Thursday 2 November 2017

कथा - बदल्याचा बळी

जरूर वाचा, reply द्या आणि share करा

*बदल्याचा बळी*

आज भगवानराव गुरुजींच्या छातीमध्ये त्रास होत होता म्हणून जीवनछाया हॉस्पिटलमध्ये त्यांना एडमिट करण्यात आले. सविता मैडम त्याही खुपच चिंताग्रस्त होत्या. त्यांना ही कुठे त्याच  हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांचे दोन चिमुकली मुले मुलगा प्रवीण सातव्या वर्गात तर मुलगी प्रणिता चौथ्या वर्गात शहरातल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेत होती. भगवानराव गुरुजीं शहराच्या जवळच्या एका खेड्यातील प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते तर सविता मैडम त्याच शहरातल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होत्या. पण सरल पोर्टलद्वारे ऑनलाइन बदल्या करण्याचा शासनाचा निर्णय जाहिर झाल्यापासून दोघांचेही मन अस्वस्थ होते. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये बदल्याचा हंगाम असतो आणि हजार एक बदल्या होऊन शाळा सुरु होण्यापूर्वी सर्वजण सेटल होऊन जातात. पण यावर्षी शासनाने सर्वाच्या बदल्या केल्या पण प्राथमिक शिक्षकांचे बदल्या केल्या नाही. त्यामुळे त्यांना हुरहुर लागली होती. त्यातल्या त्यात रोज एक नविन बातमी कानावर येत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची काळजी देखील वाढत होती. आज ही असेच एक बातमी व्हाट्सअपवर वाचायला मिळाली अन भगवानराव गुरुजींची छाती भरून आली. सविता मैडम शहरातल्या शाळेत असल्यामुळे त्यांची बदली होणार हे निश्चित झाले होते. कारण कुणी तरी त्यांची जागा मागितली होती. असे कळले होते.  त्यासाठी त्यांनी आपल्या आवडीचे वीस गावे ऑनलाइन भरून दिली. मात्र पती-पत्नी एकत्रीकरण त्यांनी नाकारले होते. हीच बाब त्यांना नेहमी खटकत होती. आज एक बातमी वाचण्यात आली की, दिलेली माहिती खोटी आढळल्यास संबंधित दोषी शिक्षकांना निलंबित करण्यात येईल. ही बातमी वाचल्यापासून गुरुजीं अधिक चिंतातुर झाले होते. कारण त्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण नको असे स्विकार केले होते. त्यांना कोणी तरी वेगळीच माहिती सांगितली होती की, तुम्ही दोघे शिक्षक असताना ही तुम्ही पती-पत्नी नको स्विकार केलात हे चूक आहे. गुरुजींला काहीच कळेना. बाहेर मित्रांसोबत बसले की याच विषयावर चर्चा चालायचे. वीस गावातुन एकही गाव मिळाले नाही तर कोठे ही  कोणत्याही गावी फेकतात म्हणून तुम्ही पती-पत्नी स्विकार केले असते तर निदान दोघांना एकच शाळा किंवा जवळ जवळच्या शाळेचे गाव मिळाले असते. या बदल्यामुळे अनेक चर्चा त्यांच्या कानावर पडत होते त्यामुळे त्यांची बीपी आणि शुगर कमी जास्त होत होते. जेवण कमी झाले होते, झोप कमी झाली होती. एवढेच काय त्यांचे इतराशी बोलणे देखील कमी झाले. चार महिन्याच्या काळात त्यांचे जवळपास दहा किलो वजन कमी झाले असेल. घरात सगळीकडे चिंता आणि काळजीचे वातावरण होते. कोणीही कोणास पूर्वीसारखे प्रेमाने बोलत नव्हते. मुले देखील आपली शाळा, ट्यूशन आणि होमवर्क यात गुंग राहायची. आज होणार उद्या होणार म्हणत म्हणत दिवाळी आली पण बदल्या काही झाले नाहीत. त्यांच्या घरातील दिवाळी देखील अशी तशीच झाली. मुलांनी यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करायची म्हणून बाजारातून एकही फटाका विकत घेतला नाही. सविता मैडमने देखील कोणताच दिवाळी फराळ तयार केला नाही. दिवाळी साजरी करण्यात कोणाला ही आनंद वाटत नव्हता. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रातभर जागरण करून भगवानराव गुरुजींनी सविता मैडमचा बदलीचा अर्ज भरला. पहाटे पहाटे ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली अन भगवानराव गुरुजींला डोळा लागला. तासभराची डुलकी झाली असेल तोच बाहेर फटाके फुटण्याचा आवाज आल्यामुळे त्यांची झोप उडाली. त्या दिवशीही दिवसभर याच बदल्याच्या चर्चा सर्वत्र चालू होत्या. पेपरामध्ये देखील अर्धे पान लिहून आले. बदल्यामुळे काय होते आणि काय नाही याची धसकी भगवानराव गुरुजींना लागली. अखेर व्ह्ययचे तेच झाले, गुरुजीं या धसकीतून काही बाहेर आलेच नाहीत. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट मध्ये पण तबीयतमध्ये काही सुधारणा झाली नाही. त्या दिवशी कुठून तरी एक बातमी त्यांच्या कानावर गेली. ती बातमी ऐकून त्यांची दिल की धडकन अजुन वाढली. ती अशी वाढली की कायमची बंद झाली आणि सविता मैडम विधवा झाल्या. बदल्यामुळे शिक्षकांची मानसिकता योग्य राहत नसेल तर या बदल्या काय कामाच्या असे लोक चर्चा करू लागली. बदल्या होईल तेंव्हा होईल मात्र त्यामुळे एका शिक्षकांस आपल्या जिवाला मुकावे लागले त्याचे काय अशी ही चर्चा लोकांमध्ये होऊ लागली.

( वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून, कथेत आलेली नावे आणि प्रसंग पूर्ण काल्पनिक आहे. यदा कदाचित या कथेनुरूप प्रसंग आपल्या जीवनाशी निगडित असेल तर तो योगायोग समजावे. )

थेट वेमुलवाडाहून ( तेलंगना ) लिहिलेली

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Wednesday 1 November 2017

राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती

राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती

शाळेत शिकत असताना गुरुजी मुलांना संगत की, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे, कसल्याही प्रकारचे हालचाल करू नये. तसे केल्यास राष्ट्रगीताचा अपमान समाजल्या जातो. या सूचनेचे पालन करीत मुले रांगेत उभे राहून सरळ समोर पाहत ताठ मानेने राष्ट्रगीत एका सुरात आणि तालबध्द पद्धतीने म्हणतात. अश्या या रोजच्या कृतीमुळे मुलांमध्ये राष्ट्राभिमान जागृती करता येते. देशातील प्रत्येक शाळेची सुरुवात ही राष्ट्रगीताने होते. कधी कधी पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर भरपूर पाऊस चालू असतो अश्या वेळी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मैदानात जाता येत नाही त्यावेळी वर्गावर्गात राष्ट्रगीत म्हटले जाते. त्याशिवाय शाळेची सुरुवात केल्यास दिवसभर काही तरी हरवल्यासारखे अस्वस्थ वाटते. अगदी लहानपणापासून आपल्या मनात राष्ट्राविषयी स्वाभिमान जागे करण्याचे काम या राष्ट्रगीतामार्फत केल्या जाते. नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या जगप्रसिध्द पुस्तकातील जन गण मन हे काव्य भारताचे राष्ट्रगीत म्हणून सन 1950 मध्ये स्विकार करण्यात आले. त्यपूर्वी 27 डिसेंबर 1911 मध्ये कोलकताच्या राष्ट्रीय अधिवेशनात हे गीत सर्वात पहिल्यांदा गायिले गेले. प्रत्येक देशाला एक राष्ट्रगीत असतेच ज्यातून त्या देशाची इत्यंभूत माहिती दिली जाते. त्या देशाचा इतिहास आणि परंपरेची माहिती देखील यातून मिळते म्हणूनच राष्ट्रगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्या या देशाभिमान जागृत करणाऱ्या राष्ट्रगीताविषयी काही बोलले जाते तेच मुळात चुकीचे आहे. एकीकडे राजस्थानच्या जयपूरचे महापौर अशोक काटोल यांनी दोन वेळा राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे म्हणून चर्चेचा विषय ठरतो तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायलयातील एका सेवानिवृत्त न्यायाधीशाने राष्ट्रगीत चालू असताना उभे रहाणे बंधनकारक नसावे असे म्हटले आहे. यावरून मग देशात चर्चेला सुरुवात होते. अन्य कुणी तरी हा विषय न्यायालयात दाखल करतात. म्हणजे हे सर्व असहिष्णुतेचे लक्षण आहेत. दिवसेंदिवस लोकांमधील देशाभिमान आणि देशभक्ती कमी कमी होताना दिसून येत आहे. याला कारण देखील भरपूर असतील. मात्र आज भारतात जे काही चित्र पाहायला मिळत आहे त्यास अनेक बाबी कारणीभूत आहेत. सर्वात पहिल्यांदा म्हणजे शालेय स्तरावर जे राष्ट्रगीत चालते ते फक्त दहाव्या वर्गापर्यंतच्या शाळेतच चालते. मुले कॉलेजमध्ये गेले की, त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडतो. कारण इयत्ता अकरावी वर्गापासून मुलांना राष्ट्रगीत सक्तीचे नसते. कॉलेजमध्ये फक्त राष्ट्रीय सणाच्या म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशीच राष्ट्रगीताची धुन ऐकण्यास मिळते. त्यामुळे येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे राष्ट्रगीताविषयीचे प्रेम हळूहळू संपुष्टात येते. म्हणून कॉलेजमध्ये देखील राष्ट्रगीत म्हणायलाच आहे. विद्यापीठमधून देखील राष्ट्रगीत म्हटले तर देशभक्ती जागृत राहु शकेल. एक ठराविक वेळ ठरवून कॉलेज आणि विद्यापीठामधून राष्ट्रगीत चालू करणे आवश्यक आहे. तरच लोकांमध्ये देशभक्ती जागृत राहील. कळत्या आणि समजदार वयात हे राष्ट्रगीत त्यांच्या कानावर जात नाही त्यामुळे ते सदरील विषय गंभीरपणे घेत नाही. सर्व सरकारी कार्यालयाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोण वेळेवर उपस्थित राहतात याची ही माहिती होईल. सध्या ऑफिसमधले कर्मचारी आणि अधिकारी केंव्हाही येतात आणि केव्हाही जातात. अश्या वागणुकीवर नक्की बंधने येतील. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने झाली तर कार्यक्रमात खुप उत्साह आणि चैतन्य दिसून येते. चित्रपट सुरु होण्यापूर्वी सिनेमागृहात राष्ट्रगीतची धुन वाजविण्याची सक्ती योग्य वाटते. कभी ख़ुशी कभी गम या चित्रपटात सर्वप्रथम राष्ट्रगीताचा वापर झाला. त्यावेळी चित्रपट चालू असताना तो राष्ट्रगीताचा प्रसंग आल्यावर अनेक मंडळी सिनेमागृहात उभे राहिले होते. राष्ट्रगीताचा सिनेमात शक्यतो वापर करू नये.  जागतिक पातळीवर एखादा सामना सुरु होण्यापूर्वी त्या त्या देशाचे राष्ट्रगीता ची धुन वाजविली जाते. त्यातून एक प्रकारे राष्ट्रभक्ती प्रकट होते. म्हणून राष्ट्रगीताविषयी आपल्या मनात किंतु, परंतु अशी शंका मनात न आणता राष्ट्रगीत आपल्या कानावर पडले की ज्यांचे पाय आपोआप उभे होण्यासाठी उठतात, त्यांच्या मनातच खरी राष्ट्रभक्ती असते, असे वाटते. राष्ट्रभक्ती दाखविण्यासाठी कुण्या कायद्याची निश्चित अशी गरज नाही.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Sunday 29 October 2017

एकता दिन

देशातील एकता कशी टिकेल ?

कोणत्याही देशाचा विकास हा तेथील लोकांच्या एकते मध्ये दिसून येते. भारत देश किती तरी वर्षे गुलामगिरी मध्ये होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील लोकांमध्ये नसलेली एकता. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहत असे. त्याचसोबत ही मंडळी निरक्षर असल्यामुळे लोकांना काही कळत नव्हते. याच गोष्टी चा फायदा अनेक राजे-महाराज आणि इंग्रजांनी घेऊन देशावर राज्य केले आहे. मात्र भारतातील लोक जेंव्हा जागे होऊ लागली तसेच सर्वजन एकत्र येऊ लागली. त्यांना एकताचे महत्त्व कळाल्यावर सर्वानी एकत्र येऊन लढा दिला. म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताच्या या एकता ची संपूर्ण जगाने दखल घेतली. भारत स्वातंत्र्य झाले असले तरी काश्मीर, हैद्राबाद आणि जुनागढ येथील संस्थान आणि लहान मोठे 563 संस्थान भारतात विलीन होण्यास तयार नव्हते त्यामुळे भारताची अखंडता तूटत होती. पण स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला. आपल्या कणखर व्यक्तिमत्वामुळे देशातील एकता कायम राखण्यासाठी अल्पावधीमध्ये हे तीन ही संस्थाना सोबत सर्वच संस्थान भारतात विलीन करण्यात त्यांना यश मिळाले. संपूर्ण देशात आनंद झाला. सरदार पटेल नेहमी  देशातील एकतेबद्दल युवकांना संदेश देत असत याच बाबीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 या वर्षापासून त्यांचा 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात एकता दिन साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले. खरोखरच राष्ट्रीय एकात्मता राखायची असेल तर देशातील सर्व लोकांत एकता असायलाच हवी. त्याशिवाय देशाची प्रगती तरी कशी होईल ?
एकात्मतेची सुरुवात स्वतः पासून होते. स्वतः च्या मनात एकात्मता नसेल तर देशाची एकात्मता कशी राहील. भारत हा विविध जाती, धर्म आणि पंथाचा देश आहे. येथील लोक गुण्यागोविंदाने राहतात हे विधान आता इतिहास जमा झाले आहेत असे वाटते. कारण दिवसेंदिवस विविध कारणावरुन देशात अधुनमधून जातीय तणाव दंगली घडत आहेत. त्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. वास्तविक पाहता एकता विषयी घरातून सुरुवात होते. घराघरातील वाद किंवा भांडण पाहता हे देशाची एकात्मता काय टिकवून ठेवतील ? असा प्रश्न पडतो. घरात जर आपण एकतेने वागू तेंव्हाच कुठे समाजात या विषयी खुले मनाने बोलू शकतो. नाही तर लोक आपणालाच बोलतात. मी सांगतो लोकांना शेंबुड माझ्या नाकाला या म्हणी प्रमाणे. आपण सर्व देशाच्या एकात्मतेविषयी भरभरून बोलतो आणि लिहितो मात्र प्रत्यक्षात जेंव्हा वागण्याची वेळ येते तेंव्हा मात्र दोन पाऊल मागे सरकतो, असे का ? आपल्या स्वकीय आणि स्वजाती च्या लोकांना आपण जवळ घेतो मात्र जे भिन्न जाती किंवा धर्माचे लोक आहेत त्यांना कोणी जवळ येऊ देत नाहीत, असा अनुभव अनेक लोकांकडून ऐकायला मिळतात. मग कशी राहील राष्ट्रीय एकात्मता ? तीस वर्षा पूर्वी खेडोपाडी जे स्पर्श-अस्पर्श्य किंवा उच्च-नीच जे चित्र पाहायला मिळत होते ते आज जरी नष्ट झाले असे वाटत असले तरी नकळत कुठे ना कुठे याचा अनुभव अजुनही शिल्लक आहे. हे मनातील घाण जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत देशातील राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणार नाही. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही, त्यामुळे प्रत्येकाने जागरूक नागरिक होऊन वागले पाहिजे. त्याचबरोबर विविध जाती, धर्माविषयी आपल्या मनात नेहमीच आदर ठेवायला हवे. इतर धर्माच्या चालीरीती वा पध्दतीविषयी काही बोलण्याच्या अगोदर आपण त्यांच्या भावना दुखावत तर नाही ना याचा विचार करणारी पिढी तयार करायला हवे. मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करून एकता संपविण्याचा घाट चालले आहे असे वाटते. प्रत्येक व्यक्ती माझा मी असा स्व चा विचार करताना दिसत आहे. स्व चा विचार करायला हवे त्याचसोबत इतर लोकांचा देखील विचार करायला हवे. शाळाशाळामधून हेच एकतेचे संदेश शिकवायला हवे. मात्र आज पूर्वीसारखे एकतेचे शिक्षण कोणत्याच शैक्षणिक संस्थेतून मिळत नाही अशी ओरड सर्वत्र ऐकायला मिळते. असेच जर चालू राहिले तर येत्या काही वर्षात भारत महासत्ता होण्याच्या ऐवजी भारत विविध जाती आणि धर्मात विभागला जाईल. बाहेरील कोणी तरी हुशार व्यक्ती परत एकदा आपल्या वर राज्य करतील. पूर्वीचे लोक नकळत गुलामगिरीत होते तर आत्ता सर्व कळून गुलामगिरीमध्ये जाण्याची दाट शक्यता दिसून येते. म्हणून आज एक दिवस महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस साजरा करून देशात एकात्मता खरोखर टिकेल काय ? देश बदलेल किंवा बदलणार नाही याचा विचार न करता सर्वप्रथम आपले विचार बदलायला हवे तरच ही एकात्मता सर्वत्र दिसून येईल.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक
मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...