हाताची जादू
एका कार्यक्रमात मित्राला एक छानशी भेट द्यायची होती. म्हणून मी एका दुकानात गेलो. तेथे अनेक छान छान वस्तू दिसत होत्या. सर्व वस्तू न्याहाळत न्याहाळत मी पुढे जात होतो. तेवढ्यात माझ्या पुढे एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, " नमस्कार सर, मला ओळखलंत का ? "
मी त्याचा चेहरा पाहून आठवण करण्याचा प्रयत्न करीत होतो. पण नाव काही आठवत नव्हते. किती तरी मुलं आपल्या हाताखालून जातात. कोणाला कोणाला आठवण ठेवणार ? मी म्हणालो, " नाही, मी ओळखलो नाही. कोण रे तू ? तुझं गाव कोणतं ?"
यावर तो म्हणाला," सर मी कृष्णा, काळा कृष्णा, आठवलं का ? माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरी आला होतात..." असे म्हटल्याबरोबर मला विजापूरचा शाळेतील तो कृष्णा आठवलं आणि मी आनंदी झालो. "अरे, किती दिवसांनी तुला पाहतोय, आणि तू इथे काय करतोस ? "
यावर तो म्हणाला," सर, हे माझेच दुकान आहे."
अरे व्वा ! छान आहे की, एवढं सर्व छान छान पेंटींग, डिझाईन, हे वस्तू कुठून आणतोस तू ?
यावर तो म्हणाला, "सर, हे विकत आणित नाही, हे मी स्वतः तयार करतो आणि हो तुमची तर मला म्हणाला होतात तुझ्या हातात जादू आहे. तुमची कृपा आहे सर्व म्हणून हे शक्य आहे. नाही तर आज मी काय राहिलो असतो ? हे माझे मलाच ठाऊक नाही."
मला त्याच्या बोलण्याचा खूप आनंद वाटले. मला आवडलेली एक वस्तू घेतली आणि त्याची किंमत देऊ केली. पण कृष्णा घेण्यास अजिबात तयार होत नव्हता. पण पैसे नाही घेतले तर वस्तू घेणार नाही असे म्हटल्यावर त्याने ती रक्कम घेतली. ती वस्तू पोटाशी धरून मी कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडीत बसलो. खिडकीच्या बाहेर पळणारी झाडे पाहता पाहता मी त्या वीस वर्षांपूर्वीच्या विजापूरच्या प्राथमिक शाळेत जाऊन पोहोचलो.
माझी विजापूरच्या शाळेवर नुकतीच बदली झाली होती. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग होते. शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेत हजर झालो. मुख्याध्यापकानी मला तिसरा वर्ग शिकविण्यासाठी दिले. त्या वर्गात जेमतेम 20 मुले होती. वर्गाची हजेरी घेतली. एक एक मुलाची चाचपणी केली. त्या वर्गात दोन कृष्णा नावाची मुले होती. त्यापैकी एक कृष्णा उपस्थित होता तर दुसरा कृष्णा अनुपस्थित होता. त्याचे नाव आल्याबरोबर मुले ओरडू लागली " काळा कृष्णा काय येणार नाही." वर्गात सर्व मुले हजर, एक त्याला सोडून. असे दहा-बारा दिवस चालले. त्याच्या बाबतीत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता असे कळाले की, तो अभ्यास करत नाही, खोड्या करतो, मारामारी करतो, घरीच मातीशी खेळत राहतो आणि शाळेला येतच नाही. माझ्या मनात त्याला भेटण्याची इच्छा झाली. एके दिवशी वर्गातील मुले नि मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो.
घराच्या मागच्या बाजूला काळी मातीची चिखल तयार करण्यात आला होता आणि त्या चिखलाजवळ कृष्णा विविध वस्तू तयार करण्यात गर्क होता. त्याच्या आजूबाजूला मातीच्या अनेक वस्तू त्याने तयार केल्या होत्या. सर्व वस्तू हातात घेऊन पाहिले, खूप छान तयार केला होता. माझ्या सोबत आलेल्या मुलांनी कृष्णाला म्हणाले, " हे कृष्णा, तुला भेटायला नवीन सर आले आहेत."
मी त्याला माझ्या जवळ बोलावून घेतलो त्याचे नाव आणि प्राथमिक चौकशी केली. तू शाळेला का येत नाही ? म्हणून त्याला विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " मला त्या शाळेत यायचे नाही. मला लिहिता येत नाही आणि वाचता देखील येत नाही.हे पोरे सारे मला चिडवतात. म्हणून मला शाळेला यावं वाटत नाही."
"यापुढे तुला कोणी काही म्हणणार नाहीत, तू चल शाळेला." असे बोलून त्यास शाळेत सोबत घेऊन गेलो. जाताना त्याने मातीपासून तयार केलेले सर्व साहित्य नेलो. वर्गात गेल्या गेल्या त्याचे सर्व साहित्य मुलांना दाखवून त्याला शाबासकी दिली आणि यापुढे त्यास कोणी चिडवू नये याची सक्त सूचना केली. असेच दहा - बारा दिवस उलटले. एके दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत कृष्णाने काढलेले जंगलात चरत असलेली जनावरे आणि आजूबाजूचा निसर्गाच्या सुंदर चित्राने शाळेतून पहिला क्रमांक मिळाले. त्याचे चित्र शाळेत दर्शनी भागावर लावण्यात आले. त्याला खूप अभिमान वाटू लागला. बाहेर येता जाता तो चित्र जागेवर आहे किंवा नाही हे पाहू लागला. तो एक उत्तम चित्रकार होता, त्याच्या हातात जादू होती, हे मी ओळखलं आणि त्याला त्या क्षेत्रात हवी ती मदत करीत राहिलो. बोर्डावर विविध प्रकारचे चित्र त्याच्या हातून काढून घेऊ लागलो. त्याला शाळेची गोडी लागली. सुट्टीच्या दिवशी त्याला करमत नव्हते. तो सदा कामात गर्क असे. चित्रकलेच्या माध्यमातून त्याला वाचनाकडे घेऊन गेलो. आत्ता त्याला हळूहळू वाचता आणि लिहिता देखील येऊ लागले होते. तो पाचवी पास झाला आणि दुसऱ्या शाळेत त्याला जावे लागले. कारण विजापूरच्या शाळेत सहावा वर्ग नव्हता. खूप जड अंतकरणाने आम्ही त्याला निरोप दिला. त्याचे ही डोळे पाणावले होते. जाता जाता त्याला एकच सल्ला दिला होता की, " तुझ्या हातात जादू आहे त्याचा योग्य वापर कर, जीवनात तू नक्की यशस्वी होशील." हेच लक्षात ठेवून कृष्णाने आज खूप प्रगती केली. कोणी ही त्याच्या दुकानात आल्यावर एक तासभर तरी नुसते चित्र पाहतच राहतात. नको असताना देखील त्याचे चित्र विकत घेतात. आज तो आपल्या ठिकाणी सुखी आहे हे ऐकून आणि पाहून मला देखील परमोच्च आनंद होतो. जगात असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या हातात जादू आहे फक्त गरज आहे ती त्यांना त्यांच्या कलेची जाणीव करून द्यायची. जो स्वतःच्या अंतरंगातील गुण ओळखतो तोच पुढे प्रगती करू शकतो.
नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment