Saturday, 21 March 2026

जागतिक कविता दिवस - 21 मार्च ( World Poem Day )

     जागतिक कविता दिनानिमित्त 
" मनातील भावनांना वाट मोकळे करून देणारे शब्द म्हणजे कविता "

।। शुभेच्छा ।।

कवींच्या कवितेला शुभेच्छा
कवयित्रींच्या कवनाला शुभेच्छा
वारकरीच्या भजनाला शुभेच्छा
कबिरांच्या दोह्याला शुभेच्छा

तमाशातल्या लावणीला शुभेच्छा
नाटकातील पद्याला शुभेच्छा
चित्रपटातील गाण्याला शुभेच्छा
शाहिराच्या पोवाड्याला शुभेच्छा

तुकारामाच्या अभंगाला शुभेच्छा
ज्ञानेश्वरांच्या ओव्याला शुभेच्छा
एकनाथांच्या भारुड्याला शुभेच्छा
रामदासांच्या दासबोधाला शुभेच्छा

महात्मा फुलेंच्या अखंडला शुभेच्छा
सावित्रीबाईंच्या बावनकशीला शुभेच्छा
काव्य रचणाऱ्या कवीमनाला शुभेच्छा
काव्य वाचणाऱ्या वाचकांना शुभेच्छा 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्द हेच धन शब्द हेच मन
शब्दामुळेच जिवंत आहे तन

कवितेतील शब्द बोलाविते मला
कवितेतील शब्द जगविते मला

कवितेमध्येच गुंतला माझा प्राण
कवितेनेच दिलाय मान सन्मान

- नासा येवतीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्दांमागून शब्द आले
मनात आले लिहीत गेलो
अनुभवाचे काही विचार
काव्यामधून व्यक्त केलो

कमी शब्दांत जास्त विचार
कवितेतून होतो साकार
आपल्या मनातील भावनांना
कवी कवितेतून देतो आकार

शब्द हेच त्यांचे धन
शब्द हीच त्यांची संपत्ती
शब्दांचे भाव जोडले की
होते नव्या कवितेची उत्पत्ती

कविता वाचायला सोपी पण
समजायला अवघड असते
शब्दांमधून उतरलेल्या भावना
कवींचे हळवे मन सांगते

- नासा येवतीकर, 9423625769
21 मार्च 2020 @ 08:02 pm
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

कविता कशी करावी ?
साधी करावी, सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी

कविता कोठे करावी ?
घरात करावी, बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी

कविता कोणावर करावी ?
आई वर करावी
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी

कविता का करावी ?
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
जागतिक कविता दिनानिमित्त सर्व कवी व कवयित्री यांना मनापासून शुभेच्छा ....!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगणे कसे असावे ? 

जगतात किडे मुंगी ही
जगण्याला अर्थ असावे
आपले जगणे कसे असावे ?

कोणी आठवण काढेल
आपले काम असे असावे
आपले जगणे कसे असावे

चार माणसात नाव निघेल
आपले वागणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

कुणालाही दुखावणार नाही
आपले बोलणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

डोक्यात उच्च विचार ठेवावे
आपले राहणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

शंभर दिवस शेळी होण्यापेक्षा
एक दिवस सिंहासारखे जगावे
आपले जगणे कसे असावे ?

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - जीवनगाणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
........ कविता ........

जो तो उठतो नि करतो कविता
म्हणतो सर्वाना कशी वाटली कविता

चार दोन शब्दाची करतो कविता
म्हणतो माझा प्राण आहे कविता

कवींचे मन सांगत असते कविता
कवींच्या भावना कळवते कविता

मनोरंजनासाठी वाचावी का कविता ?
विरंगुळा म्हणून लिहावी का कविता ?

सर्वाना हवीहवीशी वाटते कविता
मनातल्या भावना व्यक्त करते कविता

- नासा@26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आज जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने दोन शब्द .......
साहित्यिक मित्रांनो, कुणाचे साहित्य चोरी करू नका. इतरांचे साहित्य आवडले असेल तर प्रामाणिकपणे त्यांच्या नावासकट पुढे पाठवत राहावे. स्वनिर्मिती मध्ये जो आनंद असतो तो आनंद साहित्य चोरी करून आपल्या नावाने publish करण्यात कधीच नसते. म्हणून सध्याच्या काळात जी साहित्याची चोरी जे की फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ती थांबवू या, एवढीच विनंती .........!

जागतिक कविता दिनानिमित्त वरील कविता आवडली तर मनातून शुभेच्छा द्या 
....... धन्यवाद ....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769



Wednesday, 18 March 2026

दिनविशेष माहिती - 20 मार्च ( World Sparrow Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 20 मार्च अर्थात जागतिक चिमणी दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण चिमणी या पक्ष्याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

        जागतिक चिमणी दिवस

World Sparrow Day हा दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे चिमण्यांचे संरक्षण करणे आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. एकेकाळी घराच्या अंगणात आणि शहरांमध्ये सहज दिसणारी चिमणी आज अनेक ठिकाणी दिसेनासी झाली आहे. म्हणून ग. दि. माडगूळकर यांचे गाणे या चिमण्यांनो, परत फिरा रे.... घराकडे आपुल्या..... हे आजच्या दिवसाला तंतोतंत लागू होते.
निसर्गाची ओळख आपणाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. लहानपणी याच चिमणीला पाहून आपणाला खूप खूप आनंद ही होत असे, नाही का !
पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. याची सुरुवात भारतातील Nature Forever Society या संस्थेने केली. या उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी Mohammed Dilawar यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली.
चिमणी हा एक छोटा आणि सुंदर पक्षी आहे. चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो. ती मानवी वसाहतीच्या आसपास, घरांच्या छपरांमध्ये किंवा झाडांवर घरटे बांधते. चिमणी प्रामुख्याने धान्य, किडे आणि बिया खाते. चिमणी पर्यावरणासाठी उपयुक्त आहे कारण ती किडे खाऊन संतुलन राखते. तिचा चिवचिवाट खूप मधुर असतो. तिच्यामुळे कोणाचे नुकसान होत नाही.
विशेषतः House Sparrow ही प्रजाती भारतात मोठ्या प्रमाणावर आढळते. मात्र वाढते शहरीकरण, अंगणाची कमतरता, झाडांची कमी झालेली संख्या आणि घरांच्या रचना यात बदल झाल्यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
जागतिक चिमणी दिवस आपल्याला निसर्ग आणि पक्ष्यांचे महत्त्व समजावून देतो. चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण झाडे लावणे, घरट्यांची व्यवस्था करणे आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे यासारखे छोटे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - चिमणीचा आवाज कसा असतो ?
बरोबर उत्तर आहे, चिव चिव हा चिमणीचा आवाज आहे. 

दुसरा प्रश्न - पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा पाळला होता ?
बरोबर उत्तर आहे, पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला.

तिसरा प्रश्न - जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे कोणाचे मोठे योगदान आहे ?
बरोबर उत्तर आहे, जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी Mohammed Dilawar यांचे मोठे योगदान आहे.

चौथा प्रश्न - चिमणीचा रंग कसा असतो ?
बरोबर उत्तर आहे, चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - या चिमण्यांनो, परत फिरा रे...... हे गीत कुणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे - या चिमण्यांनो, परत फिरा रे...... हे गीत कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 17 March 2026

दिनविशेष माहिती - 18 मार्च ( Rudolf Diesel )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण डिझेल इंजिनचा शोध लावणारे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

              रुडॉल्फ डिझेल
रुडॉल्फ डिझेल हे जर्मन अभियंता आणि संशोधक होते. त्यांनी डिझेल इंजिन या महत्त्वपूर्ण शोधाचा शोध लावला. त्यांच्या या शोधामुळे वाहतूक, उद्योग आणि शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडली.
रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी पॅरिस येथे झाला. त्यांचे आई-वडील जर्मन वंशाचे होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि यंत्रांबद्दल खूप उत्सुकता होती. पुढे त्यांनी जर्मनीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंजिनांची कार्यक्षमता कमी होती. त्यामुळे कमी इंधनात जास्त शक्ती निर्माण करणारे इंजिन तयार करण्याचा विचार रुडॉल्फ डिझेल यांनी केला. अनेक वर्षांच्या प्रयोगांनंतर त्यांनी १८९७ साली पहिले यशस्वी डिझेल इंजिन तयार केले. या इंजिनात इंधन जाळण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ते अधिक शक्तिशाली आणि किफायतशीर ठरले.
डिझेल इंजिनचा वापर पुढे ट्रक, बस, जहाजे, रेल्वे आणि विविध यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे उद्योग आणि वाहतूक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने झाला.
रुडॉल्फ डिझेल यांचे १९१३ मध्ये निधन झाले. त्यांच्या शोधामुळे आजही जगभरातील लाखो वाहने आणि यंत्रे कार्यरत आहेत.
रुडॉल्फ डिझेल हे महान संशोधक होते. त्यांच्या डिझेल इंजिनाच्या शोधामुळे आधुनिक उद्योग आणि वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळाले. म्हणूनच त्यांचे नाव विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कायम आदराने घेतले जाते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी पॅरिस येथे झाला. 

दुसरा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांनी कशाचा शोध लावला ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला. 

तिसरा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांना लहानपणापासूनच कशाची उत्सुकता होती ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि यंत्रांबद्दल खूप उत्सुकता होती. 

चौथा प्रश्न - डिझेल इंजिनवर चालणाऱ्या काही यंत्राची नावे सांगा.
बरोबर उत्तर आहे, बस, ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, बुलडोझर, जहाज, रोड रोलर, आणि डिझेल कार 

शेवटचा पाचवा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - रुडॉल्फ डिझेल यांचे २९  सप्टेंबर १९१३ मध्ये निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 16 March 2026

दिनविशेष माहिती - 17 मार्च ( Kalpna Chavala )

               नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

               कल्पना चावला
कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती. त्यांच्या धाडस, मेहनत आणि जिद्दीमुळे त्या जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते, आणि त्यांच्या वडिलांचा छोटा व्यवसाय होता. लहानपणापासूनच कल्पना यांना आकाश आणि तारे यांच्याबद्दल विशेष आकर्षण होते. रात्रीच्या वेळी त्या तासन्तास आकाशाकडे पाहत आणि तार्‍यांबद्दल स्वप्ने पाहत. त्यांच्या या स्वप्नांनीच त्यांना भविष्यात अंतराळवीर बनण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या या उत्साहाला नेहमीच पाठिंबा देत असे, ज्यामुळे त्यांना आपले ध्येय निश्चित करण्यात मदत झाली.
त्या लहानपणापासून अत्यंत हुशार आणि मेहनती होत्या. त्यांना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये विशेष आवड होती. 
कल्पना यांनी चंदीगड येथील पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदविका प्राप्त केली, ज्यामुळे त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान अनेक अडचणींचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. १९८८ मध्ये, कल्पना यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले, ज्यामुळे त्यांना नासा नॅशनल ऐरोनौटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९९४ मध्ये, कल्पना यांची नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी होती. 
१९९७ मध्ये, कल्पना यांना त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. २००३ मध्ये, कल्पना यांना दुसऱ्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. त्या कोलंबिया अंतराळ यानाच्या STS-107 मोहिमेत सहभागी होत्या. ही मोहीम १६ जानेवारी २००३ रोजी सुरू झाली. १६ दिवस चाललेल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात सुमारे ३८२ तास घालवले आणि पृथ्वीभोवती २५५ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पण दुर्दैवाने १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीवर परत येताना कोलंबिया अंतराळ यानाचा अपघात झाला आणि त्यातील सात अंतराळविरांचा मृत्यू झाला. त्यात कल्पना चावलाचाही समावेश होता. 
कल्पना यांचे जीवन म्हणजे एका सामान्य मुलीने असामान्य यश मिळवण्याची कहाणी आहे. 
आज कल्पना चावला यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कल्पना चावला यांचा कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. 

दुसरा प्रश्न - अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती.

तिसरा प्रश्न - कल्पना चावला यांना कोणत्या विषयांमध्ये विशेष आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये कल्पना चावला यांना विशेष आवड होती. 

चौथा प्रश्न - कल्पना चावला यांना पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी केव्हा मिळाली ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांना १९९७ मध्ये पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कल्पना चावला यांचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे - कोलंबिया अंतराळ यानाच्या अपघातात दिनांक १ फेब्रुवारी २००३ रोजी कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 15 March 2026

दिनविशेष माहिती - 16 मार्च ( Malhar Rao Holkar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण मल्हारराव होळकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार आणि होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला.
मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात धनगर समाजातील खंडोजी होळकर आणि सीताबाई होळकर यांच्या पोटी झाला. गावावरून त्यांचे नाव होळकर असे झाले. बालपणापासूनच मल्हारराव धाडसी, कष्टाळू आणि युद्धकौशल्यात पारंगत होते. मल्हारराव तीन वर्षाचे असताना वडिलांचे मृत्यू झाले. त्यामुळे ते आपल्या आईसोबत मामाच्या गावी खानदेशात तळोदे येथे गेले. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले. त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना लवकरच मोठे पद मिळाले. मल्हाररावांनी उत्तर भारतात अनेक मोहिमा केल्या आणि मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढविण्यात मोठी भूमिका बजावली. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.
मल्हारराव होळकर यांनी मध्य भारतातील इंदूर परिसरात आपले राज्य मजबूत केले. त्यामुळे होळकर घराण्याचा पाया भक्कम झाला. मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एक पुत्र म्हणजे खंडेराव. दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून खंडेराव मरण पावले. त्यावेळी त्यांची सुन अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय न्यायी आणि उत्तम प्रकारे कारभार चालवला.
मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली. मल्हारराव होळकर हे फक्त शूर योद्धेच नव्हते तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी प्रजेची काळजी घेतली, व्यापार आणि शेतीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांना लोकांचा मोठा आदर मिळाला.
२० मे १७६६ रोजी मल्हारराव होळकर यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे त्यांचे नाव मराठा इतिहासात कायम अजरामर झाले आहे.
आज मल्हारराव होळकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम ! 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - मल्हारराव होळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात झाला.

दुसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव खंडेराव असे होते.

तिसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव अहिल्यादेवी होळकर असे होते

चौथा प्रश्न - मल्हाररावांनी किती लढाया मध्ये भाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.

शेवटचा पाचवा प्रश्न - मल्हारराव होळकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - मल्हारराव होळकर यांचे २० मे १७६६ रोजी निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार

विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बे...