विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार
धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथील मुख्याध्यापक कृष्णा येरावार सर हे आज 30 एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्याने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख देणारा छोटासा प्रयत्न.
कृष्णा येरावार यांचा जन्म धर्माबाद शहरात 02 एप्रिल 1968 रोजी धर्मापुरी व सौ. कमल यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील अध्यापक विद्यालय मधून डी. एड. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिनांक 07 जुलै 1992 रोजी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. केंद्रातील जि. प. प्रा. शाळा खैरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी सुरुवात केली. तेथे दहा वर्षाच्या सेवेनंतर 2002 मध्ये त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील दहा वर्षाची सेवा केल्यानंतर 2012 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा मंगनाळी येथे झाली. याठिकाणी त्यांनी 90 हजाराची लोकवर्गणी मिळवून शाळा डिजिटल केली, अतिक्रमित असलेली जागा शाळेला मिळवून दिली आणि मैदानात 100 झाडाचे वृक्षारोपण करून एक नवा आदर्श निर्माण केला होता. सहा वर्षाच्या सेवेनंतर समायोजन प्रक्रियेत पुन्हा 2018 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील त्यांनी शाळा खोली बांधकाम, स्वछतागृह, किचनशेड बांधकाम, वॉटर फिल्टर बसवले आणि 15 व्या वित्त आयोगातून शाळेचा विकास घडवून आणला. सन 2024 मध्ये या शाळेचा समावेश पी एम श्री शाळेत झाला. त्यामुळे शाळेतील भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य यासह शाळा अजून सुंदर व आकर्षक बनवण्यात कृष्णा येरावार यांचा सिंहाचा वाटा आहे. 8 वर्षाच्या सेवेनंतर आज 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे ते नांदेड जिल्हा परिषदेतून 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत.
सेवानिवृत्तीचा हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा व भावनिक असा आहे. अनेक वर्षांच्या अखंड सेवेनंतर ते आज शासकीय कार्यातून निवृत्त होत असले, तरी समाजसेवा आणि ज्ञानदानाच्या कार्यातून ते कधीच निवृत्त होणार नाहीत.
कृष्णा येरावार हे एक चांगले शिक्षक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. जि. प. प्रा. शाळा मंगनाळी व बेल्लूर बु. शाळेत त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करणे, कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने घडवणे, ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले.
ते एक कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणूनही ओळखले जातात. बेल्लूर बु. येथील शाळेची प्रगती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेला नवी दिशा मिळाली. विद्यार्थी लाभाच्या योजना राबवून सर्वाना लाभ मिळवून दिला.
कृष्णा येरावार हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण करण्याचे काम BLO म्हणून यशस्वीरित्या काम केले आणि सामाजिक जाणीवा निर्माण करणारे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना 2007 मध्ये धर्माबाद तालुका गुरु गौरव पुरस्कार व 2018 मध्ये नांदेड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत.
शिक्षकांच्या हक्कांसाठी व शैक्षणिक प्रश्नांसाठी ते शिक्षक संघटनेत सक्रिय कार्यरत राहिले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तयार राहायचे. सहकाऱ्यांना नेहमी मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि एकजूट ठेवणे, ही त्यांची मोठी ताकद होती.
शैक्षणिक वर्तुळात त्यांनी नेहमीच चांगले काम करून आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्यामुळे अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. ते खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरले.
कृष्णा येरावार सरांच्या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. राधिका यांचा विशेष सहभाग आहे. संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी सरांना नेहमी प्रेरणा, साथ आणि बळ दिले. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे येरावार यांचे कुटुंब होय.
त्यांचा मोठा मुलगा अभिषेक हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून हैद्राबाद येथे खाजगी कंपनीत काम करतो तर दुसरा मुलगा अक्षय हा सध्या पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार, मेहनत आणि मूल्ये जपत स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवले आहे. हीच त्यांच्या आयुष्यभराच्या परिश्रमांची खरी कमाई आहे.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभक्षणी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. त्यांचे पुढील भावी आयुष्य आनंदमय, शांततामय आणि यशस्वी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चारोळी
ज्ञानदीप ज्यांनी तेवत ठेवला,
विद्यार्थ्यांचा जीवनमार्ग उजळवला।
कर्तव्याचा ध्यास जपला सदैव,
शिक्षणातून घडवला नवा मेव।
आज निवृत्तीचा सोहळा सुंदर,
आशीर्वाद राहो तुमचा अखंड निरंतर।
आरोग्य, आनंद लाभो आयुष्यभर,
कृष्णा सरांना मानाचा मुजरा सादर।
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment