नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे गीत ऐकू यां.... सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
हे गीत कुणी लिहिलं आहे ? माहित आहे का तुम्हांला........
तर हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलं आहे तर आजच्या कार्यक्रमात आपण कवी मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
कवी मंगेश पाडगावकर
मंगेश पाडगांवकर हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि मान्यवर कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, निसर्ग, जीवनातील साध्या-सुंदर भावना आणि सामाजिक जाणीवा यांचे अत्यंत सुंदर चित्रण दिसते. साधी, गेय, नादमय आणि हृदयस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची विशेषता होती. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य लोकांमध्येही खूप लोकप्रिय झाल्या.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव तर आईचे नाव रखमाबाई असे होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्य आणि कवितेची आवड होती. त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई येथे घेतले. पुढे त्यांनी काही काळ महाविद्यालयात अध्यापनही केले.
मंगेश पाडगावकर यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले. त्यांनी प्रेमकविता, बालकविता, गीत, अनुवाद आणि ललित लेखन अशा विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. त्यांच्या कवितांमध्ये साधेपणा, गोडवा आणि भावनांची खोली दिसून येते. त्यांच्या अनेक कवितांवर आधारित गीते मराठी संगीत विश्वात अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेलं ' या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे गीत प्रत्येकजण गुणगुणल्याशिवाय राहत नाहीत.
त्यामुळे ते केवळ कवीच नव्हे तर उत्कृष्ट गीतकार म्हणूनही ओळखले जातात. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय मंगेश पाडगावकर यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी अनेक बालकविता आणि अनुवादित साहित्य देखील लिहिले आहे.
मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारकने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला तर महाराष्ट्राने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हे सन्मान त्यांच्या साहित्यिक योगदानाची पावती देतात.
टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले
अश्या सुंदर नादमय रचना लिहिणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वात कधी ही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
मंगेश पाडगावकर आज आपल्यात नसले तरी त्यांचे साहित्य, कविता, गीते आपण नेहमी ऐकत असतो. मराठी साहित्य विश्वात त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य रचनेला त्रिवार सलाम
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - मंगेश पाडगावकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला.
दुसरा प्रश्न - कोणत्या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे, सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तिसरा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकाररने कोणता पुरस्कार देऊन सन्मान केला ?
बरोबर उत्तर आहे, कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकारकने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानकेला.
चौथा प्रश्न - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कुणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिले.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769