सेमी इंग्रजीची समस्या
राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.
इंग्रजी माध्यमासाठी सेमी इंग्रजी हा एक उत्तम पर्याय आहे असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. मात्र खरोखरच सेमी इंग्रजी आपल्या सर्वसाधारण आणि सरकारी शाळेतील मुलांसाठी फायदेशीर किंवा चांगले आहे काय ? यावर विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते. अन्यथा सेमी वर्गातील त्या विद्यार्थ्याचे एक वर्षाचे आयुष्य बरबाद झाले म्हणून समजा. त्या विद्यार्थ्याची अवस्था खुपच बिकट होते कारण त्याला मराठीचे अंक आणि त्याचे वाचन देखील कळत नाही. ही फार मोठी समस्या दिसत आहे. याही पेक्षा भयानक चित्र शाळेत दिसून येते.
इंग्रजी माध्यमात जाणारी मुले मराठी शाळेत यावेत म्हणून सेमी इंग्रजी हा पर्याय काही वर्षापूर्वी राज्यात सुरु करण्यात आला. आजपर्यंत त्याचा आढावा घेण्यात आला नाही की सेमी इंग्रजी खरोखर प्रभावी आहे काय ? उच्च प्राथमिक शाळेत कदाचित सेमी योग्य आहे असे वाटते. मात्र प्राथमिक वर्गात या सेमीमुळे पूर्ण गोंधळ उडालेला आहे याची कोणालाही काही देणे घेणे नाही. त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत या सेमीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. प्रशासकीय आणि क्षेत्रीय अधिकारी मंडळीनी सरकारी शाळेत गेल्या दोन वर्षापासून कंपलसरी सेमी वर्ग सुरु करण्याची सूचना दिली. कोणतेही वर्ग सुरु करण्यासाठी संचालकाची परवानगी घ्यावी लागते. तर सध्या सरकारी शाळेत जे सेमी इंग्रजी शाळा सुरु करण्यात आल्या त्यास संचालकाची परवानगी घेतली आहे काय ? अशी ही शंका राहून राहून पालकांच्या मनात येते. त्यामुळे प्रत्येक सरकारी शाळेत पहिल्या वर्गा पासून सेमीचा वर्ग सुरु करण्यात आला. सेमी म्हणजे फक्त गणित विषय तेवढा इंग्रजीत शिकवायचे आणि बाकी सर्व मराठीत. मुख्याध्यापकानी आपापल्या शाळेत सेमी सुरु केले पण आज एवढ्या अडचणीत सापडले आहेत की, काय करावे हे त्यांना सुचत नाही. पालकाना तर यातले काहीच माहित नाही. एका हुशार मुलाच्या पालकाने आमच्या एका सराजवळ तक्रार केली की, याला गणित काहीच येत नाही. सराना देखील आश्चर्य वाटले कारण त्याला गणितामध्ये सर्व येते. मग सर अंक दाखवून वाचन घेतले असता तो त्या अंकाचे वाचन इंग्रजीत योग्य करीत होता. पालकानी त्यावर म्हणाले हे बरोबर आहे सर पण मराठीत ओळखता येत नाही ना. पाच म्हणले तर त्याला कळत नाही, इंग्रजीत फाइव म्हणले की कळते. यावर शिक्षक म्हणाले हो बरोबर आहे तो सेमीच्या वर्गात आहे. त्याला इंग्रजी मधूनच शिकविण्यात आले. त्याला मराठीत कसे कळणार ? ही एक प्रमुख समस्या आज शिक्षक आणि पालकासमोर उभी आहे. वास्तविक पाहता इयत्ता पहिल्या वर्गापासून सेमीचा वर्ग सुरु करण्याची खरेच आवश्यकता होती काय ? तसे तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्णा मोरे यांनी सन 2000 या वर्षापासून इयता पहिली पासून इंग्रजी विषय अनिवार्य केले होते. त्या विषयाच्या माध्यमातून मुलांना इंग्रजीमधून अंक ओळख करता आली असती. त्यासाठी सेमी वर्ग सुरु केलाच पाहिजे असा प्रशासनाचा हट्ट कश्यासाठी ? हे न समझणारे कोडे आहे.
प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता -
सेमी इंग्रजी वर्ग सुरु तर करण्यात आले मात्र त्या वर्गाला शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता सर्वत्र जाणवत होती. ही समस्या मात्र कोणी लक्षात घेत नाही. वर्गाला एक शिक्षक तर नाही उलट वर्गाची संख्या जास्त शिक्षकांची संख्या कमी यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतेच होते शिवाय सेमी इंग्रजी ही मराठी माध्यमातील शिक्षकांनीच शिकवावे म्हणजे किती शोकांतिका आहे. प्राथमिक शिक्षक सर्व काही करू शकतो ही भावना कुठे तरी कमी व्ह्ययला पाहिजे. इंग्रजी विषयाच्या माध्यमातून मुलांना इंग्रजीत अंक ओळख आणि वाचन करण्यास शिकविणे अवघड नाही. पण सेमी इंग्रजीचे भूत पालकांच्या मानगुटीवरुन उतरवणे आवश्यक. मातृभाषेतुन जेवढ्या लवकर आकलन होते तेवढ्या लवकर इतर कोणत्याच भाषेतुन होत नाही. बाकी इतर सर्व मुले मराठीत अंक वाचन करतात तेंव्हा सेमी वर्गातील विद्यार्थी बुचकळ्यात पडतात.
गणितासारखा विषय इयता पहिली पासून इंग्रजी मध्ये शिकविल्याने ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील आणि वंचित समाजातील मुले-मुली अशिक्षित राहण्याचा मोठा धोका निर्माण होऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक गळतीचे प्रमाण देखील वाढीस लागण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. प्राथमिक शिक्षणाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी न राहता तणावपूर्ण झाली आहे. प्रगत महाराष्ट्र मधील भावी पिढी शिक्षणापासून वंचित आणि अप्रगत राहू नये यासाठी प्राथमिक शाळा मध्ये सुरु असलेले सेमी इंग्रजी वर्ग तात्काळ प्रभावाने बंद व्हावे असे काही मराठी प्रेमी पालकाची मागणी अगदी रास्त वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
nagorao26@gmail.com
No comments:
Post a Comment