Sunday 15 April 2018

बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?

बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?

दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडले त्यावेळी संपूर्ण देशातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. कँडल मार्च देखील काढण्यात आला. यातील दोषींना फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली. एवढ्या सगळ्या प्रकरणातून लोकांनी काही तरी बोध किंवा शिकवण घेणे अपेक्षित होते मात्र सध्या जे घडत आहे ते पूर्ण उलट घडत आहे. दिवसेंदिवस बलात्काराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. कुठे तरी काही तरी चुकत आहे, ज्यामुळे असे प्रकार घडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून यात वाढ झालेली दिसून येत आहे कारण आहे या सोशल मीडियाचा. तळहातावर असलेल्या मोबाईलने सर्वांना अक्षरशः वेडे करून टाकले आहे. काही मंडळी याचा चांगला उपयोग करतात तर काही याचा वाईट उपयोग करतात. चांगल्या कामासाठी याचा वापर केल्यास मोबाईल हे मानवाला मिळालेली एक अमूल्य देणगी होईल. मात्र त्याचा वाईट वापर केल्यास तो जीवन विनाशक आहे. लोकं याचा वाईट वापर कसे करतात ? ज्यावेळी मोबाईल नव्हता तेंव्हा लोकांच्या मनात जरी आले की एखादे अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाहावे तरी ते पाहू शकत नव्हते. एखाद्या सिनेमागृहात गेल्याशिवाय कोणालाही कोठे ही ते पाहायला मिळत नव्हते. बहुतांश वेळा तर ब्ल्यू चित्रपट पाहताना पोलिसांची धाड अश्या बातम्या वाचण्यास मिळत होत्या. ते आत्ता वाचायला मिळते का ? नाही. म्हणजे लोकं अश्लील व्हिडिओ पाहणे बंद केले आहेत असा त्याचा अर्थ निघतो काय ? मोबाईलमुळे लोकांना आता पॉर्न चित्रपट पाहण्यासाठी कोणत्या चित्रपटगृहात जाण्याची आवश्यकता नाही. सर्व काही पाच इंची मोबाईलवर उपलब्ध होत आहे. पॉर्न व्हिडिओ आणि अश्लील फोटो पाहून ही मंडळी उत्तेजित होत आहेत. त्याचमुळे हे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, असे वाटते. आपली लैंगिक भूक शमविण्यासाठी माणूस कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो हे नुकतेच झालेले प्रकरण पाहून तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. या कृत्यामुळे आपले भविष्य काय असणार आहे आणि त्या निष्पाप जीवाचे काय होणार याचा अजिबात विचार न करता ही मंडळी वागत असतात. याचसोबत कुटुंबातील मुलांवर होणारे संस्कार कुठे तरी कमी पडत आहेत. पूर्वी जे एकत्रित कुटुंब पद्धत होती ज्यात घरात आई बाबा सोडून इतर बरीच मंडळी राहत असत, ज्यामुळे त्या मुलांवर नकळत बरेच संस्कार होत असत. मात्र आजची कुटुंब पद्धत ही विभक्त झाली असून नवरा बायको आणि दोन मुलं एवढेच त्यांचे विश्व झाले आहे. एकत्रित कुटुंबात वावरताना होणारे संस्कार कमी झालेत. मुलांमध्ये सहकार्याची भावना किंवा इतरांना मान सन्मान देणे यासारख्या नैतिक गोष्टीपासून दूर गेले आहेत. आई वडील दोघे ही काम करणारे किंवा नोकरी करणारे असतील तर या मुलांची देखभाल व्यवस्थित होईल काय ? याबाबत मनात शंका निर्माण होते. ही मुले दिवसभर काय करतात ? काय पाहतात ? याची माहिती पालकांनी दर दहा दिवसांनी घ्यायला हवी पण घेतल्या जात नाही. पालकांचा मुलांवर अजिबात धाक राहिला नाही तसेच मुलांचे अति लाड यामुळे देखील बरीच मुले वाया गेली आहेत आणि जात आहेत. मुलगी घराबाहेर राहणे प्रत्येक माता पित्याला आज फार मोठी काळजीचा विषय बनले आहे. असे काही प्रकरण घडताना दिसत आहेत की, मुलगी कोठे ही सुरक्षित वाटत नाही.  शेजारपाजारच्या लोकांवर विश्वास ठेवणे देखील अवघड झाले आहे. विद्यादानाचे ज्या ठिकाणी पवित्र कार्य केल्या जाते अश्या शाळेत देखील अधूनमधून आशा घटना वाचायला येतात तेंव्हा मुलगी येथे ही सुरक्षित नाही, याची अजून काळजी वाढते. भारत देश मुलींसाठी सुरक्षित नाही असेच काहीसे चित्र जगात पसरत चालले आहे जे की, भारताच्या विकासासाठी घातक आहे. म्हणून भारत सरकारने सर्वप्रथम पॉर्नच्या सर्व साईटवर कायमची बंदी घालावी. कसल्याच प्रकारची हयगय न करता सोशल मीडियामध्ये जर कोणी तशी काही हरकत केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून कोणी तशी हरकत करणार नाही. त्याच सोबत पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करीत त्यांच्या हातात स्मार्ट मोबाईल नावाची वस्तू अजिबात देऊ नये. मुलांच्या भावना उत्तेजित करणाऱ्या बाबीपासून त्यांना दूर ठेवणे हा एकमेव पर्याय सध्या तरी आपल्यासमोर दिसत आहे.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...