Thursday 17 October 2019

कविता - दिवाळी

*।।  प्रदुषणमुक्त दिवाळी  ।।*

आली आली बघा दिवाळी
प्रदूषणमुक्तीची देऊ या टाळी

विचाराची पेटवू या ज्योत
सहकार्याची खाऊ या गोळी

फटाक्याचा आनंद असे  क्षणभर
संपूर्ण जीवनाची करते होळी

सर्वत्र धूर आणि धडाडधूम
आवाजाने घाबरतात सगळी

अघटित काही घडले की
जीवनाची होते राखरांगोळी

अपघातापूर्वीची घेऊ काळजी
येऊ देऊ नये कुणावर ही पाळी

फटाक्यामुळे नको कोणते दुःख
करू या प्रदुषणमुक्त दिवाळी

- नासा येवतीकर, धर्माबाद
   9423625769

।। आली आली दिवाळी ।।

दिवाला दिवा लावुनी
प्रकाश पसरे चहुकडे
हृदयास हृदय जोडूनी
आनंद मिळे सगळीकडे

आली आली दिवाळी
उरात माझ्या मोद भरे
नवे कपडे सर्वच नवे
जीवनात दुःख ना उरे

लाडू शेव अनारसे
फराळाची मेजवानी
मित्र नातलगाची भेट
दिवाळीच्या निमित्तानी

नका करू आतिषबाजी
दारूगोळा फटाक्याची
यावर्षी करू या संकल्प
प्रदुषणमुक्त दिवाळीची

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769

दिवाळी सण मोठा
नाही आनंदाला तोटा
मिळेल इष्ट सर्व काही
मन करू नका छोटा

© नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   9423625769

Wednesday 16 October 2019

अन्न




संतुलित आहाराची आवश्यकता
      
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस शिकार केलेले प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खाण्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाच्या जेवण्यात सुधारणा होऊ लागली. त्यानंतर मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महानगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्नाविषयी किंवा आहारा विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटा च्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्नाचे अति सेवन करणे शरीराला जसे घातक आहे तसे कमी जेवण करणे हे ही धोकादायक आहे विशेष करून लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयात पोषक आणि संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे.
शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बादाम, साजुक तूप यासरखी महागडी पदार्थ खावे लागतात, असा एक गोड गैरसमज जनमाणसात पसरलेले आहे. रोजच्या जेवणात सर्व अन्नघटकाचा समावेश केल्यास सुध्दा आपले शरीर शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ राहू शकते. मेळघाटसारख्या विभागातील कुपोषणाचा प्रश्न जेंव्हा आपल्या समोर येतो तेंव्हा संतुलित आहार घ्यावे अशा प्रकारची सहज प्रतिक्रिया आपण देऊन टाकतो. दररोज एक प्रकारचे जेवण केल्यामुळे आपण कंटाळून जातो त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थची चव घेतो, न जाणतेपणाने आपण संतुलित आहार घेत असतो. परंतु यात काही जाणीवपूर्वक बदल करून गृहिणीने आठवड्याचा वेळापत्रक तयार करून तसे खाद्य म्हणजे जेवण आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा मुलांसोबत आपणाला  सुध्दा होतो.
घरातील लहान मुले जेवण्याच्या बाबतीत नेहमीच हे नको, ते हवे अश्या तक्रारी करीत असतात. आंबट फळे खात नाहीत, फक्त गोड असलेल्या फळाची मागणी करतात. त्यामुळे ते जीवनभर त्या फळापासून दुरच राहण्याची शक्यता नकारता येत नाही. कारले कडू लागतात म्हणून बऱ्याच मुलांना ते घशाखाली उतरत नाही. प्रत्येक भाजी खाण्याबाबत त्यांना आग्रह केल्यास त्यांच्या शरीराला फायदा होईल. आपल्या शरीराला जेवढे पिष्टमय, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाची गरज आहे तेवढीच क्षार व जीवनसत्वाची सुध्दा आहे. हिरव्या पालेभाज्या आणि फळे यातून क्षार व जीवनसत्व मिळते. शरीरात ए जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाल्यास रात्रीला अंधुक अंधुक दिसणे म्हणजे रांताधळेपणाचा रोग होतो. त्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आहारात असणे आवश्यक आहे.  बी जीवन सत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होणे व त्वचा खरखरीत होणे असे रोग होऊ शकतात.  दाताच्या हिरड्या मजबूत राहण्यासाठी सी जीवनसत्वाची गरज असते आणि हे जीवनसत्व सर्व आंबट गोड फळातुन मिळतात. सकाळी कोवळया सूर्यप्रकाशात बसल्यामुळे डी जीवनसत्व मिळते आणि त्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात व पाठीला बाक येत नाही. कैल्शियम मिळविण्यासाठी मांस व अंडी चा जेवणात वापर करण्याच्या सल्ला वैद्यकीय मंडळी याच साठी देतात. असे काही विकार आपल्या मुलांना होऊ नये यासाठी सर्व मातानी जागरूकपणे आपल्या स्वयंपाकात संतुलित आहाराचा समावेश केल्यास आपला मुलगा अर्थात देशाचा भावी नागरिक बळकट, तंदुरुस्त आणि सुदृढ होईल यात शंकाच नाही.

जेवण करताना घ्यायची काळजी
जेवण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावे. जेवणाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ परिसरात जेवण परिपूर्ण होतच नाही. दिवसातुन दोनच वेळा जेवण करण्याची सवय लावून घ्यावी. भूक लागली की जेवण असे शक्यतो करू नये. सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ साफ केल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर अर्धा तास काही ही सेवन न करता तसेच रहावे. सर्वात महत्वाचे सकाळी शक्यतो चहा टाळावे त्याऐवजी दुधाचा वापर करावा. दूध हे पूर्ण अन्न आहे आणि चहामुळे आपल्या भूकेचा सर्व नाश होतो. त्यामुळे सकाळी चहासोबत बिस्किट किंवा पाव खाऊ नये त्याऐवजी मोड आलेली कडधान्ये किंवा इतर काही अन्नघटकाचा नाष्टा करावा ज्यामुळे आपण दुपारच्या जेवणापर्यन्त थांबु शकतो. दुपारच्या वेळी जर आपण कार्यालयात काम करणारे कर्मचारी असाल तर झोप येणार नाही असे जेवण करावे. शाळेतील मुलांनी सुध्दा दुपारी पोट भरून जेवण करू नये त्यामुळे वर्गात लक्ष राहत नाही. सायंकाळी जेवण शक्यतो रात्री आठ च्या पूर्वी आटोपते घ्यावे. त्याच बरोबर सायंकाळी हलके अन्न घ्यावे त्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होते. उशिरा जेवण केल्याने आणि जड अन्न खाल्याने पचन क्रियेवर सुद्धा ताण येतो आणि मग पोटाचे विकार सुरु होतात. सायंकाळी जेवण केल्यानंतर शतपावली करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जेवताना आपण प्रसन्न असावे. उदास किंवा रागावलेल्या परिस्थितीत जेवण करू नये. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करावे आणि जेवताना फक्त कौटुंबिक चर्चा करावी. त्यामुळे सर्वांशी संवाद होईल. आज घराघरातील संवाद लोप पावले आहे असे वाटत आहे. ते यामुळे जुळून येतील. प्रत्येकाचे जेवणाच्या वेळा वेगवेगळे आहेत त्यामुळे कोणाचे कोणाच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे असे म्हटले जाते त्यामुळे अन्नाचा नाश न करता त्याचा पूर्ण वापर करावा म्हणूनच पूर्वी चे लोक म्हणतात की फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजावे. फिरत फिरत किंवा सोप्यावर किंवा पलंगावर बसून जेवण करणे टाळावे कारण जेवताना थोडे फार तरी शीत खाली पडतात आणि त्याच्या शोधात बारीक लाल मुंग्या फिरत असतात. ते शीत जर सोप्यात किंवा पलंगावर पडले तर तिथे लाल मुंग्या येणार. जेव्हा आपण सोप्यावर किंवा पलंगावर बसू तर त्याचा त्रास आपणालाच होणार. जेवणापूर्वी थोडा वेळ तरी शांत बसून मनोमन प्रार्थना म्हणावी.  रेडियो ऐकत, टीव्ही पाहत किंवा पेपर वाचन करीत जेवण करू नये त्यामुळे आपले लक्ष अन्ना वर राहत नाही. घाईघाईने जेवण न करता अगदी स्वस्थपणे जेवण करावे. गाय, बैल किंवा म्हैस या सारख्या प्राण्याना जशी रवंथ करण्याची सोय आहे तशी आपल्या शरीरात नाही याची जाणीव ठेवावी. या सर्व बाबी लक्षात ठेवून जेवण केल्यास आपणास नक्कीच उत्तम आरोग्य लाभेल यात शंकाच नाही.

      - नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
        मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
       09423625769




Monday 14 October 2019

वाचन प्रेरणा दिवस - कविता



15 ऑक्टोबर - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती

*।। वाचन प्रेरणा दिवस ।।*

वाचनाने मिळते आम्हा ज्ञान
ज्ञानाने होतो आम्ही सज्ञान

विचारवंतांची असे एकच भूख
वाचनातून मिळते त्यांना सुख

रिकामा वेळ वाचनात घालवी
विचारांना फुटेल नवी पालवी

वाचनाने होते लेखन समृद्ध
लहान असो वा असो वयोवृद्ध

वेड लागेल जेंव्हा वाचनाची
विसर पडेल तेंव्हा तहानभुकाची

दिसमाजी काही करावे चिंतन
डोक्यात होईल ज्ञानाचे सिंचन

- नागोराव सा.  येवतीकर,
जि. प. प्रा. कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

डॉ. अब्दुल कलाम - मिसाईल मॅन ते राष्ट्रपती


चित्र रेखाटन - विनायक काकुळते, नाशिक

मिसाईल मॅन ते राष्ट्रपती

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या छोट्या बेटासारख्या गावात मध्यमवर्गीय कुटुंबात 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन तर आईचे नाव आशिअम्मा असे होते. डॉ. कलाम यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या छोट्याशा गावातच झाले. त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र आणि तेथील परिसराच्या वातावरणाचे त्यांच्यावर विलक्षण असे संस्कार झाले. त्यांच्या घराशेजारी मंदिर होते आणि मशीद सुद्धा. संपूर्ण रामेश्वर बेटावर इंग्रजी जाणू शकणारे एकच व्यक्ती होते ते म्हणजे डॉ. कलाम यांचे वडील जैनुलाबदिन. त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते. जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांनी सुद्धा नकळत डॉ. कलामावर संस्कार केले. शाळेतून शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण जलालुद्दीन यांच्याकडून तर चेहऱ्यावरून दुसऱ्यांच्या मनातील भाव ओळखायचे, शरीराची व डोळ्यांची भाषा शमसुद्दीन यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांचे बालपणीचे तीन जीवश्च कंठश्च हिंदू मित्र होते ते म्हणजे रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिव प्रकाशन, यांच्या सहवासामुळे त्यांच्या मनात कधीच धार्मिक तेढ निर्माण झाले नाही. उलट त्यांचे प्रेम दिवसागणिक वृद्धिंगत होत गेले.
डॉ. कलाम लहान असताना समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जात असत. त्या ठिकाणी खेळताना हवेत उडणारे पक्षी बघून विचार मग्न होत असत. या उडणाऱ्या पक्षांना पाहून आपण सुद्धा असे हवेत उडाण करावे अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असे. यातूनच त्यांनी रॉकेट उडवण्याचा अभ्यासाकडे वळण्याचा विचार केला. लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न करीत राहिले. लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार  करताना त्यांना बऱ्याच वेळा अपयश मिळाले. अनेक प्रकारची संकटे आली. विविध समस्या निर्माण झाल्या. परंतु सर्व संकटे, अपयश आणि समस्यांना तोंड देत त्यांनी यश मिळविले. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमितपणा यामुळे ते जीवनात यशस्वी झाले. शालेय जीवनात इंग्रजी, गणित, विज्ञान व तमिळ हे त्यांचे आवडते विषय होते. ते मुलांना नेेहमी स्वप्न पाहण्याचा संदेश देत असत कारण स्वप्नातून जग साकारता येते. आपली जर काही स्वप्ने नसतील तर आपल्यासाठी विश्व शून्य आहे असे ते मानत.
कलाम यांनी 1950 मध्ये विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. सन 1954 ते 1957 या काळात आयआयटी चेन्नईमधून एरोनॉटिकल इंजीनियरिंगचा अभ्यास पूर्ण केले. वायुदल आणि तंत्रज्ञान विकास व निर्मिती मुख्यालयात कार्यरत असताना त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, भारतीय अंतराळ संशोधन समिती आणि थुंबा आण्विक प्रक्षेपण केंद्रावर काम केले. 11 मे 1998 रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुस्फोट चाचणी केली त्याचे शिल्पकार डॉ. अब्दुल कलाम हेच होते. आण्विक क्षेपणास्त्र संशोधनात दहा वर्षे काम करून त्यांनी पृथ्वी, त्रिशूल, नाग आणि आकाश यासारखे क्षेपणास्त्रे बनवली. यामुळे भारतातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची संपूर्ण जगाला ओळख करून देणाऱ्या डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्राचे जनक असे म्हटले जाऊ लागले तर भारतातील जनता त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागली.
25 जुलै 2002 रोजी भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदी पदावर ते विराजमान झाले. भारताचे ते 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना एखाद्या शास्त्रज्ञ व्यक्तीला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळाली असा अभूतपूर्व प्रसंग जनतेला पाहण्यास मिळाले. याचा सर्वात जास्त आनंद त्यांच्या आईला झाला होता कारण आईच्या शिकवणीमुळे व तिने लहानपणी केलेल्या संस्कारांमुळे ते या पदापर्यंत पोहोचू शकले होते. त्यांची आई त्यांना नेहमी विविध गोष्टी, कथा, प्रसंग प्रसिद्ध विचारवंताचे विचार सांगून त्यांच्यावर संस्कार केले होते. त्यांच्या वडिलांच्या वागणुकीचे नकळत संस्कार त्यांच्यावर झाले होते.  भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्याचसोबत पद्मभूषण पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार मिळालेले होते. वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेले असतानाही ते दररोज दहा ते पंधरा तासाचा वेळ वाचन आणि चिंतन करण्यात घालवीत असत. यावरून त्यांची महानता लक्षात येते. त्यांनी पुस्तकाला आपल्या पासून कधीच दूर केले नाहीत कारण ते म्हणत एक चांगले पुस्तक शंभर मित्राप्रमाणे असते. डॉ. अब्दुल कलाम यांची आत्मकथा अग्निपंख ( मराठी अनुवाद ) या पुस्तकातून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला आहे. डॉ. अब्दुल कलाम यांचे लहान मुलावर विशेष प्रेम होते. उद्याचा सुदृढ भारत व सशक्त भारत घडविण्याची ताकद फक्त आजच्या मुलांच्या मनगटात आहे असा आत्मविश्वास त्यांना होता. भारतातील लहान मुले त्यांना कलाम चाचा असे संबोधतात. मिसाईल मॅन ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणार्‍या डॉ. अब्दुल कलाम विदेशात एक व्याख्यान देताना दिनांक 27 जुलै 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. शासनाने त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने आपण सर्वजण आजच्या दिवशी एकच दिवस वाचन न करता त्यात सातत्य ठेवून नियमीत एक तास किंवा अर्धा तास तरी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प करू या तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...