Saturday 15 October 2016

स्वच्छतेचे महत्व

                


                     स्वच्छतेचे महत्त्व
                          - नागोराव सा. येवतीकर

स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणा मुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता म्हटली की आपल्या समोर अनेक बाबी उभ्या राहतात. स्वच्छता कश्याकश्याची आणि कशी ठेवायाची हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून म्हणजे स्वतःच्या शरीर स्वच्छते पासून करावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वच्छते विषयी आपण जागरूक राहून कार्य केल्यास आपली छाप इतरावर निश्चितपणे पडते. लहानपणी सकाळी उठले की आई मुलांच्या मागे राहून दात स्वच्छ घास, चूळ भर आणि हात-पाय स्वच्छ धुउन घेण्याविषयी तगादा लावते. कारण स्वतः च्या स्वच्छतेची सुरुवात ही याच क्रियेपासून होते. लहानपणी लागलेली स्वच्छतेची चांगली सवय त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते ही तर चांगली गोष्ट आहेच यासोबत आपल्या दाताचे आयुष्यही वाढते. दाताचे विकार होत नाही. आपल्या जीवनात दाताचे काय महत्त्व आहे हे दात नसणाऱ्या लोकांना विचारून पहिल्याशिवाय कळणार नाही. स्नान करणे ही त्या नंतरची अत्यंत महत्वाची क्रिया. बहुतांश व्यक्ती स्नान ही क्रिया महादेवाला पाणी घातल्यासारखे डोक्यावरुन पाणी ओततात त्यामुळे अंगाची सफाई होत नाही. साबणाचा वापर करीत अंग घासुन स्नान केल्यास आपल्या अंगाचा वास येत नाही. विशेष म्हणजे त्वचा रोगापासून आपण दूर राहू शकतो. दररोज स्वच्छ कपडे परिधान करून बाहेर पडण्याची आपली सवय इतराना त्रासदायक ठरत नाही. मळके कपडे अंगावर असतील आणि प्रवासात कुठे तरी आपण बसलात तर कपड्याच्या दुर्गन्धी मुळे कुणी आपल्याजवळ बसत नाही. शाळेत तर याचा फार वेगळा अनुभव येतो. त्यामुळे घराबाहेर जाताना स्वच्छ कपडे एक तर आपणास शोभुन दिसते आणि आपल्यामुळे इतराना त्रास ही होत नाही. म्हणून स्वच्छ कपडे वापरण्याची सवय शाळेत असताना जी लागते ती आयुष्यभर सोबत राहते. बाहेरुन घरात येताना हात-पाय स्वच्छ धूउन घरात प्रवेश करावा. बहुतांश वेळा मुले बाहेर उघड्यावर खेळतात आणि तसेच घरात प्रवेश करतात. ज्यामुळे बाहेरील अनेक किटक थेट घरात प्रवेश मिळवितात आणि घरातील अनेक लोक आजारी पडतात. शौचास जाऊन आल्यावर सुद्धा स्वच्छ हात-पाय धुवावे आणि मगच घरात यावे. जेवण करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या रुमालाने साफ करावे. रात्री झोपण्या पूर्वी सुद्धा स्वच्छ हात-पाय धुतल्या नंतर छान झोप लागते की नाही ते पहा. म्हणजे स्वतः ची स्वच्छता ही जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय आपले जीवन दीर्घायुष्य होउच शकत नाही. अस्वच्छ रहाणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच आपण जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला आहे. त्यातून आपणास हाच संदेश मिळतो की स्वच्छ रहा ; निरोगी रहा.

स्वतःच्या स्वच्छतेनंतर आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो आणि ते आवश्यक आहे. कारण आपले ज्याठिकाणी उठणे, बसणे, खाणे, आणि पिणे असते त्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले घर झाड़ूने साफ करीत असतो. आपले अंगण स्वच्छ करतो. घरातील आणि अंगणातील कचरा परिसरात टाकतो. म्हणजे आपणास परिसर घाण असलेले चालते परंतु आपले घर आणि अंगण स्वच्छ असावे असे वाटते ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हा बदल करण्यासाठी स्वच्छतेचे धडे किंवा पाठ आज समाजाला शिकविण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे हे चुकीचे आहे हे कळतय पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. 
आज ग्रामीण भागात जर गेलो तर गावाच्या प्रवेशालाच दुर्गन्धी सुरु होते. प्रत्येक जण उघड्यावर शौचास जाउन गावाचा प्रवेशाचा संपूर्ण रस्ता अस्वच्छ करतात. यात कधी बदल होणार आहे ? गावात असलेली शाळा आपणास कधीच स्वच्छ ठेवता येत नाही. शाळा सुटली की गावातले काही रिकामटेकडे पोरे शाळेत येऊन वर्ग खोल्याच्या भिंती खराब करतात. काही गुटखा शौकीन मुले पान तंबाखू खातात आणि सर्व परिसर कधी कधी भिंती रंगवून टाकतात. दारू पिणारे मंडळी दारू पितात आणि वर्ग खोलीत बाटली फेकतात तर काही जण बाटली मैदानावर टाकतात, अश्या रीतीने सकाळी स्वच्छ केलेला शाळेचा परिसर सायंकाळी घाण केल्या जातो. शालेय स्वच्छालय कोणत्याच गावात चांगली ठेवली जात नाहीत. ज्या गावात शालेय स्वच्छालयाची देखभाल स्वतः गावकरी करीत असतील त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. गावात इतर काही ठिकाणी सुध्दा ही मंडळी अस्वच्छता पसरवितात. ज्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे गावात साथीचे अनेक रोग पसरतात. मग दवाखाना आपल्या मागे लागते. जेथे लाखो रुपये खर्च करावे लागते तरी आपले डोळे उघडत नाही आणि आपला गांव स्वच्छ ठेवत नाही. डेंग्यू सारखा आजार तर कधी कधी आपला जीव ही घेतो. हा रोगप्रसार फक्त आणि फक्त आपल्या अस्वच्छतेमुळे होते याची जाणीव आपणास व्हायला हवी. ग्रामपंचायत कार्यालय जमेल तेवढे कार्य करते पण संपूर्णपणे त्यावर अवलंबून रहाणे हे ही चूक आहे. वैयक्तिक स्वच्छते सोबत गावाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपली वागणूक चांगली असेल तर परिसर स्वच्छ राहू शकते. बरेच जण सार्वजानिक ठिकाणी बेजबाबदरपणे वागतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना असा अनुभव खास करून येतो. बसमध्ये प्रवास करणारे काही मंडळी पान तंबाखू आणि गुटखा खाऊन कोपऱ्यात थुंकुन सर्व जागा घाण करतात. त्यामुळे इतर प्रवाश्याना त्याचा त्रास होतो. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे ह्या फलक ऐवजी कोपऱ्यात थुंकू नका असे फलक लावावे लागेल असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तिस दंड लावण्याचा कायदा अस्तित्वात आहे मात्र फक्त तो कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी जर करण्यात आली आणि दंड लावण्याची प्रक्रिया चालू केल्यास अस्वच्छता कमी होईल, असे वाटते. बसनंतर सर्वात जास्त प्रवासी वाहून नेणारे रेल्वेमध्ये स्वच्छता दिसणे खूपच दुरापास्त आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे नागरिक रेल्वेत मात्र सर्व काही विसरून वागतात. जेथे काही खाल्ली तेथेच कचरा करतात. ज्याचा त्रास इतर प्रवाश्याना होतो. कधी कधी त्याचे बळी आपणच ठरतो हे ही सत्यच आहे. बागेत सुध्दा आपली हीच बेफिकिर वृत्ती दिसून येते. पर्यटननाच्या स्थळी सुध्दा आपण स्वच्छ वागतो असे काही दिसून येत नाही. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील स्वच्छता असो वा इतर ठिकाणची स्वच्छता ही आपल्या हातात आहे. ती आपली सर्वाची मालमत्ता आहे अशी काळजी घ्यावी. आपण एकटे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू या आपल्या सोबत एक-दोन व्यक्ति तरी निश्चितपणे या मार्गावर येतात. महात्मा गांधीजी यांनी ज्याप्रकारे आपल्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तसे आपण ही महत्त्व देऊ या. स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपले ही काही योगदान देऊ या.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
nagorao26@gmail.com
★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★
[10/16, 3:37 PM] ‪+91 99228 61408‬
*स्वच्छतेचे महत्त्व*                 
------------------- शामल कुलकर्णी             
स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही.तर स्वछता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्व आहे.ती मनाची व अंतः करणाची अवस्था देखील आहे. ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो.                   गावागावातून ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिले त्या संत गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला , बाबा आपण मंदिरात का येत नाहीत? तेंव्हा बाबा बोलले अरे देव दगडात नाही तर माणसात आहे. आणि त्याच्या निरोगी जीवनासाठी मला हा मंदिराबाहेरील पडलेले फुले, नारळाचा कचरा साफ करणे गरजेचे वाटते. त्यांचा हा विचार आपल्याला अगदी विचार करायला लावणारा आहे.
          जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असतात. 

 दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”
           स्वच्छता स्वतः पासून सुरु करा . वैयक्तिक  स्वचतेच्या लक्ष्मण रेषा पाळल्या की सामाजिक स्वच्छता आपोआपच घडून येते.
म्हणूनच घेऊ वसा मन प्रसन्न करण्याचा, शरीर निरोगी करण्याचा , घर -परिसर स्वच्छ ठेवण्याचा,समाज निरोगी करण्याचा!!                        शामल कुलकर्णी                      kulkarnishamal79@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:25 PM] ‪+91 94228 62625‬

स्वच्छता आपली मुलभूत गरजच आहे.केवळग पंतप्रधानांनी आवाहन केले म्हणुन नाही तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेच पालन केल पाहीजे.
जवळजवळ ६०% आजारांच मुळ अस्वच्छतेत असत.
प्रत्येक व्यक्तीन लहानपणापासुनच स्वच्छतेचा धडा गिरविला पाहीजे जो आयुष्यभर पक्का लक्षात बसेल..घर, परिसर, गल्ली, गाव, शहर देश  अस स्वच्छतेच अव्याहत चक्र चालु असेल तर आपल जीवन सुकर होईल अन्यथा घाण, रोगराई, प्रदुषण याचा पडत असलेला विळखा आणखी घट्ट होऊन मानवी जीवन जगण कठीण होत जाईल..
आपलआरोग्य निसर्ग याच्या संरक्षणार्थ स्वच्छतेचा मार्ग हाच सुखी जीवनाचा मार्ग असेल 
..पुष्पा गायकवाड 
नांदेड🙏
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:41 PM] 
 विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेलीआहेत .आपण स्वत: ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब,घर, शेजारी पाजारी,परिसर,गाव ,तालुका,जिल्हा ,राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते.
        'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकते कडे नेणारी गोष्ट आहे.
       स्वच्छतेचे बाळकडू 
बालपणापासून आपणास मिळत आले,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो ,मोठे झालो.कुटुंबातून ,शिक्षकांकडून ,पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलोआणि तेपटणारेच होते. सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची ,घराची ,परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न वाटते.या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते.मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही.आणि मग जाणीव होते स्वच्छता म्हणजे नेमके काय याची.शरीरातील,मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी,अडगळ ,अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते.ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.
    देह देवाचे मंदीर
    आत्मा एक पंढरपूर
हे खरे आहे.जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको. 
      स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो .हे वैयक्तिक आरोग्य ा बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे.डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे .हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे.आज ई_कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही  समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.
    मी ,माझ्यापुरते पाहून चालणार नाही.देशाच्या स्वच्छता अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव,स्चछ देश हे स्वप्न सत्या त उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी.विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध ,जाहिराती प्रसारीत होतात.अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची
नितांत आवश्यकता आहे.
सत्यम शिवम सुंदरम,अशी वाटचाल करायची तर स्वच्छ  शरीर
       व स्वच्छ सुंदर मन
घडवायलाच हवे.ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी
योग्य उर्जेची प्राप्ती होईल.निसर्ग सुंदर आहे,आयुष्य सुंदरआहे.
चला तर मग हाती घेऊन हात
अस्वच्छतेवर करू मात
सुविचारांना देऊ साथ
आरोग्यदायी  उगवेल प्रभात
[10/16, 6:42 PM] विद्या प्रभू: विद्या प्रभु मुंबई९७६९३९४६४८
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:51 PM] ‪+91 80079 17680‬

 स्वच्छतेच महत्व 
  स्वच्छता ही एक कला आहे,
    स्वच्छता कशी राखायची,
      हे ज्याने त्याने ठरवायच,
प्रॉब्लेम सर्वानाच असतात,प्रॉब्लेम सोडवायचे,
 की रडत बसायचे 
   हे ज्याने त्याने ठरवायाचे.
खरच स्वच्छता ही आपल्या जीवनात नंदनवन फुलविते.स्वच्छतेचाच आग्रह सर्वानी धरला पाहिजे.त्यामुळे केवळ आपल्या शारीरिक च नव्हे तर सामाजिक तक्रारी देखील दूर होतील.कारण आपण पाहतो आजुबाजुला पडलेला कचरा केवळ आपलेच नाही तर प्राण्यांच्या आरोग्य करिता अपाय कारक आहे.म्हणूनच सर्वाना हीच विनंती की आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच परिसर ही स्वच्छ ठेवन्यास कटीबध् असावे.
 आपण शारीरिक स्वच्छता नियमित करावी.त्यामुळे आपण इतरासाठी आदर्श ठरू शकतो.
  ओला कचरा व् सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापण व्हायला हवे.चला तर मग स्वच्छता पाळू,रोगराई टाळू.
जायभाये एस बी




Friday 14 October 2016

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन निमित्त

वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिध्द आहे. वाचन हा प्रत्येक मानवाच्या मेंदुचा खुराक आहे. वाचन केल्यामुळे आपणास बरीच माहिती मिळते. ज्ञानाचा साठा वाढतो. त्याच सोबत आपण प्रगल्भ देखील बनत असतो. आजकाल वाचन करणे फार कमी होत चालले आहे अशी समाजात ओरड सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याउलट सोशल मीडिया नावाच्या whatsapp आणि फेसबुक मुळे लोकांची वाचन संस्कृती वाढली असे म्हणण्यास काही हरकत नसावी. दिवसातुन अनेक ग्रुपच्या माध्यमातुन बरीच अनोळखी माहिती बघायला आणि वाचायला मिळत आहे. हे काय कमी आहे. त्यातल्या त्यात ebook लाईब्रेरी मुळे तर पुस्तकांच्या पुस्तके pdf मध्ये वाचता येत आहेत. आज जे पुस्तक म्हटले त्या पुस्तकाची माहिती नेट वर उपलब्ध होत आहे आणि त्यातून वाचन संस्कृती मध्ये वाढ होत आहे. असे जरी दिसत असेल किंवा भास होत असेल तरी वास्तव थोडे वेगळे आहे. हे ही नाकारुन चालत नाही.
वाचनाच्या प्रक्रियेला शाळेतुन सुरु होते. तसे मुले लहान असताना चित्र वाचन अगदी छान रित्या करतात. तेथून त्यांच्या वाचन कौशल्य विकसित होण्यास सुरु होते. मग त्यानंतर अक्षर आणि अंकाची ओळख होते. हळूहळू वाचन कला जमायला लागते. भाषा कौशल्यामध्ये श्रवण व भाषण हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच वाचन ही क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. ज्यांच्या वरील दोन क्रिया योग्य प्रकारे होते त्या मुलांचा विकास योग्य दिशेने होतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना श्रवण व भाषण ही क्रिया जमवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जातो. तेथे प्रगती नक्की दिसते. खाजगी शाळेत यावर आवर्जून लक्ष दिले जाते. तर इकडे सरकारी बालवाडी मध्ये खाऊ वाटप करण्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. यात मला त्यांना दोष द्यायचा नाही पण पाया मजबूत करण्याकडे कुणाचेच अजिबात लक्ष नसते आणि मुले वरच्या वर्गात गेली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या दोषाचे खापर शिक्षकांच्या अंगी फोडून मोकळे होणे एवढे मात्र सर्वाना जमते. एखादा रस्ता ख़राब होताना वेळीच लक्ष दिले आणि तातपुरती दुरुस्ती केली तर रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. त्याकडे लक्षच दिले नाही तर रस्ता पुन्हा नव्याने करावा लागतो. विद्यार्थ्यांचे जवळपास तसेच आहे. प्राथमिक वर्गात असताना त्यांच्या चूका व त्रुटी लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केल्यास ती मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत. अमुक विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही हे वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात आल्यास काहीच करता येत नाही. रस्ता पुन्हा नव्याने करता येऊ शकेल पण विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिली किंवा दूसरी चा अभ्यास शिकवून तयार करणे फार कठीन आणि जिकरीचे आहे. त्यासाठी वेळीच पालक शिक्षक यांनी जागरूक होऊन त्यांच्या प्रगती कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या एकूणच शैक्षणिक प्रगती मध्ये वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. जी मुले योग्य गतीत वाचन करतात त्यांची प्रगती नियमानुसार होत राहते. वाचन केल्याचा खरा आनंद जर आपणास पहायचा असेल तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर पाहता येईल. वर्गातील एक दोन मुले खुप छान वाचन करतात तेंव्हा ज्याना वाचन करता येत नाही त्यांना त्या मुलाचा हेवा वाटते. वर्गातील सर्वच्या सर्व मुले वाचू लागली की त्याचा खरा आनंद त्या शिक्षकाना होतो. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळक दिसून येते. असा आनंद मिळविण्यासाठी मात्र शिक्षक मंडळींना खुप प्रयत्न करावे लागते हे ही सत्य आहे. वाचन प्रेरणा दिवस साजरा करून कोणाची वाचन कौशल्य मध्ये प्रगती होणार नाही त्यासाठी दररोज अर्धा तास तरी मुले वाचन करतील असे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. दिनविशेष पुरते त्याला बंधनात न ठेवता ती प्रक्रिया रोज राबविण्यासाठी मुलांकडून पाठाच्या उताऱ्यातील पाच वाक्याचे रोज वाचन करून घ्यावे. वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण कितीही वाचन केलो तरी नित्य नविन माहिती मिळविण्यासाठी वाचन हे करावेच लागते. रोज पाच वाक्य वाचन करण्याचा सराव कधी पाठ वाचन करण्यात होते हे कळतच नाही. मुले सुद्धा अगदी योग्य गतीत वाचन करतात. वर्गातील धीम्या गतीने वाचन करणारा मुलगा देखील येथे गती घेतो. हा प्रयोग मात्र सतत चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सतत वाचन करण्यात व्यस्त असत त्या वाचनातुन ते विद्वान झाले. असेच अजून एक महान व्यक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांनी सुद्धा आपल्या जीवनात वाचनाला खुप महत्त्व दिले आहे. ते दिवसाचे सोळा-सतरा तास वाचनात घालवित असे. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर  संपूर्ण महाराष्ट्रात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून गेल्या वर्षीपासून साजरी केली जात आहे. फक्त आजच्या दिवशी एक तासभर वाचन करण्यापेक्षा रोज किमान पाच वाक्याचे वाचन प्राथमिक वर्गात केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

Monday 10 October 2016

दसरा विशेष सुवर्ण चारोळी स्पर्धा


[10/11, 7:58 AM] 
‪+91 99707 43604‬ 
दसरा विशेष 
सुवर्ण चारोळी स्पर्धा

नियम व अटी:

1. प्रत्येकाने किमान 10 चारोळी पोस्ट कराव्यात
2. चारोळीत
विजय
सोने
दसरा
विचार
यश
संत
दिवाळी
गड
सज्जन
माणूस
इत्यादी शब्द यावेत
3. निर्धारित वेळेत पोस्ट टाकाव्यात
4. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 
5. 
स्पर्धा बरोबर सकाळी 08 वाजता सुरू होईल
6. दहाच्या दहा चारोळी स्पर्धेसाठी समाविष्ट धरल्या जातील.

7. प्रथम पारितोषिक : स्मृतिचिन्ह, प्रमाणपञ
बीड येथे शब्दसह्याद्री वक्तृत्व मंचावर भव्य सत्कार


द्वितीय पारितोषिकः
सन्मानचिन्ह आणि प्रमाणपञ... पोस्टाने पाठवले जाईल

तृतीय पारितोषिक:
प्रमाणपञ पोस्टाने पाठवले जाईल
8. परिक्षक: प्रा. श्रावण गिरी
(कवी आणि लेखक)
9. आयोजकः शब्दसह्याद्री मंच, बीड
10. संकल्पना: ज्ञानदेव काशिद 
11. हा ग्रुप फक्त आजच्या एका दिवसासाठीच आहे.
12. सकाळी 08 वाजता स्पर्धा सुरू होईल आणि सकाळी 11 वाजता संपेल.
13. चारोळी 'दसरा विशेष चारोळी स्पर्धा' ग्रुपवर टाकाव्यात. 
 याची सर्वांनी नोंद घ्यावी.
***********************************************

10/11, 9:13 AM]

*🌿☘🍀 दसरा विशेष 🍃🍂🍁*

*🍁🍁सुवर्ण चारोेळी स्पर्धा🍁🍁*

1)
आलाय बघा दसरा
घेऊन आनंदाचा सदरा
एकमेकास प्रेम देऊनी
दुःख सारे विसरा

2)
दसऱ्याचे सोनं म्हणजे
आपट्याची पाने
एकमेका देऊन गाऊ
आनंदाचे गाणे

3)
सोन्याचे भाव वाढले
जरा जपून वाटप करा
आपल्या जीवनात साऱ्या
सुख-समृद्धि देवो दसरा

4)
आज आहे दसरा
आत्ता सगळ विसरा
दुःख येवोत कितीही
हसते ठेवा चेहरा

5)
मनामनातील दुष्ट भावना
संपवुनी करू सण साजरा
चिंता, काळजी नष्ट होऊनी
सुख घेऊन येवो दसरा

6)
आपट्याचे पान
हृदयाचा आकार
आनंदाच्या या क्षणी
दसरा करू साकार

7)
नवरात्राचे नऊ रूप
दाखवी देवी माता
दशमीचा विजयोउत्सव
साजरी करूया आत्ता

8)
आज आहे सण उत्सवाचा
आपटारूपी सोने लूटण्याचा
जुने दुःख विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा

9)
रामाने मारले लंकेच्या रावणाला
तोच विजय दिवस आहे आजचा
आपण ही मारू दुष्ट प्रवृत्तीला
साजरा करू सण विजयादशमीचा

10)
बायको म्हणाली मला
सोने घेऊन द्या हो
मी म्हणाला बायकोला
दसरा सण येऊ द्या हो
=======================
विजय मिळवा आपल्या - दुर्गुणावर
विजय मिळवा आपल्या - कुविचारावर
विजय मिळवा आपल्या - व्यसनावर
विजय मिळवा आपल्या - गर्वावर
===========================

*विजयादशमीच्या लाखमोलाच्या शुभेच्छा*

===========================
*- नागोराव सा. येवतीकर*
   *मु. येवती पो. येताळा*
   *ता. धर्माबाद जि. नांदेड*
   *09423625769*
=======================

स्पर्धेत सहभागी करून घेतल्याबाबत संयोजकाचे धन्यवाद
****************************************

[10/11, 9:33 AM]

शब्द सह्याद्री मंच आयोजित
सुवर्ण  चारोळी स्पर्धा
****************************
1)   गड किल्ले बांधुन शिवरायांनी
       केले स्वराज्याचे रक्षण
      दस-याच्या मुहुर्तावर तुम्हा
      सुवासिनी करीती औक्षण
**-*--*******************-***
2)
    यश आणि अपयश
   फरक फक्त 'अ' चा असतो
   अपयशाने माणुस रडतो
   यशाने मात्र हसतो.
************************-***
3 )सोने लुटा, आचारांचे
     सोने लुटा, विचारांचे
    देशाच्या  एकात्मते साठी
  सोने लुटा, सामोपचारांचे.
************************
4 )
    साधु  संत येती घरा
    तोचि दिवाळी दसरा
     पुजन करा तयांचे
     तोच क्षण खरा हसरा
******************-**-******
5 ) विजय असा हवा
     खिळुन राहिल सर्वांची नजर
     दिव्य असे नेत्रदिपक करा
      तेहत्तीस कोटी देव असती हजर
****************************
6) सिमोल्लंघन करुनी सारे
   आले दस-याच्या दिनी
   काय आणले तुमच्या मनी
    आहे आमच्या ध्यानी
**************************
7 ) दहन करतात रावण
    दस-याच्या सणाला
   आनंदोत्सव असतो
     प्रत्येकाच्या मनाला
****************************
8)   जाळून टाका मनातील रावण
       विजयादशमीच्या दिनी
        संपवा मनातील व्देष
        हीच आकांक्षा मनी
****************************
9) माणसाने  माणसासारखे वागुन
   मान,प्रतिष्ठा उंचवा देशाची
   जागवा मनातील माणुसकी
    मग भीती आहे कशाची
*************************
10 ) संत चरण रज लागती सहज
        वासनेचे बीज जळुनी जाई
         माणुसकी, भूतदया ,तुम्हा
        आनंदाचे भूषण देई
****************************************
सौ.मीना सानप  बीड @ 7
9423715865
स्पर्धेसाठी
****************************************

[10/11, 9:42 AM]
+91 84469 46555‬
☘☘☘☘☘☘☘☘🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*_शब्द सह्याद्रीमंच आयोजित_*
*_सुवर्ण चारोळी स्पर्धा_*

*@@@@@@@@@@@@*

सुवर्ण म्हणजे सोने,
हे तर शब्दांना महत्त्व देण्याची सोय ..!
मनाची दशा प्रफुल्लीत
तेणे सबाह्यतंर शुद्ध हे सुवर्ण होय ..!

आपटा पाने सोन्यासम,
जरी ह्रदय उरासम आकृतीत..!
ही तर खूण असावे ह्रदय,
जसे शुद्ध सुवर्ण सर्वकालात..!

सोन्याचा मुलामा जरी चढवला,
दिसे संपूर्ण ते अलंकार सुवर्णवश..!
घ्यावे पदरी विजय अवैधतेवर,
भूतकाळ विसर जीवन अविनाश..!

सुवर्णाचे रक्षण सदैव,
करती सर्वजण अनायसे करतात..!
महत्त्व जाणीव त्यांना,
मिळे त्यांना भविष्यात याचीच मदत..!

सुवर्णमध्य ज्यात नाही नूकसान,
सर्व सामावेशक उपाय सर्व काळात..!
जाणवून देण्या नियमित दसरा,
निवडा सामावेशक मार्ग संकटात..!

श्रीरामाचे सुवर्णलंकेवर विजय,
हा तर अमानवीय प्रवृत्तीवर विजय..!
महामानवाने निवडला हा दिन,
जाणून परिवर्तनात विजयाची सोय..!

निसर्ग आणि मानव यांचे संबंध,
घट आणि घटातील धान बिजापरी..!
दोन्हीच्या संयोगाने सृष्टी संयम,
हे मानवी जीवन उजळे सुवर्णापरी..!

नवरात्रीत शक्ती उपासना,
संपवून दुर्बलता करा जीवन कवित्व..!
संपता यातना मनी शुध्दी वसे,
झाडपानातही दिसते सुवर्ण अस्तित्व..!

विजया दशमीला शस्त्र पुजा,
शस्त्र हे शास्राचे अंतिम अस्त्र असते..!
षडरिपूचे शास्त्राने करता खात्मा,
आत्मसुखे जीवन सुवर्णमय वस्त्र ठरते..!
१०
या आपणे सारे आपली मने जाणू,
एकमेका सहाय्य करण्यात करू पुढे हात..!
दसऱ्याचे हेच खरे सुवर्ण आशीश,
होऊ विजयी करून अपप्रवृत्तीवर मात..!

        बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
☘☘☘☘☘☘☘☘🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

[10/11, 10:13 AM]

🍀दसरा विशेष 🍀
🍀🍀सुवर्ण चारोळी स्पर्धा 🍀🍀

१)
आशेचं निराशेवर आज
    सर्जिकल स्ट्राईक व्हावं
    चैतन्यमय *विचारानं*
    मनामनात वहावं...
   
२)
जीवनाला मानवाच्या
   नात्यांचाच आसरा
   दुरावल्या नात्यांचही
   *सोनं* करतो दसरा

३)
आपट्याचं पान बाई
    *दस-याला* सोनं झालं
    झेंडूफुलांचं तोरण
   घरदार अंगी ल्यालं

४)
दस-याला करीतो मी
   शब्द शस्त्रांचे पुजन
   विनवीतो एवढेच
  'नका दुखवू *सज्जन*'

५)
सोनं *सोनं* म्हणून
   नका तोडू आपट्याचा फाटा
   जपा पान पान
   सोनं विचारांचं वाटा

६)
नित्य राहू दे माणसा
   अशाच प्रेमळ नजरा
   उत्सव *दस-याचा*
  रोज होऊ दे साजरा

७)
परस्त्रीत आई दिसावी
   मुलीमुलीत ताई
  दस-याला केवळ रचून *गड*
  शिवबा होता येत नाही

८)
सण येता *दस-याचा*
  भारत स्वप्नवत भासतो
  लक्तरातला दरिद्रीही
  सोनं वाटत हासतो

९)
वाटतो जो तो *सोने*
      भेद सारे मिटून गेले
      दस-याने या जगीचे
      राजा-रंक समान केले
     
१०)
माणसा तू माणसाशी
      माणूस म्हणूनच भेटत रहा
      उद्या नसला *दसरा* तरी
      सोन्यासारखे विचार वाटत रहा

- आत्तम गेंदे
पालम जि.परभणी
९९२१०५८४१४
९४२०८१४२५३

संयोजक व सर्व सदस्यांना दस-यानिमित्त लाख लाख शुभेच्छा

स्पर्धेत सहभागी करून घेतल्याबद्दल आभार
***********************************

[10/11, 10:16 AM] ‪
+91 99230 45550‬

दसरा विशेष 
सुवर्ण चारोळी स्पर्धा

(१) 
आपट्याची पानं
यशाचं गाणं 
नांदू समाधानानं 
हेच दासऱ्याच सोनं .
(२)
डुलतोय निसर्ग हसरा
मन झाली प्रफुल्लित
आपापसातील हेवेदावे विसरून
वाटू विचारांचे सोने हेच यश घवघवीत .
(३)
कणाकणाने जमवू शब्द
होऊ शब्दांनी श्रीमंत
एकमेकांच्या  हृदयात
नांदू आनंदात .
(४)
करू शब्दांना सोनं
फुलऊ आनंदानं मनं
वाढवू स्नेह दिगंतरी
कशाला वाटायची नुसती पानं .
(५)
करू स्रीजन्माचे स्वागत 
वागवा स्त्रीस देवीसमान
होऊ मानवतेचे पूजक
हेच जीवन स्वर्गासमान .
(६)
वाटून नुसती पानं
जवळ येतील का मनं ?
अतृप्ताचे आत्मे
संतोषतील का खऱ्या सोन्यानं ?
(७)
स्नेहाचा सुगंध पसरावा 
मन मोहरून जावा 
एकमेकांच्या गोड आठवणीत
वाजो आनंदाचा पावा .
(८)
स्त्री-पुरुष यावी समानता
नसो जगी कुठलीही भेदाभेद
जगी शांती नांदो
हीच मानवतेची असो साद .
(९)
नवरात्रीचा झाला जागर
स्रीजन्माचा करू आदर
विश्वात देवीच्या खऱ्या
झुलत राहो यश किर्तीने मायपदर .
(१०)
यश , कीर्ती , आरोग्य लाभो
हा दसरा देवो आनंदाच देणं 
प्रेम , जिव्हाळा , आपुलकी लाभो
फुलत राहो स्नेहाच  सोनं ...
       - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
            मु पो : शिळवणी ता : देगलूर
       जि : नांदेड पिनकोड : ४३१७४१
                संपर्क : ९९२३०४५५५०
***********************************

[10/11, 10:31 AM]

रावण वधाचा युद्ध क्षण
शमीतळीची शस्त्रे धारण
विजयादशमी पर्वणी सण
देई सदा विजयस्मरण
-1-
सोने लुटावे ते शिलांगणी
शुभेच्छित वीर आलिंगनी
दस-याची सोनेरी पर्वणी
रंगउधळण ती गगनी
-2-
दसरा सण विजयोल्हासाचा
रामायण नि महाभारताचा
अमूल्य ठेवा संस्कृतीचा साचा
उत्साह असे दुर्जन अंताचा
-3-
विचार रूजावा वीरतेचा
संचलन शस्त्रसज्जतेचे
असो धिःकार कायरतेचा
पहावे स्वप्न जगज्जेतेचे
-4-
यश देवो देवी दुर्गामाता
देशरक्षणाचा घेई वसा
पाठी आपली सृष्टी निर्माता
अभंग जप रात्रंदिवसा
-5-
संतवचन सर्वमान्य
सत्याचरण सर्वकाल
शत्रुनिर्दालना प्राधान्य
अवतरण पर्वकाल
-6-
दिवाळी आगमन चाहुल
नवरात्री देई वर्तमान
उत्सवाचा उल्हास अतुल
सुख नि आनंद वर्धमान
-7-
गड सर करावा अडचणींचा
झेंडा रोवावा सिद्ध झाल्या शक्तींचा
गड नसावा तो राजकारणींचा
संस्कार ल्यावा नवविधा भक्तींचा
-8-
सज्जन रक्षणार्थ अवतार
दुष्ट निर्दलनाय शस्त्रधार
बाणावा अंगी समर्थ निर्धार
आराध्य देव आपले आधार
-9-
माणूस म्हणून जगावे
मानव धर्मा निभवावे
जातीपातींची नच नावे
संकुचित गान नसावे
-10-
:बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर, निगडी, पुणे ४११०४४

***********************************

[10/11, 10:46 AM] ‪
+91 97306 89583‬

*🌿☘🍀 दसरा विशेष 🍃🍂🍁*

*🍁🍁सुवर्ण चारोेळी स्पर्धा🍁🍁*

1)
*आश्विन शुद्ध दशमी*
*असत्यावर विजय सत्याचा*
*रावण दहन करुया सारे*
*सण आहे मांगल्याचा*

2)
*पुरुषोत्तम श्रीराम परतले घरा*
*विजयाचा गंध अयोध्येत दरवळला*
*रामप्रिय शमी पत्रे वाटुनी प्रिय जणा*
*प्रेमबंध मनामनाचा घराघरात जुळला*

3)
*डोक्यावर ठेवावी आपट्याची पाने*
*चरणावर करुनी स्पर्श*
*माणसाने जगावे माणसासारखे*
*तोच खरा दसऱ्याचा उत्कर्ष*

4)
*नवरात्रीचे नऊ दिवस*
*दहावा दिवस विजयादशमी*
*गड जिंकावा जिंकुनी शत्रुस*
*घट्ट होतील मनाचे बंध रेशमी*

5)
*धम्मचक्र दिन आणि विजयाचा दसरा*
*आला आहे दुग्धशर्करा सुवर्ण योग*
*धम्म ध्वज नभी झळकला*
*आपट्याची पाने दूर करीती रोग*

6)
*दसरा नसे केवळ सण विजयाचा*
*दसरा नसे केवळ सण यशाचा*
*जो करीती सन्मान स्त्री जातिचा*
*संत सांगती हाच खरा सण दसऱ्याचा*

7)
*सोने नाही हे खरे*
*पाने आहेत झाडाची*
*तोडुनी कोण होती श्रीमंत*
*सज्जनास कळावी किंमत वृक्षाची*

8)
*दिवाळी दसरा सण येती दरवर्षी*
*मन आत्मा शुद्ध करने हाच खरा उद्देश्*
*सोहळा नसे हा फक्त एक दिसाचा*
*जाळूनी टाका मनामनातील द्वेष*

9)
*हृदयाचा आकार शमी पत्रास*
*किती ही किमया निसर्गाची*
*माणूस जोडती वृक्षे ही*
*घ्यावी शिकवण पर्यावरणाची*

10)
*मनी नाही विचार कसला*
*आला आहे सुवर्ण दसरा*
*राग लोभ सारे विसरा*
*करुया मिळून दसरा साजरा*
=======================
*विजयादशमीच्या लाखमोलाच्या शुभेच्छा*
=======================
   *प्रणाली रमेश काकडे*
  *मु.पो.काटोल ता.काटोल*
        *जि.नागपुर*
=======================

स्पर्धेत सहभागी करून घेतल्याबाबत संयोजकाचे धन्यवाद

********************************************
1)
वाईट विचारवर *विजय* मिळवल्यास 
जीवन सार्थक होईल
किर्तीच्या यशोशिखरावर 
सवर्ण अक्षरी नाव कोरले जाईल

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

2)
जीवनाचे *सोने* मानवाच्या.
कर्मात आहे दडल
कर्मावर तुमच्या भलवाईट 
आहे कलीयुगी घडल

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

3)
*दसरा* विजयाचे 
आहे प्रितीक खरे
मनीच्या रागद्वेषावरचा 
विजय मिळवणे हेच ते खरे

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
4)

*विचारांची* उंची तुमची
दाखवते आहे ओळख
समाजात तुमचा चेहरा
दिसतो स्वच्छ अन् चोख

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

5)
*यश* मिळवावे जगी 
सदविचाराने सरळ
यशाची तुमच्या पडेल 
जगाला मग भुरळ

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
6)

*दिवाळीत* श्रीमंताचे पैसे 
उडवून दिवाळे निघते
गरिबांच्या घरची मात्र 
कधी कधी चूलही ना पेटते

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
7)

नवतरूणांनी *गड* किल्ले 
संवर्धन फुका ना करावे
शिवरांच्या विचारांचे 
बीजही मनी रूजवावे

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
8)

*सज्जनतेचा* मुखवटे 
आजकाल सर्व चढवती आहेत
खराखोटाचा मुलामा जीवनाला 
जणु जन्मत: लावला आहे

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
9)

*माणुस* विसरत चालला 
आहे आपले माणुसपण
कलीयुगातील मानसाचे 
पाषणच जणु बनलेय मन

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

10)
*संत* शिकवण जीवनाचा 
योग्य मार्ग दाखवी
रूजवण सदविचारांची 
जीवनी ती नित्य करावी

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
कल्पना जगदाळे-घिगे
बीड
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


[10/11, 10:49 AM] 
दसरा विशेष चारोळी स्पर्धा 
१)सोने लुटावे सुविचारांचे
रक्षण करावे मातृभूमीचे
आनंदाच्या या क्षणाला
आशिर्वाद हवे थोरांचे. 
*************** 
२)ज्ञानियांची शाळा 
सावताचा मळा
संत सज्जनांचा सहवास
हाच खरा आनंद मेळा
*****************
३)संयमाचे भरता घडे
आनंदाचा पाऊस पडे
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 
आनंदाचे पडती सडे 
****************
४)जिच्या हाती लेखणी
तिच खरी देखणी
शोधूनी ज्ञानामृताच्या खाणी
दसऱ्याला संपवा सारी दुखणी
*******************
५)सतत प्रयत्न करणे 
असते आपल्याच हाती 
प्रयत्न यशाच्या रथाचा
असतो सदैव सारथी
***************
६)सात्विक अाहार
सात्विक विचार 
दसऱ्याच्या सणाला 
उत्साहाचा संचार
***************
७)शिवरायांनी ठेवून दूरदृष्टी 
बांधले किल्ले आणि गड
विजयपताका फडकवून
शत्रूचे शिरावेगळे केले धड
******************
८)माणुसकीचा सन्मान 
करतो तो सज्जन माणूस
सोने वाट सतकर्माचे
नाही नको म्हणूस
**************
९)ज्योतिचा धर्म 
ज्योतिने पाळला
सावित्रीने सांभाळला
समानतेचा माणूसकीचा
दिला आनंदी वसा
***************
१०)झाला मंदिरात घंटानाद
आनंद घाली साद
प्रभूनाम घेता मुखी
शांतता देई दाद
 ***************
कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी
********************************************


[10/11, 10:53 AM] 
+91 86980 67566‬ दसरा विशेष चारोळी स्पर्धा
१.
विजयाची आस धरूनी
केले सिमोल्लंघन...
विजयानेच धावत येऊनी
दिले मला आलिंगन...॥
***********************************
२. 
रावणाला जाळणाऱ्यांनो
मनातील रावणी विचार जाळा...
उत्सव साजरे करताना
कुलधर्म जरा पाळा...॥
************************************
३.
विजयाचा उन्माद कधी
रामाला जडला नाही....
रामाचे नाव घेताना कधी
रावणाचा विसर पडला नाही...॥
************************************
४.
दसऱ्याच्या निमिताने
भेटी होतील सज्जनांच्या
चहुकडेच टोळ्या दिसतील
सोने लुटणाऱ्या लुटारुंच्या....॥
************************************
५.
दुर्गुणांचे गड जिंकता जिंकता
सोन्याची लयलूट करु...
यश शिखरावरती जाऊनी
सद्गुणाचा झेंडा उभारू....॥
************************************
६.
विचाराचे सोने लुटू
आजच्या सणाला...
विसरून जाऊ सारे
काल दुखावले कोणी कोणाला...॥
************************************
७.
सिमोलंघन करावे
दुर्गुणांचे नि व्यसनाचे...
शौर्य दाखवावे दसऱ्याला
मर्दानगीचे....॥
************************************
८.
विजया दशमीला विजय व्हावा
सद्गुणांचा....
सिमोलंघन करु दुर्गुणांचे हा
निश्चय मनाचा...॥
************************************
९.
नवरात्रीत नवरंग पाहिले
आई जगदंबे, नारी शक्तीचे...
मनामनात रुजून कधी होईल
स्वागत स्त्री जन्माचे....?
************************************
१०.
एक विजय, एक निश्चय
एक संकल्प, एक आशा
सिमोल्लंघन भूतकाळाचे
भविष्यात नसो निराशा...॥
************************************
                  श्री. हणमंत पडवळ.
      मु.पो. उपळे (मा.)ता. जि. उस्मानाबाद.
            8698067566/9881234383.

********************************************
[10/11, 10:56 AM] ‪
+91 98603 14260‬
दसरा विशेष
सुवर्ण चारोळी स्पर्धा
********************
१-आदिशक्ती भगेवती मातेचे
 श्रीरामांनी नवरात्री पूजन केले
रावणावर विजय मिळवूनी
सीतेला वनवासातून सोडवले

२-आपट्याची पाने हाती घेऊनी
दस-याला लूटती *सोने* म्हणूनी
परस्परांतील स्नेह वाढविती
साडेतीन मुहुर्तातल्या या दिनी

 ३-साडेतीन मुहुर्ताचा हा दिन
मांगल्याचा सौख्याचा
 दिन हा विजयादशमीचा
*दसरा*सण सीमोल्लंघनाचा

४-मनी असावे चांगले *विचार*
नसावा मनी स्वार्थ
भक्ती श्रध्दा ठेवा मनी
तरच घडतो परमार्थ

५-माणसाच्या जीवनात
यश अपयश नित्य येते
यशाने नाही हुरळायचे नसते
अपयशाने नाही खचायचे

६-साधू संत सांगून गेले
नित्य ठेव हे ध्यानात
अंतरात तुमच्या आमच्या
नित्य वसे भगवंत

७-  आली दिवाळी आली  दिवाळी
पणत्यांनी उजळले घर
दारी घातली रांगोळी
आनंदाचे माहेरघर
 
८-शूरवीर शिवरायानी
जमविले शूर मावळे
*गड*किल्ले सर केले
शत्रूला नामोहरम केले

९-सज्जनांची संगती धरा
कुसंगती कधी  न करावी 
संतसज्जन सांगून गेले
एक तरी ओवी ज्ञानेशाची गावी

१०-माणूस जन्माला येताच
चिकटते त्याला नाते
नात्यांची ही वीण
जन्मभर सोबत रहाते
प्राची देशपांडे 
समूह क्र. १५
 *************** *************** ***************

[10/11, 10:56 AM] 
‪+91 82373 29804‬
स्पर्धेसाठी..


१) 
उत्सव आला विजयाचा, 
दिवस सोने लूटण्याचा
नवे जुने विसरून सारे 
फक्त आनंद वाटण्याचा......

२)
तोरण बांधुनी दारी , 
घालू रांगोळी अंगणी 
करु उधळण सोन्याची 
जपू नाती मना मनातूनी ....

३)
मिळवूनी विजय कुविचारांवर,
व्हावा विजयोत्सव साजरा..
सुसंस्कृती सदा नांदावी,
पिढ्यांची रूढी सांभाळतो दसरा..

४)
आरोग्याचे सुत्र जपा या
वाटुनिया आपट्याची पाने..
नववर्षाची सुरूवात करू या,
करूनी संतविचारांचे सोने..

५)
दस-याची पहाट घेऊन आली,
घरी माझ्या सज्जनाचा घाट...
माणुसकीचा मंत्र जपु या
पिढ्यांचा अपरंपारी थाट..

६)
प्रेमाचे ऋणानुबंध अन् नात्यात गोडवा ,

संस्कृतीचे मान राखू , बांधून दारी तोरण..!

दंभ, मत्स, लोभ व द्रुष्टवृत्तीचे करूनी दहन ,

आनंदोत्सवात साजरा करू या दस-याचा सण..!!

७)
घडविले स्वराज्य शिवबाने,
राखूनिया गड किल्ल्यांचा मान..
आपणही लावू पताका दस-याची
ठेवून महापुरूषांचा मान...

८)

आपट्याची पान त्याला
  मनरूपी ह्रदयाचा आकार....
मनाचे बंध त्यास राखू 
आनंदाच्या क्षणाी सर्वाचा रूकार..

९)
असा सण जगी शोभतो..
सुसंकृत तो दसरा..
करू साजरा सर्वांनी
ठेवून चेहरा हसरा..

१०)
माणूसकीचे बंध जुळवू या,
राग रुस सारे विसरा...
नववर्षाची असेल नांदी
तोची दिवाळी नि दसरा..

________संतोष एकनाथ शेळके 
मु. पो. कळंब, ता. कर्जत, रायगड.
 *************** *************** ***************

💐🌺🍀विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा🍀🌺💐
[10/11, 10:57
*शब्द सह्याद्री मंच आयोजित*
🍂सुवर्ण चारोळी स्पर्धा 🍂

         *--(१)--*

समाप्त झाले नवराञ
साधनेचा पवित्र काळ
आला हासत दसरा
दारी लावा झेंडूमाळ

       *--( २ )--*

सोने महाग मिळत असले तरी
प्रतिकरूपे वाटा आपट्याचे  पाने
ऊल्हासाने साजरा करा दसरा
आनंदाने ऊजळून जावू द्या मनॆ

       *--( ३ )--*

आला दसरा की लागते,
दीपोत्सव दिवाळीची चाहूल
सर्वजण वाट पाहती सणाची
सुखाचे, आनंदाचे जणू पाऊल

        *--( ४ )--*

सज्जनांचा दुर्जनावर विजय
हाच तर आहे पूर्व इतिहास

ऊर जातो आभिमानाने दाटून
दसरा म्हणतो थोडे तरी हास

        *--( ५ )--*

पांडवांनी वनवास काळात
शमीवर ठेवली होती शस्ञे
करा पूजन आपटा शमी
व्रुक्षांचे
सांगती आपले पुराणे शास्त्र

        *--( ६ )--*

सुवर्णतुल्य अाहेत आपले
शमी,आपटा सारखे वृक्ष
करीता वाटतात यांची पाने
इतिहास देतो ना याची साक्ष

       *--( ७ )--*

विचार ठेवा पवित्र मग
यश नसते जराही दूर
नसता हाती लागत नाही
.मारला कितीही लांब सूर

   
     *--( ८ )--*
दसरा म्हणजे श्रीरामाचा,
विजय, संपवनारा वनवास
मनातील शञुवर मिळवा जित
लाभेल तुम्हा सुखाचा सहवास

       *--( ९ )--*

दक्षिनायनात असे रेलचेल सणांची
दिवाळी-दसरा चैतन्याचा झरा
भारतीय संस्कृती अाहे थोर अापली
जगण्यात समाधान आंनद येतो खरा

        *--( १० )--*

संत महंताची ही पवित्र भूमी
ज्यांनी मार्गदर्शन केले शूरविरांना
अाजही सापडतात शोधून एखादे
वाटते वंदावे जोडून दोन्ही करांना


सुनिल बेंडे  
*नाथसेवक*
9404071984
 *************** *************** ***************

[10/11, 11:02 AM] 
 दसरा विशेष चारोळी स्पर्धा 

१)
सोने लुटावे सुविचारांचे
रक्षण करावे मातृभूमीचे
आनंदाच्या या क्षणाला
आशिर्वाद हवे थोरांचे. 
*************** 
२)
ज्ञानियांची शाळा 
सावताचा मळा
संत सज्जनांचा सहवास
हाच खरा आनंद मेळा
*****************
३)
संयमाचे भरता घडे
आनंदाचा पाऊस पडे
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 
आनंदाचे पडती सडे 
****************
४)
जिच्या हाती लेखणी
तिच खरी देखणी
शोधूनी ज्ञानामृताच्या खाणी
दसऱ्याला संपवा सारी दुखणी
*******************
५)
सतत प्रयत्न करणे 
असते आपल्याच हाती 
प्रयत्न यशाच्या रथाचा
असतो सदैव सारथी
***************
६)
सात्विक अाहार
सात्विक विचार 
दसऱ्याच्या सणाला 
उत्साहाचा संचार
***************
७)
शिवरायांनी ठेवून दूरदृष्टी 
बांधले किल्ले आणि गड
विजयपताका फडकवून
शत्रूचे शिरावेगळे केले धड
******************
८)
माणुसकीचा सन्मान 
करतो तो सज्जन माणूस
सोने वाट सतकर्माचे
नाही नको म्हणूस
**************
९)
ज्योतिचा धर्म ज्योतिने पाळला 
सावित्रीने सांभाळला
समानतेचा माणूसकीचा
आनंदी वसा दिला 
***************
१०)
झाला मंदिरात घंटानाद
आनंद घाली साद
प्रभूनाम घेता मुखी
शांतता देई दाद
 ***************
कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी 
 *************** *************** ***************






[10/11, 11:12 AM] ‪+91 94231 53509‬: दसरा विशेष
सुवर्ण चारोळी स्पर्धा

१ ) देती शिकवण समतेची
    संत आमचे माता पिता
    शिकवण देती नित्य नवी
    विचार तयांचे अनुसरू आता

२ ) फटाके आतिषबाजी फक्त
    म्हणजे का हो दिवाळी असे?
    आनंद दयावा उपेक्षीतांना
     तीच खरी हो दिवाळी असे

३ ) राजे आमचे शिवराय
     आठवण तयाची आज ही
     दिवाळीत बांधतो आम्ही
     गड किल्ले सुरेख मातीची

४ ) प्रत्येकामधे असे 
    अवगुण काही तरी
    दसरा दहन करू तयाचे
    चालू सज्जनाच्या पायी

५ ) माणूस म्हणून जगण्याचा
     नव्हता अधिकार ही जरी
     माणसाला दिले माणूसपण
     नेले बुद्धाच्या त्या वाटेवरी

६ ) रक्तपात कलिंग मधे
     अशोक रणी लढला
     बुध्दा चरणी विजय
     सम्राट अशोक जाहला

७ ) सण दसऱ्याचा आला
     पाने आपट्याचे वाटा
     शुभेच्छा एकमेका देवू
     सोने हेच आता लुटा

८ ) सण असतो सणासारखा
    आनंदी आनंद चोहिकडे
    दसरा असे नाव तयाचे
    मंगलमय स्वप्न पहाटेचे

९ ) विचारांनी विचारावर मात
     म्हणून घेतली ती दिक्षा
     धम्माची शिकवण देवून
    भारतास पुन्हा बुध्द तो दिला

१० ) अशोकाने जिंकून लढाई
        स्थैर्य तयास न लाभले
        उपदेश ऐकूण शांतीचा
        बुध्द मार्गी यश ते लाभले

किशोर झोटे,
औरंगाबाद.
[10/11, 11:29 AM] Gajanan patil: *शब्द सह्याद्री मंच आयोजित सुवर्ण चारोळी स्पर्धा*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
काळ्या आईचं लेकरू 
सोन पिकवून शेतावरी..!
भाव मिळेना धान्याला 
दुःख झेलताना अंतरी..!!
☘☘☘☘☘☘☘
दसरा, दिवाळीचा सण 
तुम्हा आम्हा सर्वासाठी..! 
आठवण थोडी तरी ठेवा 
सीमेवर उभ्या जवानासाठी..!! 
☘☘☘☘☘☘☘
विजया दशमी सण 
आनंदाचा सोहळा खरा..!
सोन्या सारखी माणसे 
हृदयात जतन करा..!!
☘☘☘☘☘☘☘
सुविचाराचे सोने लुटा 
नका ठेवू मनात कटुता..! 
निर्धार करावा याचक्षणी 
मित्रत्वाचे सोने येईल हाता..!! 
☘☘☘☘☘☘☘
संत सज्जन होता भेटी  
लागो त्यांचे पाय घरा..!
दिवाळी आणि दसरा 
आनंदाने साजरा करा..!!
☘☘☘☘☘☘☘
पाने वाटू अपट्याची 
अंतर मनात साठवन..!
लाभो प्रेमे जिव्हाळा आता
हेच मागणे ठेवा आठवण..!! 
☘☘☘☘☘☘☘
सण साजरा करता 
जावे मळभ सरून..!
प्रेम वाढावे गडगंज 
हृदय शुद्ध अंतःकरण..!!
☘☘☘☘☘☘☘
यश अपयश सोबती 
बाळगू नये तयाची भीती..!
कर्तव्य करावे प्रयत्नाने 
तिचं खरी असे महती..!!
☘☘☘☘☘☘☘
विजयाची माळ गळा 
माणसे माणूसकी सांभाळा..!
होईल जीवनी सोहळा 
फुलवा अंतरीचा मळा..!!
☘☘☘☘☘☘☘
विसर नका पडू देऊ
माझ्या देशातील वीरांचा..!
रक्षण करणारे खरे सोने 
देश शोभे हा खरा शूरवीरांचा..!!
☘☘☘☘☘☘☘
   गजानन पाटील पवार


[10/11, 12:11 PM] 
‪+91 99234 45306‬
✳ *दसरा विशेष*✳

✍🏻 *सुवर्ण चारोळी स्पर्धा* ✍🏻

---------------------------------------------------------------
१.
सण विजयाचा
साडेतीन मुहुर्ताचा
सण मांगल्याचा
सिमोल्लंगनाचा !

२.
दुर्गुणावर करुन मात
दहन करु या अज्ञानाचे
करुन मनी निश्चय
स्वागत करु या स्त्रीजन्माचे !

३.
विचारांचे लुटावे सोने
आशीर्वाद घ्यावेत थोरांचे
शमीपत्र,झेंडु वाहुन
पुजन करावे शस्त्रांचे !

४.
आपट्याचे पान
त्याला ह्रदयाचा आकार
देश महासत्ता होण्याचे
करुयात स्वप्न साकार!

५.
आज सोनियाचा दिन
चेहरा ठेवा हासरा
सारीकडे मोद पसरे
दु:खास नका देऊ आसरा !

६.
नकारात्मकतेचे करावे दहन
सकारात्मक विचार मनी रुजावा
नवनिर्मितीचा घेऊन ध्यास
आनंदोत्सव साजरा करावा !

७.
दस-याच्या सणाला
आपट्याची पाने वाटा
करुन शब्दशस्त्रांचे पुजन
सुविचारांचे सोने लुटा !

८.
दहन करा मनातील
वैफल्य,निराशा,चिंतेचे
धैर्याने सामोरे जा
हेच मागणे दस-याचे !

९.सीमेवर जवान उभा
झेलतो छातीवर गोळी
तुम्ही आम्ही मात्र आनंदाने
साजरा करतोय दसरा-दिवाळी!

१०.
विश्वासाचे नाते जुळावे
कार्य जगी श्रेष्ठ करावे
नित्य दर्शन लक्ष्मीचे व्हावे
शतवर्षाचे आयुष्य लाभावे !

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद



पुणे सहल प्रयरु

Pune Sahal

दसरा विशेष चारोळी

*🌿☘🍀 दसरा विशेष 🍃🍂🍁*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
1)
आलाय बघा दसरा
घेऊन आनंदाचा सदरा
एकमेकास प्रेम देऊनी
दुःख सारे विसरा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
2)
दसऱ्याचे सोनं म्हणजे
आपट्याची पाने
एकमेका देऊन गाऊ
आनंदाचे गाणे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
3)
सोन्याचे भाव वाढले
जरा जपून वाटप करा
आपल्या जीवनात साऱ्या
सुख-समृद्धि देवो दसरा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
4)
आज आहे दसरा
आत्ता सगळ विसरा
दुःख येवोत कितीही
हसते ठेवा चेहरा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
5)
मनामनातील दुष्ट भावना
संपवुनी करू सण साजरा
चिंता, काळजी नष्ट होऊनी
सुख घेऊन येवो दसरा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
6)
आपट्याचे पान
हृदयाचा आकार
आनंदाच्या या क्षणी
दसरा करू साकार
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
7)
नवरात्राचे नऊ रूप
दाखवी देवी माता
दशमीचा विजयोउत्सव
साजरी करूया आत्ता
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
8)
आज आहे सण उत्सवाचा
आपटारूपी सोने लूटण्याचा
जुने दुःख विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
9)
रामाने मारले लंकेच्या रावणाला
तोच विजय दिवस आहे आजचा
आपण ही मारू दुष्ट प्रवृत्तीला
साजरा करू सण विजयादशमीचा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
10)
बायको म्हणाली मला
सोने घेऊन द्या हो
मी म्हणाला बायकोला
दसरा सण येऊ द्या हो
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विजय मिळवा आपल्या - दुर्गुणावर
विजय मिळवा आपल्या - कुविचारावर
विजय मिळवा आपल्या - व्यसनावर
विजय मिळवा आपल्या - गर्वावर
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*विजयादशमीच्या लाखमोलाच्या शुभेच्छा*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*- नागोराव सा. येवतीकर*
   *मु. येवती पो. येताळा*
   *ता. धर्माबाद जि. नांदेड*
   *09423625769*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...