तनामनात ज्योत पेटविणारा " जागर जाणिवांचा "
~~~~~~~~~~~~~~~~
चौकट - मा. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि अक्षर प्रकाशन आजराचे प्रकाशक सुभाष विभुते यांच्या हस्ते विनायक हिरवे लिखित जागर जाणिवांचा या पुस्तकाचे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन मध्ये दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेला थोडक्यात आढावा.
~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षक म्हणजे केवळ शाळेतील ज्ञान देणारे नसून ते समाजाला संवेदना, संस्कार आणि दृष्टी देणारे मार्गदर्शक आहेत. संवेदनशील नागरिक घडविण्याचे खूप मोठे काम शिक्षक करत असतात. पूर्वीचा काळ असो की आजचा काळ, शिक्षकांना नेहमीच समाजात मान सन्मान मिळतो. फक्त समाजाला समजून घेऊन कार्य करता आले पाहिजे. शिक्षक हा समाज घडविणारा खूप मोठा अभियंता आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकांमध्ये निर्माण व्हावा या उदात्त हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक विनायक हिरवे यांनी जागर जाणीवांचा हे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे निमित्त साधून आजरा येथील अक्षर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक नसून एक शिक्षक आपली शिक्षकी पेशा सांभाळत सामाजिक कार्य कसे पूर्ण करता येऊ शकते ? समाजाचे ऋण कसे फेडता येईल ? याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हे पुस्तक लेखकाचे आत्मकथन आहे पण त्यांच्या आत्मकथनातुन प्रेरणा घेण्यासारखं आणि नवीन काही शिकण्यासारखं व करण्यासारखं खूप आहे. शालेय जीवनातील अनेक प्रसंग आणि घटना आपले पुढील आयुष्य घडवत असतात. शाळेमध्ये शिक्षणासोबत इतर क्रिया देखील अत्यंत महत्वाचे असतात. शाळेतील शिक्षक तर विद्यार्थ्यांवर संस्कार टाकण्याचे काम करतातंच शिवाय सहकारी विद्यार्थी मित्र देखील संस्कार करत असतात. पुस्तक वाचताना या गोष्टीची प्रत्येक वेळी जाणीव होत असते. गरिबी माणसाला संघर्ष करायला शिकविते. संकटे ही माणसाला स्वतःच्या सामर्थ्यांची कल्पना देतात. तावून सुलाखून कणखर बनवून बाहेर काढतात. लेखकांची ही स्वमत वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नशीब देखील चांगले असावे लागते. नशिबात काय लिहून ठेवलं आहे ? हे विधात्याशिवाय कोणालाच माहित नाही. लेखकांना खरं तर नाविक दलात काम करण्याची इच्छा होती मात्र अपघाताने ते शिक्षक झाले. म्हणून त्यांनी नाराज किंवा निरूत्साही झाले नाहीत. त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करत सोने निर्माण केले आहे. आपला स्वभाव प्रेमळ आणि मायाळू असेल तर शत्रू देखील आपला मित्र बनतो. कुणापुढे हात पसरण्याची देखील गरज नसते आणि भरपूर मदत मिळू शकते पण त्यासाठी अगोदर स्वतःला खूप कष्ट आणि दुःख सोसावे लागते. लेखकाला जीवनात अनेक चांगल्या लोकांशी संपर्क आला. ज्यात प्रामुख्याने सेवायोग संस्थेचे इंद्रजित देशमुख आणि साद माणुसकीचे संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले त्यांच्या सहवासाने लेखकांच्या जीवनात आमूलग्र बदल झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. समाजातील तळागाळातील गरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ नावाची ज्योत त्यांनी चोवीस वर्षांपूर्वी पेटविली. ज्ञान, प्रबोधन आणि सेवा या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन, या अंतर्गत त्यांनी अनाथ लोकांना मदत, पूरग्रस्ताना मदत, विधवा महिलासाठी हळदी कुंकू, सायकल बँक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब मुलांसाठी असलेली अभ्यासिका असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्या सर्व उपक्रमाची माहिती वाचताना अंगावर शहारे येतात. मित्र परिवाराची मिळालेली साथ हे ही अत्यंत महत्वाचे आहे. राज्यपुरस्कार मिळणे हे कोणत्याही शिक्षकांसाठी खूप मोठे पारितोषिक आहे. पण लेखकांनी हा पुरस्कार का मिळविले ? याची कहाणी खूपच रोचक आहे. शैक्षणिक व्यासपीठाची स्थापना आणि त्या अंतर्गत केलेले सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे. लेखक आपल्या पहिल्या पानावर नेल्सन मंडेला यांचे वाक्य लिहिले आहे, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता. खरंच आहे, शिक्षणाने जी क्रांती होते, ती अन्य कशानेही होत नाही. म्हणून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण मिळायला हवे. यासाठी प्रत्येक शिक्षकांने धडपड करायला हवे. हीच प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक आहे, असे मला वाटते. शिक्षक व लेखक विनायक हिरवे यांचे कार्य समजून घेण्यासाठी आणि आपण ही समाजासाठी काही करू शकतो हे जाणून घेण्यासाठी जागर जाणीवांचा पुस्तक वाचायलाच हवं. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी यांची सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. पुस्तकाची सुंदर व आकर्षक अशी बांधणी असून अक्षर जुळणी छान केलेली आहे. रुपेश वारंगे यांचे मुखपृष्ठ वाचकांचे मन वेधून घेते. या पुस्तकात एकूण 199 पृष्ठ असून पुस्तकाची किंमत 250 ₹ आहे. लेखकांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा ......!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद, 9423625769