Saturday 15 April 2017

लिहिते व्हा......!

लिहिण्याला पर्याय नाही

कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी साहित्याचा वापर करता येतो. म्हणून त्यास खुप महत्त्व दिल्या जाते. ज्यावेळी कागदाचा शोध लागला नव्हता त्यावेळी लोक काय करत असत ? झाडांच्या साली किंवा पानावर काठीद्वारे रेघोटया मारुन लिहिले जायचे. त्याही पूर्वी एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती मुखोद्गत पध्दतीने दिल्या जायची. गुरुकुल पध्दतीमध्ये गुरुच्या मुखातून निघालेली प्रत्येक माहिती, ज्ञान लक्ष देऊन ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. वनस्पतीच्या अर्कापासून रंग तयार करणे आणि टाकद्वारे लिहिण्याची पद्धत पूर्वीच्या काळी दिसून येत होत्या. जसे जसे काळ बदलत गेले तसे तसे लेखन कला देखील विकसित होत गेली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील आज्ञापत्र जर पाहिले तर आपणास लक्षात येईल की लेखनास किती महत्त्व आहे ते. संत रामदास स्वामी यांनी तर लिहिण्याच्या बाबतीत म्हटले आहे की दिसामाजी काही तरी लिहावे. कारण सौ बका एक लिखा सारखेच असते. काही ठिकाणी वारंवार बोलून फायदा होत नसतो किंवा समस्या सूटत नाही त्या ठिकाणी एखादे कागद लिहून पाठवले की चुटकीसरशी काम पूर्ण होते. ज्यास लेखणीची किंमत माहित आहे तो लेखणीला कधीच दूर करत नाही.
वर्षभर कलेेल्या अभ्यासाची लेखी परिक्षेच्या माध्यमातून परिक्षण होते. त्यासाठी लिहिणे आवश्यक आहे. वाचन आणि लेखन ह्या एकमेकाच्या संगतीने राहत असतात. जो चांगल्या प्रकारे वाचन करू शकतो तो उत्तम प्रकारे लेखन करू शकतो. वाचन केल्यामुळे आपल्या जवळ त्या भाषेची शब्दसंपत्ती वाढू लगाते शब्दाची साथ असल्याशिवाय आपल्याला काय व्यक्त करायचे आहे ते व्यक्त करुच शकत नाही. संगणकच्या युगात लिहिणे कमी होत आहे असे जरी वाटत असले तरी लिहिण्याला अजुन तरी पर्याय उपलब्ध नाही. शासन किती ही पेपरलेस कारभार करण्याची संकल्पना केली तरी कागद आणि लिहिणे क्रमप्राप्त आहे. वास्तविक पाहता ज्याचे सुंदर अक्षरात लेखन करण्याची कला आहे त्यास साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान आहे. अक्षरांच्या नियमानुसार जे लेखन करतात त्यास वळणदार अक्षर संबोधिले जाते. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या लेखानाकडे लक्ष दिल्यास लेखन सुधारणा होऊ शकते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जाते मात्र लेखनाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. लेखनाचे प्रामुख्याने दोन प्रकार दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे अनुलेखन, ज्यास पाहून लिहिणे असे म्हटले जाते. प्राथमिक वर्गात सहसा अनुलेखनाकडे लक्ष द्यायला हवे. अनुलेखन करताना मुले प्रत्येक अक्षर कश्या पद्धतीने लिहितो याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी मुलांना सूचना दिल्यास अक्षर लेखनात नक्की सुधारणा होऊ शकते. मात्र नेमके याच ठिकाणी पालक आणि शिक्षकांच्या हातून चूका होतात. प्रत्येक मुलांचे अक्षर वेगवेगळे असते, पण थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार होऊ शकते, हा विश्वास असले पाहिजे. अनुलेखनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर श्रुतलेखनाकडे वळावे लागते. ज्याची श्रवण प्रक्रिया अगदी पूर्ण झाली असेल तेच मूल श्रुतलेखन करू शकते. ऐकून लिहिणे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपे नाही. कारण कोणाला काय ऐकू येते आणि कोण काय समजून घेतो यावर ही लेखन प्रक्रिया अवलंबून आहे. वर्गात सर मुलांना ऐकून लिहिण्यास सांगतात दैवत आणि मुले लिहितात दईवत असे कश्यामुळे होते याचा शोध लावणे अत्यावश्यक आहे. मुलांचे या दोषाचे निदान झाले नाही तर पुढे त्याचा भाषा विकास होणे शक्य नाही. आपले विचार डोक्यात आल्यानंतर त्यास शब्दबध्द करून त्याची मांडणी करणे सर्वाना जमेलच असे ही नाही. कित्येक मंडळी एका शब्दावरुन खुप काही लिहितात त्यास राईचा पर्वत करणे म्हणू शकतो. तर काही मंडळी आपले विचार लिहूच शकत नाहीत. त्यांची नेहमी तक्रार असते की मला साध्या दहा ओळी लिहिता येत नाही. आमच्या गुरुजींनी आम्हाला कधी शिकविले नाही. अन्यथा आम्ही सुध्दा आज शिक्षक म्हणून राहिलो असतो, असे ऐकायला मिळते.
समाजात वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात परंतु सर्वच लोक लिहू शकतात अशी बाब नाही. ज्याला दृष्टी आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे तोच आपल्या लेखणीद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या माध्यमातून जनजागृती केली आणि इंग्रजाना भारतातून हाकालुन दिले. एवढी प्रचंड ताकद या लिहिण्यात आहे. ही ताकद पूर्वी ही होती आणि आजही आहे, यात शंका नाही. आज संगणक च्या युगात डिजिटल शाळा आणि ई लर्निंग मुळे मुले हळूहळू कागदवार लिहिण्यापासून दूर होत आहेत. अक्षरांच्या बटन वर दाब देऊन लेखन करण्याच्या युगात लेखन  कला लोप पावते की काय अशी अनामिक भीती राहून राहून मनात येत राहते. समाजातील प्रत्येक लोकांचा मनामानात आणि घराघरात पोहोचलेला व्यक्ती म्हणणे शिक्षक. लोकांच्या मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नापर्यंत शिक्षकांशिवाय कोणी पोहोचु शकत नाही. त्यामुळे शिक्षक मंडळीनी खास करून लिहिण्यावर भर द्यावा. समाजातील विविध समस्या, प्रश्न आणि शंकेचे निराकरण आपल्या लेखणीच्या मार्गदर्शनातून शिक्षकांने करणे आवश्यक आहे. परमपूज्य साने गुरुजी यांच्या जीवन चरित्राकडे बारकाईने लक्ष दिल्यास एक गोष्ट कळून चूकते की, शिक्षकांच्या लेखणीत समाज परिवर्तन करण्याची ताकद किती मोठ्या प्रमाणात आहे. लिहिणाऱ्या व्यक्तीला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो त्यामुळे तो प्रगल्भ व्यक्ती असतो. शिक्षणाची जागतिक प्रेरणा स्थान ठरलेली मलाला युसूफजाई म्हणते की, माझ्या हातात पुस्तक आणि पेन द्या मी जगात क्रांती करून दाखवेन. ही प्रेरणा लक्षात घेऊन शिक्षकांमध्ये सुधारणा हवी असेल तर ते फक्त लेखनातून विकसित होऊ शकते. रोज एक तरी पान आपल्या मनातील विचार लिहिण्याची पध्दत एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवेल, यात शंका नाही. शिक्षकच मुलांना लिहिते करू शकतात. पण त्यासाठी शिक्षक साहित्याचा रसिक असणे आवश्यक आहे. त्याला स्वतःला लिहिण्याची आवड असेल तरच तो मुलांना याबाबतीत  काही सांगू शकतील. जो शिक्षक लेखक आहे त्यांच्या शाळेतील मुले काही ना काही नवसाहित्य निर्माण करू शकतात. म्हणून शिक्षकांनी कविता, गजल आणि लेख लिहित राहाणे आवश्यक आहे.त्यामुळे शिक्षक मित्रांनो चला उचला लेखणी आणि लागा लिहायला. पहिल्यांदा चुकाल तरच शिकाल ना. जो चुकत नाही सहसा तो शिकत नाही किंवा जो काही करतच नाही तोच चुकत नाही असे म्हणण्यास हरकत नाही. चूका आणि शिका या तत्वानुसार शिक्षकांस समाधानी जीवन जगण्यासाठी लिहिण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Friday 14 April 2017

शाळासिध्दी बाह्यमूल्यमापन गुंडाळले

*शाळा सिध्दी मध्ये नियोजनाचा अभाव*

*A श्रेणीत असलेल्या शाळेची बाह्य मूल्यमापन राज्य निर्धारकामार्फत करण्याचे कार्यक्रम नुकतेच थांबविण्यात आल्याची सूचना मिळाली असल्याची सर्व राज्य निर्धारकाना आश्चर्याचा धक्का बसला. सध्याचे नियोजन स्थगित करण्यामागे काही वेगळेच गौडबंगाल दिसतेय, अशी सर्वच निर्धारकांना शंका येतेय. याबाबत प्रशासनाकडुन खरे कारण समजावे ही एक अपेक्षा आहे.*
शाळा सिध्दी हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे जे की आपल्या राज्यात फार मोठा गाजावाजा करून राबविण्यात आले. वास्तविक पाहता प्रत्येक शाळेने यात सहभाग घेऊन माहिती भरणे का अत्यावश्यक करण्यात आले ? हे कळायाला मार्ग नाही मात्र या निर्णयामुळे तळागाळातील आणि डोंगर दऱ्यातील मुख्याध्यापक लोकांना खुप त्रास सहन करावे लागले. अगदी सुरुवातीला तर हे उपक्रम कळायाला मार्ग नव्हता. जे निर्धारक तयार करण्यात आले होते ते सुध्दा स्वतः संभ्रम अवस्थेत उत्तर देत होते. याची माहिती देखील एक तर इंग्रजी किंवा हिंदीत उपलब्ध होती त्यामुळे मराठी प्रेमी शिक्षकांना त्याच्या त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुख्य सात मुद्याच्या अधारावर संपूर्ण शाळेचे चित्र निर्माण होणार होते आणि 999 गुणापैकी 800 च्या वर गुण मिळविणाऱ्या शाळा A श्रेणी मध्ये गणना झाली होती. त्याच शाळाचे बाह्य मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक विभागात दोन टप्यात राज्य बाह्य निर्धारक तयार करण्यात आले होते जे की A श्रेणी मध्ये असलेल्यां शाळाचे बाह्य मूल्यमापन करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणार होते. त्यासाठी संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात आले होते. तसे काम ही सुरु झाले होते. निर्धारकांच्या अहवालानंतर ही ती शाळा A श्रेणीत येत असेल तर त्या शाळेला तसे प्रमाणपत्र मिळणार असे नियोजन करण्यात आले होते. मात्र या सर्व नियोजनाचे तुर्त्त तरी तीन तेरा वाजले आहे. वास्तविक पाहता या कार्यक्रमात नियोजनाचे अभाव ठळकपणे दिसून येते. त्याच सोबत अधिकारी मंडळीनी या कार्यक्रमाला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही. कदाचित त्यांचा ईगो दुखावला गेला असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण शाळा तपासणीसाठी एक सामान्य शिक्षक राज्य निर्धारक म्हणून जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी  स्वतःहुन या कार्यक्रमापासून दूर केल होते, असे चित्र काही तालुक्यात दिसून आले. काय करायचे ते करून घ्या पण आम्हाला विचारू नका अशी भूमिका घेतल्यामुळे पहिल्या दोन दिवशी निर्धारकाना अनेक संकटाला तोंड द्यावे लागले.
वास्तविक पाहता प्रत्येक तालुक्यात A श्रेणीच्या शाळा कोणत्या हे पाहण्याचे काम तालुका अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी यांची होती. त्यानुसार त्यांनी जी शाळा A श्रेणीत आली आहे ती खरोखर त्या दर्जाची आहे काय ? याची एक वेळा खातरजमा करण्यास हरकत नव्हती. ती शाळा चुकून A श्रेणीत आली असेल तर तसे जर विद्या प्राधिकरणला कळविणे आवश्यक होते. पण तशी तसदी घेतल्या गेली नाही त्यामुळे निर्धारकांना शाळेवर गेल्यावर हिरमोड झाला. शाळेवर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाले नाही कारण त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांना तसे अवगत केले नाही म्हणजे  क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उदासीनता स्पष्ट दिसून येते. निर्धारकाना शाळेवर जाण्या-येण्याची तसेच मुक्काम करण्याच्या गैरसोईमुळे जो त्रास झाला तो अधिकाऱ्यांनी मनावर घेतले असते तर कदाचित झाला नसता, असे वाटते.  तालुक्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दिवसासाठी चार चाकी वाहन आणि चार लोकांची व्यवस्था करण्यासाठी दिवसाकाठी काही रक्कम खर्च करण्याचे आदेश दिले असते तर प्रत्येक तालुका अधिकारी तालुक्यातील A श्रेणीतील संख्येनुसार नियोजन नक्की केले असते. परंतु बाह्य निर्धारकामध्ये शिक्षक मंडळी असल्यामुळे कुणीही तेवढे मनावर घेतले नाही असे दिसते. तरी ही पहिल्या दोन दिवसासाठी शिक्षकांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून दोन दिवस तळपत्या उन्हात, कोसो किमी ची पाय पीट करून खुप त्रास सहन करून मूल्यमापनाचे काम केले. काही  निर्धारकानी आवश्यक स्टेशनरी साहित्य खरेदी करून ठेवली होती. म्हणजे निर्धारकांची खुप तयारी होती हे यावरून दिसून येत नाही काय ? हे काम या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण ही झाले असते मात्र काही मुख्याध्यापकांचे निवेदन आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळा तपासणी चा गाशा सध्या तरी जून - जुलै पर्यंत गुंडाळला गेला. जून मध्ये पावसाळा सुरु होतो त्याचा ही त्रास होणार आहेच. आपल्या राज्यात सर्व ऋतुत त्रास होतो. त्यामुळे बाह्य मूल्यमापनाची प्रक्रिया आत्ताच एप्रिल महिन्यात पूर्ण व्ह्ययला पाहिजे अशी प्रत्येक निर्धारकांची ईच्छा असताना बाह्य मूल्यमापन प्रक्रिया रद्द करण्यात आली. असो काही एक हरकत नाही पुढील महिन्याच्या जून - जुलै महिन्यातील नियोजनावेळी काही गोष्टी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्यात येईल अशी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही.
शेवटी एक नमूद करावेसे वाटते की , जुन-जूलै मध्ये ज्यावेळी बाह्य मूल्यमापन करण्याचे नियोजन होईल त्यावेळी आज जे शिक्षक राज्य निर्धारक म्हणून आहेत त्यांनाच काम देण्यात यावे.  तालुक्यातील A श्रेणीतील शाळा खरोखर त्याच श्रेणीत येतात काय याची खातरजमा गटशिक्षणाधिकारी यांनी करावे तसेच बाह्य मूल्यमापन करण्यासाठी येत असलेल्या राज्य निर्धारकाची शाळेवर येण्या-जाण्याची, राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था विद्या प्राधिकरणाने तालुका प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांचेवर टाकली तरच हे कार्य सफल होईल. अन्यथा निर्धारकाना त्रास होऊन त्याचा आउटपुट बरोबर येणार नाही, असे वाटते.

*नासा येवतीकर, स्तंभलेखक*

Thursday 13 April 2017

शिका, संघटित व्हा


"  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा ते आपल्या आत्याच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ.  सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे.  लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली. 
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय  चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा  हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.

प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांची अभ्यास केले आणि बरीच पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचाअभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी म्हणजे 126 वी जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद 




पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...