Tuesday, 25 August 2026

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. प्रत्येक समाजाचा सण वेगळा, त्याची परंपरा वेगळी; पण त्या प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतो माणूस आणि माणुसकीचा विचार. म्हणूनच सण हे केवळ आनंद साजरा करण्याचे दिवस नसून समाजाला जोडणारे संस्कारपर्व आहेत.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या जीवनातून प्रेम, दया, सत्य, प्रामाणिकपणा, परोपकार, बंधुभाव आणि शांततेची प्रेरणा मिळते. गरजूंची मदत करणे, दुर्बलांशी प्रेमाने वागणे आणि समाजात सौहार्द निर्माण करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा संदेश आहे.
दिवाळीचा प्रकाश अंधारावर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो. आपल्या मनातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकता दूर करून चांगुलपणाचा प्रकाश निर्माण करण्याची शिकवण तो देतो.
ईद आपल्याला वाटून घेण्याची, दानशीलतेची आणि बंधुभावाची भावना शिकवते. आपल्या आनंदात दुसऱ्यालाही सहभागी करून घेणे आणि गरजू व्यक्तीची काळजी घेणे, हा या सणामागील सुंदर विचार आहे.
ख्रिसमस प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. बुद्ध पौर्णिमा शांतता, संयम आणि करुणेची वाट दाखवते. महावीर जयंती अहिंसा आणि आत्मसंयमाचे महत्त्व सांगते. गुरुनानक जयंती सेवा, समानता आणि बंधुभावाची प्रेरणा देते. गुरुपौर्णिमा गुरूंच्या ज्ञानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते.
म्हणजेच सण वेगळे असले तरी मूल्ये समान आहेत.
आजच्या काळात या संदेशाची गरज अधिक आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे; पण कधी कधी मनामनांमध्ये दुरावा निर्माण होतो. सोशल मीडियावर अफवा, गैरसमज किंवा द्वेषपूर्ण संदेश पसरताना दिसतात. अशा वेळी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कोणत्याही धर्माचा अपमान होईल असे बोलणे किंवा लिहिणे टाळले पाहिजे. मतभेद असतील तर संवाद साधला पाहिजे आणि गैरसमज असतील तर ते प्रेमाने दूर केले पाहिजेत.
सण जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाहीत. शाळेतही या विचारांची सुरुवात झाली पाहिजे. वेगवेगळ्या धर्मांचे विद्यार्थी एकाच वर्गात शिकतात, एकत्र खेळतात, एकमेकांना मदत करतात. मित्राचा सण कोणताही असो, त्याला शुभेच्छा देणे आणि त्याच्या श्रद्धेचा आदर करणे, हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे.
आपण एखाद्या सणाचा आनंद साजरा करताना त्यामागील मूल्यही आत्मसात केले पाहिजे. दिवाळीत प्रकाश, ईदमध्ये बंधुभाव, ख्रिसमसमध्ये प्रेम, बुद्ध पौर्णिमेत शांतता, महावीर जयंतीत अहिंसा आणि गुरुनानक जयंतीत सेवा ही मूल्ये जर आपल्या रोजच्या जीवनात उतरली, तर प्रत्येक दिवस सणासारखा सुंदर होईल.
आज गरज आहे ती धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्याची नव्हे, तर माणुसकीच्या नावावर पूल बांधण्याची.
चला, सणांच्या निमित्ताने एक संकल्प करूया, 
धर्म कोणताही असो, माणुसकी मोठी मानूया.
सण कोणताही असो, प्रेमाचा संदेश देऊया.
मतभेद असले तरी मनभेद होऊ देऊ नका.
द्वेषाला नाही, मैत्रीला स्थान देऊया.
आणि विविधतेतून एकतेचा सुंदर भारत घडवूया.
कारण शेवटी
“सण वेगळे, परंपरा वेगळ्या,
पण माणुसकीची भाषा एकच;
प्रार्थना वेगवेगळ्या असल्या,
तरी प्रेमाचा देव एकच!”

हीच आपल्या सर्व सणांची खरी शिकवण आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे.

ईद-ए-मिलाद निमित्ताने शुभेच्छा .......!

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...