नेहमी हसतमुख राहणारे - राजकुमार जाधव
राजकुमार जाधव यांचा जन्म 10 ऑगस्ट 1967 रोजी धर्माबाद येथून जवळच असलेल्या येळवत या गावी झाला. वडिलांचे नाव सटवाजी होते तर आईचे नाव निलावतीबाई. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी उमरी येथील डी. एड. कॉलेजमधून शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त केली. सन 1990 मध्ये त्यांना जिल्हा परिषद नांदेड मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. तत्पूर्वी ते धर्माबादच्या यशवंत विद्यालयात दोन वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले होते. जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्याने त्यांनी खाजगी संस्थेतील नोकरी सोडून बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारला बु. याठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात केली. ही त्यांची पहिली शाळा होती. चार वर्षाच्या सेवेनंतर सन 1994 मध्ये त्यांची बदली जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. याठिकाणी त्यांनी जवळपास 14 वर्षे सेवा केली. मोठी शाळा, विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षक ही भरपूर यामुळे याठिकाणी त्यांना अनेक चांगले सहकारी लाभले. ते स्वतः मनमिळाऊ वृत्तीचे असल्याने इतरांसोबत जुळवून घेण्यात त्यांना वेळ लागला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधी ही चिंता किंवा दुःख दिसले नाही. नेहमी ते हसत राहायचे आणि इतरांना पण हसवत राहायचे असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे या शाळेतील 14 वर्षाचा काळ अत्यंत आनंदात आणि समाधानकारक होता असे ते मानतात.
सन 2008 मध्ये विद्यार्थी संख्येच्या अभावी त्यांचे समायोजन केंद्रीय प्राथमिक शाळा चिकना येथे झाली. येथे कार्यरत असताना गटसधान केंद्र धर्माबाद येथे त्यांची प्रतिनियुक्ती झाली. येथील कार्यालयात त्यांनी निरंतर शिक्षण विभाग अंतर्गत साक्षर भारत विभागाचे काम अत्यंत नेटाने आणि जबाबदारीने पूर्ण केले. साक्षर भारतचा संपूर्ण तालुक्याचा कार्यभार त्यांनी सलगपणे पाच-सहा वर्षे सांभाळली होती. त्यानंतर तालुक्यातील सेवा जास्त झाल्या कारणाने सन 2013 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथे त्यांची प्रशासकीय बदली झाली. तेथे एक वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली परत जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. येताळा येथे जुन्या आठवणी सोबत घेत त्यांनी येथे चार वर्षे सेवा केली. त्यांच्याकडे साक्षर भारत विभागाचा कार्यभार पुन्हा देण्यात आला. तेव्हा त्यांनी कसलेही अडचण न सांगता ते काम स्वीकारले. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल द्वारे सन 2018 मध्ये त्यांची बदली आताच्या पाटोदा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. याठिकाणी त्यांची सात वर्षे सेवा केल्यानंतर आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण करीत असल्याने ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदमध्ये सन 1990 ते 2025 असे एकूण 35 वर्षाची सेवा केली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी सर्वाना सहकार्य करण्याचे काम केले. कोणत्याही अधिकाऱ्यांना किंवा आपल्या सोबतच्या शिक्षकांना कधी ही त्रास होईल अशी त्यांची वागणूक नव्हती. अगदी प्रेमळ, गरज पडेल तेव्हा बोलणे, मितभाषी आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणारे असा त्यांचा स्वभाव होता. ज्यामुळे ते ज्यांच्या संपर्कात आले ते त्यांच्याशी मैत्री केल्याशिवाय राहत नसे.
असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जाधव सरांच्या धर्मपत्नी सौ. सुशिलाबाई जाधव यांनी त्यांच्या सुखदुःखात नेहमी साथ दिल्या म्हणूनच ते यशस्वीपणे हा टप्पा पूर्ण करू शकले. जाधव सरांना दोन अपत्य. मोठा मुलगा प्रभाकर हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथे मॅनेजर पदावर काम करत आहे तर छोटा मुलगा बालाजी हा IT इंजिनियर असून नामवंत अश्या P & G कंपनीत हैद्राबाद येथे काम करत आहे. सरांच्या चांगल्या कामाचे हे फळ आहे, त्यांचे दोन्ही मुलं उच्च पदावर काम करीत आहेत. सर्वजण सुखी समाधानी आहेत.
जाधव सरांची सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
- नासा येवतीकर, मुख्याध्यापक कन्या शाळा धर्माबाद, 9423625769