Saturday, 28 June 2025

वेळेला महत्व देणारे श्री बाबुराव भोजराज सर ( Baburao Bhojraj Sir )

वेळेला महत्व देणारे बाबुराव भोजराज सर

समाजात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. शिक्षकांविषयी म्हटले आहे की, "शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तो आयुष्य घडवतो." शिक्षक हे पुस्तकी ज्ञानासोबत त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याचे काम करतात. शिक्षक म्हणजे अंधारात प्रकाश दाखवणारा दिवा होय. शिक्षकांच्या सहवासामुळे अनेकांचे जीवन सुधारले जाते. शिक्षक मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि धैर्याने संकटाला तोंड द्यायला शिकवतात. असेच एक शिक्षक म्हणजे बाबुराव हणगोजी भोजराज सर होय. आज त्यांची सेवानिवृत्ती त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला आढावा. 
बाबुराव हणगोजी भोजराज यांचा जन्म धर्माबाद तालुक्यातील जारीकोट या गावी 29 जून 1967 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण जारीकोट येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयमध्ये त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम म्हणजे डी. एड. ला देगलूर येथे प्रवेश घेतला. पण काही कारणाने येथील कॉलेज बंद झाल्याने त्यांनी आपले द्वितीय वर्षाचे शिक्षण शासकीय अध्यापक विद्यालय धर्माबाद येथून पूर्ण केले. 
डी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कु.) येथील संत कबीर विद्यालय संस्थेवर दोन वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. हदगाव तालुक्यातील आष्टी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव ( ता. ) याठिकाणी दिनांक 08 जुलै 1992 रोजी रुजू झाले. ही त्यांची आपल्या सेवेतील पहिली शाळा होती. बोरगाव हे अतिशय लहान खेडे होते, त्या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. आष्टीपासून दोन किलोमीटर पायी चालत जावं लागायचं, त्यातच रस्त्यावर मोठा नाला होता. पावसाळ्यात पूर आला की नाला ओलांडून जाता येते नव्हते. कधी शाळेला उशिरा व्हायचा तर कधी शाळेच्या गावी थांबावे लागायचे. दळणवळणाची कोणतीच सुविधा नसल्याने त्या गावात मुक्कामी राहण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय नव्हता. या त्रासाला कंटाळून त्यांनी त्याच गावात राहण्याचा निश्चय केला. गावात मुक्कामी राहू लागल्यामूळे प्रत्येक कुटुंबाशी व व्यक्तीशी माणुसकीचे नाते जुळले यातूनच साक्षरता अभियान मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांना खूप मदत झाली. त्यामुळे याठिकाणी सहा वर्षे त्यांनी गावात राहून सेवा केली. तीस वर्षांपूर्वी जुळलेली नाती आजतागायत कायम आहेत प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी सर्वजण सोबत असतात. गावातील लोकांसोबत त्यांचे त्यावेळेसचे प्रेम आणि स्नेह आजही कायम आहे. या शाळेवर त्यांना सतिश भुरे नावाचे शिक्षक उत्तम सहकारी म्हणून लाभले. या शाळेतून त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोट येथे झाली. याठिकाणी ते 16 जुलै 1998 रोजी रुजू झाले. येथील शाळेवर त्यांनी अनेक उपक्रम राबवून विद्यार्थांना ज्ञानार्जन करण्याचे काम केले. या शाळेवर काम करताना सतिश बोधनकर, राम चिलकेवार, गोविंद मोरे आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.  येथे देखील सहा वर्षाची सेवा केल्यानंतर त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायखेड येथे झाली. येथे दिनांक 05 जुलै 2004 रोजी रुजू झाले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून येथील शाळा त्यांनी आकर्षक केली होती. शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज विविध पदावर काम करत आहेत. या शाळेवर काम करताना देविदास नारमोड आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. याठिकाणी नऊ वर्षाची सेवा केल्यानंतर दिनांक 01 जून 2013 रोजी त्यांची बदली बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे प्रशासकीय बदली झाली. या शाळेत कार्यरत असताना त्यांनी मुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळले व विविध उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थांना गुणवंत करण्याचा प्रयत्न केला होता. याठिकाणी 05 वर्षाच्या सेवाकाळात त्यांना जगन्नाथ दिंडे, इरेश्याम झंपलकर, नासा येवतीकर आणि सौ. निता दमकोंडवार या शिक्षकांची उत्तम साथ मिळाली. 
चिरली शाळेतील सहकारी सोबत

त्यानंतर त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी येथे ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली झाली. दिनांक 29 मे 2018 रोजी या शाळेवर रुजू झाले. याठिकाणी देखील त्यांनी आपल्या स्वभावानुसार उत्तम प्रकारे शाळा सांभाळली. याठिकाणी त्यांना मिठू लोणे नावाचे उत्तम सहकारी मिळाले. सात वर्षाच्या सेवेनंतर ते आज 30 जून रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण करीत असल्याने ते याठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत.  
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून हदगाव, धर्माबाद व बिलोली तालुक्यात 32 वर्षे 11 महिने 22 दिवस अशी प्रदीर्घ सेवा केलेली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे उत्तम कार्य केले. म्हणून त्यांना तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचसोबत त्यांनी शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी ibta संघटनेच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. संघटनेच्या चळवळीत काम करताना अनेक शिक्षक आणि अधिकारी यांचा संपर्क झाला होता. संघटनेसोबत त्यांचे सहकार क्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आहे. शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भास्कर पतसंस्था नायगाव ( बा.) या पतसंस्थेवर त्यांनी काही काळ संचालक म्हणून काम पाहिले तर दोन वर्षे सचिव पदावर काम केले. या काळात त्यांनी पतसंस्थेत जास्तीत जास्त सभासद करण्याचे व शिक्षकांना आर्थिक मदत करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पतसंस्थेत काम करत असताना सभासदाच्या हितासाठी व पतसंस्थेच्या भरभराटीसाठी अनेक खर्चात काटकसर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. 
चिरली येथे आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 

त्यांचे कौटुंबिक जीवन देखील सुखी समाधानाचे आहे. त्यांच्या परिवारात एकूण पाच भावंडे होती. ते घरात सर्वात जेष्ठ होते. त्यांना चार बहिणी होत्या. सर्व बहिणी व त्यांच्या मुलं-मुली यांनाही घरच्यासारखे प्रेम व वेळप्रसंगी आर्थिक मदत देखील केली आहे. त्यांच्या सौभाग्यवतीच्या अमूल्य अश्या सहकार्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करू शकले. त्यांना दोन मुली रामेश्वरी व रश्मी व एक मुलगा राहुलकुमार अशी तीन अपत्य असून मुलगी रश्मी महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत आहे. 
मला माध्यमिक शाळेत शिकविलेले शिक्षक श्री विलासराव आग्रे आणि श्री जांबुवंतराव धुप्पे यांच्यामुळे मी एक उत्तम व यशस्वी जीवन जगू शकलो आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली म्हणून माझ्यासाठी ते नेहमी आदर्श व्यक्ती आहेत, असे ते म्हणतात. 
एकूण 33 वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केला नाही. वेळेच्या बाबतीत ते अत्यंत शिस्तीचे होते. त्यांनी स्वतः वेळेचे पालन केले आणि विद्यार्थ्यांना वक्तशीरपणाचे महत्व आपल्या वर्तनातून दाखवून दिले. आजपर्यंतच्या सर्वच शाळेत त्यांना उत्तम सहकारी शिक्षक लाभले. ज्यांच्या सहकार्यामुळे ते उत्तम कार्य करू शकले. ते सर्वच शिक्षक माझ्या स्मरणात कायम मित्र म्हणून राहतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन सुखदायी, आरोग्यदायी आणि यशस्वी होवो हीच या मंगल प्रसंगी शुभकामना व पुढील भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

2 comments:

  1. पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक .....हार्दिक शुभेच्छा....सर....

    ReplyDelete
  2. वेळेला महत्व देणारे सर भोजराज सर

    ReplyDelete

वेळेला महत्व देणारे श्री बाबुराव भोजराज सर ( Baburao Bhojraj Sir )

वेळेला महत्व देणारे बाबुराव भोजराज सर समाजात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. शिक्षकांविषयी म्हटले आहे की, "शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत...