Saturday 2 June 2018

अभ्यास

अभ्यासाशिवाय पर्याय नाही

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर नुकतेच शाळेला सुरूवात झालेली आहे. घरात बसून बसून कंटाळून गेलेली बच्चेकंपनी कधी एकदा शाळेला प्रारंभ होते याची वाटच पाहत होती. नवा वर्ग, नवे पुस्तक, मित्रही नव्हे आणि यावर्षी शिक्षक सुद्धा नवे मिळाले आहेत. त्यामुळे शाळेला जाण्याची उत्सुकता मुलांमध्ये होती. ते वास्तव चित्र विविध ठिकाणी संपन्न झालेल्या प्रवेशोत्सव बातमीच्या आधारावर कळून आले. काही ठिकाणी नवागत मुलांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले तर काही ठिकाणी प्रभातफेरीच्या माध्यमातून नवागतांचे स्वागत करण्यात आले. काही शाळेत गुलाबाचे फुल देऊन आणि मोफत पुस्तके वाटप करीत नवीन विद्यार्थ्यांचे उल्हासात स्वागत करण्यात आले. राज्यातील एका शाळेने तर नवीन विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीमधून गावात मिरवणूक काढली. या सर्व घटनेमागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे मुलांना शाळा म्हणजे तुरुंग वाटता कामा नये. त्यांनी शाळेत दररोज आनंदात यावे आणि आनंदात जावे. त्यांच्या मनावर कसल्याच प्रकारचे दडपण राहू नये. बहुतांश वेळा पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थीच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न डोकावतात. आई-वडिल आणि घर सोडून राहणे त्यांना अवघड वाटते. दिवसभर कुटुंबाचा सहभाग व मोकळ्या जागेत विविध खेळ खेळलेले मूल जर सहा तास शाळेत राहू लागले तर त्यास कठीण वाटणारच, यात शंका नाही. त्यास्तव नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांवर दडपण येऊ नये यासाठी शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार होण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा केला जातो. ज्यात सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केल्या जाते. मुलांना सर्व काही नवीन मिळाले जसे की पुस्तक, वह्या, पेन, वर्गमित्र, पिशवी, शिक्षक परंतु एक जुना मित्र मात्र जशास तसा मिळाला ते म्हणजे अभ्यास.
अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. शाळेत शिकविलेला भाग घरी गेल्यानंतर उजळणी करणे आवश्यक आहे. अशी जी मुले घरी जाऊन अभ्यास करत असतात त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात, म्हणजेच त्यांना ज्ञान मिळते. परंतु बहुतेक वेळा शाळा सुटल्यानंतर मुले घरी जातात, दप्तर घरात भिरकावून फेकतात आणि मित्रांसोबत खेळायला बाहेर पडतात. दिवे लागणीची वेळ होते तरी घरात परतण्याचा नाव घेत नाहीत. तुळशीसमोर दिवा लागल्यानंतर खेळून खेळून थकूनभागून मुले घरात येतात. स्वयंपाक तयार असतोच, त्यामुळे गरमागरम जेवतात तोपर्यंत त्यांची  झोपण्याची वेळ होते आणि शाळेत काय काय शिकविले याचा मागोवा न घेता म्हणजे अभ्यास न करता झोपी जातात. पुन्हा सकाळी उशिरा उठणे व शाळेची तयारी, त्यात अभ्यासाला वेळच नसतो. त्यामुळे अभ्यास नावाचा मित्र त्यांच्यापासून दुरावल्या जातो. संकट काळात मदत करणारा तोच खरा मित्र असे म्हटले जाते आणि अभ्यास या व्यवस्थेत तंतोतंत बसतो असे वाटते. जी मुले अभ्यासाला मित्र बनविली आहेत त्यांना जीवनात आलेली संकटे काही वाटत नाहीत आणि याउलट अभ्यासाला मित्र न मानणारे मंडळी लहान-लहान संकटात सुद्धा घाबरून जातात. संकटाना तोंड द्यायची त्यांच्यात शक्तीच नसते. त्यासाठी अभ्यास सर्वात महत्त्वाचे आहे. पहिल्या वर्गापासून ते पीजीपर्यंतच्या शिक्षणात अभ्यास अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभ्यास म्हणजे सराव, त्यास सवय असेसुद्धा म्हटले जाते. सवयीचे दोन प्रकार आहेत, एक चांगली आणि दुसरी वाईट.  तर अभ्यास हे एक क्रमांकाच्या प्रकारात म्हणजे चांगल्या सवयीमध्ये मोडणारी आहे. अभ्यासाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी आजीवन विद्यार्थी तर होतेच शिवाय वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याचा त्यांना विलक्षण छंद होता. म्हणूनच त्यांच्या जयंतीच्या दिवशी सलग अठरा तास अभ्यास करून त्या महामानवाला अभिवादन केले जाते. अश्या उपक्रमातून आपण सर्वांनी एकच बोध घ्यावा, ते म्हणजे सदोदित व नियमित अभ्यास करणे. अभ्यास करण्यात आळस किंवा कंटाळा केला तर कितीही चांगली शाळा, शिक्षक व शिकवणी असूनही त्याचा विद्यार्थ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
अभ्यासात नियमितपणा व सातत्यपणा या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यार्थी शालेय वेळापत्रकाचा ज्याप्रकारे तंतोतंत पालन करतो त्याच धर्तीवर स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ठराविक ठिकाणी ठराविक वेळी ती क्रिया अगदी सहज घडते. आपले मन देखील ते ठरविलेले कार्य करण्यासाठी तयार असते. त्यासाठी रोजचा अभ्यासाची वेळ सर्वप्रथम ठरविणे आवश्यक आहे. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करण्याची पद्धत भविष्यात घातक ठरू शकते. त्यामुळे ठरवून अभ्यास करण्याची सवय आपल्या मनाला चांगली सवय लावून जाते. सवयीचे रूपांतर शिस्तीत झाली की मग अभ्यासासाठी वेळ राखून ठेवण्याची गरजच राहत नाही. आपण खेळण्यासाठी वेळ काढतो. चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढतो. मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढतो. टीव्हीवरील सिरीयल बघण्यासाठी वेळ काढतो. या सर्व क्रिया अर्थातच आपण आपल्या मित्रांसोबत करत असतो. त्यामुळे घरातील सर्वच मंडळी आपणाला दोष देतात. हे पोरगा काही चांगला नाही, त्याच्यामुळे माझं लेकरू वाया जात आहे, एवढेच नाही तर अशा मुलासोबत न राहण्याची तंबी सुद्धा देतात. यांऐवजी आपण सर्व मित्र आपल्या ठराविक वेळानुसार अभ्यासासाठी एका मित्राच्या घरी एकत्र येऊन गटात अभ्यास केल्यास कुटुंबातील मंडळी आपणास चांगले म्हणतील की वाईट, अर्थातच चांगले म्हणतील. चार-पाच मुलांचा गट करून अभ्यास करण्याची सवय आपण लावून घ्यावी. आजपर्यंत जेवढे ही यशस्वी व्यक्ती झाले आहेत त्यांच्या जीवनात अभ्यासाचा सिंहाचा वाटा आहे, हे कळते. तेव्हा चला तर मग यावर्षी आपण आपल्या अभ्यासाचा वेळापत्रक तयार करूया आणि त्या अनुषंगाने मित्रांच्या गटातून दररोज न चुकता नियमितपणे अभ्यास करण्याचा संकल्प करु या. गटात अभ्यास करण्याचा फायदा काय झाला ? अभ्यासाशिवाय कोणताही पर्याय नाही हे आपल्या मित्रांना सांगण्यास विसरू नका. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday 1 June 2018

पर्यावरण वाचवा

गोष्ट लहान पण काम महान

जगप्रसिद्ध ग्वेन डायर वर्ल्ड व्ह्यू स्तंभाखालील वुई आर फ्रॉग इन दी पॉट या लेखातून त्यांच्या शीर्षक अर्थ सांगतो की, बेडूक उचलून जर उष्ण पाण्यात टाकले तर ते चटकन उडी मारुन बाहेर पडते. मात्र तेच जर थंड पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवले आणि मंद आचेवर ठेवून पाणी हळूहळू तापविले तर बेडूक छान पैकी शिजते परंतु भांड्यातून उडी मारून बाहेर येत नाही. ह्या प्रयोगातून आपण काय शिकतो ? तर आज आपली सुद्धा अवस्था त्या बेडकासारखीच झाली आहे. पुढे लेखक म्हणतो की, जागतिक बँकेच्या अप्रकाशित अहवालानुसार तापमान जर अधिक दोन सेल्सिअस डिग्रीने वाढले तर भारतीय अन्नधान्य उत्पादन 25 टक्क्यांनी आणि चीनचे 38 टक्क्यांनी घटेल तसेच भूजल साठेही संपलेले असतील. यावरूनच  लेखकाने वरील प्रयोगाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. देशाच्या राजधानीपासून ते गल्लीबोळातल्या रिकामटेकड्या युवकांपर्यंत सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे. यापुढे आपण सर्वजण काय करावे ? यापेक्षा काय करू नये ? यावरच जास्त भर दिलेले बरे वाटते. कारण काही करा म्हटलं की आपले मानवी मन लवकर तयारच होत नाही तसेच त्यास तन-मन-धन याचीही गरज भासते आणि करू नये म्हटले की ज्या ठिकाणी आपण आहोत तेथील परिस्थितीचा विचार करून शक्यतो तसे करण्याचे टाळावे म्हणजेच नकळत आपण काहीतरी करीत असतोच.
सध्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्रत्येकांच्या घरात जेवढे सदस्य तेवढ्या गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे आज इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत असे आपण म्हणतो. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा इंधनाच्या दराची तुलना जर आजच्या दराशी केली तर त्यात जवळपास अडीच पट वाढ झालेली दिसून येते. पुढील दहा वर्षात या इंधनाचे दर वाढून पाच पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी आपण काय करणार ? आपल्या सर्व गाड्या अशावेळी भंगारमध्ये विकून टाकण्याची वेळ आपणावर तर येणार नाही काय ? याचा असा नुसता विचार जरी केला तरी अंगावर शहारे येतात. तेव्हा आपणाला त्या बेडकाचे उदाहरण तंतोतंत लागू पडल्यासारखे वाटते. जेव्हा टंचाई वा उणीव वाटते त्याच वेळी माणूस जागा होतो इतर वेळी मात्र त्याचा अपव्यय करतो.
पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाची निर्मिती करणे निश्चितच आपल्या हातात नाही मात्र त्या इंधनाची आपण नक्कीच बचत करू शकतो. शहरात किंवा एक-दोन किलोमीटरच्या आत फिरत असताना शक्यतो गाडीचा वापर टाळणे योग्य राहील. त्यासाठी पर्याय म्हणून पायी जाणे किंवा सायकलीचा वापर केल्यास आपला शारीरिक व्यायाम तर होईलच शिवाय वाटीभर इंधनाची बचत ही होईल. आपली बचत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची बचत आहे ही जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. गाडीचा वापर शक्यतो अशा ठिकाणी केला जावा ज्या ठिकाणी गाडीशिवाय पर्यायच नसतो. मात्र आजकाल आपण स्वतःची इमेज, स्टेटस व इगो यामुळे या समस्याकडे संपूर्णपणे कानाडोळा करून वागत आहोत. आज आपणाला याविषयी काही चटका किंवा त्रास जाणवत नसल्यामुळे त्याचे काहीच वाटेनासे होत आहे मात्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा संपून गेला, तर आपले काय हाल होतील ? याचा नुसता विचार जरी केला तरी डोकं सुन्न पडते. त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने इंधनाची बचत करावी. इंधन बचत करण्यात स्वतःचा पैसा वाचला यापेक्षा देशाची संपत्ती वाचली हे महत्त्वाचे आहे.
विजेची बाबसुद्धा इंधनासारखीच आहे. विजेची निर्मिती करणे हे सामान्य माणसाच्या हातात नाही मात्र पावलोपावली त्याची बचत करता येते. बचत म्हणजे एक प्रकारे वीज निर्मितीत होय. त्यास्तव अत्यंत जागरूकपणे विजेचा वापर करणे आवश्यक आहे. दिवसा घराचे दारे व खिडक्या खुल्या ठेवून सूर्यप्रकाशाचा वापर करण्याऐवजी दारे-खिडक्या बंद करून विजेच्या दिव्याचा वापर करतो हे खरोखरच आपल्या बुद्धीला पटते का ? गरज नसताना पंखे व दिवे बंद करणे आवश्यक आहे. मनोरंजनाचा विचार केल्यास पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेथे रेडिओ होता त्याची जागा आता टीवी आणि संगणकाने घेतली आहे. आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांना त्याचे वेड लागले आहे आणि प्रत्येकाना ती हवीहवीशी वाटते. मात्र रोजच्या टीव्ही पाहण्यामुळे आपल्या कुटुंबाचा एक युनिट वीज खर्ची पडतो, थोडाफार बचत करता येईल काय ? याचा विचार करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहूच नये असे मुळीच नाही मात्र सर्वांनी मिळून जे काही बघता येईल ते जर पाहिले आणि टीव्ही सेट बंद केला तर आपल्या कुटुंबात खूप काही बदल बघायला मिळेल. विजेची बचत होईल हे तर होणारच शिवाय लहान मुले व मोठी माणसे यांच्यात संवाद वाढेल म्हणजे त्यांच्यात आत्मीयता निर्माण होईल. मात्र याच टीव्हीमुळे आज कुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली एकाच घरात राहून विभक्त असल्यासारखे वाटत आहे, लहान मुले अजिबात ऐकेनाशी झाली, कुटुंबप्रमुखाचे कामात लक्ष नाही, गृहिणीचे स्वयंपाकात लक्ष नाही कारण त्यांचे सर्वांचे लक्ष टीव्हीवरील कार्यक्रमाने वेधून घेतलेले असते. त्यामुळे इतर बाबीकडे अजिबात लक्ष जात नाही. तसेच जुन्या बल्ब किंवा यंत्राचा वापर शक्यतो टाळावा. कारण जुनी यंत्रे नवीन यंत्रापेक्षा जास्त वीज खर्च करतात आणि त्याचा लाभ सुद्धा आपणाला कमीच मिळतो. त्यास्तव विजेची बचत करण्यासाठी जे काही आपल्याला शक्य होते ते सर्व करावे कारण पुढे हीच बचत आपल्या कामाला येऊ शकते.
घरात वापरल्या जाणाऱ्या गॅसचा वापर करतानाही महिलांनी सहजपणे वापर करणे आवश्यक आहे. स्वयंपाक संपल्यानंतर गॅसचा मेन स्विच बंद करण्यास कधीही विसरू नये ही छोटीशी सवय आपणाला अनेक धोक्यापासून वाचविते आणि नकळत त्या ठिकाणी आपली बचतही होते. हिवाळ्याच्या मोसमात पाणी गरम करण्यासाठी गॅसचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यास्तव त्याकाळात गॅसची टाकी लवकर संपत असल्याची जाणीव महिलांना होत असते. त्याऐवजी महिलावर्गाने सौरबंब बसविण्याचे घर प्रमुखाकडे मागणी करून त्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास इंधन बचत नक्कीच होईल. सौर ऊर्जा हे एक असे इंधन आहे जे की कधीच संपणार नाही. त्याचा वापर करण्यावर महिलांनी पुढाकार घेतल्यास भविष्यातील त्यांची बरीच काही कटकट कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही वस्तू मुबलक प्रमाणात मिळत असले की, त्याचा वापर आपण कसे ही करतो. जसे की पाणी. भारतात जवळपास सर्वच भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळते म्हणून पाण्याची कोणी ही बचत करीत नाहीत. पण ज्यावेळी कडक उन्हाळा पडतो त्यावेळी हीच माणसे घोटभर पाण्यासाठी त्रासून जातात. पाण्याची निर्मिती देखील आपण करू शकत नाही. ती नैसर्गिक देणगी आहे. शेती करताना कमी पाण्याचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे. मात्र फार कमी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. सार्वजनिक नळाद्वारे शासन पाणीपुरवठा करते मात्र नळाला तोटी न लावता बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जाते. या वाया जाणाऱ्या पाण्याची कोणालाही चिंता किंवा काळजी नाही. भविष्यात नळाला देखील मीटर बसवून नळपट्टी वसूल केल्यास पाणी अपव्ययावर निश्चित आळा बसू शकेल असे वाटते. काही मंडळी पाण्याचा पैसा करीत आहेत. याबाबीकडे शासनाने लक्ष घालून नैसर्गिक देणगी असलेल्या साठ्याचे व्यवहार बंद करावे. अन्यथा येत्या काही वर्षात इंधनासारखे पाणी देखील विकत घ्यावे लागेल. आज ही पाणी विकतच घेत आहोत मात्र यात वाढ होईल, असे वाटते.
मी एकटा असे वागलो तर समाजात काय फरक पडतो ? सागरात चिमूटभर साखर टाकल्याने संपूर्ण सागरातील पाणी गोड कधीच होऊ शकत नाही, अशी विचारधारा ठेवण्यापेक्षा थेंब थेंब साचून तळे तयार होत असते अशा विचाराने प्रत्येक जण वागू लागले तर भविष्यात आपण फार मोठी लढाई जिंकू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपली8 नकारात्मक विचारशैली बदलणे गरजेचे आहे. यासारख्या अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्याच्याकडे जागरूकपणे लक्ष दिल्यास आपल्या हातून फार महान काम होऊ शकते. पर्यावरणाला वाचविण्यासाठी जागो माणूस जागो, आपण ही जागे व्हा आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वाना जागे करा. त्या बेडकासारखी आपली अवस्था होऊ नये याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Thursday 31 May 2018

जागतिक दुध दिवस

दूध म्हणजे पूर्ण अन्न

नुकतेच जन्म घेतलेल्या मुलांसाठी दूध हेच पोषक अन्न आहे. सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात त्यामुळे मूल जन्मल्याबरोबर दूध पाजविण्याचा सल्ला डॉक्टरमंडळी देतात. दूध म्हणजे सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. दूध निर्मिती करणे हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे. सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूध पाजून मोठे करतात. एखाद्या महिलेला स्तनातून दूध येत नसल्यास त्या लेकराला गाईचे दूध पाजविले जाते म्हणून गाईला आईच्या नंतरचे स्थान दिल्या जाते. गाईचे दूध पचायला हलके असते आणि त्यात मेदाम्ले, प्रामुख़्याने प्रथिन आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण असते याशिवाय सोडियम पोटॅशियम, कॅलशियमचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असतात. दूध हा मानवाच्या आहारातील महत्वाचा अन्न बनले आहे. त्याचसोबत दुधातून कॅल्शियम मिळत असल्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी दूध पिणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. पहिलवान मंडळी व्यायाम केल्यावर तांब्याभरून दूध पित असत असे पूर्वीचे लोकं बोलायचे. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आज चहा करायला कपभर दूध मिळणे अवघड आहे तर तांब्याभर दूध पिण्याची गोष्ट वेगळी.  त्याचबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांसाठी देखील ते पोषक असते. लहान मुलांना दुधात गरम भाकर चुरून दिल्यास मोठ्या आनंदात ते मूल जेवण करते. माणूस जेव्हा शेती करायला प्रारंभ केला त्याचवेळी त्याला पशुपालनाचे महत्व कळाले होते. म्हणून शेतात काम करणाऱ्या प्राण्यासोबत प्रामुख्याने गायी पाळण्यात येत असत. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस यांचे देखील पालन होऊ लागले आणि या प्राण्यापासून दूध मिळवले जाऊ लागले.  प्रत्येक व्यक्तीच्या घरी दूध देणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता. खाऊन उरल्यानंतर शिल्लक राहिलेले दूध टिकवून ठेवण्यासाठी त्या दुधापासून दही बनवण्याची पद्धत सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची आहे. त्याचसोबत दूधापासून लोणी, चीज, क्रिम, खवा, पनीर आणि  आईसक्रीम इत्यादी पदार्थे तयार केले जातात ज्यांचा रोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फार पूर्वीच्या आकडेवारीनुसार भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते, यास धवल क्रांती असे सुद्धा म्हटले जाते.  दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते. दूध हे एक पूर्ण अन्न असून आजारी असलेल्या लोकांना दुधात हळद टाकून दिल्या जाते. लहान मुलाना रोज सकाळी एक कपभर दूध पिण्याचा सल्ला मोठी मंडळी देतात. पण आजची मूल दुधापेक्षा चहाला अधिक महत्व देतात. गावोगावी डेअरीच्या माध्यमातून दुधाचे संकलन सध्या केल्या जात आहे. यात काही कंपनी खूप मोठे कार्य केले आहेत ज्यात प्रामुख्याने डॉ. वर्गीज कुरियन यांचे अमूल कंपनी आज ही अग्रेसर आहे. ग्रामीण भागात पूर्वी दूध देणाऱ्या जनावरांची संख्या भरपूर होती मात्र आज तशी परिस्थिती राहिली नाही. ग्रामीण भागात आज दूध देणाऱ्या गायीचे प्रमाण खूप कमी झाले आहे त्यामुळे जेथे दुधाचा महापूर वाहत होता तिथे कपभर चहासाठी दूध मिळणे खूप अवघड झाले आहे. काही शहरी गावात याच दुधाच्या व्यवसायाने अनेकांना जगण्याचे मार्ग दाखविले आहे, हे ही सत्यच आहे. मात्र बरेच दूध विक्रेते दुधात पाणी मिसळून भेसळ करतात त्यामुळे लोकांना शुध्द दूध मिळणे फारच अवघड आहे. सध्या शहरात दुधाचे प्रति लिटर 50 ते 60 रु. याप्रमाणे विकले जाते.  दूध का कर्ज चित्रपटात एका सापाने आपले दुधाचे कर्ज कसे दिले हे दाखविले आहे मात्र विज्ञान सांगते की, साप दूध पित नाही. तसेच काही मंडळी दुधाचा अभिषेक देखील करतात. त्यात खास करून गायीच्या दुधाचा वापर करतात मात्र ते दूधच मिळत नसेल तर काय करणार ? त्यावेळी नुसत्या पाण्याचा अभिषेक देखील केला जातो. आज जागतिक दूध दिन आहे त्यानिमित्ताने दुधाचे महत्व आपण सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. 

संकलन 
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...