Tuesday, 1 October 2024

तुळजापूरची तुळजाभवानी ( Tulajabhavani )

   नवरात्र विशेष - तुळजापूरची तुळजाभवानी


तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते.

धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.

आख्यायिका - कृतयुगाच्या वेळी 'कर्दम' ऋषींची पत्‍नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुंकुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्‍न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. 

तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर १३९८ चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे.

मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे. तुळजाभवानीची मूर्ती चल असून, ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते.

या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

( वरील माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. ) 

- नासा येवतीकर

No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिन ( Republic Day )

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा