Thursday 11 January 2018

राजमाता जिजाऊ जयंती विशेष

आई असावी जिजाऊसारखी

कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते खरोखरच ज्यास आई नाही त्यालाच वरील ओळीचा अनुभव येईल. आईंची महती शब्दात व्यक्त करणे कठिण आहे. एक कवी आईला आपल्या कवितेत प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई असे संबोधतो. आपल्या जीवनाला वळण देणारी, आपले जीवन संस्कारक्षम करणारी म्हणजे आई. वडिलांचे संस्कार आपणास धाडसी करतात तर आईचे संस्कार आपणास मायाळू बनवतात. आईच्या वागणुकीवर मुलांचे वागणे अवलंबून असते. ज्या घरातील आई ही उद्योगी, सतत क्रियाशील, प्रेमळ, इतर लोकांना मदत करणारी असते त्यांची मुले सुद्धा त्याच वृत्तीची तयार होतात. या गोष्टीचा आपण कधीही विचार न करता लहान मुलांसमोर घरात वावरत असतो. लहान मुले टीप कागदाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात आणि त्याचे अनुकरण देखील करतात. प्रत्येक मुलांची कुटुंब ही पहिली शाळा आहे तर आई ही त्यांची पहिली शिक्षिका. वडील म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक समजू या. कुटुंबामधून मुलांना प्रत्येक गोष्टीचे संस्कार नकळत होत राहते. संस्कार जाणीवपूर्वक करता येत नाही मात्र तसे जाणीवपूर्वक वर्तन केल्यास मुलांवर नक्की फरक पडतो. कधी कधी आपण लहान मुलांसमोर नकळत खोटे बोलतो मग मुले ही खोटे बोलण्यास सुरुवात करतात. खोटे बोलू नका अशी आपली शिकवण असते आणि आपणच जर मुलांसमोर खोटे बोलत असू तर त्याचा खरोखर चांगला परिणाम बघायला मिळेल काय ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येते. कुटुंबातील शिक्षण हीच मुलांची खरी प्रगती दर्शवित असते. म्हणून तर शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात एखाद्या वेळी कुपुत्र म्हणजे वाइट मुलगा जन्मास येऊ शकतो मात्र कुमाता म्हणजे वाइट आई जन्मास येणे अशक्य आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांविषयी चांगले तेच पाहते.
जगात असे अनेक उदाहरण आहेत ज्या ठिकाणी आईच्या सहवासामुळे ते व्यक्ती महान झाले. ज्यात पहिले नाव येते अर्थात साने गुरुजी यांचे. यशोदा सारखी आई लाभली नसती तर कदाचित श्याम सारखा मुलगा पाहायला मिळाला नसता. तिच्या वागण्या बोलण्यातुन श्याम म्हणजे साने गुरुजी घडले. त्या नंतर दुसरे नाव आवर्जून घ्यावे वाटते ते म्हणजे विनोबा भावे. विनोबा लहान असताना त्यांची आई शेजारच्या लोकांना खूप मदत करीत असे. असाच एक प्रसंग विनोबाजी वर संस्कार करून गेला. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची. एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस. आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजा-याचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते. दुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी  नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले. विनोबाच्या मनात प्रेम, माया हे संस्कार त्यांच्या आईच्या वागणुकीतून रुजत गेले. सहज केलेले वर्तन बरेच काही शिकवून जाते. यांच्या आई सारखी आपली आई आहे काय ? मी श्यामची आई किंवा विनोबाच्या आई सारखी बनू शकते का ? याचा कधी आपण विचार करीत नाही. समाजात अजून एकनआई आहे ज्यांच्याकडे सर्वच जण आदर्श माता म्हणून पाहतो ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे यांच्याशी  दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीला रामायण आणि महाभारतातील शुर वीराच्या गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता इत्यादी गोष्टी सांगितल्या. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजीराजे घडले. जिजाबाईनी  नुसत्या याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर आपल्या शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस सुध्दा दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. राजमाता जिजाऊमुळे छत्रपती शिवाजी राजे घडले. म्हणून प्रत्येक जण म्हणतो की आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी. ज्याना कुणाला अशी आई मिळते त्यांचे जीवन खरोखरच धन्य होते. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

2 comments:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...