समाजातील घटनेचे प्रतिबिंब म्हणजे ' गट्टी फू ' काव्यसंग्रह
कवयित्री जयश्री पाटील यांचा गट्टी फू काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. चिंतनशलाका आणि मर्मभेदी नंतर त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. कवयित्री ह्या हिंगोली जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासून म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांना लेखनाचा छंद आहे. आपल्या मनातील भावना, विचार ते ललित लेख, वैचारिक लेख आणि कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. आजपर्यंत त्यांचे अनेक लेख व कविता दैनिकातून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच अनेक कविसंमेलनात त्यांच्या कवितेला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. कवयित्री ह्या स्वतः स्त्री असल्याने त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्त्रियांच्या समस्या, जाणिवा आणि घुसमट आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर समाजात वावरत असतांना ज्या अनिष्ट व अप्रिय गोष्टी दृष्टीस पडतात त्यावर मनात आलेली प्रतिक्रिया काव्यातून व्यक्त केल्याचे जाणवते.
देशभक्ती या कवितेतून कवयित्रीने फार चांगला संदेश दिला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकाची देशभक्ती विविध पोस्टच्या माध्यमातून दिसत आहे. पण खरी देशभक्ती म्हणजे प्रत्येक माणसात असलेली माणुसकी होय. माणसाने माणसाला माणुसकीने वागविले पाहिजे, तीच खरी देशभक्ती ठरेल असे सांगताना ते म्हणतात,
नुसताच झेंडा फडकवून
पूर्ण होत नसते देशभक्ती
माणुसकी आणि कृतज्ञता
अशी हवी मानवी कृती
कोरोनाचा काळ कोणी ही विसरू शकत नाही. या कोरोनाने अनेक जवळचे नातेवाईक हिरावून नेले आणि जीवनाची खरी किंमत काय आहे ? याची जाणीव देखील निर्माण केली. म्हणूनच कोरोनाचा धडा या कवितेत कवयित्री उत्स्फूर्तपणे म्हणते,
क्षणात माणसं होत्याची नव्हती झाली
त्यांची सर्वच संपत्ती जागेवरच राहिली
सिकंदर ची शिकवण पुन्हा स्मरून गेली.
मुलगी ही परक्याची धन असते. आई-वडिलांच्या लाडा-कोडात वाढलेली मुलगी वयात आल्यावर लग्न करून सासरी जाते. तिच्या मनात तेव्हा काय चलबिचल होते ते कन्यका या कवितेत त्या मुलीची मनातील भावना व्यक्त करताना म्हणते,
स्वप्नातील राजकुमार तुला घेऊन जाईल
धस्स झालं काळीज घर सुनंसुनं होईल !
लहान मुलांच्या विश्वात आजी-आजोबा म्हणजे एक स्वप्नमय जग असते. त्यांचे प्रेम अवर्णनीय असेच आहे, त्यातल्या त्यात आजीचे म्हणूनच आजीमाय कवितेत आजीचे छान वर्णन केले आहे. भक्ती या कवितेतून समाजात चाललेल्या अनेक अंधश्रद्धा वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
गट्टी फू या पुस्तकाच्या शीर्षक असलेल्या कवितेतून कवयित्रीने रुसलेल्या पावसाला लवकर येण्याची विनंती करतांना पाऊस नसल्याने कोणत्या गोष्टी घडत नाहीत, कोणकोणत्या गोष्टीला आपण मुकतो याचे वर्णन केले आहे. तसेच पाऊस लवकर आला नाही तर पावसासोबत कट्टी करण्याची धमकी सुद्धा दिली आहे.
बळीराजा हे काव्य विठ्ठल वाघ यांच्या काळ्या मातीत मातीत तिफण चालते या लयीवर तालबद्ध केले आहे. तर सांग सांग भोलानाथ या चालीवर सांग सांग देवराया ही कविता कवयित्रीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. त्या प्रश्नाचे उत्तर शोधतांना वाचक अंतर्मुख होतो. बाईपण या कवितेत स्त्री मनातील रुदन व्यक्त केले आहे.
मलाच माझी वाटली लाज हे काव्य प्रत्येक वाचकांना विचार करायला भाग पाडते. एकीकडे सुकाळ आहे तर दुसरीकडे दुष्काळ, असे जेव्हा पाहायला मिळते त्यावेळी खरंच मनस्ताप झाल्याशिवाय राहत नाही. तीच भावना कवितेतून व्यक्त झालंय.
बुफे पार्टीतील गेस्ट सारे
अन्न टाकून देताना दिसले
पाड्यातील कुपोषित बालक
शितासाठी तरसातना दिसले
मलाच माझी वाटली लाज
असे चित्र फक्त कवयित्रीलाच दिसते का ? नाही ना ! सर्वानाच दिसते. सर्वच जण याविषयी हळहळ व्यक्त करतात. तेव्हा अशा या चित्रात बदल व्हायला पाहिजे, ही तळमळ या कवितेतून जाणवते.
आस या कवितेतून शेतकऱ्यांची स्थिती वर्णन करतांना कवयित्री म्हणते,
सुगीची होती आम्हा आस,
निसर्गाने टाकला हो फास.
निसर्गावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सुगीची आस लागलेली असते. यावर्षी तरी सुगी चांगली होईल आणि आपलं नशीब बदलेल असं वाटतं पण निसर्ग त्याला कधीच साथ देत नाही. शेतकऱ्यांची व्यथा या कवितेतून व्यक्त केले आहे.
ती सध्याची या काव्यातून कवयित्रीने आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहून काम करत असली तरी तिच्या नशिबातील चूल नि मूल काही चुकले नाही याविषयी खंत व्यक्त करतांना म्हणते,
बचतगट सरपंचपद इतकंच काय
नऊवारीसह स्कायडायव्हिंग ही केलं
घरात पाऊल टाकताच कुकर मात्र
तिचीच वाट पाहताना दिसलं
माणसांच्या वागण्यात कसा दुटप्पीपणा असतो हे हळुवारपणे सांगितले आहे. माणूस कळून सुद्धा काही श्रद्धा म्हणून अंधश्रद्धा चे कार्य करतो. कितीही शिकला सवरला तरी त्याच्या मनात चुकचुकणारी पाल दूर होत नाही. कुंडलीमध्ये योग जुळतो की नाही म्हणून ग्रह-तारे बघितले जातात आणि ज्यावेळी ग्रह-ताऱ्याचा मिलन म्हणजे ग्रहणाचा काळ मात्र वेगळ्याच दृष्टीने बघतो, असे का ? यावर चिंतन करण्यासारखे आहे.
महाराष्ट्राचे शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज यांना परत एकदा येण्याची विनंती शिवबा तुम्ही परत या कवितेतून करते. कारण आज राज्यात सर्वत्र अराजकता आणि भ्रष्टाचाराचा सुकाळ झालं आहे. शिवबाच्या काळात जनता जशी सुखी होती, सर्व जनतेला स्वतःच्या जीवाची सुरक्षितता होती, ती आज नाही. म्हणून ते कवितेतून त्यांना परत बोलावत आहेत.
या काव्यसंग्रहात बाप्पा, अहोभाग्य माझे, तुळस, मैत्री, तू अन् बालपण, आरोग्यम धनसंपदा, सावित्रीमाई, विविध विषयांवरील आशय संपन्न कविता आहेत. नांदेडच्या रश्मी पब्लिकेशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केले असून संपादक गोविंद जोशी यांचे मुखपृष्ठ शीर्षकाशी समर्पक असे आहे. या काव्यसंग्रहाला नांदेड येथील प्रसिद्ध लेखिका आशा पैठणे यांची प्रस्तावना असून बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी पुस्तकाचे पाठराखण केले आहे. एकूणच सदरील काव्यसंग्रह वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे आहे. कवयित्री जयश्री पाटील यांना पुढील लेखनासाठी मनस्वी शुभेच्छा ....!
पुस्तक परिचय
- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
-