Tuesday, 10 March 2026

दिनविशेष माहिती - 11 मार्च ( Chatrpati Sambhaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

छत्रपती संभाजी राजे भोसले
छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. ते अत्यंत पराक्रमी, विद्वान आणि स्वाभिमानी राजे म्हणून इतिहासात ओळखले जातात. कठीण परिस्थिती मध्ये ही त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले आणि मुघल सम्राट औरंगजेब याच्या विरोधात धैर्याने लढा दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. लहानपणीच त्यांची आई वारल्यामुळे त्यांचे संगोपन प्रामुख्याने राजमाता जिजाबाई यांच्या देखरेखीखाली झाले.
संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना संस्कृत, फारसी आणि मराठी भाषांचे चांगले ज्ञान होते. त्यांनी लहान वयातच राजकारण, युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण घेतले.
इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याविरुद्ध धैर्याने संघर्ष केला.
मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपविण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी त्याला कठोर प्रतिकार केला. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले.
संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर ते विद्वानही होते. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत ’बुधभूषण’ हा ग्रंथ, तर ब्रज भाषेत ’नायिकाभेद’, ’नखशिख’ आणि ’सातसतक’ हे ग्रंथ लिहिले.
इ.स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे मुघल सैन्याने संभाजी महाराजांना पकडले. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी आपल्या धर्माचा आणि स्वाभिमानाचा त्याग करण्यास नकार दिला. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर असे ही म्हटले जाते.
त्यामुळे औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या केली. त्यांच्या या बलिदानामुळे ते इतिहासात महान आणि अजरामर ठरले.
अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदृष्टी, अनेक विद्या व कलांचे जाणकार व सर्वगुणसंपन्न असेच छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व होते. अवघ्या ३२ वर्षांचे अवघे आयुष्य लाभलेले युवराज म्हणजे संभाजीराजे. त्यांचे पराक्रम, धैर्य आणि बलिदान आजही भारतीय इतिहासात प्रेरणादायी मानले जाते. ‘स्वधर्मे निधनो श्रेय: परधर्मो भयावह:’ चे आजन्म पालन करून मृत्यूस सामोरे जाणार्‍या धर्मवीर साहित्यमेरू शंभूराजांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त शब्दकुसुमांजली ...

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

दुसरा प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज 

तिसरा प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला ?

चौथा प्रश्न - हिंदू धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्यामुळे धर्मवीर असे म्हटले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना कोठे पकडले होते ?
बरोबर उत्तर आहे - संगमेश्वर येथे मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 12 मार्च ( Yashwantrao Chavhan )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...