गोष्ट लहान पण काम महान
जगप्रसिद्ध ग्वेन डायर वर्ल्ड व्ह्यू स्तंभाखालील वुई आर फ्रॉग इन दी पॉट या लेखातून त्यांच्या शीर्षक अर्थ सांगतो की, बेडूक उचलून जर उष्ण पाण्यात टाकले तर ते चटकन उडी मारुन बाहेर पडते. मात्र तेच जर थंड पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवले आणि मंद आचेवर ठेवून पाणी हळूहळू तापविले तर बेडूक छान पैकी शिजते परंतु भांड्यातून उडी मारून बाहेर येत नाही. ह्या प्रयोगातून आपण काय शिकतो ? तर आज आपली सुद्धा अवस्था त्या बेडकासारखीच झाली आहे. पुढे लेखक म्हणतो की, जागतिक बँकेच्या अप्रकाशित अहवालानुसार तापमान जर अधिक दोन सेल्सिअस डिग्रीने वाढले तर भारतीय अन्नधान्य उत्पादन 25 टक्क्यांनी आणि चीनचे 38 टक्क्यांनी घटेल तसेच भूजल साठेही संपलेले असतील. यावरूनच लेखकाने वरील प्रयोगाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. देशाच्या राजधानीपासून ते गल्लीबोळातल्या रिकामटेकड्या युवकांपर्यंत सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे. यापुढे आपण सर्वजण काय करावे ? यापेक्षा काय करू नये ? यावरच जास्त भर दिलेले बरे वाटते. कारण काही करा म्हटलं की आपले मानवी मन लवकर तयारच होत नाही तसेच त्यास तन-मन-धन याचीही गरज भासते आणि करू नये म्हटले की ज्या ठिकाणी आपण आहोत तेथील परिस्थितीचा विचार करून शक्यतो तसे करण्याचे टाळावे म्हणजेच नकळत आपण काहीतरी करीत असतोच.
सध्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्रत्येकांच्या घरात जेवढे सदस्य तेवढ्या गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे आज इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत असे आपण म्हणतो. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा इंधनाच्या दराची तुलना जर आजच्या दराशी केली तर त्यात जवळपास अडीच पट वाढ झालेली दिसून येते. पुढील दहा वर्षात या इंधनाचे दर वाढून पाच पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी आपण काय करणार ? आपल्या सर्व गाड्या अशावेळी भंगारमध्ये विकून टाकण्याची वेळ आपणावर तर येणार नाही काय ? याचा असा नुसता विचार जरी केला तरी अंगावर शहारे येतात. तेव्हा आपणाला त्या बेडकाचे उदाहरण तंतोतंत लागू पडल्यासारखे वाटते. जेव्हा टंचाई वा उणीव वाटते त्याच वेळी माणूस जागा होतो इतर वेळी मात्र त्याचा अपव्यय करतो.
पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाची निर्मिती करणे निश्चितच आपल्या हातात नाही मात्र त्या इंधनाची आपण नक्कीच बचत करू शकतो. शहरात किंवा एक-दोन किलोमीटरच्या आत फिरत असताना शक्यतो गाडीचा वापर टाळणे योग्य राहील. त्यासाठी पर्याय म्हणून पायी जाणे किंवा सायकलीचा वापर केल्यास आपला शारीरिक व्यायाम तर होईलच शिवाय वाटीभर इंधनाची बचत ही होईल. आपली बचत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची बचत आहे ही जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. गाडीचा वापर शक्यतो अशा ठिकाणी केला जावा ज्या ठिकाणी गाडीशिवाय पर्यायच नसतो. मात्र आजकाल आपण स्वतःची इमेज, स्टेटस व इगो यामुळे या समस्याकडे संपूर्णपणे कानाडोळा करून वागत आहोत. आज आपणाला याविषयी काही चटका किंवा त्रास जाणवत नसल्यामुळे त्याचे काहीच वाटेनासे होत आहे मात्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा संपून गेला, तर आपले काय हाल होतील ? याचा नुसता विचार जरी केला तरी डोकं सुन्न पडते. त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने इंधनाची बचत करावी. इंधन बचत करण्यात स्वतःचा पैसा वाचला यापेक्षा देशाची संपत्ती वाचली हे महत्त्वाचे आहे.
विजेची बाबसुद्धा इंधनासारखीच आहे. विजेची निर्मिती करणे हे सामान्य माणसाच्या हातात नाही मात्र पावलोपावली त्याची बचत करता येते. बचत म्हणजे एक प्रकारे वीज निर्मितीत होय. त्यास्तव अत्यंत जागरूकपणे विजेचा वापर करणे आवश्यक आहे. दिवसा घराचे दारे व खिडक्या खुल्या ठेवून सूर्यप्रकाशाचा वापर करण्याऐवजी दारे-खिडक्या बंद करून विजेच्या दिव्याचा वापर करतो हे खरोखरच आपल्या बुद्धीला पटते का ? गरज नसताना पंखे व दिवे बंद करणे आवश्यक आहे. मनोरंजनाचा विचार केल्यास पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेथे रेडिओ होता त्याची जागा आता टीवी आणि संगणकाने घेतली आहे. आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांना त्याचे वेड लागले आहे आणि प्रत्येकाना ती हवीहवीशी वाटते. मात्र रोजच्या टीव्ही पाहण्यामुळे आपल्या कुटुंबाचा एक युनिट वीज खर्ची पडतो, थोडाफार बचत करता येईल काय ? याचा विचार करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहूच नये असे मुळीच नाही मात्र सर्वांनी मिळून जे काही बघता येईल ते जर पाहिले आणि टीव्ही सेट बंद केला तर आपल्या कुटुंबात खूप काही बदल बघायला मिळेल. विजेची बचत होईल हे तर होणारच शिवाय लहान मुले व मोठी माणसे यांच्यात संवाद वाढेल म्हणजे त्यांच्यात आत्मीयता निर्माण होईल. मात्र याच टीव्हीमुळे आज कुटुंबातील सर्व सदस्य एकाच छताखाली एकाच घरात राहून विभक्त असल्यासारखे वाटत आहे, लहान मुले अजिबात ऐकेनाशी झाली, कुटुंबप्रमुखाचे कामात लक्ष नाही, गृहिणीचे स्वयंपाकात लक्ष नाही कारण त्यांचे सर्वांचे लक्ष टीव्हीवरील कार्यक्रमाने वेधून घेतलेले असते. त्यामुळे इतर बाबीकडे अजिबात लक्ष जात नाही. तसेच जुन्या बल्ब किंवा यंत्राचा वापर शक्यतो टाळावा. कारण जुनी यंत्रे नवीन यंत्रापेक्षा जास्त वीज खर्च करतात आणि त्याचा लाभ सुद्धा आपणाला कमीच मिळतो. त्यास्तव विजेची बचत करण्यासाठी जे काही आपल्याला शक्य होते ते सर्व करावे कारण पुढे हीच बचत आपल्या कामाला येऊ शकते.
घरात वापरल्या जाणाऱ्या गॅसचा वापर करतानाही महिलांनी सहजपणे वापर करणे आवश्यक आहे. स्वयंपाक संपल्यानंतर गॅसचा मेन स्विच बंद करण्यास कधीही विसरू नये ही छोटीशी सवय आपणाला अनेक धोक्यापासून वाचविते आणि नकळत त्या ठिकाणी आपली बचतही होते. हिवाळ्याच्या मोसमात पाणी गरम करण्यासाठी गॅसचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यास्तव त्याकाळात गॅसची टाकी लवकर संपत असल्याची जाणीव महिलांना होत असते. त्याऐवजी महिलावर्गाने सौरबंब बसविण्याचे घर प्रमुखाकडे मागणी करून त्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास इंधन बचत नक्कीच होईल. सौर ऊर्जा हे एक असे इंधन आहे जे की कधीच संपणार नाही. त्याचा वापर करण्यावर महिलांनी पुढाकार घेतल्यास भविष्यातील त्यांची बरीच काही कटकट कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही वस्तू मुबलक प्रमाणात मिळत असले की, त्याचा वापर आपण कसे ही करतो. जसे की पाणी. भारतात जवळपास सर्वच भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळते म्हणून पाण्याची कोणी ही बचत करीत नाहीत. पण ज्यावेळी कडक उन्हाळा पडतो त्यावेळी हीच माणसे घोटभर पाण्यासाठी त्रासून जातात. पाण्याची निर्मिती देखील आपण करू शकत नाही. ती नैसर्गिक देणगी आहे. शेती करताना कमी पाण्याचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे. मात्र फार कमी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. सार्वजनिक नळाद्वारे शासन पाणीपुरवठा करते मात्र नळाला तोटी न लावता बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जाते. या वाया जाणाऱ्या पाण्याची कोणालाही चिंता किंवा काळजी नाही. भविष्यात नळाला देखील मीटर बसवून नळपट्टी वसूल केल्यास पाणी अपव्ययावर निश्चित आळा बसू शकेल असे वाटते. काही मंडळी पाण्याचा पैसा करीत आहेत. याबाबीकडे शासनाने लक्ष घालून नैसर्गिक देणगी असलेल्या साठ्याचे व्यवहार बंद करावे. अन्यथा येत्या काही वर्षात इंधनासारखे पाणी देखील विकत घ्यावे लागेल. आज ही पाणी विकतच घेत आहोत मात्र यात वाढ होईल, असे वाटते.
मी एकटा असे वागलो तर समाजात काय फरक पडतो ? सागरात चिमूटभर साखर टाकल्याने संपूर्ण सागरातील पाणी गोड कधीच होऊ शकत नाही, अशी विचारधारा ठेवण्यापेक्षा थेंब थेंब साचून तळे तयार होत असते अशा विचाराने प्रत्येक जण वागू लागले तर भविष्यात आपण फार मोठी लढाई जिंकू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपली8 नकारात्मक विचारशैली बदलणे गरजेचे आहे. यासारख्या अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्याच्याकडे जागरूकपणे लक्ष दिल्यास आपल्या हातून फार महान काम होऊ शकते. पर्यावरणाला वाचविण्यासाठी जागो माणूस जागो, आपण ही जागे व्हा आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वाना जागे करा. त्या बेडकासारखी आपली अवस्था होऊ नये याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment