Saturday 8 February 2020

शिवजयंती

चला, राजे शिवाजी होऊ या ....!

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे. त्यांच्या राज्यकारभारात प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाच्या व्यक्तीला समान हक्क, अधिकार आणि कर्तव्य होते. त्यांच्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान होता. परस्त्री त्यांना माते समान होती. ही सारी शिकवण त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवले होते. रामायण आणि महाभारतातल्या साहसी व शूरवीर गोष्टी सांगून त्यांना जिजाऊ यांनी धाडसी बनविले होते. आजच्या काळातील प्रत्येक आईला राजमाता जिजाऊ बनणे आवश्यक आहे. आज आजूबाजूला अनैतिक कृत्य होतांना पाहून आपण माणूस आहोत याची घृणा वाटते. एवढं हिंसक आणि पशु प्रमाणे कृत्य आजकाल घडत आहे. आज घराघरांत एक जिजाऊ पाहिजे आहे शिवबा सारखा मुलगा घडविण्यासाठी. आपल्या सहकारी मावळ्यांवर असलेलं त्यांचे प्रेम आणि विश्वास, ज्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तगड्या मुघलांच्या विरोधात पाच पन्नास मावळे घेऊन युद्ध करणे म्हणजे साधी व सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी हिंमत लागते आणि तेवढा आत्मविश्वास देखील लागतो. शक्तीपेक्षा युक्ती कधी ही श्रेष्ठ असते याचे अनेक उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पाहण्यास मिळतात. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना एकवार त्यांच्या चरित्रात जाऊन पहावं, एकदा आपण ही शिवाजी होऊन पहावं. त्यांनी राज्यातील लोकांची इतकी काळजी घेतली होती की, प्रत्येक व्यक्ती राजावर निस्सीम प्रेम करत होते. निसर्गाची काळजी घेताना त्यांनी वाळलेली झाडे तोडावी असा आदेश दिला होता. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान होणार नाही याची काळजी देखील त्यांनी घेतली. जनतेचे इतके हितचिंतक राजे यापूर्वी कधी झाले नाही आणि पुढे होणार देखील नाहीत. राजे शिवाजी यांचे बालपण आणि तरुणपण या दोन काळात त्यांनी संघर्षमय जीवन जगले. त्यांना आईचे प्रेम भरपूर मिळाले. त्यांच्या आईमुळे राजे शिवाजी घडले. परिस्थिती माणसाला शिकविते आणि घडविते हे देखील राजे शिवाजी यांच्या चरित्रावरून आपणांस कळते. जिवाभावाचा माणूस आपणाला सोडून गेल्यावर काय दुःख होते हे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे या सारख्या मावळ्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज किती शोकसागरात बुडाले होते, हे डोकावून पाहिल्यावर कळते. शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचून किंवा त्याच्यावरील सिनेमा पाहून त्यांची प्रतिमा हृदयात घ्यायला हवं आणि तसे कार्य करायला हवं. हरहर महादेवची गर्जना म्हणजे काम फत्ते करण्याची हमी होती. तेच कार्य आपणाला घेऊन जायचं आहे. चला तर मग प्रत्येकजण शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करूया, हीच शपथ शिवजयंतीच्या निमित्ताने घेतली तर त्यांना खरी आदरांजली ठरेल. 

आमचे दैवत आहेत छत्रपती
आम्हांला नाही कुणाची भीती

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

Friday 7 February 2020

शिक्षकांच्या बदल्या

*शिक्षकांची ऑनलाईन बदली ऑफलाईन होणार ?*

शिक्षकांच्या बदल्या हा नेहमीच एक चर्चेचा विषय ठरत आला आहे. त्याला कारण ही तसेच आहे, शिक्षकांची संख्या भरपूर आहे. गावोगावी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे सरकारी शाळेत शिकविणारे व्यक्ती म्हणजे प्राथमिक शिक्षक आणि या सरकारी कर्मचाऱ्यांवर गावातील लोकांपासून मंत्रालयाच्या आमदारापर्यंतचे लोकं विशेष लक्ष देतात. म्हणून तर शिक्षकांच्या बदल्या हा चर्चेचा गुऱ्हाळ ठरत असतो. तसं तर मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हे गुऱ्हाळ सुरू होते मात्र यावेळी जरा लवकरच सुरू झाले कारण नुकतीच एक बातमी पेपरात झळकली की, शिक्षकांच्या बदल्याचे धोरण बदलण्यात येणार. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या बदल्यावर चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांसह अनेक लोकांचे त्या धोरणाकडे लक्ष लागले आहे. 
ऑनलाईन बदल्या - तत्कालीन शासनाने दोन वर्षांपूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया अगदी सुरुवातीला खूपच किचकट वाटली. यात संगणकीय प्रणालीद्वारे राज्यात एकदाच बदली करण्यात आली होती. ज्यात शिक्षकांना त्यांच्या पसंदीचे वीस शाळा निवड करून माहिती इंटरनेटच्या माध्यमातून भरायचे होते. ही माहिती भरत असतांना अनेक शिक्षक आणि शिक्षिकांना रात्र जागून काढावे लागले होते. ज्यांच्या घरी संगणक आणि इंटरनेटची सोय नव्हती त्यांना कॅफेमध्ये जाऊन किंवा इतरांच्या घरी जाऊन भरावे लागले. या सर्व प्रक्रियेत बहुतांश शिक्षकांचे उन्हाळी सुट्या संपून गेल्या, याचा अनेकांना त्रास झाला, हे मान्य करावेच लागेल. पण दुःखानंतरच सुखाचे दिवस येतात आणि तेंव्हाच सुखाचे महत्व कळते.  31 मे रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करून शाळा सुरू होण्यापूर्वी राज्यातल्या सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन शाळेवर नवीन शिक्षक रुजू झाले. ज्यांना वीस पसंदीचे शाळा देऊनही शाळा भेटली नाही ते विस्थापित झाले. अश्या शिक्षक मंडळींना ही ऑनलाईन प्रक्रिया चांगली नाही असे वाटणे साहजिक आहे. मात्र यात बदली करणाऱ्या यंत्रणेची काही चूक नाही. कारण या मंडळीनी प्रक्रियेचा अभ्यास न करता पसंदीचे शाळा निवडले असावे किंवा सर्वात ज्युनियर असल्यामुळे त्यांना जवळच्या शाळा उपलब्ध नव्हते. तरी देखील पुढील टप्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षकांचे संवर्ग एक ते चार असे प्रकार पाडून कोणावर ही अन्याय होणार नाही याची काळजी देखील घेतल्या गेली. संपूर्ण बदलाच्या प्रक्रियेत 90 टक्के शिक्षक आनंदी असलेले दिसून आले. फक्त 10 टक्के शिक्षकांना त्याचा त्रास झाला. संवर्ग एक मधील अनेक शिक्षकांना पहिल्याच पसंदीची शाळा मिळाली. ज्यामुळे त्यांची याबाबत कसलीही ही तक्रार नाही. ते या ऑनलाईनच्या बाजूने आहेत. पती पत्नी एकत्रिकरण करण्यात थोडा बहुत शिक्षकांना त्रास झाला. तर बहुतांश शिक्षक पती पत्नींना एकाच शाळेवर किंवा नजीकच्या शाळेत जागा मिळाली. पती पत्नी एकत्र शाळेत जाण्याचा योग या बदल्यामुळे मिळालं. दुर्गम भागात काम केलेल्या शिक्षकांना देखील पहिल्या पसंदीचे गाव मिळाले. त्यामुळे त्यांची देखील या बदलाच्या धोरणाविषयी तक्रार नाही. ते देखील याच बाजूने आहेत. राहिला प्रश्न सर्वसाधारण संवर्ग चार मधील शिक्षकांना सेवाजेष्टतेनुसार शाळा मिळाल्यामुळे ज्युनियर शिक्षकांना त्याचा खरा त्रास जाणवला. या संपूर्ण बदली प्रक्रियेत संवर्ग चारमधील शिक्षकांना थोडा मानसिक त्रास झाला पण बदलीसाठी द्यावा लागणारा अमाप पैसा वाचला हे सत्य स्वीकारावे लागेल.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा सर्वांगीण विचार केल्यावर यात ज्या त्रुटी असतील त्या दूर करून ही प्रक्रिया जशास तसे चालू ठेवावे असे अनेक शिक्षकांच्या मनात आज ही कायम आहे. पण यात काही बदल झाला आणि पूर्वीप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली तर परत एकदा पैश्याचा घोडेबाजार चालू होणार यात शंकाच नाही. ज्या शिक्षकांचे लोकप्रतिनिधीसोबत चांगले संबंध आहेत त्यांच्या बदल्या सोईनुसार होतील आणि ज्या शिक्षकांचे कोणीच वाली नाहीत त्यांना परत एकदा दुर्गम भागात, शहरापासून दूर, वाडी-तांड्यावर, दऱ्याखोऱ्यात नोकरी करावी लागेल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीचे अधिकार या ऑनलाईन बदलीमुळे कमी झाले आहेत ही गोष्ट फक्त लक्षात घेऊन या धोरणात बदल करण्यात येऊ नये. पूर्वी बदल्याचे आदशात कित्येक वेळा बदल केला जात होता. शासकीय अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीचा दबाव असायचा त्यामुळे ते देखील काही करू शकत नव्हते. ऑनलाईन बदल्याने सर्वात जास्त डोकेदुखी कमी झाली ती अधिकारी वर्गाची. अनेक शिक्षक बदली झालेल्या शाळेवर रुजू होण्याऐवजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत चकरा मारत असे. हे सारे चित्र ऑनलाईन बदलीमुळे बदलून गेले आहे. या प्रक्रियेत ज्यांची बदली झाली त्यांना शाळेवर तात्काळ रुजू होणे अत्यावश्यक केले होते. त्यामुळे ज्या भागात कोणी जायला तयार होत नव्हते तेथे जाणे त्यांना भाग पडले. विरोधाला विरोध म्हणून किंवा जुन्या शासनाचे नियम बदलावेच अशी भावना मनात न ठेवता निर्णय घेतले जाणे अत्यावश्यक आहे. तसेच शिक्षक संघटना देखील शिक्षकांची बाजू समजून घेऊन या बदल्याच्या धोरणात आपले मुद्दे मांडायला हवे आहेत. शिक्षकांच्या संघटना देखील आपलं हित न पाहता सर्वसमावेशक शिक्षकांचे हित लक्षात घेऊन बाजू मांडायला हवी. शिक्षक संघटनकडे कोणता शिक्षक जातो ? ज्याच्यावर अन्याय झाला तोच शिक्षक जाऊन आपल्या व्यथा मांडतो. ज्याच्यावर अन्याय झाला नाही तो कशाला जाईल संघटनेकडे. दुःखी कष्टी शिक्षकांना न्याय मिळायलाच हवे. पण त्याची दुसरी बाजू देखील पाहणे आवश्यक आहे. म्हणून संघटनेतील नेत्यांनी दोन्ही बाजू विचारात घेणे आवश्यक आहे, असे वाटते. एकंदरीत शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत बदल करून ते ऑफलाईन करणे म्हणजे शिक्षण क्षेत्रात संगणकीय प्रणालीने केलेल्या बदल्या हे सर्व विभागासाठी एक आदर्श प्रणाली ठरली होती. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले होते. ते सर्व बाहेर फेकून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय. राज्यातील बहुतांश शिक्षक बदल्याचे धोरण बदलू नये याच विचारात असल्याचे सध्या तरी दिसत आहेत. जर यदाकदाचित यात बदल झाला तरी शिक्षक मंडळी त्याच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...