Wednesday 14 December 2022

World Tea Day ( चहा दिवस )

जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. चहा विषयी वाचू या मनातील भाव

जागतिक चहा दिवस निमित्ताने

एक कप चहा

प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते. 
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे. 
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...