Saturday, 5 October 2024

दीपालिका दिवाळी अंक 2024 ( Deepalika )


📘 पुस्तक परीक्षण 📘

 
  ***  दीपालिका दिवाळी अंक !  ***

   सर्वांना नमस्कार ! अनेक प्रतिथयश नसलेले परंतु चांगलं लेखन करणारे लेखक आणि कवी मित्र यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अरविंद कुलकर्णी आणि श्री. नासा येवतीकर ( स्तंभ लेखक ) यांनी पुढाकार घेऊन आणि सोबतीला आणखी काही उत्साही मित्र संपादकीय मंडळात घेऊन या दिवाळीअंकाचे प्रकाशन यशस्वी करून दाखविले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ! 
   या अंकाचे छपाई , मुखपृष्ठ , आणि मागणीप्रमाणे प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम " शॉपीझेन " या कंपनीने योग्य तऱ्हेने पार पाडले आहे . शिवाय हा दिवाळीअंक अमेझॉन या ऑनलाईन साईटवर उपलब्ध करून ठेवला आहे. 
   काही दिवसापूर्वी मला हा दिवाळीअंक घरबसल्या मिळाला ! इतर दिवाळीअंक साधारण दसऱ्यापासून बाजारात यायला सुरुवात होते , त्यामानाने बराच लवकर एक दिवाळीअंक घरी आल्यामुळे साहजिकच आनंद झाला .
   मी आणि माझ्या सौ. ने चारपाच दिवसात बराच अंक वाचून काढला. अंकात लघुकथा, ललित व वैचारिक, वैचारिक लेख व्यक्तीविशेष, कविता आणि गझल असे विभाग पाडले आहेत तें योग्यच आहे !
   शिवाय संपादकांचे मनोगत श्री. अरविंद कुलकर्णी यांनी आणि संपादकीय हें श्री. नासा येवतीकर यांनी अत्यंत अनुरूप असें लिहिले आहे. शॉपीजनच्या ऋचा दीपक कर्पे यांनी स्वतःची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याचे जाणवते !
   आता मला या अंकाबद्दल काय वाटते तें पटतंय का तें बघा.  अंकाचा आकार पारंपारिक दिवाळी अंकासारखा नाही. दिवाळी अंकापेक्षा लहान आणि एखाद्या पुस्तकासारखा आहे त्यामुळे त्याची शोभा कमी झाल्यासारखी वाटते . जेवढं अंतरंगाला महत्व असतं तेवढंच बाह्यरंग महत्वाचे असते असं मला वाटतं . असो. आपण आता अंतरंगाकडे वाळूया ! 
   पहिलीच कथा " चमचाभर आनंद " घडाभर आनंद देऊन जाते ! त्याचप्रमाणे , कातरवेळ, भाऊबीज , समाजावणी, कळावे लोभ नसावा , निर्णय, शेवटची भेट, काटेकोरांटीची फुले, या लघुकथा  विशेष  उल्लेखनीय  वाटल्या ! " हे ही दिवस जातील एक चांगला संदेश देऊन जाते . 
   'ललित व वैचारिक ' मधली " वसंती ओढ " यांत फक्त तारुण्यातील प्रेमाची ओढ जाणवते ! इतर लिखाणही यापेक्षा अधिक चांगलं लिहिता आलं असतं असं वाटून जातं  पण प्रयत्न म्हणून चांगलं आहे !
   " वैचारिक लेख " या सदरात प्रत्येकाने स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे  पण त्यात अधीक नावीन्य असायला हवं होतं असं वाटतं !
    " व्यक्ती विशेष " मधली शेख जानी शेख नबीसाहब यांची माहिती उल्लेखनीय आहे !
    " ऑक्शन " नावाचं प्रवास वर्णन छान जमलंय !
( एखादा फोटो हवा होता )
  अनेक पारितोषिक विजेत्या ठमाताई पवार यांची मुलाखत घेऊन अंकाची शोभा वाढली आहे ! (फोटो हवा होता ).
   कविताँच्या दालनातील सर्व कविता वाचनीय आहेत . त्यातील "अंधश्रद्धा भारूड " आणि ' सृष्टी फुलली आनंदाने " या कविता विशेष उल्लेखनीय !
   या दीपालिका दिवाळी अंकाच्या शेवटी स्थान मिळालेल्या गझला अतिशय सुंदर आहेत ! "घालता गोंधळ कशाला ", " कुणाची काय पर्वा ", "जमाव " आणि " वनहरिणी "या चारही ही  गझला सामाजिक परिस्थिती अधोरेखित करतात , आणि " सांगायचे कशाला " ही गझल ह्रिदयस्पर्शी झाली आहे तसेच      " काळोख आज दाटला " हें प्रेमागीत झालं आहे !
आणि सर्वांत शेवटी असलेली " शुभ दीपावली " 
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या दिवाळी अंकाचा गोड शेवट होतो !!! 
   साहित्य प्रेमिंना हा दिवाळीअंक नक्कीच आवडेल !

अजित हरचेकर .
दादर , मुंबई .
३०/०९/२०२४ .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पोस्टमनद्वारे आज मला शाळेत अंक मिळाला. अंक हातात घेताच डोळे पाणावले होते.आणि उत्सुकता होती ती प्रथम माझी कविता बघण्याची. शाळेत असल्यामुळे अंक फारसा हाताळता आला नाही ;पण घरी गेल्यानंतर आईबाबांना नमस्कार करून ही आनंदाची बातमी सांगितली आणि शाबासकी मिळवून आवरून पुस्तक वाचायला सुरूवात केली.
पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं आकर्षक आहे की त्याने मला लगेच आपल्याकडे खेचून घेतलं .नासा सरांच्या संपादकीयातून पुस्तकातला आत्मा कळला .यावरून पुस्तक वाचण्याला पुन्हा नवा उत्साह मिळतो .
पहिल्या 'चममाभर आनंद या  लघुकथेपासुन सुरूवात केली तर आजूबाजूला काय घडतंय याचं भान विसरून पुस्तकात मग्न झाले ते 'मुलाखती'वर जाऊन पोहोचल्यावर आईची हाक कानावर पडली.
म्हणजे जवळजवळ निम्माहून जास्त पुस्तक वाचून झालं . प्रत्येक वाचकाच्या बाबतीत हेचं झालं असेल आणि होईलही याची खात्री वाटते. पुस्तकातल्या प्रत्येक साहित्यातून एक चांगला संदेश मिळतोय .काही साहित्य वाचताना हे आपल्यासोबत किंवा आपल्या समोरच घडतंय असाही भास होतो. साहित्याची निवड खूप विचार करून केलेली जाणवते. आयुष्यातल्या लहानात लहान गोष्टींवर लिखाण केलेलं आहे त्यामुळे पुस्तक वाचायला अधिक रस येतो.  पुस्तकाची पानंही जाड आहेत ."हा दीपालिका दिवाळी अंक २०२४ या दिवाळीत प्रत्येक वाचकाच्या मनात तेवणार्या  दिव्याच्या ज्योतीला अधिक तेजोमय करेल याची खात्री आहे" हे साहित्य आवडलं आणि हे ही छान आहे असं मी म्हणूच शकत नाही कारण प्रत्येक साहित्यातून नव्या विचारांत जायला होतं.जवळजवळ आयुष्य कसं जगावं आणि कोणते विचार आत्मसात करावे याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. मी दहावीत शिकते पण मी अजूनही माझं ध्येय निश्चित केलेलं नाही पण नक्कीच पुस्तकातल्या साहित्य मार्गदर्शनाचा उपयोग मला माणसापासून माणुसकीपर्यंत जाण्यासाठी होईलचं माझ्याही साहित्याची निवड केल्यांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढील प्रकाशनांसाठी खूप खूप शुभेच्छा!!

प्रतिक्षा धनंजय नेवरेकर 
रत्नागिरी (निवेंडी)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🙏🏻 नमस्कार 🙏🏻

मी  काव्यरसिका
सौ. रसिका आनंद शाळिग्राम, पुणे .
 माझे पुस्तक परीक्षण
 
पुस्तकाचे नाव -  दीपालीका दिवाळी अंक 2024 

सर्व संपादक मंडळ,
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
सर्व संपादक मंडळांनी माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकांना आमचे लेख, कविता, गझल आपल्या अंकामध्ये छापून आम्हाला मानाचे स्थान दिले. 🙏🏻
वर्तमानपत्र मध्येही मी लेख, कविता, प्रतिक्रिया लिहित असते त्याही वर्तमानपत्रात छापून आल्यावर  खूपच आनंद होतो..
📘आज प्रथमच पुस्तकामध्ये तेही दिवाळी अंकामध्ये आपल्या दीपालिका दिवाळी अंकामध्ये माझी कविता छापून आली आहे. मनस्वी आनंद झाला ...
सर्वप्रथम माझा विश्वासच बसेना पण जेव्हा मी स्वतःचे नाव वाचले तेव्हा माझा विश्वास बसला. 
🙋🏻‍♀️ काव्यरसिका अशी स्वतःची नवीन ओळख निर्माण झाली. 📝
दिवाळी अंकामध्ये माझी स्वरचीत कविता प्रकाशित करून मला आपल्या दीपालीका दिवाळी अंक 2024 या दिवाळी अंकामध्ये काव्य लेखनाची सुवर्णसंधी दिली. अतिशय सुंदर, वाचनीय अशा दीपालीका दिवाळी अंक 2024 या अंकामध्ये प्रथमच माझी कविता प्रकाशित झाली आहे. त्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व संपादक मंडळांची खूप खूप मनस्वी आभारी आहे.🙏🏻
याही पुढे आपण मला आपल्या दिवाळी अंकासाठी उत्तम लेखन करण्याची सुवर्णसंधी द्याल अशी मी अशा व्यक्त करते. 🙏🏻
प्रकाशक ... शॉपीजन मराठी विभाग प्रमुख माननीय ऋचा दीपक कर्पे.
नमस्कार ऋचा मॅडम आपण दीपालीका दिवाळी अंक 2024 आमच्या सर्व साहित्य मंडळींपर्यंत पोहोचवल्याबद्दल   आपले आणि शॉपिझेनचे मनःपूर्वक आभार. 🙏🏻
आपले कार्य खूपच महान आहे. आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 🙏🏻
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे. साहित्यरंजनच्या माननीय सौ. शिल्पाताई रवी यांनी दिवाळी सणाला साजेसे असे मुखपृष्ठ केले आहे. दिवाळीमध्ये आपण रंगीबेरंगी दीप प्रज्वलित करतो. आपल्या जीवनातील अंधकार, नकारात्मकता नाहीसे होऊन  आपले जीवन प्रकाशमान बनावे
असा सुंदर गर्भित अर्थ आपल्या दीपालीका दिवाळी अंक 2024 मुखपृष्ठाचा आहे.
दिवाळी अंकाचे मलपृष्ठ श्री.अरविंद कुलकर्णी सरांनी खूप छान लेखन केले आहे. सरांनी लिहिल्याप्रमाणे लेखक आणि कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे लेखन.
लेखन साहित्य वाचण्यासाठी जास्तीत जास्त वाचक वर्ग निर्माण व्हावा म्हणून  साहित्यरंजन नावाचा एक समूह देखील आहे.
अंकाची पृष्ठसंख्या ... ११९
दीपालिका दिवाळी अंकामध्ये लघुकथा, ललित व वैचारिक लेख, व्यक्तिविशेष, कविता विभागआणि गझल विभाग अशा अनेक वेगवेगळ्या साहित्यांनी वाचकाचे रंजन होते.
दीपालीका दिवाळी अंक 2024 मधील सर्वांच्याच लघुकथा, ललित व वैचारिक लेख, व्यक्तिविशेष ,कविता आणि गझल अतिशय उत्तम आणि वाचनीय आहेत. मला दीपालिका दिवाळी अंक 2024 संपूर्ण दिवाळी अंक मनापासून आवडलेला आहे.👌🏻💐
---------------------------
            👍🏻 अभिप्राय 👍🏻
कथाविभाग - लघुकथा - चमचाभर आनंद
लेखिका.. मेधा नेने  यांच्या लेखामधून छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळतो हा संदेश मिळाला.
 
वैचारिक लेख - रूढी परंपरा आणि नवीन पिढी
लेखिका.. प्रा. सौ .सुमती पवार यांच्या लेखामधून दोन पिढ्यांनी सुवर्णमध्य कसा काढावा याचे छान मार्गदर्शन केले आहे. 

वैचारिक लेख - भुताला पत्र
लेखक.. सुनील खंडेलवाल यांनी या लेखामध्ये अंधश्रद्धा या विषयावर भाष्य केले आहे. श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी असा संदेश या कथेतून मिळाला .

 लालकृष्ण आडवाणी व्यक्ती विशेष वाचनीय आहे.
 लेखिका वर्षा कुवळेकर यांच्या लेखामध्ये ऑक्शन या एका शब्दा वर आधारित हास्य लेखातून  प्रत्येक गावातील भाषेचा  एक वेगळा लहेजा असतो हे  सिद्ध होते.

कविता विभाग - असे पाहुणे येती या कवितेमध्ये कवयित्री चैताली देशपांडे यांनी अतिशय परखडपणे वास्तव विचार मांडलेले आहेत..
🎇 शुभ दिपावली 🎇 या कवितेमध्ये  कवयित्री काव्यरसिका सौ. रसिका आनंद शाळिग्राम पुणे यांच्या कवितेमध्ये दिवाळी या सणांचा राजाचे खूपच सुंदर शब्दांमध्ये स्वागत आणि वर्णन केले आहे .
कविता वाचताना....आपण दिवाळी सण  अनुभवत असल्याची जाणीव होते.
दिवाळी सणाचा उत्साह, आनंद डोळ्यासमोर उभा राहतो. 
दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्व रसिक वाचकांसाठी  लाख मोलाच्या आहेत....
सर्व रसिक वाचकांच्या वाचन प्रेमामुळेच आम्हा सर्व लेखक, कवयित्रींना काव्यरसिकांना उत्तम उत्तम लेखन करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. 👍🏻 

🌹दीपालीका दिवाळी अंक🌹 2024
या दिवाळी अंकातील सर्व लेख आकर्षक आहेत सर्व कविता, गझल वाचनीय आहेत. मनाला निखळ आनंद देणारा दीपालीका दिवाळी अंक आहे. मला दीपालीका दिवाळी अंक खूप खूप मनापासून आवडला. 
सर्व संपादक मंडळाचे, ऋचा मॅडमचे सर्व लेखकांचे सर्व कवी, कवयित्रींचे मनापासून आभार 🙏🏻
                     धन्यवाद ......!

 काव्यरसिका
सौ. रसिका आनंद शाळिग्राम, पुणे.

Tuesday, 1 October 2024

लाल बहादूर शास्त्री ( Lal Bahadur Shastri )

नन्हे फरिस्ते : लाल बहादूर शास्त्री


श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.  विशीतील त्यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” या नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. वरदक्षिणा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.

1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते. पंतप्रधान झाल्यावर देशाची अन्न आणि दुग्ध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी हरित क्रांती आणि श्वेतक्रांती यांना प्रोत्साहन दिले.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी 'जय जवान' 'जय किसान'चा नारा  दिला होता. त्यावेळी त्यांनी पगार घेणेही बंद केले होते.

१० जानेवारी १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. 

संकलन - नासा येवतीकर


माहूरची रेणुकामाता ( Renuka Mata )

श्री रेणुकामाता (माहूरगड)


देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. दरवर्षी दसर्याच्या दिवशी रेणुकादेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले..!!


( वरील माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. )

- नासा येवतीकर

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...