Monday 2 April 2018

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण

मुलांनो, आपणास जर कोणी तू असा आहेस किंवा तू तसा आहेस ? अशी दोष दाखवणारी वाक्ये ऐकविली की, आपणाला समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो. आपल्या गुणांची प्रशंसा किंवा तारीफ केली की आपला आनंद गगनात मावेनासा होतो, हे साहजिकच आहे. मात्र जर कोणी आपल्यातील दोष दाखवत असतील तर त्यांना आपण धन्यवाद म्हटले पाहिजे. कारण त्यानिमित्ताने आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न तरी करतो. डेल कार्नेगी हा प्रसिद्ध तत्त्वज्ञानी म्हणतो की, 99 टक्के लोक असे असतात की स्वतःचा दोष किंवा स्वतःची चूक कबूल करायला ते तयार नसतात. म्हणून त्यांच्यातील ते दोष कधीच घालवू शकत नाहीत. आरशावर जेव्हा धूळ साचते तेव्हा त्याच्यावरून हात फिरवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरशावरील धूळ जात नाही आणि आपली प्रतिमा चांगली दिसत नाही. घरामध्ये वावरत असताना आई-वडील भाऊ-बहीण हे आपल्याला आपल्यात असलेले दोष दाखवितात तर शाळेत गुरुजींकडून हे काम होते. लहान असताना प्रत्येकजण आपल्यातील गुणदोषांचे विवेचन करतात. मात्र आपण मोठे झाल्यावर, कळते झाल्यावर आपणाला मग कोणी याविषयी बोलत नाही. विशेषकरून शाळेतील शिक्षकांकडून आपल्यातील दोष, उणीवा व कमतरता स्पष्टपणे कळाल्या तर त्यांच्याकडून मिळालेली दोष दूर करण्याचे उपाय व त्यावरील मार्गदर्शनसुद्धा फारच मोलाचे ठरते. ब्रुयर यांनी म्हटल्याप्रमाणे हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे परंतु एक दोष दूर करणे फार कठीण आहे. म्हणूनच शालेय वयात सर्व दोष दूर कसे करता येतील ? या विचाराने वागत राहिल्यास आपल्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते. आपल्याकडे भरपूर गुण असून सुद्धा एका अवगुणामुळे आपली प्रगती खुंटते. समाजात मान-सन्मान मिळत नाही. एवढेच काय कधीकधी नोकरीसुद्धा मिळत नाही. जेव्हा लोक आपल्या बाबतीत त्यांची सर्व गुण चांगले आहेत मात्र एकच अवगुण आहे, असे बोलतात तेव्हा मन उदास होते. म्हणूनच फ्रेंकलिन म्हणतो की, आपल्या मृत्यूपूर्वी स्वतःचे दोष नष्ट करा म्हणजेच आपण सगळ्यांच्या स्मरणात राहू. तसे पाहिले तर जगात भगवंताशिवाय परिपूर्ण असा कोणीच नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष, उणीवा किंवा कमतरता नक्कीच असते. अजून एक बाब आपण नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे इतरांचे दोष दाखविताना ते दोष आपल्यात नाहीत ना ! याचे आत्मपरीक्षण करून जाणून घ्यावे. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे आपली अवस्था होऊ शकते.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...