Monday, 8 May 2017

मुलांच्या शिक्षणासाठी

कश्यासाठी ? मुलांच्या शिक्षणासाठी..!

प्रत्येक पालकांना वाटते की आपले पाल्य चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावे. चांगल्या शाळेची व्याख्या कशी करता येईल ? जे बाहेरुन खुप सुंदर दिसते, आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे, ती शाळा काहीना चांगली वाटते. ज्या शाळेला भव्य मैदान आणि शिक्षकांची संख्या भरपूर आहे ती शाळा चांगली. ज्या शाळेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो ती शाळा चांगली, पालक वेगवेगळ्या कारणावरुन चांगली शाळा ठरवित असतात. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी घडतात ती शाळा चांगली असते. जेथे शिक्षक विद्यार्थ्याच्या यशासाठी कठोर मेहनत घेतात ती शाळा चांगली. जेथे मुलांना अभ्यासासोबत इतर ही खेळ आणि मूल्य शिकविले जाते ती शाळा चांगली. आपल्या घराशेजारच्या शाळेत सर्व काही उपलब्ध असताना ही काही पालक त्या शाळेत आपल्या पाल्याना प्रवेश देत नाहीत. कारण त्यांना दुरवरच्या शाळेचे आकर्षण असते. पण खरोखरच घराजवळील शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक करणे योग्य वाटते काय ? यावर शासनाने विचार करणे भविष्यात गरजेचे आहे काय ? याविषयी नुकतेच न्यायालयाने सरकारला विचारणा केली आहे की, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये विनाअनुदानित शाळेत मागासवर्गीय आणि दारिद्रयरेषेखलील मुलांना 25 टक्के आरक्षण देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पालकानी शाळेत प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र घराजवळील शाळा सोडून बहुतांश पालकानी घरापासून दुरच्या शाळेची निवड केली कारण ती शाळा नावाजलेली आहे किंवा त्याचा निकाल चांगला लागत असेल. प्रत्येक पालकानी जर त्याच शाळेत प्रवेश हवा म्हणून हट्ट केल्यास कसे चालेल ? म्हणून न्यायालयाने यावर हरकत घेत घराजवळील शाळेत प्रवेशासाठी काय करता येईल ? यावर उपाय सांगण्याचे सरकारला कळविले असल्याची बातमी वाचण्यात आली. वास्तविक पाहता सदरील बाब ही फक्त 25 टक्के प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यापुरती नसून सर्वासाठी आणि सर्व प्रकारच्या शाळेसाठी का विचारात घेऊ नये ? असा ही प्रश्न कधी कधी मनात पडतो. शहरात शंभर मिटरच्या  परिघात चार पाच शाळा तरी असतात. मात्र त्यापैकी एकाच शाळेत मुलांची गर्दी दिसते तर बाकीच्या शाळेत शिक्षक टिकून राहतील एवढी देखील विद्यार्थी संख्या नसते. एकीकडे भरपूर संख्या तर दूसरी कडे हाताच्या बोटावर मोजता येणारी संख्या, एवढा विरोधाभास का निर्माण होत आहे.

पालक मंडळी अश्या शाळेकडे फिरकुन सुध्दा पाहत नाही. त्यातल्या त्यात सरकारी शाळा असेल तर त्याच्या वाटेला ही जात नाही. सरकारी शाळा म्हणजे गरीब मुलांची शाळा असे ब्रीद झाले आहे. आज शहरातल्या सरकारी शाळाची अवस्था खुपच बिकट झाली असून विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त असे चित्र दिसून येत आहे. सर्व शाळेत विद्यार्थी समान प्रवेश घ्यावे अशी काही योजना शिक्षण विभाग का करत नाही ? असा प्रश्न जनसामान्य लोकांना नेहमी पडत असतो मात्र त्याचे उत्तर अजुन तरी मिळाले नाही. कारण घराजवळ शाळेची उपलब्धता असून देखील पालक आपल्या मुलांना गर्दीच्या शाळेतच प्रवेश देतात.
काही शाळेचे संस्थाचालक पालकांना वेगवेगळी आमिष दाखवून विद्यार्थ्याची पळवापळवी करतात हे ऐकुन तर धक्काच बसणे बाकी होते. काही गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी, मुलांसाठी गणवेष, वह्या, पुस्तके, दप्तर किंवा इतर सहित्याचे प्रलोभन देऊन मुले आपल्या शाळेत प्रवेशित केल्याचा घटना ऐकण्यात येतात तेंव्हा खुप आश्चर्य वाटते. पालकाना आपल्या पाल्याना राज्यात नव्हे तर देशात कुठे ही शिकविता येते, तसा त्यांना हक्क आहे. मात्र याच हक्काचा गैरवापर जास्त प्रमाणावर होत असल्यामुळे त्यावर काही निर्बंध घालणे योग्य वाटते. त्यासाठी शाळेत प्रवेश घेताना रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात यावे. म्हणजे ज्या भागातील किंवा गावातील पालक रहिवाशी आहे त्याच भागातील किंवा गावातील शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात यावे. जे असे करणार नाहीत त्यांना कुठल्याच प्रकारची सुविधा देण्यात येऊ नये असे केल्यास सगळ्या शाळेत संख्या समान राहील. ज्या शाळेत विद्यार्थ्याची प्रचंड गर्दी असते त्या शाळेला प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संखेची मर्यादा निश्चित करावी. त्यावरील विद्यार्थ्याची प्रवेशाला परवानगी देण्यात येऊ नये. तालुका शिक्षणाधिकारी यांनी ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची प्रवेशासाठी गर्दी होते त्या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. इतर शाळेत पालक का जात नाहीत याचा मागोवा घेऊन त्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
शहरी भागातील सरकारी शाळेसारखी आत्ता ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. काही इंग्रजी शाळेचे मंडळी गावात स्कुल बस पाठवून गावातील सर्व विद्यार्थी पळवून नेत आहेत. त्यामुळे खेड्यातील सरकारी शाळेत देखील मुलांची संख्या रोडावत चालली आहे. त्यामुळे रहिवाशी प्रमाणपत्राची अट ठेवल्यास मुलांची पळवापळवी थोडी कमी होईल असे वाटते. पालकानी देखील आपल्या लहान मुलांना घरापासून खुप दुरच्या शाळेत पाठवून त्याच्यावर अन्याय करण्यापेक्षा घराजवळील शाळेत प्रवेश घेतल्यास आपल्या मुलांचे शारीरिक आणि मानसिक त्रासापासून बचाव करता येऊ शकेल.
हल्ली प्रत्येक पालकाचे लक्ष मोठ्या शहरातील शिक्षणाकडे लागले आहे. नांदेड, लातूर, अहमदपुर, किंवा औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्याचा लोंढा थांबवायचे असेल तर काही उपाय करणे आवश्यक आहे. शासनाने सरकारी शाळा वाचविण्यासाठी भविष्यात काही उपाय केले नाही तर राज्यातील शिक्षणाचे भविष्य खाजगी व्यक्तीच्या हातात जाण्यास वेळ लागणार नाही. शासनाने शैक्षणिक क्षेत्रात खाजगी लोकांच्या मुक्त संचारावर निर्बंध आणले नाही तर भविष्यात गरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल काय ? याबाबत शंका निर्माण होत आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

Sunday, 7 May 2017

रक्तदान

रक्तदान : सर्वश्रेष्ठ दान

सृष्टीमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने अनेक शोध लावले आहेत आणि संशोधन केले आहेत. त्यामुळे मानवी जीवन सुखदायक होणे शक्य झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याच शास्त्रज्ञाने मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा शोध लावू शकला नाही. भविष्यात त्याचा शोध लागेल की नाही या याबात आत्ताच काही सांगता येणार नाही. रक्ताची निर्मिती कोणत्याही प्रयोगशाळेत शक्य नाही तर ते फक्त जिवंत माणसाच्या शरीरात तयार होऊ शकते. म्हणजे एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासली तर ते मनुष्यच पुरवठा करू शकतो. म्हणूनच सर्व दानात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
निरोगी माणसाच्या शरीरात पाच ते सहा लीटर रक्त नेहमी फिरत असते. त्यापैकी रक्तदान करताना फक्त 350 मिली एवढेच रक्त काढल्या जाते. काही कालावधीनंतर आपले शरीर ते रक्त लगेच भरून काढते. त्यामुळे रक्तदान विषयी आपल्या मनात असलेली भीती सर्वप्रथम दूर होणे अत्यावश्यक आहे. आज ही कित्येक लोकाना रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण न कळाल्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेक प्रकारच्या अनामिक भीती आणि शंका लोकांच्या मनात असल्यामुळे रक्तदान करण्यास पुढे येत नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वात प्रथम लोकांच्या मनातील ही भीती किंवा शंका दूर करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे.
रक्त दिल्याने आपल्या शरीरावर कुठलाही प्रतिकूल परिणाम होणार नाही. काही काळ थकवा आल्यासारखे वाटेल परंतु डॉक्टरांच्या सल्याने जर आपण वागलो तर लगेच पूर्ववत होता येते. तीन महिन्यानंतर परत एकदा रक्तदान करता येते. म्हणजे वर्षातुन चार वेळा आपण रक्तदान करू शकतो. आपण दिलेले रक्त कुण्या एकाचे नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच जणाचे जीव वाचवू शकते. एखादे वेळेचे अन्नदान त्या भुकेल्या व्यक्तीचे एक किंवा दोन वेळच्या भुकेचे शमन करू शकते. एखाद्याला दिलेली आर्थिक मदतीची दान त्याचे जीवन दोन दिवस सुखाचे करू शकते मात्र रक्तदान हे एखाद्या व्यक्तीला आयुष्य प्रदान करू शकते, जे की सर्वात महत्वाचे आहे, असे वाटते.
एखादा गंभीर अपघात झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव होतो. अश्यावेळी त्यास खरी गरज असते रक्ताची. आजकाल तर अपघाताची संख्या भरपूर वाढली आहे. मग ऐनवेळी जर रुग्णास रक्त मिळाले नाही तर त्याच्या जीविताला धोका होऊ शकतो. महिलाना प्रसुतीच्या वेळी प्रचंड रक्तस्राव होतो. अश्या रक्तस्रावासारख्या समस्येला प्रत्येक महिलेला तोंड द्यावे लागते. वेळेवर रक्त मिळाले नाही तर बाळाच्या आईला आणि बाळाच्या जीवितेला धोका असू शकतो. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्यावेळी ही रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. लढाईच्या दरम्यान सैनिक जखमी झाल्यास त्यास रक्ताची गरज भासते. तो आपल्या जीवाचे रक्षण करतो तर त्याच्या जीवाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली नव्हे काय ? जेव्हा आपल्यावर रक्त मिळविण्याचे संकट निर्माण होते त्याच वेळी रक्तदानाचे महत्त्व लक्षात येते त्याशिवाय रक्ताचे महत्त्व लक्षात येत नाही. कुणी रक्तदानच केले नाही तर रक्तपेढ्यात रक्त कुठून येणार ? 
समाजात प्रत्येक ठिकाणी जात, धर्म, पंथ, अमका, तमका असे वर्गीकरण केल्या जाते मात्र रक्त मागणी करताना हे रक्त कुणाचे आहे ? हे विचारल्या जात नाही. कारण सर्वांचे रक्त लाल आणि लालच असते. तसे रक्तात सुद्धा प्रमुख चार गट आहेत. ए, बी, एबी, आणि ओ असे चार रक्तगटाचे प्रकार आहेत. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त कोणालाही चालते म्हणून या रक्तगटाला ' जागतिक रक्तदाता ' असे संबोधिले जाते. अश्या लोकांची संख्या एकूण लोकसंखेच्या 40 ते 46 टक्के एवढी आढळून येते. आपला जो रक्तगट आहे तेच रक्त आपणास दिले जाते.अपवाद  ओ रक्तगट सर्वाना दिला जातो मात्र त्या ओ रक्तगटाच्या व्यक्तीला त्याच रक्तगटाचे रक्त द्यावे लागते. वेळेवर रक्त मिळण्यासाठी प्रत्येकजण शहरातील रक्तपेढ्याकडे धाव घेतात. शिबिराच्या माध्यमातून रक्तपेढ्या रक्त संकलित करीत असतात. म्हणून आपणास वेळेवर रक्त उपलब्ध होत असते. या रक्तपेढ्यात मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन होणेे आवश्यक आहे. महापुरुषाच्या जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा काही विशेष कार्यक्रम असेल तेंव्हा डीजे लावून नाच गाणे करण्यापेक्षा रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्याठिकाणी दहा लीटर रक्त संकलन केल्यास खरी जयंती वा पुण्यतिथी साजरा केल्याचा आनंद मिळेल. वर्षातुन एकदा येणाऱ्या जन्मदिवशी बहुतांशजण आपल्या आणि मित्रांच्या आनंदासाठी बर्थडे पार्टीचे आयोजन करून हजारो पैश्याची उधळपट्टी करतात. त्याऐवजी मित्रांसह सर्वानी रक्तदान करण्याचा निर्णय घेतल्यास बर्थडे बॉयला किंवा गर्लला दीर्घायुष्य तरी लाभेल. एका व्यक्तीने शंभर वेळा रक्तदान करण्यापेक्षा शंभर जणानी एक वेळा केलेले रक्तदान जास्त चांगले ठरेल.
रक्तदान केल्यामुळे असंख्य असे फायदे देखील आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्या रक्ताची यनिमित्ताने चाचणी होते. त्यामुळे आपणास आपल्या निरोगी शरीराची माहिती होते. आपला रक्तगट कळण्यास मदत होते. रक्तदान केल्याने आपणास एक प्रमाणपत्र दिले जाते ज्याच्यामुळे आपणास कधी रक्ताची गरज भासली तर पहिल्या प्रथम प्राधान्याने आपला विचार केला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक समाधान मिळते. रक्तदान करणाऱ्या कर्मचारी व्यक्तीला अर्ध्या दिवसाची पगारी सुट्टी मिळते. सुशिक्षित आणि सज्ञान लोक सुद्धा रक्तदानाच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. म्हणून प्रत्येक कर्मचारी वर्षातुन एकदा तरी रक्तदान करावे अशी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. भविष्यात रक्तदान करणाऱ्या कर्मचारी लोकांना एका दिवसाची पगारी सुट्टी दिली जावी आणि रक्तदान करणाऱ्या कर्मचारी लोकांचा वर्षातुन एकदा जागतिक रेडक्रॉस दिनाच्या दिवशी किंवा अन्य दिवशी यथोचित सत्कार आणि सन्मान केल्यास रक्तदान विषयी लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत मिळू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा सेवाभावी संस्थेने रक्तदान केलेल्या लोकांचा सर्वासमक्ष नागरी सत्कार करावा म्हणजे लोकांत याविषयी जागृती निर्माण होईल. प्रत्येकाने वर्षातुन कमीत कमी एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प केल्यास हजारों लीटर रक्त संकलन होऊ शकते. रक्तदानामुळे नकळतपणे आपल्या हातून एक चांगले कार्य घडते. म्हणून जीवनात रक्तदान करण्यापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही हे समजून घेऊन 18 ते 60 वयोगटातील निरोगी लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri )

कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिम...