. बहुतांश लोक फळभाजी आणि पालेभाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. रोज एकसारखे अन्न जेवण केल्यास सर्व प्रकारचे जीवनसत्वे मिळत नाहीत. त्यामुळे मग कोणत्या तरी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते आणि मग आपणांस आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. आपणाला मिळलेले शरीर हे एक अमूल्य वरदान आहे. मात्र त्याची आपणांस काहीच काळजी वाटत नाही हे आपल्या नेहमीच्या वागण्यावरून लक्षात येते. दारू पिणे, तंबाखू खाणे आणि विडी ओढणे यासारख्या व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती आपल्या शरीराविषयी जरा सुद्धा काळजी घेताना दिसत नाहीत. जर त्यांना खरोखरच आपल्या शरीराची काळजी राहिली असती तर दिवसरात्र दारू पिऊन स्वतः मृत्यूच्या खाईत गेला नसता. तंबाखू आणि गुटखा खाण्याच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातल्या त्यात शाळा-महाविद्यालयातील मुलां-मुलीच्या संख्येत वाढ होत आहे. जे की देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर नाही. राज्यात गुटखा बंदी असून देखील कोपऱ्या कोपऱ्यात गुटख्याचे पाकीट सर्रास विकले जात आहेत. यातच आपला देशातील तरूण युवक आपले आरोग्य गमावून बसत आहेत. तिशीच्या आत तो स्वर्गात आपली जागा करीत आहे. पूर्वीच्या लोकांचे जिवंत राहण्याचे सरासरी आयुष्य 100 वर्षे होते परंतु आजच्या लोकांचे वय 60 वर्षावर येऊन बसले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मधुमेह, कँसर यासारख्या रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. लोकांमध्ये एड्स विषयी जनजागृती निर्माण झाल्यानंतर या रोगाचे रुग्ण कमी झाले असले तरी पूर्णपणे संपले असे म्हणता येणार नाही. पोलियोसारख्या रोगांवर मात्र आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविले आहे. सन 1995 पासून भारतात दरवर्षी एकाच दिवशी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलियोचे दोन थेंब पाजवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळाले आहे. 
लोकांनी आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दिवसातून एक तास जरी दिले तरी आपले आरोग्य बिघडणार नाही. रोज सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चालणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतर काही करा किंवा न करा मात्र रोज अर्धा तास चालण्यासाठी द्या असे प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला सांगत असतात. आपल्या पूर्वजांनी देखील शरीराच्या तंदुरुस्ती साठी व्यायाम करण्याचे महत्व सांगितले आहे. त्याच अनुषंगाने करा योग रहा निरोग असे आयुर्वेदामधून रामदेवबाबा सांगतात. 
युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेकडून 07 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 07 एप्रिल 1948 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ 192 देशांचा सहभाग आहे. लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना म्हणजे केवळ रोग आणि त्यावरील उपाय इतक्यावरच मर्यादित न रहाता शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक व सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. या संघटनेची जगात सहा ठिकाणी कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात.  प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो,  त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, चित्रपट इत्यादी मार्फत त्याविषयाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाते. हे वर्ष जागतिक आरोग्य संघटनेने सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी देण्याचे घोषित केलं आहे. म्हणून आज जागतिक आरोग्य दिनी आपल्या आरोग्यासाठी रोज अर्धा तास चालण्याचा संकल्प करू या आणि निरोगी जीवन जगू या.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday 2 April 2018

कथा - हाताची जादू

हाताची जादू

एका कार्यक्रमात मित्राला एक छानशी भेट द्यायची होती. म्हणून मी एका दुकानात गेलो. तेथे अनेक छान छान वस्तू दिसत होत्या. सर्व वस्तू न्याहाळत न्याहाळत मी पुढे जात होतो. तेवढ्यात माझ्या पुढे एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, " नमस्कार सर, मला ओळखलंत का ? " 
मी त्याचा चेहरा पाहून आठवण करण्याचा प्रयत्न करीत होतो. पण नाव काही आठवत नव्हते. किती तरी मुलं आपल्या हाताखालून जातात. कोणाला कोणाला आठवण ठेवणार ? मी म्हणालो, " नाही, मी ओळखलो नाही. कोण रे तू ? तुझं गाव कोणतं ?" 
यावर तो म्हणाला," सर मी कृष्णा, काळा कृष्णा, आठवलं का ? माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरी आला होतात..." असे म्हटल्याबरोबर मला विजापूरचा शाळेतील तो कृष्णा आठवलं आणि मी आनंदी झालो. "अरे, किती दिवसांनी तुला पाहतोय, आणि तू इथे काय करतोस ? " 
यावर तो म्हणाला," सर, हे माझेच दुकान आहे." 
अरे व्वा ! छान आहे की, एवढं सर्व छान छान पेंटींग, डिझाईन, हे वस्तू कुठून आणतोस तू ?
यावर तो म्हणाला, "सर, हे विकत आणित नाही, हे मी स्वतः तयार करतो आणि हो तुमची तर मला म्हणाला होतात तुझ्या हातात जादू आहे. तुमची कृपा आहे सर्व म्हणून हे शक्य आहे. नाही तर आज मी काय राहिलो असतो ? हे माझे मलाच ठाऊक नाही." 
मला त्याच्या बोलण्याचा खूप आनंद वाटले. मला आवडलेली एक वस्तू घेतली आणि त्याची किंमत देऊ केली. पण कृष्णा घेण्यास अजिबात तयार होत नव्हता. पण पैसे नाही घेतले तर वस्तू घेणार नाही असे म्हटल्यावर त्याने ती रक्कम घेतली. ती वस्तू पोटाशी धरून मी कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडीत बसलो. खिडकीच्या बाहेर पळणारी झाडे पाहता पाहता मी त्या वीस वर्षांपूर्वीच्या विजापूरच्या प्राथमिक शाळेत जाऊन पोहोचलो.
माझी विजापूरच्या शाळेवर नुकतीच बदली झाली होती. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग होते. शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेत हजर झालो. मुख्याध्यापकानी मला तिसरा वर्ग शिकविण्यासाठी दिले. त्या वर्गात जेमतेम 20 मुले होती. वर्गाची हजेरी घेतली. एक एक मुलाची चाचपणी केली. त्या वर्गात दोन कृष्णा नावाची मुले होती. त्यापैकी एक कृष्णा उपस्थित होता तर दुसरा कृष्णा अनुपस्थित होता. त्याचे नाव आल्याबरोबर मुले ओरडू लागली " काळा कृष्णा काय येणार नाही." वर्गात सर्व मुले हजर, एक त्याला सोडून. असे दहा-बारा दिवस चालले. त्याच्या बाबतीत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता असे कळाले की, तो अभ्यास करत नाही, खोड्या करतो, मारामारी करतो, घरीच मातीशी खेळत राहतो आणि शाळेला येतच नाही. माझ्या मनात त्याला भेटण्याची इच्छा झाली. एके दिवशी वर्गातील मुले नि मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो.
घराच्या मागच्या बाजूला काळी मातीची चिखल तयार करण्यात आला होता आणि त्या चिखलाजवळ कृष्णा विविध वस्तू तयार करण्यात गर्क होता. त्याच्या आजूबाजूला मातीच्या अनेक वस्तू त्याने तयार केल्या होत्या. सर्व वस्तू हातात घेऊन पाहिले, खूप छान तयार केला होता. माझ्या सोबत आलेल्या मुलांनी कृष्णाला म्हणाले, " हे कृष्णा, तुला भेटायला नवीन सर आले आहेत."
मी त्याला माझ्या जवळ बोलावून घेतलो त्याचे नाव आणि प्राथमिक चौकशी केली. तू शाळेला का येत नाही ? म्हणून त्याला विचारले. 
तेंव्हा तो म्हणाला, " मला त्या शाळेत यायचे नाही. मला लिहिता येत नाही आणि वाचता देखील येत नाही.हे पोरे सारे मला चिडवतात. म्हणून मला शाळेला यावं वाटत नाही." 
"यापुढे तुला कोणी काही म्हणणार नाहीत, तू चल शाळेला." असे बोलून त्यास शाळेत सोबत घेऊन गेलो. जाताना त्याने मातीपासून तयार केलेले सर्व साहित्य नेलो. वर्गात गेल्या गेल्या त्याचे सर्व साहित्य मुलांना दाखवून त्याला शाबासकी दिली आणि यापुढे त्यास कोणी चिडवू नये याची सक्त सूचना केली. असेच दहा - बारा दिवस उलटले. एके दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत कृष्णाने काढलेले जंगलात चरत असलेली जनावरे आणि आजूबाजूचा निसर्गाच्या सुंदर चित्राने शाळेतून पहिला क्रमांक मिळाले. त्याचे चित्र शाळेत दर्शनी भागावर लावण्यात आले. त्याला खूप अभिमान वाटू लागला. बाहेर येता जाता तो चित्र जागेवर आहे किंवा नाही हे पाहू लागला. तो एक उत्तम चित्रकार होता, त्याच्या हातात जादू होती, हे मी ओळखलं आणि त्याला त्या क्षेत्रात हवी ती मदत करीत राहिलो. बोर्डावर विविध प्रकारचे चित्र त्याच्या हातून काढून घेऊ लागलो. त्याला शाळेची गोडी लागली. सुट्टीच्या दिवशी त्याला करमत नव्हते. तो सदा कामात गर्क असे. चित्रकलेच्या माध्यमातून त्याला वाचनाकडे घेऊन गेलो. आत्ता त्याला हळूहळू वाचता आणि लिहिता देखील येऊ लागले होते. तो पाचवी पास झाला आणि दुसऱ्या शाळेत त्याला जावे लागले. कारण विजापूरच्या शाळेत सहावा वर्ग नव्हता. खूप जड अंतकरणाने आम्ही त्याला निरोप दिला. त्याचे ही डोळे पाणावले होते. जाता जाता त्याला एकच सल्ला दिला होता की, " तुझ्या हातात जादू आहे त्याचा योग्य वापर कर, जीवनात तू नक्की यशस्वी होशील." हेच लक्षात ठेवून कृष्णाने आज खूप प्रगती केली. कोणी ही त्याच्या दुकानात आल्यावर एक तासभर तरी नुसते चित्र पाहतच राहतात. नको असताना देखील त्याचे चित्र विकत घेतात. आज तो आपल्या ठिकाणी सुखी आहे हे ऐकून आणि पाहून मला देखील परमोच्च आनंद होतो. जगात असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या हातात जादू आहे फक्त गरज आहे ती त्यांना त्यांच्या कलेची जाणीव करून द्यायची. जो स्वतःच्या अंतरंगातील गुण ओळखतो तोच पुढे प्रगती करू शकतो.

नागोराव सा. येवतीकर

( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

मुलांनो, आपणास जर कोणी तू असा आहेस किंवा तू तसा आहेस ? अशी दोष दाखवणारी वाक्ये ऐकविली की, आपणाला समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो. आपल्या गुणांची प्रशंसा किंवा तारीफ केली की आपला आनंद गगनात मावेनासा होतो, हे साहजिकच आहे. मात्र जर कोणी आपल्यातील दोष दाखवत असतील तर त्यांना आपण धन्यवाद म्हटले पाहिजे. कारण त्यानिमित्ताने आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न तरी करतो. डेल कार्नेगी हा प्रसिद्ध तत्त्वज्ञानी म्हणतो की, 99 टक्के लोक असे असतात की स्वतःचा दोष किंवा स्वतःची चूक कबूल करायला ते तयार नसतात. म्हणून त्यांच्यातील ते दोष कधीच घालवू शकत नाहीत. आरशावर जेव्हा धूळ साचते तेव्हा त्याच्यावरून हात फिरवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरशावरील धूळ जात नाही आणि आपली प्रतिमा चांगली दिसत नाही. घरामध्ये वावरत असताना आई-वडील भाऊ-बहीण हे आपल्याला आपल्यात असलेले दोष दाखवितात तर शाळेत गुरुजींकडून हे काम होते. लहान असताना प्रत्येकजण आपल्यातील गुणदोषांचे विवेचन करतात. मात्र आपण मोठे झाल्यावर, कळते झाल्यावर आपणाला मग कोणी याविषयी बोलत नाही. विशेषकरून शाळेतील शिक्षकांकडून आपल्यातील दोष, उणीवा व कमतरता स्पष्टपणे कळाल्या तर त्यांच्याकडून मिळालेली दोष दूर करण्याचे उपाय व त्यावरील मार्गदर्शनसुद्धा फारच मोलाचे ठरते. ब्रुयर यांनी म्हटल्याप्रमाणे हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे परंतु एक दोष दूर करणे फार कठीण आहे. म्हणूनच शालेय वयात सर्व दोष दूर कसे करता येतील ? या विचाराने वागत राहिल्यास आपल्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते. आपल्याकडे भरपूर गुण असून सुद्धा एका अवगुणामुळे आपली प्रगती खुंटते. समाजात मान-सन्मान मिळत नाही. एवढेच काय कधीकधी नोकरीसुद्धा मिळत नाही. जेव्हा लोक आपल्या बाबतीत त्यांची सर्व गुण चांगले आहेत मात्र एकच अवगुण आहे, असे बोलतात तेव्हा मन उदास होते. म्हणूनच फ्रेंकलिन म्हणतो की, आपल्या मृत्यूपूर्वी स्वतःचे दोष नष्ट करा म्हणजेच आपण सगळ्यांच्या स्मरणात राहू. तसे पाहिले तर जगात भगवंताशिवाय परिपूर्ण असा कोणीच नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष, उणीवा किंवा कमतरता नक्कीच असते. अजून एक बाब आपण नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे इतरांचे दोष दाखविताना ते दोष आपल्यात नाहीत ना ! याचे आत्मपरीक्षण करून जाणून घ्यावे. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे आपली अवस्था होऊ शकते.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...