नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
कल्पना चावला
कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती. त्यांच्या धाडस, मेहनत आणि जिद्दीमुळे त्या जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते, आणि त्यांच्या वडिलांचा छोटा व्यवसाय होता. लहानपणापासूनच कल्पना यांना आकाश आणि तारे यांच्याबद्दल विशेष आकर्षण होते. रात्रीच्या वेळी त्या तासन्तास आकाशाकडे पाहत आणि तार्यांबद्दल स्वप्ने पाहत. त्यांच्या या स्वप्नांनीच त्यांना भविष्यात अंतराळवीर बनण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या या उत्साहाला नेहमीच पाठिंबा देत असे, ज्यामुळे त्यांना आपले ध्येय निश्चित करण्यात मदत झाली.
त्या लहानपणापासून अत्यंत हुशार आणि मेहनती होत्या. त्यांना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये विशेष आवड होती.
कल्पना यांनी चंदीगड येथील पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदविका प्राप्त केली, ज्यामुळे त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान अनेक अडचणींचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. १९८८ मध्ये, कल्पना यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले, ज्यामुळे त्यांना नासा नॅशनल ऐरोनौटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९९४ मध्ये, कल्पना यांची नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी होती.
१९९७ मध्ये, कल्पना यांना त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. २००३ मध्ये, कल्पना यांना दुसऱ्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. त्या कोलंबिया अंतराळ यानाच्या STS-107 मोहिमेत सहभागी होत्या. ही मोहीम १६ जानेवारी २००३ रोजी सुरू झाली. १६ दिवस चाललेल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात सुमारे ३८२ तास घालवले आणि पृथ्वीभोवती २५५ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पण दुर्दैवाने १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीवर परत येताना कोलंबिया अंतराळ यानाचा अपघात झाला आणि त्यातील सात अंतराळविरांचा मृत्यू झाला. त्यात कल्पना चावलाचाही समावेश होता.
कल्पना यांचे जीवन म्हणजे एका सामान्य मुलीने असामान्य यश मिळवण्याची कहाणी आहे.
आज कल्पना चावला यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - कल्पना चावला यांचा कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला.
दुसरा प्रश्न - अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती.
तिसरा प्रश्न - कल्पना चावला यांना कोणत्या विषयांमध्ये विशेष आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये कल्पना चावला यांना विशेष आवड होती.
चौथा प्रश्न - कल्पना चावला यांना पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी केव्हा मिळाली ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांना १९९७ मध्ये पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कल्पना चावला यांचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे - कोलंबिया अंतराळ यानाच्या अपघातात दिनांक १ फेब्रुवारी २००३ रोजी कल्पना चावला यांचा मृत्यू झाला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment