Friday 26 February 2016

+91 96730 60762‬
🎤🔴 आग्रहाचे निमंञण 🔴🎤

🔘शिक्षक साहित्य संघ (महा राज्य)
शाखा दारव्हा जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित

        दि २७ फेब्रुवारी २०१६ मराठी राजभाषा दिना निमित्य "काव्य मैफिलीचे" आयोजन करण्यात आले आहे.

♦कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा. श्री प्रकाशजी मुथा (सामाजिक कार्यकर्ते)

♦प्रमुख अतिथी-
🔹श्री ना.म. जवळकर (माजी प्राचार्य)
🔹श्री गजानन जिरापूरे (अध्यक्ष नगर वाचनालय दारव्हा)
🔹श्री किशोर तळोकार (जिल्हाध्यक्ष शि.सा.संघ यवतमाळ)

🔶दिनांक-  २७ फेब्रुवारी २०१६ (शनिवार)
🔶स्थळ- जिजामाता कन्या शाळा, आर्णि रोड दारव्हा
🔶वेळ- दु. १२.३०

                ⚪आयोजक⚪
🔹अनिल भगत (सचिव)
🔹सुहास राऊत (कार्याध्यक्ष)
🔹महादेव निमकर(अध्यक्ष)


सर्व दारव्हा शाखा पदाधिकारी व सभासद

     करिता शिक्षक साहित्य संघाच्या सर्व पदाधिकारी व सभासदांना सस्नेह निमंञण

🔴टिप. नवोदित कविंना आपले काव्य सादरीकरणासाठी सहभागी होता येईल.

👉🏼संपर्क-
श्री अनिल भगत 📞९४२३७६१७५१
श्री सुहास राऊत 📞९९२२८७४६०६
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
 ‪+91 88797 63591‬
 l| मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
🌹।। माझी माय ही मराठी ।।🌹
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
स्वर्गे अमृताची गोडी..
चाखून पहा ना थोडी..
वाहे फुलांची परडी..
माझी माय ही मराठी....!!

किती सुंदर वलय..
जसे देवाचे आलय..
झुले सह्याद्री मलय..
माझी माय ही मराठी....!!

किती सांगावी महती..
राकट रांगडी माती..
खेड्यापाड्यातली नाती..
माझी माय ही मराठी....!!

जशी दुधातली साय..
तशी मऊ माझी माय..
तिचे वंदितो मी पाय..
माझी माय ही मराठी....!!
********सुनिल पवार......
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
+91 94044 64814‬
🙏माय मराठी 🙏

पान्हा अविट पाजते,माझी माय मराठी,
टाळ मृदुंगी गूंजते,माझी माय मराठी....

सहते हजार घावा,ढाल होऊनी लढण्या,
वाघ बळाने शौर्य गर्जते,माझी माय मराठी....

ओठी मधाळ सरिता,हाती भगवदगीता,
संस्काराचे पाठ शिकवते,माझी माय मराठी...

काट्या तुन फुलुनी,राहते गुलाब छंदी,
नाजुक फुलातून हसते,माझी माय मराठी...

घालुनी हिरवा शालू,भरी मळवट कपाळी,
लावण्य खणी साजते,माझी माय मराठी....


करते कधी न त्रागा,जपते शील शांती,
सुशील होऊन नांदते,माझी माय मराठी....

पडतील अपुरे शब्द,
थोरवी वर्णवाया,
नस नसात वाहते,माझी माय मराठी.....
🙏जय महाराष्ट्र🙏
सारिका बकवाड
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
+91 97630 76725‬
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी प्रेमीना हार्दिक हार्दिक शुभेच्छा …।

मराठी भाषेचे किती कौतुक करावे
सौंदर्यवतीस जसे अलंकाराने भरावे

निसर्गाने दिले तिला सौंदर्याचे लेणे
लाजून मुरडून घेतात स्त्रिया उखाणे

असती एका एका शब्दाचे अर्थ अनेक
सर्व भाषांची माउली माझी मराठी नेक

देते मराठीच मिळवून तुम्हा खरा मान
तिच्यामुळेच होतो महाराष्ट्राचा सन्मान

मराठीमुळे टिकला आमचा वारकरी पंथ
दिले तिने आम्हा तुकाराम,ज्ञानोबा संत

शब्दांकुर…….
९७६३०७६७२५
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
Aravind Kulakarni a"nagar
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय?

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
 ‪+91 98505 90374‬
 मराठी आमची शान
मराठी आमचा मान
आमच्याच महाराष्ट्रात
मराठी होतीये घान

मराठी आमची माती
मराठी आमची नाती
एकाच नाळीच्या
हजार आहेत जाती

मराठी आमची माय
मराठी दुधाची साय
मराठी दुर्गावरती
भगवा फडकत हाय

मराठी आमच रक्त
मराठीचे आम्ही भक्त
मरेपर्यंत आम्ही
मराठी रहनार फक्त

          निखिल स. जगताप
          मो. नं.9850590374
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
 ‪+91 88067 02499‬
मराठी राजभाषा दिना निमित्त

📚📜||माय मराठी||🎭🗻

अंतरीचे बोल मराठी
केवढे अनमोल मराठी

अक्षरांची सुंदर नक्षी
माणिका सम गोल मराठी

मान माझा मान तुझा की
नांदते समतोल मराठी

उंच सह्याद्रीच्या ओठी
सोनियासम तोल मराठी

स्नेह संवादाने गाजे
अभिनयाचे रोल मराठी

शब्द सुमनांचा गंध अता
पाकळयांनी खोल मराठी

चौघडे लेझीम तुतारी
बोलती ढोल मराठी

मायभूची माया ममता
ठेवते हे ओल मराठी
✒मिलिंद इंगळे    8806702499
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
 ‪+91 98207 58823‬
 माझ्या मराठीचे वैभव

संत साहित्य अमर
सौभाग्य मायबोलीचे।

सावरकरांची महाकाव्ये
जागरण असे क्रांतीचे।

विंदा ,वसंत , मंगेश
प्रतिबींब जीवनाचे।

कुसुमाग्रजांचे साहित्य
अलंकार मराठीचे।

अरूण भटांची काव्ये
आवाज जनमनाचे।

बालकवींचे निसर्गकाव्य
आनंद जीवनाचे।

महानोर सहजी रेखती
चित्र मराठी खेड्यांचे।

कांबळे, कोलटकर,डहाके
खोत ,आवाज आत्म्याचे।

आत्मचरित्रे  दबलेल्यांची
नवसंजीवन भाषेला।

स्रियांचे  झुंझार शब्द
नवे कोंब साहित्याला।

संगीत नाटके अविट
धन मराठी संस्कृतीचे।

नवकथाकार ,नवकवी
 भाषेची गुणी अपत्ये ।

एकांकीका पथनाट्ये
चित्र रेखती समाजाचे।

काळ चालेल पुढे अखंड
भाषेत प्रवाह हवे नवे।

होईल सागर विशाल
 वारे मराठी वहावे।

माझ्या मराठी भाषेला
वैभव देवलोकीचे यावे।

अंजना कर्णिक©
मराठी भाषा दिन
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
‪+91 88797 63591‬
 ।। बेधडक बोल मराठी ।।
=================
आज गातोय गोडवे फार,
फसवीच परी भाषेची वाढ..
रेटणार नाही जिव्हा उद्या,
फुटेल तिज इंग्रजी हाड..!!

श्रद्धाळु आमच्या मनात रुजतो,
अंधश्रद्धेचाच पगडा गाढ़..
नमस्कारास करून बाय बाय,
हाय हेल्लोचचं वाढलयं फ्याड..!!

माय मरो आणि आंटी जगो,
ही वृत्तीच करतेय सारा बिघाड..
घरची भाकर बेचव झाली,
अन बर्गर आता लागतोय ग्वाड..!!

संस्कृती राहिली दिवसापुरती,
आता स्टेटसचे वाढले लाड..
पोकळ झाला मानाचा वाङा,
अन बोनसाय झाले बोलके झाड़..!!

न्यूनगंडाचे भय ते मनात,
समूळ सारे उपटून काढ..
बेधड़क प्रथम बोल मराठी,
मग अभिमानाचे झेंडे गाड..!!
***********सुनिल पवार.......
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
91 89752 50342‬
मायमराठीचा ठेका
मायमराठीचा ताल
जेव्हा उसळे मनात
धुंद नाचे भवताल

हिच्या कुशीत वाढतो
हिच्यासवे बहरतो
फुलापानाचे गार्‍हाणे
याच भाषेत मांडतो

कधी रडते पडते
कधी लढते मरते
मराठी अस्मितेची हाक
दर्‍या खोर्‍यात भिनते

साद घालते जीवाला
गुज कानात सांगते
कधी अंगणात फुलते
कधी चुलीशी भांडते

किती जावे खोल खोल
हिचा सापडे ना तळ
मनी धुमसत्या वेदनेला
हिच्याविना नाही बळ

- दिनेश चौडेकर
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
!! आजची प्रबोधिका !!
मायबोली मराठी माझी-
      शोधीते  आसरा !
दहा कोटी लेकरे
      आशा  तिज-मिळेल आसरा !!
मायबोली माझी
      गेली- मराठमोळ्या घरी !
ऐटीत तेथे बैसली होती
       आन्ग्लाई गाभारी !!
मायबोली माझी
       गेली मराठी नेत्याघरी !
मराठीचा ढोल तो
       येता जाता  बडवी  !!
मुखी त्याच्या
       ऐसा होताय -तैसा होताय !
मायबोली जाणी,
        याचे  काय खरे नाय !!
मायबोली माझी ,
        गेली सरकार दरबारी !
अघाद तिचे रूप पाहता
         फिरली सत्वरी माघारी !!
मायबोली माझी,
         आली मग रस्त्यावर !
आक्रंदे ---
          कुणी देता का घर?
गरजे कोणी ,
          काहे को चील्लाते हो?
अरे भाई ,
           इसे कोई यहासे हटावो !!
बोले कोणी --
            सच कहते हो मौसी !
पुत्र तिचे ते
            सारे सरसावले
मायेसी सोडून
             मौसी पुजत राहिले !!
(प्रा चंद्रसेन टिळेकर यांच्या 'कवितेच्या वाटेला 'या कविता संग्रहातून )
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
+91 97303 45580‬
🌷माझी मराठी🌷
"""""""""""""""""''"""
माझी बोली मराठी
माझी माय मराठी।
आम्ही बोलू मराठी
तुम्हीही बोला मराठी!!

अमृताला फिके पाडी
आहे ऐसी गोडी।
प्राकृताला मागे सोडी
अशी बोली मराठी !!

राष्ट्राला बोलीतून जोडी
ऐकीतून वाढे गोडी ।
माय मराठीची मोडी
राज्यातून राष्ट्र जोडी !!

सह्याद्रीच्या वन
मलयाची गोडी ।
संगीत माधुर्याची
मराठी अविट गोडी !!

आम्ही बोलू मराठी
तुम्हीही बोला मराठी..!!
""""""""""""""""""""""
.......अनिल हिस्सल
             बुलडाणा
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
‪+91 96891 31138‬
 दिलदार तू मराठी
आधार तू मराठी

दगडास या दिला हा
आकार तू मराठी

केलेस स्वप्न माझे
साकार तू मराठी

शब्दास येत जावी
ती धार तू मराठी

सांगून संत गेले
ते सार तू मराठी

हृदयास जोडणारी
ती तार तू मराठी

      ~दिनकर वाघमारे

मराठी भाषादिनाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा!!
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
+91 99214 07745‬
आज मराठी भाषा दिवस , या दिवशी अस्सल वर्हाडी विनोदी कवी डाँ मिर्जा रफी अहमद बेग रा. नेर परसोपंत,यवतमाळ, यांची पुढील कविता आठवते...जरूर वाचा........

अमराठी असुनही मले येते मराठी,
ठोकू नका माह्यावाली पाठ ह्याच्यासाठी,
धर्माच नं भाषेचं काय हाय नातं,
भाषा म्हणजे धान्य, धर्म म्हणजे जातं,
जो जिथं जनमला तिथं त्याची भाषा,
अनं कपासीतून बोंडाचीच कराना तुम्ही आशा,
मुसलमानानं जनम दिला हिंदू लोकाइत वावरलो,
वर्हाडीच्या वासानं सांडावानी बावरलो,
मराठी चा अभिमान मले भारताचा गर्व,
मंदीर मस्जिद एकच मले हिंदूस्तानातले सर्व,
अनं हिंदू मुसलमानात काय हाय फरक,
हा म्हणते हटजा अनं थो म्हणते सरक,
हा म्हणते ईश्वर थो म्हणते अल्लाह,
हा करते गोंधळ, थो करतो कल्ला,
अरे कातासंग चुना जसा असतो पानात,
हिंदुसंग मुसलमान तसे हिंदुस्तानात,
आपण कायी फालतू वाकया नाही फाडू,
आपण कायी जातीचा भेद नाही पाडू,
तुम्ही आम्ही भारतवासी, भाजून खाऊ पराठे,
महाराष्ट्र आपला आपण सर्व मराठे,
                        डाँ मिर्जा रफी अहमद बेग
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
+91 98907 99023‬
आजही अन् कालही---(मराठी भाषादिनाच्या निमित्ताने)
मित्रहो,
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा. कोणतीही भाषा ही  शब्दांनी समृध्द असावयास हवी. साहित्यिक मग तो कवी असो वा लेखक ; त्याचे शब्दांवर प्रभुत्व असायलाच हवे. शब्दांची अराधना केल्याशिवाय सरस्वतीच्या मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य असते. मंदिराच्या पायरीवर पण जागा मिळणे ही अराधनेचीच बाब आहे. माझ्या आयुष्यात शब्दांचे स्थान काय आहे हे ( मी साहित्यिक नसूनही ) सांगणारी एक माझी गझल पेश करतोय मराठी भाषादिनाच्या निमित्ताने.


शब्द माझे शस्त्र आहे, शब्द माझी ढालही
शब्द माझ्या सोबतीला आजही अन् कालही

शब्द माझा श्वास आहे आणखी विश्वासही
शब्द नसता जीवनाचा हरवलेला तालही

शब्द देती रूप माझ्या गीत गझलांना असे!
वर्णितो मी दु:ख लिलया अन् गुलाबी गालही

शब्द रुसले जर कधी का लेखणी रुखते अशी!
एक लिहिण्या  शब्द लागे कैक महिने; सालही

शब्दडोही डुंबताना आगळी येई नशा
गुंतलो मी ज्यात पुरता; शब्द मायाजालही

शब्दवेड्यांनाच मुजरा शारदेच्या अंगणी
श्रीफळा समवेत त्यांना आज मिळते शालही

वानवा संभाषणाची काय झाले मानवा?
बोलणे आहे जरूरी सांगण्याला हालही

साठ वर्षे पूर्ण झाली जन्मुनी "निशिकांत"ला
शब्दमार्गीचा प्रवासी थांबली ना चाल ही


वैयक्तिक टीपः-- उद्या मी श्रीलंकेच्या टूर वर जात आहे. तेथे कनेक्टिविटी नाही मिळाली तर ७/८ .मार्चला आपली भेट होईल फेसबुकवर.---धन्यवाद.
निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼







*** संकलन -
✏ उद्या
 "मराठी भाषा गौरव दिन "
सर्वत्र साजरा होत आहे ,त्या निमित्त
📚 साहित्य मंथन ग्रूप कडून आयोजित
🎤 काव्यमंथन चारोळी स्पर्धा -

💥 विषय - माझी मायबोली मराठी
💥 दिनांक - 26 फेब्रुवारी 2016
💥 वेळ - सकाळी 10 ते सायंकाळी 7
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नियम
-----------------------
1) चारोळी मराठीतून लिहीलेली असावी ,मराठी फाॅन्ट नसेल तर कागदावर लिहून त्याची फोटोकाॅपी पोस्ट करावी !
2) दिलेल्या विषया पैकी एक तरी शब्द चारोळीत असावा !
3) दुसऱ्या व चौथ्या ओळीच्या शेवटी यमक असावे .
4) फक्त एकच चारोळी पोस्ट करावी
5) परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील !
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अमृताहून गोड
आहे माझी मराठी
अभिमान मला आहे
मी बोलतो मराठी
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
झगमगाट हा बहू चालला
रोषणाई किती मोठी ।
देव्हार्यातील शांत तेवते
समई ती माय मराठी ।
@ अरविंद कुलकर्णी
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रक्तात मराठी प्राणात मराठी
शब्द साम्राज्याची राणी मराठी
कृष्णा कोयना तापी गिरणा
वाहते त्यात सदैव पाणी मराठी
---'-ज्ञानेश्वर भामरे
  वाघाडी शिरपूर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
"अलंकार लेवूनी भरजरी
नटली अशी मायमराठी
सख्खी मावशी इंग्रजी
धास्तावून उभी पाठी"
........जयश्री पाटील.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पैठनी ची शान न्यारी,
गज-याचा हा सुगंधी भारी...
मराठी बोली आम्हा प्यारी,
अभिमानाने बोलती सर्व नरनारी
🔵WARANKAR G🔵
 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माय माझिया जिवा ची
बोली माझी मराठी
नही तीयला तोड़ कुठे
या जगा च्या पाठी
- हुसेन शेख
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जेवणात आपली पूरनपोली भारी
आपल्या मराठीची बातच न्यारी
अमृताचेही पैजा जिन्के
म्हणुनच आदर करती दुनिया सारी.
मंदार कुलकर्णी,निगडी पुणे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
झाले सुपूञ अनेक अशी ही भूमी
अाठवण होता तयांची -हदयी होय दाटी
अभिमान. होतो सदॆव अशी
आमची अनमोल माय मराठी
       सुनिल बेंडे वसमत
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मायबोली माझी मराठी
धडपड तिच्याचसाठी
मानाने ती जगी मिरवावी
हीच अपेक्षा मोठी.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
महाराष्ट्राची रे शान मराठी,
आमचा ही अभिमान मराठी,
जात-पात, धर्म जरी अनेक,
अंगात भिनली माय मराठी...
निर्मला सोनी.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझी मायबोली मराठी !
माझी मराठी असे माझ्या रक्तात ,
नाही विसरणार मी ती स्वप्नात !
जरी गेलो परदेशी
तरी मायबोली असेल श्वासांत
तीचा अभिमान वाटेल ,मरेपर्यंत !
सौ. निलाक्षी विद्वांस .
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझ्या माय मराठीची ऐ
बोलू काय कौतुके ......?
अमृतातेही.........
पैजा जिंके......!
.......अनिल हिस्सल
    बुलडाणा (महाराष्ट्र)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माझी मराठी मायबोली
पिंगा सह्याद्रीत घाली
तिचं पैजणं वाजता
जाग महाराष्ट्राला आली
-----ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझ्या मराठीचा गोडवा
गोड साखरेचा उस
काळ्या शेतात पिकतो
लाज झाकण्याचा कापूस
----ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझ्या मायबोलीचं कौतूक
काय सांगू तुम्हा आता
हिची ओवी ज्ञानेशाची
 अन तुकारामाची गाथा
----ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझ्या मायबोलीची थोरवी
काय सांगू तुम्हा आता
हिची ओवी ज्ञानेशाची
 अन तुकारामाची गाथा
----ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सह्याद्रित खेळते
पिते कोयनेचं पाणी
गाते मराठी मायबोली
बहिणाबाईची ही गाणी
------ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझी मराठी लावणी
पायी नक्षत्रांचे चाळ
आमराईत बोलते
जणू मराठी कोकीळ
-----ज्ञानेश्वर भामरे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संस्काराचे बीज पेरुणी
घडविला महाराष्ट्र हा महान
मायबोलीने जगी वाढविला
मराठी माणसाचा स्वभिमान
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎯 मारुती खुडे, माहुर.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
ज्ञानदेवाची ही अमृतवाणी
मुक्ता,जना ,बहीणाईची गीते
संत मेळ्यांची अभंगवाणी
वैभव माझ्या माय मराठीचे.
- अंजना कर्निक
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जे वदती मराठी  सर्व काळ
तयावरी ईश्वराचे झल्लाळ,
का वदती मिंग्लीशचे गुऱ्हाळ
मऱ्हाठीच असे सर्वदा मधाळ...।।१॥
सुनीता पाटील..
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
परदेशातही फडकतोय झेंडा,
आहे मजला गर्व तीचा फार...
अशी माझी मायबोली मराठी,
शब्दच असे तीचा साजसृंगार..
       @ उत्कर्ष देवणीकर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माय बोली मराठीचा
अभिमान उरी भरु द्या,
शिवशंभुचा निनाद
स्वराज्यात घुमवू द्या....।।२॥
सुनीता पाटील
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मायबोली मराठी भाषा माझी
बोल शिकतो बोबडे ओठी
दूर देशी जाता पडे शब्द कानी
अप्रूप वाटे राजभाषा ती मराठी
- आप्पासाहेब सुरवसे लाखनगावकर
===================
काना,मातरा,वेलांटी
शालू नेसली नववारी..!
मायमराठी माझी भाषा ,
जगी किमया तिची भारी..!!
✏_____ गजानन पवार
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
माझ्या माय मराठीचे
पांग आम्ही फेडीतो
यत्न साहित्य निर्मितीचे
मायबोलीतून लिहीतो
अंजना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आला चंगळवाद दारी
आंग्लभाषेचे झालो दास
मराठी शाळांना ओहोटी
माय मराठीचा दुस्वास!
अंजना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
'साहित्य मंथन' करितो
सेवा माय मराठीची
साहित्यासाठी झटतो
मोट बांधतो एकीची!
अंजना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मराठी दिन स्पर्धेसाठी ग्रूपच्या बाहेरील चारोळी

मराठीचा मी
मराठमोळं वैभव माझं
मराठीच नातं
संस्कारीत लावण्य माझं
दीपक मा पाठक, परभणी
9420195172
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मायबोली मराठी भाषेपोटी
जन्मा आले संतपंत कवी
रीचवुन पचवुन परकीय भाषा त्यांनी
मायबोली मराठीला केली नवी ✏
 डाॅ.शिल्पा जोशी, दादर...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मऊमऊ स्पर्शाने भाषा
मायबोली मराठी सजली..!
शब्दा शब्दातून साखर गोडी,
चाखावयाशी आज मिळाली..!!
✏____ गजानन पवार
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
1)  नसा,ऊरातच गुंजते
    मराठी मायबोली बाय
   भर्जरी शब्दकळा लेवते
    इंग्रजी तिला,सवत हाय
               
2) काय वर्णू गं , गुण तुझे
    माय मराठी ,अभिमान
   अंगी भिनले भिनले माझे
    दुस-या भाषांचे अभियान
-    कुंदा पित्रे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
 'माझी मायबोली मराठी,
 जीची जगामध्ये थोरवी,
 अमृताचा गोडवा ओठी,
 सालंकृत स्वाभिमानी मिरवी.'
-  संगीता देशमुख,वसमत
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
1) महाराष्ट्र आहे शान आमुची
सर्व धर्म समभावाने राहुनी |
मायबोली मराठी आमुची
सर्व भाषीक घेतसे सामावुनी ||

2) कोकणी व-हाडी अन् खानदेशी
भाषा असती जरी येथे अठरापगडी |
एकीने राहतसु आम्ही मितभाषी
माय मराठी एकची ती आम्हांसी जोडी ||

3) भाषांचा उगम असे संस्कृत जरी
एकची भाषा असे तीस जवळची |
कोणी वापरे कोणतीही बोली जरी
असे परडी भारी माय मराठीची ||
SP
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
'महाराष्ट्राच्या अखंड सार्वभौमत्वाचे ,
 करे राकट सह्याद्री अहोरात्र संरक्षण.... |
दख्खनची  महाराणी सोज्वळ मराठी,
करे बळकट संस्कृती सकळ संगोपण..... ||
- यज्ञ
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सह्य कड्यातून दुमदुमते
माझी माय मराठी बोली.....
शोधली तुकोबा-ज्ञानोबाने,
साऱ्या शब्द-अर्थांची खोली...
_डॉ.सखाराम भगत
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मन मराठी,मान मराठी,
सण मराठी,संस्कार मराठी,
गर्व मराठी,गौरव मराठी,
आन मराठी,महाराष्टाची शान मराठी .
 - संदीप पाटील, नांदेड
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
                   समाप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷












* परीक्षेला जाता जाता .... *

फेब्रुवारी महिना उजाडला की, सर्वांना परीक्षेचे वेध लागतात. महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक परीक्षा मंडळाद्वारे या परीक्षेच्‍या कार्यक्रमाचे उदघाटन बारावीच्‍या परीक्षेने दरवर्षी करीत असते. तसे बारावीच्या परीक्षेला फेब्रुवारी महिन्याच्या 18 तारखेपासून सुरुवात झाली. त्‍यानंतर दहावीच्‍या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होत आहे. मग इयत्‍ता पहिली ते नववी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांची परीक्षा होते. विद्यापीठाच्‍या परीक्षेने या परीक्षांचा शेवट होतो. परीक्षेच्‍या काळात मुलांवर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण जाणवते. वर्षभर केलेल्‍या अभ्‍यासाची फक्त दोन ते तीन तासात परीक्षा द्यावी लागते. बहुतांश वेळा असे होते की ऐनवेळी विद्यार्थी प्रश्‍नाचे उत्‍तर विसरतात. परीक्षेच्या काळात गोंधळून जाऊ नये किंवा मनावर जास्‍तीचे दडपण घेवू नये. परीक्षेच्‍या आदल्‍या दिवशी जागरण करून अभ्‍यास न करता निश्चित झोपी जावे. उद्याचा पेपर कसा जाईल ? याची अजिबात काळजी न करता आपले डोके शांत ठेवल्‍यास त्‍याचा परिक्षेच्या काळात निश्चितपणे फायदा होतो. नावडता विषय आपणाला अवघड वाटतो, त्‍याची जास्‍तच काळजी वाटते. त्‍यामुळे त्या विषयातील येत असलेला भाग सुध्‍दा आपण विसरून जातो. असे होऊ नये यासाठी त्‍या विषयाची धास्‍ती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. इयत्‍ता पहिली ते आठव्‍या वर्गाची परीक्षा पध्‍दत बंद केल्‍यामूळे विद्यार्थ्‍यांचा परीक्षेला जाण्‍याचा सराव  कमी झाला असे म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. पूर्वी पहिल्‍या वर्गापासून घटक चाचणी व सहामाही म्‍हणजे प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा होत असत. परिक्षेच्या काळात शाळेमध्‍ये सर्वत्र परीक्षेचे वातावरण असायचे, जो तो आपले डोके पुस्‍तकांत खुपसून अभ्‍यास करीत बसायचे, शक्‍यतो गृहपाठाच्‍या वह्या वाचून काढले जायचे कारण त्‍यातीलच प्रश्‍न परीक्षेत विचारल्‍या जायचे. परीक्षेला जातांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीने सामसोळीच्या शेपटाला स्पर्श केला तर पेपर सोपा जातो असं परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची. नेमकं परीक्षेला निघताना ती सामसोळी मात्र कुठच दिसायची नाही. पेपर सोपा गेला तर त्याची आठवण सुध्दा यायची नाही. परंतु जर पेपर अवघड गेला असं जर वाटलं तर मनात रुखरुख लागायची. परीक्षेतला जातांना अजून एक प्रकर्षाने व्हायचं परीक्षेच्या पॅडला तुळशीचे दोन पान लावायचे. त्याचं काय गुपित आहे ते आजपर्यंत कळले नाही. आज शहरात अंगण नाही तर तुळस कुठं दिसणार. पण ही बाब अजूनही घरोघरी दिसून येत आहे. परीक्षेचा दिवस उजाडला की, सकाळी सर्व कामे आटोपून परीक्षेला पॅड घेऊन निघतांना आई ओरडून म्‍हणायची " अरे देवाच्‍या पाया पड, पेपर सोपा जाईल"  तिच्‍या या बोलण्‍याचं मला हसू यायचे आणि  मी म्‍हणायचो ‘वर्षभर अभ्‍यास केल्‍यामूळे माझं पेपर सोपं जाणारच आहे. त्‍यासाठी देव काय मदत करणार आहे. तो काय स्वत: येऊन मला लिहायला मदत करणार आहे कां ? असा प्रति प्रश्‍न तिला विचारायचा. आपल्‍या देवाला कुणी काही असं बोललेलं तिला खपायचे नाही, रुचायचे नाही. ती मला समजावून सांगे की, ‘देवाला पाया पडल्‍याने आत्मिक समाधान लाभते, बळ मिळते, एक वेगळा उत्‍साह येतो. यामूळे देवाला नमस्‍कार करायचा’. मग शेवटी आईचे मन रहावे म्‍हणून देवासमोर नतमस्तक व्‍हायचो. पहिला पेपर सोपा गेला की, आपसुकच दुस-या दिवशी परीक्षेला जाण्‍यापूर्वी पाय देवघरांकडे वळायचे. मग यानंतर जीवनात कोणती ही परीक्षा असो त्‍यापूर्वी आपले पाय देवघरांकडे वळतातच. आज ही आम्‍ही हीच प्रथा किंवा परंपरा आपल्‍या मुलांपर्यंत पोहचवित आहोत. आज आपली मुले जेंव्हा परीक्षेला निघतांत त्यावेळेस ‘जा देवाचे पाया पड आणि मग परीक्षेला जा’ असे आपण अगदी सहज म्‍हणतो. परीक्षेला जातांना देवाच्या पाया पडावे किंवा नाही हा वादातीत विषय आहे. त्‍यावर चर्चा केल्‍यास वादंग होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र देवाच्या पाया पडल्यानंतर जो आत्‍मविश्‍वास मनात तयार होतो, ते अत्‍यंत महत्‍वाचे आहे.  परीक्षा म्‍हणजे एक कसोटी, आयुष्‍यात घेत असलेले महत्‍वाचे वळण. या कसोटीत निर्भेळ यश मिळविण्‍यासाठी देवांसोबत घरातील वाड-वडिलांचे आशीर्वाद घेणे सुध्‍दा अत्यंत महत्‍वाचे आहे असे वाटते. ज्‍याप्रकारे पूर्वी रंणागणावर जातांना राजे महाराजे आपल्‍या पूर्वजांचे आशीर्वाद घ्‍यायचे तसेच काहीसे या परीक्षेच्‍या बाबतीत होत असते. स्‍वामी समर्थाच्‍या ‘भिऊ नकोस  मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्‍याने त्‍यांच्‍या भक्‍तात एक नवी प्रेरणा, उत्साह दिसून येतो दे रे हरी  पलंगावरी अशी ज्‍याची वृती नाही त्‍याला परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. परीक्षेत जास्‍तीत गुण मिळावे यासाठी नकला मारणे ही स्वतः सोबत केलेली फार मोठी चूक आहे. त्‍यामूळे नकला मारून पास होण्‍यात काही अर्थ नाही. या परीक्षेत कदाचित तुम्‍ही पास व्‍हाल पण आयुष्‍याच्‍या परीक्षेत नकलाच  नसतात तिथे मात्र नापास होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. नकला मारणे म्‍हणजे चोरी करणे. आणि चोरी  कधी  ना कधी पकडली जाते. म्‍हणून मुलांनो, परीक्षेत यशस्वीपणे तोंड देण्‍यासाठी परमेश्‍वर आपणास सुबुध्‍दी देवो, आत्मिक बळ देवो. दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
मो. 9423625769

Monday 22 February 2016

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 * मराठी भाषा गौरव दिन *

 ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, कादंबरीकार तथा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मराठी साहित्यातील दुसरे साहित्यिक कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा होत आहे त्या निमिताने मराठी भाषेच्या विकासासाठी आपण सारे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित भाषा आहे. 
मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.मराठी ही महाराष्‍ट्राची राजभाषा आहे. मात्र आपल्‍याच राज्‍यात आपण आपल्‍या मराठी भाषेला पदोपदी ठार करीत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करीत असतो, त्‍यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्‍यांना भाषेच्या प्रत्‍येक शब्‍दांत असलेल्या  सौंदर्य आणि सामर्थ्‍यांची जाणीव नसते, त्‍यांना वाक्‍यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते. अशा लोकांच्‍या भाषेमूळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. माणसाच्या जीवनांत आईचे स्थान जेवढे महत्वाचे असते तेवढेच मातृभाषेचे ही असायला पाहिजे. पण आज तिच्याबाबत जे चित्र दिसते ते दुर्दैवाने फार वेगळे आणि मन उदास करणारे आहे. ती स्थिती बदलण्याची जबाबदारी जिथे जिथे मराठी माणूस राहतो आहे, तिथे तिथे  प्रत्येकाची आहे.
 आज प्रत्‍येकजण आपल्‍या पाल्‍यांना मराठीच्‍या शाळेत शिकविण्‍या ऐवजी इंग्रजी मिशनरीच्‍या शाळेत शिकविण्‍याकडे जास्‍त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणा-यांची संख्‍या  सर्वात जास्‍त आहे. इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या स्पर्धेत टिकू शकतो. माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्‍हणून त्‍याला K.G. पासून इंग्रजीचे धडे शिकविण्‍यास प्रारंभ केल्‍या जाते. सध्‍या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे. की, प्राथमिक  शिक्षण  इंग्रजी माध्‍यमातून झाले की त्‍याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही.परंतु वास्‍तव काही उलट आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांच्या संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होतात. त्‍यास घोकंपटटी किंवा वारंवार अभ्‍यास करावे लागत नाही. विषयाची  संकल्‍पना मुलांना कळाली तर ते अगदी बिनधास्‍त पणे व्‍यक्‍त करू शकतात आणि त्‍यासाठी मातृभाषेतून शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. इंग्रजी शाळेत टापटीपपणा आणि होमवर्क पूर्ण करण्‍याची पध्‍दत एवढे दोनच बाबी कोटेकोरपणे पाळले जातात. येथे  शिकविण्यासाठी तज्ञमंडळी उपलब्‍ध नसल्‍यामूळे थातूर मातूर शिकविले जाते याकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्‍या जाते. पालकांकडून भरपूर पमाणात फिस च्‍या स्‍वरूपात पैसा उकळणे आणि त्‍या बदल्‍यात मात्र त्‍या मुलांना घोकंपटटीशिवाय काहीच मिळत नाही, हे वास्‍तव चित्र आहे. याउलट एखादी इंग्रजी शाळा असू  शकते जे की पालक व विद्यार्थ्‍यांच्‍या सर्व आशा  पूर्ण करू शकेल. पण अश्या शाळांच्या संख्या फार कमी. मुलांच्या भावना लक्षात न घेता आपण त्यांना त्या गैरभाषे कडे वळवितो तर याबाबीमूळे मुलांवर अपण अन्‍याय करीत नाही का ? याबाबीचा विचार कोणताही पालक करतांना आढळून येत नाही. या बाबतीत समाजातील काही शिक्षणतज्ञ किंवा जाणकार लोकांनी पालकांचे योग्य मार्गदर्शन करून त्‍यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्‍यमात शिकणा-या मराठी मुलाची भाषा जर ऐकायला आणि पहायला मिळाली तर त्‍याची फारच कीव येते कारण त्‍यांना मराठी शब्‍दांचे अर्थ नीट  कळत नाहीच शिवाय नियमानुसार अक्षरांचे लेखन सुध्‍दा  करीत नाहीत. 
 संत तुकाराम महाराज यांनी शेजा-यावर प्रेम करा असा संदेश दिला आहे. मात्र ही मंडळी शेजा-यांशी नेहमी तुलनात्‍मक दृष्‍टीने पाहतात. पालक वर्ग नेहमी शेजा-यांच्या मुलांची तुलना करत असतात. शेजा-याचा मुलगा इंग्रजी माध्‍यमात शिकत असेल आणि रेन रेन कम अगेन म्‍हणत असेल तर आपले मूल सुध्‍दा असे गीत म्‍हणावे असे त्‍यांना वाटते परंतू त्‍या इंग्रजीच्‍या मुलांना रेन  रेन कम अगेन चा अर्थ कळत नाही तो फक्‍त यांत्रिक पध्‍दतीने गात असतो परंतू आपला मराठी शाळेतील मुलगा ‘ येरे येरे पावसा ’म्‍हणताना त्‍याच्‍या चेह-यावरचे भाव स्‍पष्‍ट दिसतात. कारण त्‍याचा अर्थ त्‍याला कळालेला असतो. लहान वयात जी भावना, संकल्‍पना स्‍पष्‍ट होते ती आयूष्‍यभर सोबत राहते तसेच संकल्‍पना समजून घेण्‍यासाठी मातृभाषा कधीच ओझे वाटत नाही इंग्रजी सारखी. इकडे मराठी माध्‍यमाच्‍या शाळांतील मुलांची स्थिती खुपच चांगली आहे, असेही छाती ठोकून सांगता येत नाही. कारण येथील मुलांची स्थिती सुध्‍दा मराठीच्‍या बाबतीत फारच वाईट आहे. मराठी भाषेला नीट समजून न घेता दरवर्षी एका नवीन वर्गाची पायरी चढत शाळेच्‍या बाहेर पडलेला जेव्‍हा समाजात व्‍यवहार करण्‍यास प्रारंभ करतो तेंव्हा निरक्षर व्‍यक्‍तीपेक्षा साक्षर व्‍यक्‍तीच मराठी भाषेला पदोपदी मारत असतांना आढळून येतो. 
 मात्र (मातृ) देवो भव, कार अपघातांत त्‍यांचा  अंत्‍य (अंत) झाला, पाणी  हे द्रव्‍य (द्रव) आहे. आज शिक्षक दीन (दिन) आहे, सचिनचा कर्म (क्रम) सौरभ नंतर येतो इत्‍यादी  वाक्‍याचे  बारीक निरीक्षण केल्‍यास कंसातील शब्‍दामुळे वाक्‍याचा अर्थ स्‍पष्‍ट होतो मात्र भाषेचे ज्ञान नसलेले  किंवा  अर्धवट ज्ञानी मंडळी एक प्रकारे भाषेचे चिरफाड करून वाक्‍याचे अनर्थ करून टाकतात. हे म्‍हणजे कसे आहे, गाडी  नीट चालवता येत नसलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या हातात गाडी देऊन अपघात करून घेण्‍यासारखे नाही का ? ज्‍याप्रकारे गाडी चालवण्‍यासाठी परवानाची गरज भासते अगदी त्‍याच प्रकारे भाषेची मांडणी करणा-या व्‍यक्‍तीला विशेष ज्ञान असल्‍याचा परवाना आवश्‍यक नाही काय ? 
 लहानपणा पासून मुलांच्‍या बोलण्‍याकडे विशेष लक्ष देवून त्‍यांच्‍यात वारंवार सुधारणा घडवून आणण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक पालकांनी घेणे आवश्‍यक आहे. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतांना मुलांना मराठीच्‍या जास्‍तीत जास्‍त शब्‍दाची तोंड ओळख कशी होईल ? याचे नियोजन प्रत्‍येक भाषा विषय शिकविणा-या शिक्षकांनी केले पाहिजे. शब्‍द पाहिले, ऐकले आणि लिहिले तरच त्‍याच्या कायम स्‍मरणात राहील. मराठी शब्‍दांच्‍या बाबतीत अगदी प्राथमिक शिक्षणाच्‍या पाया पासून श्रवण भाषण,वाचन आणि लेखन या (LSRW) चार टप्‍यानुसार चालते आणि शिक्षकांचे सुक्ष्म निरीक्षण असेल तर मुलांमध्‍ये भाषेचे फार कमी चुका होतील. परंतु विशेष करून येथेच दुर्लक्ष केल्‍या जाते आणि भविष्‍यात याच मुलांच्‍या हातून भाषेची चिरफाड होतांना दिसून येते. मराठी भाषा फार सोपी वाटत असेल तरी या विषयात अनुत्‍तीर्ण होणा-यांची संख्‍या फार मोठी आहे. कारण स्‍वत:च्या भाषेत या मुलांना वर्णन करता येत नाही. त्‍यांना वेळेवर पर्यायी अर्थपूर्ण शब्द आठवत नाहीत किंवा खरा शब्‍द नेमकं कसा आहे? हे ही लक्षात येत नाही.  सन 1960 साली भाषेनुसार महाराष्ट्र राज्‍याची निर्मिती झाली. परंतू गेल्‍या पन्‍नास वर्षात मराठीचा व्‍हावा तेवढा विकास झाला नाही. कारण या समस्‍येकडे कुणीच गांर्भीर्याने लक्ष देत नाहीत. यासाठी समाजातील प्रत्‍येक घटक तेवढाच जबाबदार आहे. त्‍यामुळे मराठीची प्रगती व्‍हावी, त्‍याचा विकास व्‍हावा,त्‍याची चीरफाड होवू नये असे वाटत असेल तर प्रत्‍येकाने आज जागे होणे अत्‍यंत गरजेचे आहे. शाळेतून विशेष करून मराठी भाषा शिकविणा-या शिक्षकांनी याविषयी गांभीर्याने दक्षता घेवून मुलांच्‍या भाषिक कौशल्‍याचा विकास करावा. इयत्‍ता पहिली व दुसरीमध्‍ये अनुलेखन ,तिसरी व चौथ्‍या वर्गात शुध्‍दलेखन आणि पाचवी ते आठव्‍या वर्गापर्यंत प्रत्‍येक  विद्यार्थ्‍यांना श्रुतलेखन योग्‍य प्रकारे करता यावे असा किमान उद्देश डोळ्या समोर ठेवून कार्य केल्‍यास मुलांत वारंवार होणा-या चूका नक्‍कीच टाळता येतात. बहुतांश वेळा मुलांची श्रवण प्रक्रिया योग्‍य प्रकारे विकसीत न झाल्‍यामुळे समान आवाजाच्‍या शब्‍दात  मुले घोळ करतात जसे खाक-काक, मखर–मकर , खेळ-केळ ,भार–बार, घार–गार , झरा–जरा ,झाग–जाग,धार–दार ,भाई–बाई , साफ–साप,फळ-पळ, संग-संत,बंध-बंद, फर–पर ,खल-कल, भाग–बाग, साथ–सात , पथ–पत,कोश-कोष, इत्‍यादी शब्‍द ज्‍यांची ध्वनी जवळपास सारखी वाटते आणि शब्‍दाचा अर्थ बदलतो. यानंरत मराठीत असेही काही शब्‍द आहेत ज्‍यांच्‍या -हस्‍व व दीर्घ इकार व उकार मुळे वाक्‍याचा अर्थच बदलून जातो. जसे की, आदी–आदि, आयत- आयात, आर्त–आर्द, स्त्री-इस्‍त्री, कोश–कोष, दिन–दीन, नियत-नीयत, केशर–केसर, पास–पाश, पिक–पीक, बहु–बहू, लक्ष-लक्ष्‍य, विष–वीस ,चालक-चालाक, इ.  अशा बारी‍क सारीक बाबींकडे विषय शिक्षकांनी लक्ष दिल्‍यास मुलांच्‍या मराठी लेखनात  नक्‍कीच सुधारणा होवू शकेल. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके असे म्हटले आहे तर प्रसिध्द गजलसम्राट सुरेश भट यांनी म्हटले आहे 
 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
 जाहलो खरेच धन्य एक तो मराठी 
 धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी 
 एवढ्या जगात माय मानतो मराठी 
 मराठी भाषेचा विकास व्‍हावा व प्रगती व्‍हावी असे मनातून वाटत असले तर प्रत्‍येकांनी विशेष प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. शालेय वयात इंग्रजी शब्‍दार्थ पाठांतर करीत असल्‍याचे आपणा सर्वांना आजही आठवते. मात्र मराठी शब्‍दार्थ पाठांतर आपण  करतो कां? अर्थातच याचे उत्‍तर नाही असेच येते. इंग्रजी शब्‍दाची जास्‍तीत जास्‍त ओळख व्‍हावी म्‍हणून ऑक्‍सफर्डची डिक्‍शनरी प्रत्‍येकजण एकदा तरी  हाताळलेला असतो. मात्र मराठीची शब्‍दासंपत्‍ती वाढवी म्हणून निदान मराठी विश्‍वकोषाचे खंड हे  दूरचीच  गोष्‍ट आहे निदान वसंत आबाजी डहाके यांचा शालेय मराठी शब्‍दकोशाचा शंभरामागे एखादा मराठी  व्‍यक्‍ती हाताळतो. मराठी भाषेसाठी ही फार मोठी शोकांतिका आहे. त्‍यास्‍तव प्रत्‍येकाने आपली शब्‍दसंपत्‍ती कशी  वाढविता येईल  याचा  जरूर विचार करावा. यासाठी मुलांना लहानपणा पासून विविध प्रकारचे मराठी शब्‍दकोडे सोडविण्‍याचा  छंद कसा  लागेल  याकडे  विशेष लक्ष द्यावे. वारंवार कोडे  सोडविल्‍यामुळे खेळत खेळत  मराठी भाषेच्‍या अनेक शब्‍दांची  व त्‍याच्‍या  अर्थाची  ओळख होते.  मराठी भाषेच्‍या विकासासाठी  व भाषेची चिरफाड टाळण्‍यासाठी प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
 परिमलांमध्ये कस्तुरी का अंबरामध्ये शंबरारी, तैसी मऱ्हाठी सुंदरी भाषांमध्ये, ही ओळ लक्षात ठेवून आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगू या. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 
 - नागोराव सा. येवतीकर 
 मु. येवती  ता. धर्माबाद 
 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



Sunday 21 February 2016



* नागोराव सा. येवतीकर



* क्रांती बुध्देवार 



91 74989 64901
  आजच्या काळाची गरज आहे.शरीरातील काही अवयव ज्यावेळी आपले दैनंदिन कार्य करण्यास अकार्यक्षम होतात त्यावेळी शरीराला कार्यरत असणार्या नवीन कार्यक्षम अवयवाची गरज असते.आजकाल त्वचा, डोळे, किडनी, लिव्हर, पँक्रियाज, फुप्फुसे , ह्दय यांचे रोपण सहजशक्य झाले आहे.तद्न्य डॉक्टरस् आहेत.फक्त त्या अवयवाचा म्रृत्यु होण्यापूर्वी ते रूग्णापर्यंत पोहचणे जरूरी आहे.त्यासाठी बरेचदा ग्रीन लाईन मधून ते अवयव पोहचवले जातात.मध्यंतरी बंगलोर, पुणे येथे अश्या पद्धतीचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे दोन जीव वाचले होते.माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मुलीला किडनी दिली असून दोघीही उत्तम जीवनयापन करत आहेत .माझ्या दुसर्या मैत्रिणीच्या यजमानांना किडनी रोपण होउन २० वर्षे झालीत.नंतर त्यांना ब्लड कँन्सर झाला मग स्टेम सेल  रोपण झाले.बोन मँरो रोपण केला.आता ते नॉर्मल आहेत.  डोळ्यावरील पांढर्या फुल्यांवर केरँटाप्लास्टी म्हणजे कॉर्निया काढून त्याचे रोपण करतात.मग रोग्याला नवी दृष्टी मिळते. केसरोपण टकलावर होते.कोडावर जर तो डाग पसरणारा नसेल तर त्वचारोपण करतात.मग ती त्वचा हळूहळू नॉर्मल होते.फक्त तो पांढरा डाग दोन वर्षांपासून वाढलेला नसावा.      यामुळे पेशंटला निरोगी जीवन जगता येते.त्याची ईच्छाशक्ती प्रबळ होते.म्ह्णून ज्यांची जगण्याची शाश्वती नसते त्यांनी अवयवदान जरूर करावे म्ह्णज ते नव्या शरीरात जगू शकतात अंशतः कां होईना! जगलेल्यांचे आशिर्वाद सतत त्यांच्या आत्म्याला तृप्ती देत राहतात.नातेवाईकांना दुसर्याचा जीव वाचवल्याचे मौलीक समाधान देतात.दिवाळीत माझे चुलत मेहुणे गेले.त्यांनी देहदान केले.सुप्रसिद्ध कवी, लेखक विंदा करंदीकर यांनी पण देहदान केले.याचा उद्देश म्हणजे मेडिकलच्या विद्यर्थियांना अभ्यास करता यावा.
चला आपणही संकल्प करु - अंजना कर्निक

'अवयवदान -एक सामाजिक बांधिलकी'




           'दान' हा शब्द उचारला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात- एक 'कन्यादान' आणि दुसरी मंदिरा-मंदिरात आवर्जून आढळणारी 'दानपेटी'! ह्या जगात खूप गोष्टींचं दान करता येतं, त्या सर्वांच्या खोलात मी नाही शिरणार. कन्या दान करायला आणि देवासमोरील पेटीत दान टाकण्याइतकी संपत्ती जवळ जवळ सर्व माणसांकडे असते. ही संपत्ती प्रत्येक माणूस कधी ना कधी ऐपतीनुसार दान करत असतो. दान करता येईल अशा अजूनही एका अमूल्य संपत्तीचा ठेवा प्रत्येक माणसाजवळ आहे, जो संपूर्णतः त्याच्याच मालकीचा आहे. त्या संपत्तीच्या दानाबद्दल आज माहीती देणार आहे, म्हणजेच अवयव दानाबद्दल माहीती देणार आहे. ह्या जगात एकवेळ कन्यादान अथवा देवासमोर दान करण्याची ऐपत नसणारी माणसं भेटतील, पण 'अवयवदान' करण्याची ऐपत नसणारा माणूस जगात शोधून सापडणार नाही. हे दान चालणारा-बोलणारा, संवेदना असलेला जिवंत माणूस तर करू शकतोच पण संवेदनाहीन मृत देहही अवयव दान करू शकतो.
                संपूर्णतः स्वतःची मालकी असलेली संपत्ती म्हणजे आपले शरीर! त्यातील एकेक अवयवावर फक्त आपलाच अधिकार. गरीब असो वा श्रीमंत, राजा असो वा रंक, काळा असो वा गोरा, हिंदू असो वा मुस्लीम, स्त्री असो वा पुरूष त्या ईश्वराने प्रत्येकाला ही संपत्ती समान वाटलेली आहे. ह्या शरीरास हिरे-मोत्यांहून मुल्यवान असे विविध अवयव दिलेले  आहेत, ते अवयव कोणताही सज्ञान मनुष्य गरजू व्यक्तीला दान करू शकतो.
                 आपण ह्या जगी रिकाम्या हाती येतो आणि रिकाम्या हातीच जगाचा निरोप घेतो. घरदार, शेतीवाडी, गाडी-बंगला, पैसा-दागदागिने सारे मागे ठेऊन जातो. आपल्या ह्या संपत्तीची आपल्या पश्चात योग्य विल्हेवाट व्हावी म्हणून मृत्युपत्र करणारी खूप माणसं भेटतात, पण अमूल्य अशी शरीरसंपत्ती जी फक्त मानव जन्मातूनच प्राप्त होते, तिची आपण खुशाल राख करतो किंवा माती करून टाकतो. आपण आयुष्यभर कमावलेली पै अन् पै सत्कारणी लागावी म्हणून सर्व तरतूद करून ठेवतो, वाटण्या करून टाकतो. पण ह्या शरीराचा, शरीरातील प्रत्येक अवयवाचा  जिवंतपणी अथवा मृत्यू झाल्यावर कुणाला उपयोग होईल असा पुसटही विचार डोक्यात येत नाही. ह्या नाशवंत देहाची माती होते एवढेच आपल्या मनावर बिंबवलेले असते आणि आपणही त्याच वाटेने जातो. आज एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या बळावर ह्या शरीरसंपत्तीचा योग्य वापर करता येणे शक्य झाले आहे ते अवयवदानातून! डोळे, त्वचा, यकृत, मुत्रपिंड, फुफ्फुस, ह्रदय, रक्त, अस्थीमज्जा असे शरीराचे नाना अवयव प्रत्यारोपण करता येत आहेत आणि त्यापासून पीडित जीवांना सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत किंवा त्या माणसाला नवा जन्म प्राप्त होत आहे,  म्हणजे मरणाऱ्या व्यक्तीने जो अवयव दान केला तो दुसऱ्या शरीरात जीवंत राहतोय.
         अवयव दान म्हणजे नेमके काय दान करायचे ह्याबद्दल पुरेशी जनजागृत्ती नाही. शिकलेली माणसेही ह्या दानाबद्दल खूपच अनभिज्ञ आहेत तर अडाणी माणसे ह्याबद्दल काय निर्णय घेणार. शरीरातील रक्त हाही अहोरात्र फिरणारा एक अवयवच, आज रक्तदान सर्वश्रुत आहे. थॅलेसेमीया असणाऱ्या बालकाला, अपघातात जखमी झालेल्या जीवलगाला रक्ताची गरज विचारा. प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होवून जेव्हा होणाऱ्या बाळाच्या आईची प्राणज्योत मालवते तेव्हा आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. त्वचा दान केली तर अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या एखाद्या मुलीला तिचं सौंदर्य परत मिळू शकतं. अस्थीमज्जा दान केली तर कॅन्सर असलेला एखादे बालक शंभर वर्षे जग बघू शकते. नेत्रदानाने आंधळ्याच्या जीवनातील अंधार कायमचा दूर होईल. दोन्ही मुत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना डायलिसिसच्या त्रासातून मुक्तता मिळेल. काही अवयव जीवंतपणी दान करता येतात उदा.रक्त, मुत्रपिंड(किडनी) तर ज्या अवयवांवर माणसाचे जीवन सर्वस्वी अवलंबून असते ते अवयव हे मृत्यू झाल्यानंतर दान करता येतात. उदा.यकृत, हृदय,मेंदू ई. कारण मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक अवयव विघटन पावण्याचा कालावधी भिन्न आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात शरीरातील बरेचसे अवयव हे योग्य कालावधीत दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपीत केल्यास त्यांचे कार्य अगदी पूर्ववत चालू ठेवतात आणि दुसऱ्या शरीरास 'जीवन दान' देतात.
            अवयवदानाबद्दल आपण जवळच्या नातेवाइकांकडे इच्छा व्यक्त करू शकतो, स्वतःच्या मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करू शकतो. सज्ञान माणूस विविध अवयव जतन करायची सुविधा उपलब्ध असलेल्या संस्थे
त, दवाखान्यात आपल्या हयातीत कधीही नोंदणी करू शकतो. मृत्यूपश्चात नातेवाईकांनी संबधीत संस्थेला वेळेवर कळवावे लागते. मेंदू निकामी झालेल्या,कोमात असलेल्या व्यक्तीचेही अवयव नातेवाईकांची इच्छा असेल तर दान करता येतात. रक्तदान तर वर्षातून तीनवेळा करता येते. एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयास आपले संपूर्ण शरीरही दान करू शकतो. भविष्यात निष्णात डॉक्टर तयार होण्यासाठी हातभार लावू शकतो. अवयवदानाबद्दल सर्व क्षेत्रातून जनजागृती होणे गरजेचे आहे, मानवी अवयव जतन-संवर्धन-प्रत्यारोपण संबधीत तंत्रज्ञान अजून विकसित करण्यासाठी प्रत्येक देशाने पुरेसी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध तंत्रज्ञान सर्वांमुख होणे गरजेचे आहे.
               माझा विश्वास आहे,अवयवदान करून प्रत्येक माणूस 'मरावे परि कीर्तीरूपी उरावे' ही उक्ती सार्थ ठरवू शकतो.
---------------
डॉ.सखाराम दगडू भगत
गाव-निनावी,
पोस्ट-पिंपळगाव डुकरा,
ता.-इगतपुरी,
जि.-नाशिक
पिनकोड-४२२५०२
मो.नं.९५२७५५७०६९

"अवयव दान- सामाजिक बांधिलकी"
  'मरावे परी किर्ती रूपे उरावे'असं म्हणण्याऐवजी आता 'मरावे परी देह रूपी उरावे' असं म्हणण्याचा काळ आला आहे. बदल हा निसर्गनियम आहे. म्हणूनच काळानुसार बदलणे ही आजची काळाची गरज आहे. आजची माणसाची  जीवन जगण्याची पध्दत बदलली. त्यामुळे माणसाचे आयुष्य हे पाण्याचा बुडबुडा बनलेय. आजचा दिवस तेवढा माझा!हेच अंतिम सत्य बनलय.अशा वेळी आपल्या हातात जेवढे आयुष्यत्या आयुष्याचे सोने कसे करता हे माणसाने पहायला हवे.
     आज मानवी जीवन हे खूप धावपळीचे झाले. त्यातून उदभवणारे वेगवेगळे आजार,पावलोपावली घडणारे अपघात,यातून  कायमचे अपंगत्व,त्यातून येणारे नैराश्य ह्या नित्याच्याच बाबी बनल्यात. अशावेळी आपण माणूस म्हणून सामाजिक जबाबदारी काय स्वीकारतो,हे महत्वाचे ठरते.
  'तनु लाभली ही तुला माणसा,
  दे तिला आता चंदनाचा वसा'
याप्रमाणे आपल्याला समाजासाठी जे जे दान करता येइल ते ते दान करावं. काळाबरोबर दानाच्याही संकल्पना बदलल्या आहेत. मानवी मृत्यूनंतर ज्याच्या त्याच्या धर्मपरंपरेनुसार मानवी देहाचे दहन किंवा दफन केल्या जाते. आणि तो देह कायमस्वरूपी संपवल्या जातो. ज्या देहासोबत आपण गरजवंताला आवश्यक असणाऱ्या अवयवांची राख करतो.परंतु आज आपण अवयवदान,देहदान या रुपाने दुसर्याचे आयुष्य वाचवून स्वत:ला अमरत्व बहाल करु शकतो. कालपरवा बुलढाण्यात  घडलेली घटना माणुसकीचा झरा अजूनही कसा जिवंत आहे,याचे उदाहरण आणि एक नवीन पाऊलवाट निर्माण करणारे आहे. एका मुलाचा अपघात झाल्यानंतर तो वाचणार नाही,हे डॉक्टराकडून कळाल्यानंतर त्याच्या आईने ताबडतोब त्या मुलाचे काही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यातून चार जणाना जीवदान मिळाले. तेवढ्या दु:खाच्या प्रसंगी त्या आईने दाखविलेला धिरोदात्तपणा पाहून आपण अचंबित होतो. अनेकाना आलेल्या अपंगत्वातून बाहेर काढण्यासाठी,त्याला जीवदान देण्यासाठी आपले अवयव दान किंवा देहदान अतिशय महत्वाचे ठरते.जी गोष्ट अनेकांचे जीव वाचवणार आहे ती बाब जाळणे किंवा गाडून टाकणे हे कालबाह्य करावे लागणार आहे. काही अशा रुढीपरंपरा 'जुने जाऊद्या मरणालागूनी 'याप्रमाणे संपवाव्या लागणार आहेत. ज्या समाजात आपण घडलो त्या लोकांसाठी देहदान किंवा अवयव दान करुन आपण सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले आद्यकर्तव्य समजायला हवे. आपल्या मृत्यूपूर्वी देहदान किंवा अवयवदानासाठी आपण संबंधित संस्थेला संमतीपत्र देवून ठेवायला हवे. मृत्यूनंतर काही तासाच्या आत ते आपले शरीर नेवून सत्कारणी लावतात.
    मेडिकल कॉलेजला शिक्षण घेऊन भावी डॉक्टर निर्माण होत असतात. तएकवेळ तिथे भेट दिली तेव्हा कळाले की या मेडिकलच्या विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी मानवी देह मिळत नाहीत. अशावेळी आपण मृत्यूनंतर एवढे अनमोल देह का संपवतो,याचे आश्चर्य वाटते. असं म्हणतात,आपण जन्माला येताना काय घेऊन आलो?जे अनमोल देह आपण घेऊन आलो तोच जर समाजासाठी ठेवून गेलो तर केवढी मोठी सामाजिक बांधिलकी आपल्याकडून जपल्या जाईल !
  शेवटी एवढेच म्हणेन," मिळाले जे सर्व,ते करोनिया दान,
सोडियेला प्राण,कृतार्थतेने"
याप्रमाणे कृतार्थ मृत्यू हवा असेल तर सामाजिक बांधिलकी जपायलाच हवी.
   - संगीता देशमुख,वसमत

‪+91 99704 46447‬

अवयव दान सामाजीक बांधिलकी

दान म्हटले की विषेशतः आठवते ते संपत्ती, अन्न, आणि फारफारतर शरिराचा संदर्भ घेतला तर नेत्र.जो तो दान वेळोवेळी करतोच आपापल्या ऐपती प्रमाणे परंतु कधी विचार केलात मित्रांनो आपल्या जवळ अशी संपत्ती आहे जिचे मोल कोणासही लावता येणे अशक्य (IMPOSSIBLE)आहे. निसर्गाचा मिळालेला अमुल्य ठेवा म्हणजे आपले शरिर.
वर बोललोच आपण त्यानुसार शरिराचा नेत्र हाच अवयव पहिले अन् ब-याच जणांना समोर येतो परंतु अशा ब-याच गोष्टी आहेत ज्या आपण निकटवर्तीयांनाच नाही तर इतरांनाही देउ शकतो. अनेक दुर्धर आजार असे आहेत ज्याला जगातील कोणत्याही चिकित्सा पद्धतीने बरे करता येणे कठीण आहे परंतु विज्ञानात अशी प्रगती झाली आहे की आज एखादा अवयव निकामी असेल तर त्यास प्रत्यारोपित करून कार्यान्वित करता येते.
जसे
रक्त (Blood)
थँलिसेमिया असणारे रुग्ण, अपघाती व्यक्ती, एखादा रुग्ण ज्याची शल्यचिकित्सा होणार असेल, अँनेमिया सारखे रुग्ण
डोळे (Eyes)
नेत्रहिन व्यक्ती, डोळ्यातील कॉर्नीया
यकृत (Liver)
पचन संस्थेचे रुग्ण,
प्लिहा (May b pancreas)
डायाबिटीस सारखा आजार नियंत्रीत ठेवण्यास ह्या अवयवाचा महत्वाचा सहभाग, As it produces Natural Insuline in Body.
त्वचा (Skin)
आपण नेहमीच म्हणतो, ऐकतो प्लास्टिक सर्जरी , परंतु हीच त्वचा आपण दान ही करू शकतो ती Psoriasis (त्वचा रोग), पांढरे चट्टे, तसेच अँसिड हल्ला झालेले दुर्देवी, यांना नव चैतन्य जीवन मिळु शकते
हृदय (Heart)
हे आपण दान करून अनेक आजारांना इलाज नाही असे आजार असलेले रुग्ण वाचवू शकतो.
मेंदु (Brain)
ह्यातील इतके छोटे भाग आहेत जे प्रत्यारोपित करून अनेक आजारात गुणकारी परिणाम देतात.
Stem cell (मराठीत नाही आठवले)
अनेक प्रकारचे कर्क रोग, तसेच एकुण चौतीस (As per my knowledge त्याहीपेक्षा जास्तच) असे आजार आहेत ज्यात हे गुणकारी (अर्थातच शेवटचा) उपाय आहे.
आजकाल प्रसूती नंतर लगेच (जास्तीत जास्त अर्धा तास)नाळमधुन असणारे रक्त (50मिलीलिटर) रक्त घेऊन ते योग्य प्रक्रियेने साठवून ते वापरतात. If DNA MATCHES THEN CAN USE IN BLOOD RELATIONS ALSO AND IT HELPS.
मज्जा (Bone Marrow)
हा देखील स्टेम सेल प्रमाणे कार्य करतो.
Helps in Osteoporosis, as well as many types of cancer related to bones, blood also.
देह (Body)
एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयास शिक्षण म्हणून वापरासाठी संपुर्ण देह दान करता येते.

बरेच काही आहे पण वेळेअभावी आवरते घेत आहे.
शेवटचे इतकेच की आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे शक्य तितक्या प्रकारे शरिर दान करून अनेक रुग्णांना जीवनात जगण्यास नवी उम्मेद देऊ शकतो.फक्त मृत्युनंतर शक्य तितक्या लवकर अशा संस्थांना कळविले असता ते लवकरात लवकर तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे अवयव गरजवंताला पोहचवितात, कारण प्रत्येक अवयवाचा मृत्युनंतर चा कार्यकाळ मर्यादित व वेगवेगळा असतो.
संजय पाटील

91 93247 42706‬
       विषय -- अवयवदान--
     एक सामाजिक बांधिलकी
====================
    🌹प्रेषक== कुंदा पित्रे🌹
====================
खरचं आज समाजात अनेक प्रवाह येऊन मिसळत आहेत सामाजिक प्रश्नाची चळत वाढतेच आहे. संततिनियमना पासुन ते लिव्ह इन रिलेशनशिपपर्यत मजल आज गाठली गेलेय. ही काळाची गरज म्हणायची की फक्त आपलीच कातडी वाचवायची ! हा मुद्दा मोठा गहन आहे.
माणूस जेव्हा साठीच्या पुढे झुकायला लागतो त्यावेळी त्याच्यात अनेक बदलाव येतात.कोणी अध्यात्माकडे वळतो. कोणी परोपकारी भावनेने मदत करू लागतो.कोणी आपल्या ज्ञानाचा फायदा करून देतो.पण काहीना जग मिथ्या वाटू लागते.जवळच्यांचे मृत्यु,जवळच्या माणसांनी दखल न घेणं यातून त्या व्यक्तिच्या सभोवती एक दाट वलय निर्माण होते.तो एकटा पडतो .सामाजिक कार्यात सहभाग घेणंही अशक्य होऊन बसते.
अशावेळी  त्याने अवयव दानाचे कायदेशीर कागद पत्र करावेत.जो विश्वासू आहे त्याच्याकडे सुपुर्त करावेत .
खरे तर अवयव दान अजुन लोकांच्या अंगवळणी पडलेले नाही.
आताच बाहेर गावाहून आणून दोन ह्रदयरोपणे झाली.अगदी कालच वाचले त्या व्यक्तिने हाडे दिली.अगदी दोन दिवसापुर्वी एकाच्या अंगावरून ट्रक गेला त्याचे दोन तुकडे झाले.त्यास्थितीत त्याने अवयव दान केले.अर्थात त्याचे डोळे उपयोगी पडले.ही खरी सामाजिक बांधिलकी.
दान म्हटलं अनेक प्रकारची दाने आहेत.पैशाने आपण किती श्रीमंत आहोत उदार आहोत हेहि दाखविण्याचा अट्टाहास असतो.पण हे सारे आपण इथेच सोडून जातो.आपल्याबरोबर कांहीच येत नाही.सगळ्या दानात अवयव दान हे वरच्या पंक्तित बसते.
आज मेडिकलशास्त्र एव्हढे प्रगत झाले आहे. की,मृत्यु होताच अगदी कातडी पासुन ह्रदयापर्यत सारे अवयव घेण्यासारखे असतील तर ते घेऊन बाॅडी परत सारखी करून तुम्हाला पुढच्या विधीसाठी दिली जाते.
जसं सत्पात्री दान,अन्नदान,भर दुपारी अभ्यागताला जेऊ घालणे, गरीबाला मदत ! हे महत्वाचे त्याहीपेक्षा अंधाला डोळे,ह्रदरोग्याला ह्रदय,रक्ताची गरज असणा-याला रक्त,केस त्वचा ,हाडे असे कितीतरी उपयोग मानवाच्या शरिराचे होतात . ज्या व्यक्तिने दान केलेय त्याला,व ज्या व्यक्तिला त्या अवयवाचा फायदा झालाय ती व्यक्ति आयुष्यभर दुवा देईल.आणि हेच संचित माणसाने कमवायचे असते.
ईश्वर भक्ति ही नाम संकिर्तनात आहे.तसेच सहेदी दुस-यास उपयोगी पडणे हेच ------
ख-या मानवतचे लक्षण आहे.
म्हणुन म्हणावेसे वाटते---
कधी कधी घेऊन जा असंच
कोणालाही दुःख न देता
ईश्वराचं देणं देऊन जा तसंच
गरजूंना सुख दे जाताजाता !!
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
कुंदा पित्रे






91 94214 18827‬
अवयव दान सामाजिक बांधिलकी.....

दोन महिन्यापुर्वीची गोष्ट आम्ही आमच्या व्याह्यांकडे अंतयात्रेला गेलो होतो गावाला....
त्याच्या भावाचा ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यु झाला होता...एका बाजुला महिला बसलेल्या दिसल्या... तिथे जाऊन बसली... संवादात एक दुसरीला सांगत होती... अगं काय यांची पध्दत, देवाच्या दारात जातांना असले जाणे योग्य का? पुढच्या जन्मी आंधळेच होऊन जन्माला येतील ना हे... मोठ्या लोकांचे काय हे थेरं.... चौकशी अंती कळले की ब्रेन हॅमरेज झाल्याने डॉ.च्या सल्याने दोन्ही किडनी यकृत डोळे मोठे आतडे दान दिले गेले होते... अन अजुन विशेष म्हणजे प्रेत यात्रा स्मशान भुमीत न जाता मेडिकल कॉलेजला जाणार होती...
किती धाडसी निर्णय होता तो. गौरवास्पदच...
आपले दुःख बाजुला ठेवुन अवयव दान करणे ..किती धाडसी नी जुन्या रुढीला फाटा देऊन अंधश्रध्दा बाजुला फेकुन सरळ प्रेत मेडीकलच्या मुलांना शिकविण्यासाठी देणे...गौरवास्पदच....
   अनुभव डोळ्यासमोर झाला अन मनाने कुठे तरी वेध घेतला.. अरे असे जर आपण केले तर? अन माझी इच्छा घरात मुलांना बोलुन दाखवली...माझेही जे अवयव योग्य असतील तर ते खुशाल दान करा... अन घरात स्फोटच झाला मिस्टरांचा.. मुर्खासारखे काय बडबडतेस... अतृप्त आत्मा  राहील...मी शांत राहीली....शांत झाल्यावर परिस्थिती समजावुन सांगितली.. मी पारशी लोकांच्या  अंतविधीची माहीती देत मरणोत्तरही इतरांच्या उपयोगी पडावे तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होईल......
  उपदेश करणे सोपे असते पण स्वतःपासुन सुरुवात करुन खऱ्या अर्थाने समाज नविन विचारांच्या दिशेने पाऊल उचलेल.... चला साहीत्यमंथन ग्रुप पासुन सुरुवात करुया...
अवयव दान करा नी समाजाचे ऋण फेडा....सुनीता पाटील ...नाशिक


📚 साहित्य मंथन whatsapp ग्रूप आयोजित रविवार विचार मंथन स्पर्धेत

* अवयव दान : एक सामाजिक बांधिलकी *

 या विषयी मांडण्यात आलेल्या विचारांचा जाहिर करण्यात आलेला निकाल.

* प्रथम - नासा येवतीकर, धर्माबाद
* द्वितीय - संगीता देशमुख, वसमत
* तृतीय - सुलभा कुलकर्णी, मुंबई

 सर्वांचे विचार खूपच छान आहेत.
~~~~~~ΦΦΦΦΦΦΦΦ~~~~~~~~~~~~~ΦΦΦΦΦΦΦΦ~~~~~~~













पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...