Thursday 28 April 2016



सार्वत्रिक बदल्या आवश्यक : कही खुशी कही गम

बदल हा संसाराचा नियम असतो. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा मग पुन्हा पावसाळा हा निसर्ग नियम जर मोडीत निघाले तर पर्यावरण चक्र सुध्दा बिघडते. अर्थातच मानवी जीवनासह पशू पक्षी वेली, वृक्ष यांचे ही जीवन संकटात पडते. त्यामूळे ज्या क्रिया जेव्हा घडायाला पाहिजे त्याच वेळेला घडत राहिले तर सर्व काही योग्य होत राहते. हे बदल आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले सार्वत्रिक बदल्या. तसेच एप्रिल आणि मे महिना उजाडला की सर्वत्र कर्मचाऱ्याचा बदलीचा प्रश्न सर्वांच्या मनात चर्चिले जाते. बदल्या होणार की नाही, झाल्या तर किती टक्के होणार, प्रशासकीय होतील काय, कोणत्या नियमानुसार होतील या सारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. जिल्हा परिषद मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतात मात्र सर्वांचे लक्ष शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वात जास्त लागून असते. दरवर्षी एप्रिल महीना उजाडला की शिक्षकाच्या बदल्याच्या चर्चेला प्रारंभ होते आणि मे महीना संपेपर्यंत हे चर्चेचे गु-हाळ चालूच राहते. सन 2013 या वर्षापासून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्याची बदली करणे हा काही जनांना क्लेशदायक वाटत असते तर काही जनांना आनंद देणारी वाटते. जे मूळ गावापासून खूप दूर अंतरावर काम करीत आहेत त्यांना आपल्या गावाकडे परत येण्याचे वेध लागलेले असतात. जे शिक्षक शहरापासून 20- 25 किमी दूर अंतरावर खेड्यात, वाडी वस्त्या पाडी तांड्यावर काम करीत आहेत त्यांना शहरांजवळ किंवा सोईस्कर शाळा मिळावी असे वाटते त्यात त्याचे काय चुकले. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी भागात काम करणारे किती वर्ष अजून तेथेच खितपत पडावे ? त्यांना सुध्दा या भागात काम करण्याची ओढ लागलेली असते. ही मंडळी बदली प्रक्रियेची चातक पक्ष्यांसारखे वाट पाहत असतात. 
बदली प्रत्येकाना हवीहवीशी वाटत नाही. जे आज सुखात आहेत त्यांना बदली कधीच होऊ नये असे वाटते. कारण त्यांचे सर्व काही सुखात, मजेत आणि आनंदात चाललेले असते. मात्र जे दुःखात, कष्टात काम करीत आहेत त्यांना बदल्या हे एक सुखाचा आशेचा किरण वाटतो. नेमके त्यांच्या आनंदावर बदल्या न करता विरजन टाकल्या जाते. आदिवासी तालुक्यांत काम करणारा आमचा शिक्षक मित्र गेल्या पाच वर्षापासून मूळ तालुक्यांत बदली मिळविण्यासाठी खूप धडपड केली. पण दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने त्याची बदली काही झाली नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नौकरी केली आणि अचानक एके दिवशी आमच्या सर्वामधुन निघून गेला, त्याची मूळ तालुक्यात येऊन नौकरी करण्याचे स्वप्नं स्वप्नच राहिले. घरापासून दूर नौकरी करीत असलेली मंडळी कौटुंबिक सूखापासून वंचित राहतात. त्यांचे मानसिक समाधान नसते. अशी मंडळी शारीरिक बाजूने सुध्दा खचलेली असतात. मग शाळेत परिणामकारक अध्यापन करू शकतील काय ? या समस्येवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आणि प्रशासन अजिबात विचार करताना दिसत नाही, यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरत आहे. यामूळे प्रगत महाराष्ट्र चे स्वप्न खरोखरच पूर्णत्वास जाईल काय ? अशी शंका सुध्दा राहून राहून मनात येत राहते. 
कधी समायोजन झाले नाही म्हणून बदल्या रद्द होतात तर कधी पदोन्नती झाली नाही म्हणून बदल्या रद्द केल्या जातात. बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. मात्र दरवर्षी या हक्कांवर या ना त्या कारणांमुळे गदा आणली जाते आणि बदल्याची प्रक्रिया रेंगाळते. खरोखरच समायोजन किंवा पदोन्नती करण्याचे काम कोणाचे आहे ? या कारणांमुळे बदली झाली नसल्यास किंवा रद्द करावे लागल्यास यांत शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या प्रक्रियेतील दोषी व्यक्तींना जबाबदार धरण्यात येऊन प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याशिवाय हे समायोजन आणि पदोन्नतीचा प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, त्यामूळे वर्षानुवर्षे समायोजन आणि पदोन्नती असेच रखडल्या जातात. पात्र शिक्षक दरवर्षी यापासून वंचित राहतात. यावर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे अत्यंत गरजेचे आहे, असे वाटते. दोष कुणाचा आणि त्याची सजा कुणाला याचा शिक्षक संघटनानी एकत्र येऊन विचार करायला हवे. यावर्षी सार्वत्रिक बदल्या व्ह्ययल्याच पाहिजे त्यातल्या त्यात शिक्षकाच्या बदल्या झाल्याच पाहिजे यावर भर दिला पाहिजे. आज कित्येक शिक्षक मंडळी या बदल्याच्या प्रक्रियेवर आपली पुढील आशा स्वप्नं रंगवून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याना त्यांच्या सोइच्या जागी बदली होणे, त्यांच्या कार्याची गती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. मनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी, शिक्षकामध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी बदल्या आवश्यक आहेत. या सार्वत्रिक बदल्याचा कर्मचाऱ्यात कही खुशी कही गम असे दिसून येईल यांत शंका नाही. मात्र बदल्या झाल्याच पाहिजे, बदल्या झाल्या तरच महाराष्ट्र पूर्णपणे प्रगत होण्यास मदतच होईल असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद

Monday 25 April 2016





महराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून नियमित स्तंभलेखन करणारे नागोराव सा. येवतीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे वर्गमित्र संतोष कंदेवार यांनी घेतलेला त्यांच्या कार्याचा लेखाजोखा

* पत्र लेखन ते स्तंभलेखन चा प्रवास *

गेल्या 20 ते 22 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात सातत्याने नियमितपणे सामाजिक, कौटुंबिक, आणि शैक्षणिक क्षेत्रावर आधारित स्तंभलेखन करणारे, सोशल मीडिया मध्ये नासा या टोपणनावाने सुप्रसिद्ध असलेले प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर यांचा आज 40 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा लेखाजोखा.नासा यांचा जन्म 26 एप्रिल 1976 रोजी आंध्र आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमारेषेवरील " येवती " या छोट्याशा गावांत झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते तर आई घर कामाकडे लक्ष देत असे. तसे पाहिले तर त्यांचा छोटा परिवार दोन भाऊ आणि दोन बहिणी. परिवारात ते शेवटचे, त्यामूळे आई वडील बहीण भाऊ या सर्वांचेच लाडके म्हणण्यास हरकत नाही. घरात कोणत्याच वस्तुची चणचण भासत नव्हती. सर्व काही आनंदात होते. त्यांची मातृभाषा तेलगु असून ही त्यांनी मराठी भाषेकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी भाषेवर विशेष प्रभुत्व मिळविले आहे. त्याचमुळे ते आज या क्षेत्रात काही तरी नवीन करून दाखवू शकतात. वास्तविक पाहता त्यांच्या घरात किंवा गावात कोणी साहित्यिक वा लेखक झाले नाहीत. पण शालेय जीवनातील विविध अनुभवाच्या आधारावर त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असे आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण येवती येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले तर माध्यमिक शिक्षण धर्माबादच्या हुतात्मा पानसरे हायस्कूल मध्ये झाले. पानसरे शाळेत शिकत असताना येथील काही चांगल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. सु्रुवात फक्त 10 ओळी लिहिण्याने झाली. इयत्ता दहावी वर्गात शिकत असताना त्यांच्या नावावर पहिला लेख प्रकाशित झाला त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याठिकाणी जी प्रेरणा मिळाली ती आजतागायत चालूच आहे. आज ते विविध विषयावर अभ्यासपूर्ण आणि वैचारिक लेख लिहून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात. नांदेडच्या यशवंत महाविद्यालय मध्ये त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षक पूर्ण केले. येथील प्रा. जगदीश कदम यांच्या मराठी विषयांच्या शिकवणीमुळे त्यांच्या लेखनकलेला एक नवी दिशा मिळाली.  गेल्या 20 - 22 वर्षांमध्ये त्यांनी भरपूर लेखन केलेले असल्यामुळे वृतपत्राच्या क्षेत्रात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतल्या जाते. एवढे असूनही ते आपल्या व्यवसायाशी कधीही प्रतारणा केली नाही. जिल्हा परिषदमध्ये सन 1998 मध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर माहूर तालुक्यात पाच वर्षे सेवा करून सन 2003 मध्ये धर्माबाद तालुक्यांत आपल्या स्वतःच्या तालुक्यांत परतले. विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताईत बनण्यासारखे त्यांचे काम शाळेवर असते असे त्यांचे सहकारी तर सांगतातच याशिवाय गावातील लोकं सुध्दा त्यांच्याविषयी असेच उद्गार काढतात यावरून त्यांची शैक्षणिक क्षेत्रांतील कामगिरी समजून येते. प्रत्येक विषयांचा अभ्यास असल्यामूळे प्रशासकीय बाजू सुध्दा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळतात त्यामूळे अधिकारी वर्गाशी ही त्यांचा संबंध खूपच चांगले आणि विश्वासपात्र असे आहे. सर्वांशी प्रेमाने वागणे आणि बोलणे या त्यांच्या वैशिष्ट्यमुळे त्यांनी आजपर्यंत एक ही मित्र तोडले नाही तर जोडतच गेले. आज त्यांचा मित्र परिवार आणि संपर्क पाहिले तर ते लक्षात येते. गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळेच त्यांची साद माणुसकीची संपत्ती सहयोग ते संपत्ती दान या अभियानाचे लातूर विभाग समन्वयक म्हणून नियुक्तीकरण्यात आली 
*त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जे काही कार्य करीत राहिले ते पुरस्कार मिळावे या उद्देशाने अजिबात केले नाही. परंतु त्यांचे कार्यच असे होते की पुरस्कार त्यांच्याकडे धावत आले.1996 मध्ये ज्यावेळी ते बाराव्या वर्गात शिकत होते त्यावेळी त्यांनी मुंबई नागरिक नशाबंदी सप्ताह समिती कडून पोस्ट कार्ड स्पर्धेत सहभाग घेतले आणि त्यांना महात्मा गांधीजी च्या जयंती निमित्ताने गुणगौरवार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था राज्य साधन केंद्र औरंगाबाद साहित्य निर्मिती विभागाकडुन अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय लेखक शिबिरात आणि उदगीर येथील नवसाक्षर साहित्य निर्मिती शिबिरात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची लेखनकला विकसित होण्यास सु्रुवात झाली. सन 2007 मध्ये अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई यांचेकडून उत्कृष्ट लेखनाबद्दल प्रसिद्ध लेखिका श्रीमती विजया वाड यांच्या हस्ते राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या जीवनात पुन्हा एक टर्निंग पॉइंट आला ते म्हणजे सन 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आयोजित जीवन शिक्षण लेखन कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातून त्यांना सहभागी होण्याची नामी संधी मिळाली. त्या शिबिरात त्यांना लेखनाचे अनेक प्रकारचे मार्गदर्शन नामवंत लेखक मंडळीकडून मिळाले, जसे कवी विठ्ठल वाघ, माधव राजगुरु, रा. ग. जाधव इत्यादी ज्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. याच शिबिराचा पहिला परिणामकारक फायदा सन 2009 मध्ये दिसून आला. यावर्षीच्या 08 मे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्तनांदेडच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह प्रदान करण्यात आले.पुण्याच्या जीवन शिक्षण प्रणाली तर्फे आयोजीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यानी सहभाग घेतला.प्रशासनाने यांच्या कार्याची दखल घेऊन डिसेंबर 2014 मध्ये पंचायत समिती धर्माबाद कार्यालयाने गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालूच आहे. जानेवारी 2015 मध्ये घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत पहिल्या शंभरा त स्थान मिळाल्यामुळे त्यांना 2000 रू. ची ग्रंथ भेट मंडळाकडुन देण्यात आली.आणि नुकतेच ऑक्टोबर 2015 मध्ये डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना  उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यासाठी सुध्दा त्यांची नेहमीच धडपड चालूच असते. याच धडपडीतून त्यांनीशाळेत विद्यार्थ्याना सोपे वाटावे म्हणून " प्रश्न आमचे अन् उत्तर ही आमचे ह्या राबविलेल्या उपक्रमाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर  मिळालेच शिवाय त्या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते यवतमाळ येथे त्यांची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असे " पाऊलवाट " नावाचे पुस्तक जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ते " संवेदना - मनामनातील " या दुसऱ्या पुस्तकाच्या निर्मिती साठी प्रयत्न करीत आहेत.लहान मुलांसाठी विविध प्रकारची कोडे तयार करणे आणि मुलाकडुन ते सोडवून घेतात त्यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होते.सोशल मीडियात सुध्दा यांचा वावर लक्ष वेधून घेणारी असते. फेसबुक, whatsapp, ट्विटर आणि हाइक यासारखी सोशल मीडिया मध्ये जनतेला उपयुक्त असेल अशीच माहिती ते पोस्ट करतात. रोज सकाळी 7 वाजता पोस्ट होणारी फ्रेश मॉर्निंग बुलेटीनची सोशल मीडियातील माणसे चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत बसतात. एखाद्या दिवशी बुलेटीन पोस्ट झाली नाही तर लोकं त्यांना प्रश्न विचारून तंग करतात. आज त्यांची ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून शालेय मुलांना डोळ्यासमोर ठेवून केलेले हे उपक्रम आत्ता अत्यावश्यक बनले आहे. याशिवाय लोकाना वाचण्याची गोडी लागावी म्हणून विविध ग्रुप च्या माध्यमातून वैचारिक लेख, कविता, चारोळी इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून त्यांची माहिती सर्व लोकाना कळावी यांसाठी तेwww.nasayeotikar.blogspot.com या वेबसाईटवर प्रकाशित करीत असतात.अश्या या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या नासा येवतीकर यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अजून नवनवीन साहित्य निर्मिती होवो, उज्वल भविष्य घडविणारी विद्यार्थी तयार होवो आणि दूसरे पुस्तक लवकरच वाचकास वाचण्यासाठी मिळो हीच यानिमित्ताने प्रेमपूर्वक सदिच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नासा येवतीकर यांना 09423625769 या क्रमांकावर शुभेच्छा द्या.

शब्दांकन - संतोष कंदेवार, मुख्य लेखाधिकारी
नांदेड - वाघाळा महानगरपालिका

             


पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...